Monday, 23 July 2012

अपहरण


http://topnews.in/law/files/assam-map-ulfa.jpg
८ ऑगस्ट २०१० ला श्री विलास बर्डेकर यांचं मनोगत "त्या ८१ काळरात्री" हे लोकसत्ता मध्ये वाचलं आणि माझ्या चौदा वर्षांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा मिळाला. त्यावेळी मी आसाम मधील विवेकानंद केंद्राच्या गोलाघाट येथील शाळेत गणित या विषयाचे अध्यापन करत असे. गोलाघाट हे आसाम आणि नागालॅंडच्या हद्दीवरचं एक गाव. एकशिंगी गेंड्यांसाठी जगप्रसिद्ध असलेलं काझिरंगा अभयारण्य हे गोलाघाट पासून १० किमी अंतरावर. कार्बीऑंगलॉंग डीस्ट्रीक्ट मधील वनविभागही (की ज्यातून आसाम आणि नागालॅंडची सीमारेषा जाते) याच भागाच्या अगदी जवळ आहे. खरं तर सांस्कृतिक दृष्ट्या आसामचं गोलाघाट म्हणजे महाराष्ट्रातील पुणे. म्हणजे पुण्याला जसा क्रांतीकारक, सांस्कृतिक चळवळींमधे पुढाकार घेण्याचा इतिहास तशीच काहीशी गोलाघाटची पार्श्वभूमी. सध्याची उल्फा अतिरेकी संघटना हीचा जन्म गोलाघाट मधीलच. इंग्रजांच्या काळात (स्वातंत्र्यपूर्व काळात) आसाममधील अनुकूल हवामान पाहून इंग्रजांनी तिथे चहा-कॉफीचे मळे उभे केले. त्या मळ्यांवर आजूबाजूच्या राज्यांतील म्हणजे मुख्यत: बिहार मधील मजूर काम करत असत. आसाम मधे मुख्यत: जमीन अतिशय सूपिक. नुसत्या भाताच्या साळी टाकल्या तरी भाताची लागवड होऊन भात वाढत असे. भरपूर पाऊस असल्याने घराजवळच्याच खड्यात पावसाचे पाणी साठवून (आसाम मधे त्याला पुखरी म्हणतात) तेच पाणी भातशेती आणि इतर भाज्या वगैरेंसाठी वापरलं जात असे. मुख्य आहार भात आणि मासे कधीतरी असल्यास तोंडी लावायला पालेभाजी असा साधा आहार असल्याने आसाम मधील लोकांना फार कष्ट न करता आपल्या जीवनावश्यक गरजा पुरवली जाण्याची सवयच लागली. त्यामुळे त्यांच्यात एकप्रकारचा आळशीपणा ठासून भरलेला असे. हवामानही त्याला पूरक असेच होते.


