Tuesday 31 July 2012

१ एप्रिल २००५ - (भाग १) एक एप्रिल फुल!

माझ्या आयुष्यातील हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी मी केंब्रीज विद्यापीठात शिकत होते. थीसीसचे काम चालू होते. भारतात फिल्ड वर्कला जाण्यासाठी म्हणून दोन महिने आधीच १ एप्रिल २००५ चं हिथ्रो-मुंबई व्ह्याया अमान (जॉर्डनची राजधानी) असं साधारण ४०० पाऊंडाचं तिकीट (नॉन रीफंडेबल, नॉन कॅन्सलेबल, नॉन पोस्टपोनेबल) असं आधीच काढून ठेवलेलं होतं. सहापेक्षा जास्त महिन्यांनी एक महिन्यासाठी घरी जाणार असल्याने तसा उत्साह होता. आधीच फिल्डवर्कच्या डेट्स घेऊन ठेवलेल्या होत्या. डेटा कलेक्षन झालं की डेटा अ‍ॅनालीसीस करून थीसीस लिहून झाला की पदवी हातात. पण अडचणी न येता माझं आयुष्य सरळसोट असेल तर कसलं माझं आयुष्य? अपेक्षेप्रमाणे अडचणींची मालिका चालू झाली.
http://www.wolfson.cam.ac.uk/sites/default/files/imported/tour/newblock/v-block.jpg
तीन आठवडे आधी माझ्या सुपरवायझरने मी त्याला दुरूस्त करून दिलेला ड्राफ्ट न वाचता जुनाच वाचला आणि मला चक्क म्हणाला की तू आधी दिलेलं काम केलेलंच नाहीयेस. मग मी त्याला जेव्हा माझ्या इ-मेल मधील सेंट फोल्डर मधील ड्राफ्ट दाखवला तेव्हा त्याला स्वत:ची चूक समजली. पण हा माणूस ब्रिटीश. स्वत:ची चूक काही कबूल केली नाही. म्हणजे मला तोंडदेखलं सॉरी म्हणाला पण लगेच पाहू बरं असं म्हणून माझ्या इ-मेलचा ताबा त्याने घेतला. काय होतंय किंवा काय होऊ शकेल हे समजायच्या आतच ह्या माणसाने माझी ती इ-मेल डीलीट आणि एक्सपंज करून टाकली. म्हणजे थोडक्यात त्याने मी त्याला काम करून पाठवलेल्या ड्राफ्टचं प्रुफ नाहीसं केलं. आणि थंड डोक्याने मला म्हणाला जा आता मला पुन्हा तो ड्राफ्ट पाठव. मला भयंकर चीड आली होती. त्याने माझी ती टुटोरीअल चुकवली. केंब्रीज विद्यापीठात कामाचं भयंकर प्रेशर असतं त्यातून मोजक्याच ट्युटोरीयल्स मिळायच्या त्यात पुन्हा ह्या माणसाने हे असले रंग दाखवायला सुरूवात केली त्यामुळे माझ्या मनावर प्रचंड ताण आला. अशातच मी रूमवर आले. ज्यावेळी मनावर प्रेशर असतं त्यावेळी आपल्याला भयानक स्वप्नं पडतात. माझंही तेच झालं.

मी पुण्याला घरी पोहोचलेली होते आणि सगळ्यांबरोबर रात्री झोपलेली असताना मला अचानक जाग आली की माझा लॅपटॉप मी प्रवासाच्या ट्रान्झीट मधे कुठेतरी विसरले. मी एकदम किंचाळलेच आणि दचकुन जागी झाले. मी माझ्या केंब्रीज मधल्या रूममधेच हो्ते आणि माझ्या भारत प्रवासास साधारण १७-१८ दिवस हो्ते. अत्तापर्यंत केलेलं थीसीसचं काम लॅपटॉप मधे होतं आणि लॅपटॉप चोरीला जाणं म्हणजे अत्तापर्यंत केलेल्या कामावर पाणी फिरवण्यासारखं होतं. त्यावेळी मी लॅपटॉप नविनच वापरायला सुरूवात केली होती. त्यामुळे डेटा बॅक अप वगैरेपासून मी काही अंतर दूर होते. १५ दिवसात एक-एक करत माझी कामे पूर्ण करत आणली आणि आता एक महिन्यासाठी भारतात जायला मी तयार होते. तसं माझ्या ब्लॉक मेट्सना सांगूनही टाकलं. माझा एक जर्मन मित्र (ब्लॉकमेट आणि किचन-मेट) ख्रिश्चनने मला निघायच्या आदल्याच दिवशी साधारण रात्री आठच्या सुमारास म्हणाला की उद्या ह्यावेळी तू तुझ्या घरी असशील नं? त्याला फारशी भारतात जायला किती वेळ लागतो याची कल्पना नसावी. मग मी त्याला सांगीतलं की माझी फ्लाईट संध्याकाळी साडे-पाचची आहे. कदाचित उद्या ह्यावेळी मी अमान विमानतळावर असेन किंवा अमानच्या मार्गावर असेन.
