Thursday 19 July 2012

दिव्यांची आमावस्या!

http://www.flickr.com/photos/kshitijthakur/5993989684/
पूर्वी आषाढ आमवस्येपासून घराघरांत कहाण्यांची पुस्तकं बाहेर काढली जात आणि दिव्यांच्या अवसेच्या कहाणीपासून महिनाभर पुढे रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर, शुभंकरोती म्हंटल्यावर त्या त्या दिवसाची कहाणी वाचली जात असे. प्रत्येक वाराची किमान एक कहाणी तरी असेच. श्रावणातील प्रत्येक वारी कोणते ना कोणते व्रत करण्याची पद्धत त्यामुळे त्या व्रताचे महत्त्व किंवा ते व्रत कसे सुरू झाले, ते व्रत कसे करायचे, त्याव्रताने ने लोकांना कशाप्रकारे फायदा झाला, ज्यांनी ते व्रत मधेच सोडून दिले त्यांना कसा त्रास झाला इ. सर्व त्यात असे. पण दिव्यांची आमावस्या या दिवसाची कहाणी फक्त एकच दिवस वाचली जायची. दिव्यांच्या आमावस्येला घरातील सर्व दिवे (देव्हार्‍यातील चांदीच्या निरांजन-समई पासून ते कंदिला पर्यंत) घासून लख्ख केले जात. त्यांची पूजा केली जात असे. त्या दिवशीच फक्त कणकेचे गोड दिवे केले जायचे. संध्याकाळी घासून पुसून स्वच्छ झालेले दिवे लावल्यानंतर खूप सुंदर दिसायचे. मला दिव्याच्या आमावस्येची स्वच्छ घासलेले दिवे आणि कणकेचे गोड दिवे यांमुळे मजा वाटत असे. श्रावणातील पहिला दिवस जिवतीचा कागद देव्हार्‍यात लावून, तिची पूजा करून, कहाणी वाचून सुरू व्हायचा. मला त्या कहाण्या, कहाण्यांमधील विश्व खूप गंमतीशीर वाटायचे. मग इतर वेळी श्रावण नसतानाही कधी कधी मी त्या कहाण्या वाचत असे. 

http://www.flickr.com/photos/shree2much/3772798508/
त्यावेळीही आणि अत्तासुद्धा मी काही खूप कर्मकांड मानत नसे. पण मला त्या कहाण्या पंचतंत्रांतील गोष्टींसारख्या वाटायच्या. मी त्यातून माझं लॉजीक लावून काहीतरी शहाणपण उचलत असे. "आता दिव्याच्या आवसेचीच कहाणी बघा. राजाच्या सुनेने आपण चोरून खाल्ले त्याचा आळ उंदरांवर घेतल्याने उंदीर संतापले आणि त्यांनी तिची फजीती करण्यासाठी तिची चोळी पाहुण्यांच्या बिछान्यात टाकली. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी तिला घरातील लोकांनी घराबाहेर काढले. राजाची सून घरातील साफ सफाई करत असे. दिव्यांच्या आमावस्येला दिव्यांची लख्ख घासून पुसून पूजा करत असे. त्यावर्षी राजाची सून घरात नसल्याने दिव्यांच्या आमावस्येला राजाच्या घरातील दिव्यांची सफाई झालीच नाही. त्या दिवशी राजा प्रवासातून घरी परतत होता आणि विश्रांतीसाठी गावाबाहेरच्या झाडाखाली बसतो. तेवढ्यात त्याला त्या झाडावर बसलेल्या दिव्यांचे बोलणे कानावर पडते. गावातील सर्व दिवे त्या झाडावर एकत्र जमून गप्पा मारत असतात. सगळे दिवे आपली कशी छान स्वच्छता आणि पूजा झाली याचं वर्णन करत असतात. पण राजाच्या घरचा दिवा मात्र हिरमुसलेला असतो. कारण त्याची सफाई आणि पूजा झालेली नसते. मग तो सगळी हकीकत सांगतो. राजा घरी आल्यावर घडला प्रकार कोणी प्रत्यक्षा पाहीला आहे का याची शहानीशा करतो. त्यातच त्याला सुनेची चूक नसल्याचे समजते आणि मग तिला मेणा पाठवून बोलावून घेतले जाते. मग सगळे सुखाने नांदतात." मला ही गोष्ट इतकी गोंडस वाटते. इथे उंदरापासून दिव्यापर्यंत सगळ्यांना व्यक्तीमत्त्व दिलेलं आहे. यातूनच आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी अतिशय चांगल्या पद्धतीने कसे वागावे (अगदी निर्जीव वस्तू सुद्धा सजीव असल्यासारखे वागावे) हे अप्रत्यक्षपणे शिकवले गेलंय. अप्रत्यक्षपणे विश्वातील सर्व गोष्टींत चैतन्य असते हेच सांगीतलंय. पुन्हा खोटं बोलू नये, दुसर्‍यावर आळ ढकलू नये ही नितीमत्ता आलीच. त्याच बरोबर दिव्यांची सफाई म्हणजे साफसफाईचे महत्त्व आले. श्रावण महिना म्हणजे विविध व्रत वैकल्यांचा महिना. प्रत्येक दिवशी वाराप्रमाणे देवाची पूजा करून, देवाला विशिष्ट नैवेद्य दाखवून, त्या दिवसाची कहाणी वाचून साजरा करतात. मग या सुंदर अशा महिन्यांत घर देखिल स्वच्छ असायला हवं. श्रावण महिना पावसाचा महिना. दिव्यांची घासपूस करून ते देखिल स्वच्छ ठेवले तर छान पवित्र तर वाटतेच. पूर्वीच्या काळी अत्तासारखे विजेचे दिवे नसत. त्यामुळे तशी महिन्यातून एकदा दिव्यांची साफसफाई होत असेच. अगदी सध्याच्या विजेच्या दिव्यांच्या काळात विज कधी गायब होईल सांगता येत नाही तेव्हा दिवे तयार असलेले बरे. असा देखिल दुहेरी फायदा आहे. 