http://static.ibnlive.com/pix/sitepix/06_2010/ulfa-talks.jpg
स्वातंत्र्य मिळाल्यावर आसाम मधील फार कमी लोकांनी चहाच्या मळ्यांचा ताबा घेतला कारण त्यात मेहनत खूप असे आणि ते खरदी करण्यासाठी गाठीशी पैसा असायला हवा. मारवाडी लोकांकडे पैसा असल्याने अदिकाधिक चहाचे मळे मारवाडी लोकांकडे गेले. मूलभूत आलशीपणामुळे आसाम मधील माणूस फारसा शिकलेला नसे. त्यामुळे आपसूकच पांढरपेशा नोकर्‍या (बॅंक, सरकारी कार्यालये) बंगाली बाबूंच्या ताब्यात गेल्या. मारवाडी समाज मूळातच व्यावसायिक असल्याने किराणा दुकाने आणि इतर व्यवसाय त्यांच्या हातात गेले. आसामी माणसाला कष्टाचा कंटाळा म्हणून कष्टाचे व्यवसाय बिहारी, ओडीसी, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि काहीप्रमाणात बांग्लादेशी घुसखोर यांच्या हातात गेले. त्यामुळे दिवसेंदिवस आसाम मधे मूळ आसामच्या विद्यार्थ्यांना रोजगार नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्या विरोधात आसाम स्टुडंट्स मुव्हमेंट ही गोलाघाट मधे चालू झाली आणि त्याचाच परिपाक म्हणजे उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) चा जन्म गोलाघाट मधे झाला. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बंद पुकार, सरकारी कार्यालयांवर हल्ले कर अशा कारवाया चालू झाल्या. कालांतराने आसाम मधील बंगाली, बिहारी आणि मारवाडी यांच्यावर प्राणघातक हल्ले सुरू झाले. सुरूवातीला विधायक कारणासाठी निर्माण झालेल्या संघटनेची अतिरेकी संघटना कधी बनली हे कोणालाच समजलं नाही. पुढे आसाम मधील सुशिक्षित समाजाला उल्फाचे खरे स्वरूप समजल्यावर त्यांना स्थानिक एलीट क्लास कडून मिळणारा सपोर्ट कमी झाला. त्यातील काही परदेशात शिक्षणाच्या निमित्ताने गेले आणि भूमिगत राहून उल्फाच्या कार्याला पाठींबा देऊ लागले. अजुनही आंतराष्ट्रीय पातळीवर उल्फाला सपोर्ट करणारा एलिट क्लास कार्यरत आहे आणि ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. असो.
http://images.jagran.com/rail-track-balst-b-19-04-20.jpg
स्थानिक एलिट क्लासचा सपोर्ट बंद झाल्याने उल्फाचं पित्त खवळलं आणि ते अधिकाधिक अतिरेकी कारवायांमधे गर्क झाले. मग आसामला भारतापासून तोडण्याचे सर्व प्रयत्न चालू झाले. त्याचाच भाग म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण लोकांना साजरे करू द्यायचे नाहीत. मग त्या दिवसांच्या आधीपासूनच गावागावांत बंदुकधारी लोकांनी भरलेल्या गाड्या फिरवून लोकांना धमक्या द्यायच्या की ध्वजवंदनाला बाहेर पडलात तर याद राखा. मग त्याच सुमारास एखाद-दुसर्‍या आडव्या येणार्‍या माणसाला गोळ्या घालायच्या म्हणजे दहशत लोकांमधे अधिक पसरेल. तरी शासकीय कार्यालयांत, शाळा-महाविद्यालयांत हे दिवस साजरे होत. ते थांबविण्यासाठी म्हणून मग त्यांनी त्या दोन दिवसांच्या आधी आणि नंतरचे दोन दिवस आसाम बंदच पुकारायचा. मग बंगाल आणि आसाम यांना जोडणार्‍या चिंचोळ्या पट्ट्यात रेल्वेचे रूळ उडवून देणे जेणेकरून पॅदेंजर ट्रेन्स किंवा मालवाहतूक ट्रेन्स घसरतील आणि लोकांमधे दहशत पसरेल. मग लोक आसाममधे प्रवास करणार नाहीत. आपसूकच आसाम मधील लोकांना उल्फा वाल्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. हळूहळू आर्मीच्या आणि बीएसएफच्या मदतीने शासनाने परिस्थीती नियंत्रणात आणली. आंतर्गत परिस्थीती सुधारण्याचं काम स्वयंसेवी संस्थांनी घेतलं आणि आजही ते अव्याहत चालू आहे. उल्फा मधेच आता अनेक गट पडले आहेत. त्यातील काही सरेंडर झालेत तर काही अजुनही एनएससीएन या दहशतवादी संघटनेच्या मदतीने कार्यरत आहेत.