http://www.arabiansupplychain.com/pictures/Gulf%20Air.jpg
माझाही तसा हा एकटीने पहिलाच इंटर्नॅशनल विमानप्रवास होता. कारण ऑक्टोबर मधे येताना आम्ही दिल्लीहून ३० सीसीटी स्कॉलर्स एकत्रआलो होतो. हिथ्रोवरही आम्हाला आमचे सिनीअर्स घ्यायला आले होते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आलेला नव्हता. पंधरा दिवसांपूर्वीच्या त्या भयानक स्वप्नाने माझ्या मनात मात्रं ह्या प्रवासाबद्धल प्रचंड धाकधूक होती. कुठेतरी असं वाटत होतं की हा प्रवास टाळता आला तर बरं होईल. माझी रूम सोडावी असं वाटतच नव्हतं. ह्या अशा मन:स्थीतीच १ एप्रिल २००५ ची सकाळ उजाडली. सकाळी सकाळी सगळं आवरून मी तयार होते. हिथ्रोला जाणारी बस सकाळी १०.३० वाजता ड्रमर स्ट्रीट बस स्टेशन पासून सुटणार होती. माझा प्रवास अगदी नियोजनबद्ध असल्याने मी परतीचंही एक महिन्यानंतरचं तिकीट काढून ठेवलेलं होतं. तिथे अशी पद्धत असे की एकदा काढलेलं तिकीट पुढच्या बसला चालत नसे. माझं विमान हिथ्रोहून संध्याकाळी ५.३० ला होतं. त्यामुळे तीन तास आधी चेक-इन साठी पोहोचायचं होतं. केंब्रीज ते हिथ्रो साधारण तीन तास असं सगळं मोजून मी १०.३० च्या बसचं तिकीट काढलं होतं. सकाळी आठलाच पॅन्थर कॅबला फोन करून साडे नऊ वाजताची कॅब बुक केली. मी ज्यावेळी कॅब बुक करत होते  त्याचवेळी मला तिथे काहीतरी गडबड झाल्याची शंका आली. पण मी दुर्लक्ष केलं. तसं ड्रमर स्ट्रीट आमच्या कॉलेजपासून अगदी ५ मिनीटांच्या अंतरवर होतं. पण माझ्याकडे एक मोठी चेक-इन ची बॅग आणि एक केबीन लगेज, एक लॅपटॉप आणि माझी पर्स असं सामान होतं. म्हणून मी कॅबने प्रवास करायचं ठरवलं होतं. साडे नऊ झाले तरी कॅब आली नाही म्हणून मी कॅबला पुन्हा फोन लावला. पुन्हा गडबड चालूच होती. तीन वेळा माझा कॉल उचलूनही कोणीच बोललं नाही.