मला तर हे सगळे दिवस (म्हणजे नागपंचमी, बैलपोळा, दिव्याची आवस) म्हणजे त्या त्या प्राणी किंवा वस्तूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेले दिवस वाटतात. आपल्या हिंदू धर्मात वराहापासून सर्व प्राण्यांमधे देवत्त्व असल्याचे सांगीतले आहे. म्हणून ३३ कोटी देव आणि प्रत्येक देवाला आपापलं वाहन. म्हणजे त्या त्या देवा बरोबर त्या प्राण्याचीही पूजा होते. त्याचेही महत्त्व वाढते. सगळेच लोक हे पाळतात असं नाही पण आपली जीवनशैली, आपले सण (पूर्वीच्या स्वरूपातले) हे निसर्गाशी अधिकाधिक जवळीक साधणारे होते. सगळेच लोक काही बुद्धीमान नसतात. मग काही तात्वीक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या अशा कहाण्या, देव, व्रत अशा माध्यमांतून पोहोचवणे उचित आहे असे वाटल्याने हे सगळे अस्तित्त्वात आले असावे असे मला वाटते. पण शेवटी मनुष्य स्वभावाचे दोष पूर्वीही होते आणि अत्तासुद्धा आहेतच. त्यामुळे कर्मकांडाचा विपर्यास केला जातो. साधारणत: श्रावण, भाद्रपद (गौ्री-गणपती), अश्विन (देविचे नवरात्र-दसरा), कार्तिक (दिवाळी) असे महिने आहेत. याच महिन्यांत अधिकाधिक महत्त्वाचे सण येतात. हे महिने पावसाळा आणि शेवटी थंडीची सुरूवात असे असतात. पावसाळ्यात वातूळ अन्न, जड पदार्थ नीट पचत नाही्त म्हणून वांगी, कांदा-लसूण (ह्यांचा वासही उग्र असतो) इत्यादी पदार्थ खाल्ले जात नव्हते. हे सर्व पाळणे यालाच चातुर्मास पाळणे असे म्हणतात. 

http://www.smsblaze.com/smstext/gatari-amavasya-sms/
आता जे लोक मांसाहारी आहेत ते सुद्धा चातुर्मासात मांसाहार तसेच मद्यपान करत नाहीत. पण जे मांसाहार करतात, मद्यपान करतात त्यांना ते आवडते फक्त एक पद्धत म्हणून चार महिने ते करायचं नाही. मग चार महिने मांसाहार करायला मिळणार नाही दारू ढोसायला मिळणार नाही म्हणून चातुर्मास चालू होण्याच्या एकच दिवस आधी हे सगळं वारेमाप खाऊन-पिऊन घ्यायचं. नेमका तो दिवस म्हणजे दिव्याची आमावस्या येतो. कित्येक वर्षं मला दिव्याच्या आमावस्येला "गटारी आमावस्या" देखिल म्हणतात हे माहीत नव्हते. ८-१० वर्षांपूर्वी समजले. तसे म्हणण्याचे कारणही समजले कारण जे लोक मांसाहार करतात, मद्यपान करातात ते लोक त्या दिवशी भरपूर खाऊन-पिऊन अक्षरश: गटारात देखिल लोळतील इतके देहभानही त्यांना रहात नाही. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर आल्यानंतर "गटा्री" हा प्रकार लोकांमधे किती पॉप्युलर आहे याचा प्रत्यय येतो. म्हणजे लोक एकमेकांना गटारीच्या शुभेच्छा देतात. काल दिवसभरात "गटारीच्या शुभेच्छा" असे कित्येक स्टेट्स बघीतले. म्हणजे आपला हिंदू समाज कुठुन कुठे चालला आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. ज्यांना मांसाहाराशिवाय होत नाही, मद्यपान आवडते त्यांनी ते सरळ सरळ करावे १२ महिने करावे. उगाचच आपल्या सणांना बदनाम करू नये असं वाटतं.

याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की नविन पीढीला हिंदूंच्या सणांची, साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवसांची किळस यावी. मग हेच का आहे हिंदू धर्मात मग जर दारू पिणं वाईट आहे तर मग आपण आपले सण कशाला साजरे करायचे? असे प्रश्न अनेक पालकांना त्यांच्या मुला-मुलींनी विचारले असतील. गणेशोत्सवाचे, नवरात्रोत्सवाचे, दहिहंडीचे, दिवाळीचे, होळी-धुळवड-रंगपंचमी, संक्रांतीचे देखिल तेच झाले आहे. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीपुढे अश्लील गाणी लावून, लाऊड स्पीकरच्या भिंती लावून मद्यपान करून लोक हिडीस नाचतात. नवरात्रातही तोरण महोत्सवाच्या नावाखाली तेच चालू असतं. दिवाळीला इतके प्रचंड फटाके उडवायचे की सगळीकडे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण करून ठेवायचे. मकर संक्रांतीला पतंगबाजी करण्यासाठी मांजांना काचेचे आवरण लावून पक्ष्यांचे जीव घ्यायचे. तसं पाहिलं तर गणपती उत्सव, नवरात्र हे घरच्या घरी साजरे केले जाणारे सण. देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी जनतेला इंग्रज सरकार विरूद्ध एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात जागृती घडवण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. ते स्वरूप देखिल खूप विधायक होते. दिवाळीतही पूर्वी पणत्या, आकाश दिवे, सुगंधी तेल-उटणं लावून अभ्यंग स्नान इ. गोष्टी होत्या. फटाके उडविणे हा प्रकार नव्हताच. सध्या जरी मकर संक्रांतीला पतंगबाजी चालू असली तरी हे आपल्या मूळ संस्कृतीत सांगीतलेलंच नाही. पतंग उडविणे, काचेच्या आवरणापासून मांजा बनवून पतंगांची काटा-काटी हे सगळं अरब देशांतून मुघलांबरोबर आलेलं आहे. कोणतीही गोष्ट थोडक्यात केली तर ठीक आहे. त्याचा अतिरेक झाला की त्रास होतो. सध्याच्या हिंदू सणांचं एकूणच स्वरूप बघता आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून किती दूर भरकटत चाललो आहोत याची कल्पना येईल. पुढच्या पिढीकडे आपण नक्की कोणता सांस्कृतिक ठेवा देऊन जाणार आहोत याचाही विचार आपण केला पाहीजे असं वाटतं.

19 comments:

  1. लेख मनापासून भावला.
    दिव्याची गोष्ट सांगून झाली की मी आईने बनविलेले दिवे खायचो.
    जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    माझी आई रोज एक गोष्ट वाचायची.
    आणि त्या गोष्टी मला नेहमीच रुपक कथा वाटायच्या.
    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद निनाद. काल दिवसभर माझ्या मनात "गटारीचे स्टेट्स" पाहून खदखदत होते. माझ्या देखिल जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

      Delete
  2. अपर्णाताई, खरं तर मी स्वतः श्रद्धाळू असलो तरी माझा हल्ली गटारी-बिटारीवर् आक्षेप घेण्यावर फारसा विश्वास उरला नाहीय.बरीचशी माणसे गटारीला तराठ पार्टीचा विराट मोर्चा काढून झाला कि श्रावण श्रद्धेने पाळतात! उलट चातुर्मास पाळणारे नको त्या संकल्पना बळजबरी कोपाच्या भीतीने पाळत, आपले ईगो सुखावून घेत असतात! "एरवी नाही निर्मल जीवन...!" त्यामागची भावना, संवेदना लोकं केव्हाच हरवून बसलेयत!