http://i.ytimg.com/vi/nMKL0mCdtvQ/0.jpg
त्या दिवशी आमच्या मुख्याध्यापिका काही कामा निमित्त गुवाहाटीला गेल्या होत्या. दुसरी एक सहकारी दिब्रुगढला दुसर्‍या एका कामासाठी गेली होती. नेमकी मी शाळेत एकटीच होते. साधारणत: रात्री साडे आठच्या सुमारास मला शाळेत फोन आला. मी फोन उचलून बोलायला सुरूवात केली तर पलिकडून कुणीतरी घाबर्‍या-घुबर्‍या आवाजात विचारलं, "दिदि प्रिंसीपल दिदि है क्या?" मी म्हणाले, "नहीं, वो तो गुवाहाटी गयी है। परसों सुबह तक आजायेगी। क्यूं क्या हुआ?" फोन वरचा आवाज, "वो दिदि, आपके स्कूल का ऑंठवी में पढनेवाला सोहन कोलीता है ना उसको उल्फा वालोंने उठालिया।" मला धक्काच बसला आणि ताबडतोब विचारले, "ये सब कब और कैसे हुआ?". फोनवरची व्यक्ती घाईतच आणि घाबरलेल्या आवाजातच बोलत होती. तो म्हणाला, "दिदि, हर रोज शाम को सात बजे उसका घर में ट्युशन रहता है. वो अपने ट्युशन टिचर के साथ घर में बैठा था. करीब साढे सात और पौने आठ के बीच उसके घर के बाहर कुछ लोग आये और उन्होंने सोहन को आवाज दी. जब सोहन घर के बाहर आया तो उन लोगों ने उसको उठा लिया और जीप में बिठाके दीमापूर की तरफ चल दिये. उनके हाथोंमें गन थी इसलिये कोई कुछ नहीं कर पाया". हे ऐकून मला घाम फुटला. सोहन च्या वर्गाला म्हणजे आठवीला मी गणित शिकवत होते त्यामुळे मला तो मुलगा माहीती होता. आता पर्यंत फक्त इतरांच्या उल्फा कडून पळवुन नेल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. हे तर मला माहीती असलेल्या मुलाच्या बाबतीत घडलं होतं. सोहन एकदम शांत आणि निरूपद्रवी मुलगा. मला पटकन काय बोलावं ते सुचेचना मग मी त्याला म्हणाले, "मैं प्रिंसीपल दिदि को गुवाहाटी फोन करके बोलती हूं। जो कुछ भी होता है आप स्कूल में खबर करते रहना।"
http://images.jagran.com/policy_b_03-05-2012.jpg
आसाम मधे बोडो अतिरेक्यांनी आणि उल्फावाल्यांनी पुकारलेले आसाम बंद, त्यांनीच उडवुन दिलेले रेल्वे रूळ परिणामी ठप्प झालेली वाहतूक, अतिरेक्यांनी घडवून आणलेले बॉम्ब स्फोट इ. बातम्या नेहमीच्याच झालेल्या. उमेशने, शाळेच्या वॉचमनने, अनेक वेळा आम्हाला त्याच्या वायरलेस ट्रान्झीस्टरवर उल्फावाल्यांचे कॅच झालेले संदेश ऐकवले होते. काहीवेळा तर कुणाच्या अपहरणाची किंवा खंडणीची रक्कम ऐकायला मिळायची. हे सगळं आपल्यापासून दहा-हात दूर होतं तोपर्यंत ठीक आहे. पण आज हे लोण आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं होतं. दुसर्‍या दिवशी शाळेत सगळीकडे सोहनला उल्फाने पळवुन नेल्याचीच चर्चा होती. टीचर्स रूम मध्ये समजलं की त्याला शिकवायला संध्याकाळी सात ते आठ या वेळात कोणी शिक्षक येतात. ते असतानाच पावणे आठच्या सुमारास एक मारूती कार दारा समोर थांबली. त्यातून