http://img-ipad.lisisoft.com/imgmic/2/0/2015-1-taxis-conventionnes.jpg
अशातच दहा वाजले मी पुन्हा फोन लावला. ह्यावेळी पलिकडून कोणीतरी बोललं. मी ९.३० च्या कॅब बद्धल विचारलं तर त्या व्यक्तीने सांगीतलं असं काही बुकींग झालेलं नाहीये. तोपर्यंत १०.१० झाले होते आणि माझं बीपी वाढायला सुरूवात झाली. मग मी पुन्हा कॅब बुक केली. आणि १०.३० ची बस असल्याने लवकरात लवकर कॅब पाठवण्यास सांगीतले. १०.२० झाले तरी एकाही कॅबचा पत्ता नाही. माझं टेन्शन अजुनच वाढत चाललं. केंब्रीज मधे कॅब बुक करूनच जावं लागतं. हात दाखवून थांबत नाहीत (आता मेरू कॅबची कशी सीस्टीम आहे तशीच सीस्टीम होती). इतकं सामान घेऊन १०.३० ची बस मी कशी गाठणार आणि ती बस चुकली तर पुढचा सगळा प्लॅन बारगळेल आणि विमान सुटेल असे सगळे विचित्र विचार मनात यायला सुरूवात झाली. तेवढ्यात १०.२५ वाजता एक पॅंन्थर कॅब आली. एक लेडी ड्रायव्हर होती. तिने पटापट माझ्या बॅग्स डीकीत टाकल्या, लॅपटॉप आणि पर्स सकट मी कॅब मधे बसले. तोपर्यंत १०.२७ झाले होते. कॅब चालू झाल्या झाल्या मी त्या ड्रायव्हरला मला ड्रमर स्ट्रीट्ला १०.३० ची हिथ्रोला जाणारी बस पकडायची आहे आणि पुढे भारतात जाण्यासाठी विमान पकडायचं आहे. तर जरा लवकर चालव असे सांगीतले. त्या ड्रायव्हरनेही गाडी अतीशय रॅश चालवत नेली आणि आम्ही १०.३५ ला ड्रमर स्ट्रीट्ला पोहोचलो. हिथ्रोची बस आणि ऑक्सफर्डची बस यांत बरीच जागा होती. म्हणून त्या ड्रायव्हरने गाडी त्या दोन बसच्या जागेत लावली.
http://farm6.staticflickr.com/5265/5575114362_edb7b4ef7f_n.jpg
माझ्या बसचा ड्रायव्हर लोकांचं सामान डीकीत ठेवत होता. त्यामुळे मी त्या कॅब ड्रायव्हरला म्हणाले मी १ मिनीटात त्या ड्रायव्हरला थांबायला सांगून येते. माझ्या एका खांद्यावर लॅपटॉप आणि दुसर्‍या खांद्यावर पर्स होती. त्या स्वप्नामुळे डोक्यात पक्कं होतं की लॅपटॉप खांद्यावरून उतरवायचा नाही. बरं त्या ड्रायव्हरला पैसे दिल्याशिवाय ती जाणार नाही ही खात्री आणि दोन्ही खांद्यावर सामान घेऊन पळणं अवघड म्हणून पर्स कॅब मधेच ठेवली. मी अगदी अर्ध्या मिनीटात त्या बसच्या ड्रायव्हरला सांगून आले की मी दोन मिनीटात सामान घेऊन येते. परत येते तोपर्यंत कॅब ड्रायव्हरने माझं डीकीतलं सगळं सामान रस्त्यावर काढून ठेवलं होतं आणि ती माझ्याकडून पैसे मिळण्यची वाट बघत होती. आमच्या कॉलेजपासून ड्रमर स्ट्रीट बस स्टेशनला जायला ५ पाऊंड पडायचे म्हणून मी ५ पाऊंडाची नोट माझ्या जीन्सच्या खिशात ठेवलेली होती. पैसे देण्याआधी मी कॅब मधे पाहीलं तर माझी पर्स जागेवर नव्हती. त्यामुळे मला वाटलं की इतर सामानाबरोबर ती पर्सही तिने काढून ठेवलेली असणार. मी तिला ५ पाऊंडाची नोट दिली आणि ती बाई जोरात बॅक ड्राईव्ह करत सुसाट वेगाने निघून गेली.

तिचा वेग इतका होता की बॅक ड्राईव्ह करताना तिने माझ्या दोन्ही बॅग्स धक्क्याने रस्त्यावर पाडल्या. बॅगा सावरत असताना माझ्या लक्षात आलं की आपली पर्स दिसत नाहीये. मग माझी खात्रीच पटली की त्या ड्रायव्हरने माझी पर्स मिसप्लेस केली होती. माझ्याकडील विमन प्रवासाचे रिटर्न तिकीट, बॅंकेची डेबीट-क्रेडीट कार्ड्स, पासपोर्ट-व्हीसा, लायब्ररीचे पुस्तक, सगळे फोन नंबर्स असलेली डायरी, कॉलेज-युनीव्हर्सीटी आणि लायब्ररी कार्ड्स, ५० पाऊंड रोख, २००० रूपये रोख इ. अतिमहत्त्वाच्या गोष्टी त्यात होत्या. बरं माझ्याकडे कंबरेला लावायचं पाऊच होतं की ज्यात मी तिकीट, पासपोर्ट ठेवलेला होता ते पाऊच बस मधे बसल्यावर कंबरेला लावू या होशोबाने पर्स मधे ठेवलेलं होतं. लायब्ररीचं पुस्तक मधे सहा तासांची ट्रान्झीट असल्याने वाचायला बरोबर ठेवलेलं होतं. तिथेच जवळ आमच्या सीसीटी च्या ग्रुप मधला एक मित्र रहात होता मी त्याचं घर गाठलं. तो आजारी असल्याने घरीच होता. नाहीतर त्यावेळी सगळ्यांचीच थीसीसची कामं आणि सबमीशन्स चालू होती. मी त्याला घडलेला प्रकार सांगीतला. तो म्हणाला एकदा कॉलेजमधे फोन करून विचार. तिथे फोन करूनही उपयोग झाला नाही. या सगळ्यात १० मिनीटे गेली. मग आम्ही पहिल्यांदा एचएस बी सी बॅंकेला फोन लावून माझी डेबीट आणि क्रेडीट कार्डस कॅन्सल केली. पॅन्थर कॅबच्या ऑफीसमधे फोन लावला तर त्यांनी हात झटकले. मग आम्ही आमच्या ग्रुपच्या मित्रांना मदतीसाठी बोलवायला फोन करायला सुरूवात केली. पण कुणाचा फोनवरून घडलेल्या घटनेवर विश्वासच बसेना. कारण अगदी २० मिनीटेच आधी आमच्या त्या मित्राने सगळ्यांना एप्रिल फुलची एक कॉमन इ-मेल केली होती.
http://www.ci.cambridge.mn.us/vertical/Sites/%7B5533C7E1-8680-4785-B452-36CB5E1255D8%7D/uploads/%7B659051E9-6DAF-480D-8B64-129DCEE08ED8%7D.JPG
तास झाला तरी कोणीच येण्याची चिन्हे दिसेनात म्हणून मग आम्ही दोघे ड्रमर स्ट्रीट पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवायला गेलो. तिथल्या पोलीसाने ताबडतोब नोंदीला सुरूवात केली. पर्स मधील सामानाची लिस्ट सांगत असताना माझा मोबाईल सुद्धा पर्समधेच असल्याचे लक्षात आले. मग मोबाईलवर त्या पोलीसाने फोन करून बघीतला. नुसतीच रींग वाजत राहीली आणि व्हॉईस मेसेज मधे कॉल गेला. पोलीसाने तिथे मेसेज ठेवला की हा मोबाईल ज्या पर्समधे आहे त्या पर्समधील महत्त्वाची कागदपत्रे ड्रमर स्ट्रीट पोलीस स्टेशनला आणून द्यावीत. त्याने मला हे ताबडतोब लंडन मधील इंडीयन एम्बसीला कळवावे असे सांगीतले. कारण त्याच्या मते माझा पासपोर्ट चोरणे हा एकमेव उद्देश यामागे असू शकतो. म्हणून चोरीला गेलेला पासपोर्टचा नंबर तिथे सांगीतला की मग ते एअरपोर्टला अ‍ॅलर्ट राहतील. माझ्या आशा थोड्या पल्लवीत झाल्या. पण ते काही फारकाळ टिकलं नाही. मी त्या पोलीसाला सांगीतलं की त्या लेडी कॅब ड्रायव्हरला मी ओळखू शकते. तुम्ही तिची चौकशी करा. तो पोलीस मला म्हणतो तुमच्याकडे काय प्रुफ आहे की ती पर्स तिनेच चोरली आहे. आता जर असं चोरीचं प्रुफ मिळणार असतं तर मी चोरी होऊ दिली असती का? असो. मी गप्प बसले.