दोन बंदुकधारी उतरले. शिकवणी चालू असल्याने घराचा दरवाजा उघडाच होता. आत शिरून बंदुकीचा धाक दाखवुन त्या शिक्षकांच्या समोर त्याला उचलून घेवून गेले. रात्री अकराच्या सुमारास त्याच्या वडीलांना फोन करून सोहनच्या सोडवणुकीसाठी १ कोटीची रक्कम मागीतली गेली. आठवीच्या वर्गात गेल्यावर मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. वर्गातील मुलं बरीच घाबरलेली होती. मी त्यांना शांत करायचा प्रयत्न करून शिकवण्यापेक्षा गोष्ट सांगायला सुरूवात केली. पुढचा तास ९ वी च्या वर्गावर होता. वर्गात गेल्यावर मुलांमध्ये चर्चा तीच फक्त थोडी वेगळ्या अंगाने चालू होती. मुलं घाबरलेली नव्हती पण दबक्या आवाजात कुजबुज चालू होती. मी विचारल्यावर त्यातील एका धीट मुलाने उठुन सांगीतलं, "अरे दिदि, वो सोहन कोलीता को कुछ नहीं होगा। उसका बाप बहुत चालू है।" मला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थच लागत नव्हता. मला त्या मुलाने वापरलेले शब्द सुध्दा आक्षेपार्हच वाटले म्हणून मी विषय जास्त न वाढवता तिथेच थांबवला. पुढे महिनाभर त्या प्रकरणाचा तपास चालू होता. पण हाताला काहीच लागत नव्हते. बरं सोहनच्या वडिलांकडे १ कोटी रूपये देता येतील इतके पैसेही नव्हते. मग त्या लोकांनी सोहनलाच का उचलून नेलं असा प्रश्न पोलीसांना पडलेला होता.
http://www.ankurkolkata.com/images/wallpaper/Tea%20Garden%20in%20assam1322119323.jpg
साधारणत: दोन महिने उलटल्यावर सकाळी सकाळी शाळेत बातमी की सोहन कलीता सापडला आणि त्याला उल्फा करवी पळवून नेणारा त्याचा बापच होता. नंतर असंही समजलं की सोहनला एक मोठी बहिण होती की जिच्या सासरकडून तिला टी-गार्डनच्या मालकी हक्काचे पैसे मिळायचे. त्या टी-गार्डनच्या खंडणीच्या वादातूनच उल्फाच्या अतिरेक्यांकडून तिच्या नवर्‍याचा खून झाला होता. सोहनची विधवा बहिेण तिच्या दीड वर्षाच्या मुलाबरोबर त्याच्याच घरी म्हणजे वडिलांकडे रहात होती. तिला मिळणार्‍या पैशात सोहनच्या वडिलांना इंटरेस्ट होता. पण मुलगी काही त्यांना पैसे देत नव्हती म्हणून त्यांनी स्वत:च्या मुलालाच म्हणजे सोहनला उल्फावाल्यांकरवी पळवुन नेण्याचा कट रचला. त्यांना वाटलं की भावाच्या प्रेमापोटी बहिण त्याला सोडवण्यासाठी म्हणून पैसे देईल. पोलीसांनी पुष्कळ तपास केला. अगदी उल्फावाल्यांकडे त्यांच्या आतील कनेक्षन्सच्या मार्फत चौकशी केली. त्या लोकांनी हात वर केले. तेव्हा पोलीसांना संशय आला म्हणून त्यांनी मि. कलीतांच्या घरचा फोन टॅप करायला सुरूवात केली आणि एका दिवशी त्या पळवुन नेणार्‍या माणसांशी फोनवर बोलताना मि. कलीतांना पकडलं. तसंच त्या माणसांना पण पकडलं तर त्यांनी लगेच कबूल केलं की ह्यांनीच आम्हाला सुपारी दिली होती म्हणून.