http://www.cambridge2000.com/gallery/images/PC0729567e.jpg
आम्ही परत त्या मित्राच्या घरी आलो. त्याने त्याच्या ओळखीच्या एकांना फोन करून लंडन मधील इंडीयन एम्बसीच्या संदर्भात फोन करून विचारलं. त्यांनी सांगीतलं की शुक्रवारी दुपारी १.३० वाजता इंडीअन एम्बसी बंद होते. त्यामुळे जे काही करायचं आहे ते सोमवारीच करायला लागेल. त्याने तीन पर्याय सांगीतले. अ) नविन पासपोर्टला इथेच इमर्जन्सी मधे अ‍ॅप्लाय करणे आणि पासपोर्ट व्हीसा घेऊन मगच सगळं काम संपवून भारतात जावे. ब) कुठेही न जा्ता तसंच इथे रहाणं आणि सगळं काम संपल्यावर भारतात परत जावं. क) इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंटला अ‍ॅप्लाय करून आठ दिवसात ते मिळवून मग आठ दिवसांनी भारतात जावं. एकूण परीस्थीती पाहता मला तिसरा पर्याय अधिक योग्य वाटला. हे सगळं होई पर्यंत दुपारचे दीड वाजले. आमच्या स्टोरीत किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी आमच्या मित्रांपैकी एकजण आला. त्याला सुरूवातीला खरंच वाटेना. मग पुन्हा सगळं सांगीतल्यावर खरं वाटलं आणि त्यानेच इतर ३ जणांना फोन करून बोलावून घेतलं. मग आम्ही चौघे टॅक्सी करून पुन्हा एकदा पॅन्थरच्या मेन ऑफीसमधे गेलो. तिथेही त्यांनी उडवुन लावलं. माझ्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा यांच्या झेरॉक्स कॉपीज नव्हत्या. दोन कॉपीज होत्या त्या पुण्याला होत्या. मग एचएसबीसी बॅंकेत सुरूवातीला खातं उघडताना व्हिसाची एक कॉपी दिली होती. बॅंकेकडून व्हिसाची कॉपी मिळाली. तोपर्यंत चार वाजले होते.

म्हटलं घरी फोन करून घडलेला प्रकार कळवावा तर लक्षात आलं की घरी कोणीच नाहीये कारण माझे वडिल गोव्याला गेले होते. मला या घटनेच्या धक्यामुळे फक्त घरचा लॅंन्डलाईन फोन नंबर आठवत होता. बाकी सगळं एकदम ब्लॅंक झाल्यासारखं झालं होतं. बहिणीचा घरचा नंबर देखिल आठवत नव्हता. बाबांचा मोबाईल नंबर आठवत नव्हता. शेवटी मी एक रायटींग पॅड घेऊन त्यावर रॅंडमली नंबर्स लिहायला सुरूवात केली. मग २०-३० नंबर्स लिहील्यावर माझ्या मोठ्या बहिणीच्या घरचा नंबर मला आठवला. मी लगेच तिकदे फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगीतली. घरून पासपोर्टच्या झेरॉक्स स्कॅन करून पाठवायला सांगीतल्या. त्यांना वाटलं हे सगळं हिथ्रो विमानतळावर झालं त्यामुळे ते अजुनच गोंधळले. इकडे संध्याकाळ झाल्याने आणि बाकीच्यांनाही आपापली सबमीशन्स असल्याने मला त्यांनी सुखरूप कॉलेजमधे रूमवर सोडले आणि ते निघून गेले. रूमची चावी, सुटकेसच्या चाव्या मी माझ्या जीन्सच्या खिशात ठेवल्यामुळे वाचल्या. सुटकेस मधे चेकबुक्स ठेवल्याने ताबडतोब चेकने पैसे काढता आले. तरीही एकूण सगळं नुकसान बघता ६५० पाऊंडाचं नुकसान झालेलं. आणि ते एका लॅपटॉपच्या त्यावेळच्या किंमती इतकं होतं. म्हणजे १६ दिवसांपूर्वी मला घटनेची वॉर्नींग मिळाली होती. असो.
http://www.zen60163.zen.co.uk/CUTwCWebContent/Social/PubCrawls/ThePickerelInn.jpg
जेव्हा कठीण समय येतो त्यावेळेसच माणसांची खरी ओळख पटत असते. मी रूममधे एकटीच बसले होते. रस्त्यावर येणं म्हणजे काय असतं आणि हातात काहीच नसणं यात काय समाधान असतं हे दोनही मी त्या वेळी अनुभवलं. डोळे बंद केले तरी सगळी घटना एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी डोळ्यांसमोरून जात असे. फ्लाईट चुकल्याचं आणि फिल्डवर्कच्या डेट्स गेल्याचं वाईट वाटत होतं. तेवढ्यात माझ्या रूममधला दिवा चालू पाहून तो जर्मन मित्रं आणि त्याची गर्लफ्रेंड माझ्या रूमपाशी आले आणि त्यांनी बेल दाबली. मी दरवाजा उघडल्यावर मला पाहूनच त्याला लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलेलं दिसतंय. त्याला तशी शंका आधीच आली कारण आदल्याच दिवशी आमचं किचन मधे मी घरी जाणार असं बोलणं झालं होतं. तो एक्सपेरीमेंटल सायकॉलॉजी मधे पोस्ट डॉक करत होता. त्याने ताबडतोब मला रूम मधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या बरोबर पब मधे येण्याचं आमंत्रण दिलं. मी त्याआधी कधीच पब मधे गेले नसल्याने मी नको नको म्हणत होते. पण त्याने आग्रह धरला. त्याला माहीती होतं की मी दारू, बीअर काहीच पीत नाही. तो म्हणाला आम्ही बीअर पिऊ आणि तू पाणी पी. मी तयार झाले. पण बरोबर अजुन चौथी व्यक्ती कोण येणार हा प्रश्नच होता. तर त्याने माझ्या रूम समोरच्या रूममधे राहणार्‍या ऑस्ट्रेलीअन मुलाला तयार केलं. दोघांना बरोबर १५ मिनीटांनी क्लब रूम मधे भेटायला सांगीतले. त्या दिवशी पहिल्यांदाच आणि शेवटचं मी पब मधे गेले. माझं मन रमावं यासाठी त्या दिवशी माझ्या त्या जर्मन मित्राने मला पब मधे नेऊन इतर वेगवेगळ्या विषयांवर माझ्याशी गप्पा मारल्या. त्या घटनेच्या शॉकमधुन बाहेर काढण्यासाठी मला बोलतं केलं. तासाभाने मी देखिल रीलॅक्स झाले.

आता कसे होईल ही चिंता सोडून वस्तुनीष्ठपणे घडलेली परीस्थीती आपल्या हातात आणण्यासाठी आता काय करता येईल असा विचार मी करायला सुरूवात केली. मला बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की त्यानंतर काहीकाळ मी टॅक्सी, रीक्षा यांमधून प्रवास करायला घाबरत होते. माझा एकटीने प्रवासाचा कॉन्फीडन्स गेल्यासारखं झालं होतं. यासगळ्यातून बाहेर यायला माझ्या मित्रमंडळींनी जी मदत केली मी ती कधीच विसरू शकत नाही. ही घटना घडली त्यावेळी शुक्रवार होता. माझ्या मित्रमंडळींमुळेच मी त्यातून पटकन सावरले नाहीतर अशावेळी लोक आत्महत्या वगैरे दिखिल करतात. मी दुसर्‍या दिवशी आमच्या कॉलेजमधे स्वदेश सिनेमा दाखवत होते तो पहायला गेले इतकी रेलॅक्स झाले. कारण एक गोष्ट पक्की लक्षात आली होती की टेन्शन घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर अजुनच वाढतात. दुसरं म्हणजे कोणतीही अ‍ॅक्षन घेण्यासाठी सोमवारच उजाडणार होता......म्हणजे तोपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सद्य परिस्थीतीत शांत डोक्याने आहे त्या परीस्थीतीचा वस्तुनीष्ठ विचार करणे चालू केले. हा भाग खूपच लांबलचक झाल्याने पुढे ही परीस्थीती मी कशी हाताळली आणि त्यातून मी आयुष्यभराचे असे जे धडे घेतले ते पुढच्या भागात लिहीते. 

१ एप्रिल २००५:   (भाग २) शिकलेले धडे!!

No comments:

Post a Comment