http://www.hindustantimes.com/news/specials/popup/30_10_assam1.jpg
सोहनच्या वडीलांना पैसे तर नाहीच मिळाले पण तुरूंगात जायला लागलं. बरं नाचक्की झाली ती वेगळीच. त्याच बरोबर दोन महिने त्या उल्फावाल्यांबरोबर राहून सोहन एकदम ओव्हर स्मार्ट झाला......एकदम बदलला. त्याच्या वडीलांना पैशापुढे आपल्या मुलाच्या भवितव्याचं काहीच कसं वाटलं नाही. शाळेने म्हणजे प्रीन्सीपॉल बाईंनी पण एक चुकीचा निर्णय घेतला.........सोहनला शाळेतून काढलं. त्यांच्यावर इतर पालकांचं प्रेशर आलं. पण राहून राहून माझ्या मनात हेच येत होतं की केवळ दोन महिने त्या लोकांच्या सहवासात राहून तो बदलला आणि शाळेत इतकी वर्षे राहून जे संस्कार त्याने घेतले ते बदलले असं वाटत असेल तर शाळेला काय अर्थ राहीला? तिथे असताना अशा अनेक मुलांना वहावत जाताना पाहिलेलं आहे. पालकांशी बोलूनही अनेकवेळा उपयोग होत नसे. पालकांचं आपापल्या मुलांकडे झालेलं दुर्लक्ष हे खूप कारणीभूत आहे. खरंतर उल्फासारख्या अतिरेकी संघटनांकडे कोवळ्या वयाची मुलं कशी काय खेचली जातात हा मूळ प्रश्न आहे की जो सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहीजे असं मला वाटतं. गेल्या आठवड्यात गुवाहाटीत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमत मधे आलेला हा लेख आसाम मधील सध्याच्या स्थितीवर अधिक प्रकाश टाकतो. आसाम सारख्या सीमावर्ती प्रदेशातील अतिरेक्यांचा धोका कितपत टळला आहे याची कल्पना वरवर पाहता येणार नाही. तरी सल्फांमुळे उघड उघड पसरत चाललेला द्हशतवाद, जीवघेणी, घृणास्पद सत्तास्पर्धा-पैशांची स्पर्धा आसामला उर्वरीत भारतापासून तोडेल की अजुन काही होईल हे काळच ठरवेल.

2 comments:

  1. सुन्न करणारे वास्तव ताई. मुळात एक गोष्ट मला कळत नाही. एवढे ब्रेनवॊशींगचे टेक्निक त्या लोकांना (सगळीच अतिरेकी दले) कसे काय साधते? कश्मीर असो, आसाम असो, पाकिस्तान असो, नागालॆंड असो कुठेही पाहा, सर्वत्र लहान मुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाताना दिसतो. शोकांतिका म्हणजे वर्षानुवर्षे झालेले घरातले, शाळेतले संस्कार विसरून ही मुले त्या विघातक विचारांच्या अगदी सहज आणि अल्पवेळात आहारी जातात. हे कुठेतरी थांबायला हवे. :(

    ReplyDelete
    Replies
    1. विशाल, अरे लहान वयात ब्रेन वॉशिंग करणे अधिक सोपे जाते. हे केवळ आसाम, पाकीस्तान, नागालॅंड मधेच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातही झालेलं आहे. (अबु जिंदालचे उदाहरण) लहान वयात चांगल्या वाईटाची समज नसते. त्यामुळेच कोणत्याही गोष्टी (चांगल्या-वाईट) प्रभावीपणे बिंबवल्या गेल्या तर त्याचा लहान मुलांवर सखोल परिणाम होणे स्वाभाविक आहे. पालकांनी आपापल्या मुलांकडे नीट लक्ष पुरवायला हवे. आपला पाल्य शाळेच्या वेळात शाळेतच जातो आहे ना हे पाहिलं पाहीजे. अनेक गोष्टी आहेत. पुन्हा या वाट चुकलेल्या मुलांचा राजकारणी लोक स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतात. जोपर्यंत यात फरक पडत नाही तोपर्यंत परिस्थीती बदलणं अशक्य आहे.

      Delete