    बाकी मला असं वाटतं कि ह्या कथा, भाबड्या असल्या तरी सर्व सामान्य मासाच्या आयुष्यावर एवढ्या परिणाम करत कि तो चुकीची कामं करण्यास धजावत नसे. ज्ञानाच्या विस्फोटासोबत सर्वांना जे अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिळाले त्याचा फायदा घेत घेत, ती भाबडी निष्पापता सोडून लोकांनी आपापले स्वार्थ साधायला नव्या मुल्यांचा वापर करून घेतला! तिथेच सगळं संपलं! जसे पूर्वीचे लोकं ह्या कथां, देवा-धर्माच्या नावे लुटायचे, फसवायचे, तसे आता आधुनिक मूल्यांच्या नावे लोकं आत्मकेंद्री होऊन स्वार्थापायी जगाची फसवणूक करतात! एकूण माणसाची मूळ प्रवृत्ती हि आत्मकेंद्रीच होती व आहे असं वाटू लागतं! शाश्वत म्हणवल्या जाणाऱ्या मूल्यांना आम्ही अगदी निष्पापतेने विकून खाऊ शकतो एवढे बेरकीपण आम्हाला आमच्या आधुनिक संवेदनांनी दिले आहे!

    ReplyDelete
    Replies
    1. हेमंत, माझा आक्षेप गटारी साजरी करण्याला नाही. उलट मी म्हणते की दांभिकता सोडून लोकांनी आपल्याला जे आवडतं ते खावं. दिव्याच्या आमावस्येचा इतका सुंदर अर्थ असताना त्या दिवसाला सर्वत्र गटारी म्हणून एकमेकांना शुभेच्छा देणं ह्याला माझा आक्षेप आहे. माझा आक्षेप तुम्ही पुढच्या पिढीला नक्की कोणते संस्कार देणार आहात याला आहे. एकीकडे एखाद्या बॉलीवुड स्टार ने एखाद्या टीव्ही प्रोग्रॅममधे सांगीतलं की दारू पिणं वाईट की मग उघडल्यास लोकांचे डोळे उघडतील पण आपल्या सणांमधे जे सांगीतलेलं आहे ते न करता दुसरंच काहीतरी त्या सणाच्या नावाने करायचं. नविन पिढीला मग गटारी आणि दिव्याची आमावस्या सारखीच. आणि काहींना तर दिव्याची आमावस्या माहीती असणं दूरच.
      बाकी चातुर्मास मी देखिल पाळत नाही. घराबाहेरच बरीच वर्षे राहील्याने जे मिळेल ते खायचे (शुद्ध शाकाहारी) असे आहे. बाकी मद्यपानाचा प्रश्नच नाही. तो माझा प्रांत कधीच नव्हता. :-)

      Delete
  3. मला पण कालच लोकांचे फेसबुक वरील STATUS पाहून कळले हे गटारी अमावस्या प्रकरण ! लेख आवड्ला. Like :-)

    ReplyDelete
  4. लेख प्रचंड आवडला. अगदी मनातले बोललात.
    अगदी दोन वर्षांपूर्वीच मला दिव्याच्या अवसेला(आमच्या पूर्व विदर्भात ’जिवती’ नावाने जास्त प्रसिद्ध आहे हा दिवस.) ’गटारी’ म्हणतात हे माहीत नव्हते. किंबहुना हे मला सो.ने.च्या कृपेने कळले. नागपूरात गटारीचे जास्त प्रस्थ नव्हते.इकडे पुण्यात गटारीचा जास्तच उदोउदो केला जातो हे लक्षात आले. काल तर संगमवाडीत एका दुकानात चक्क ’गटारीच्या शुभेच्छा’ असा बोर्ड आणि त्याखाली ’ओकू नको , माकू नको, घेतलेली दारू टाकू नको’ हेही दिसले. गटारीचे प्रस्थ इतके वाढत आहे की लोकांना दिव्यांच्या अवसेसारख्या एका सुंदर सणाचा चक्क विसर पडावा !!
    दिव्याची अवस हा माझा अतिशय आवडता सण, एक सुंदर, उदात्त परंपरा सांगणारा आता कोणी फारसा साजरा करतांना दिसत नाही. चांगल्या गोष्टी घ्यायचे सोडून आपण नेमक्या वाईट रिती का उचलत आहोत ? पुढची पिढी कदाचित श्रावणाच्या आदल्या दिवशी गटारी येते असेच म्हणेल, दर्श आमावास्या , दिव्याची अवस किंवा जिवती येते असे म्हणणार नाही. गटारीनिमित्त जालावर जे लेख आलेत त्यावरून तर आपण नकळत ह्या सगळ्या कुरितींचे प्रस्थ वाढवत आहोत ह्याची लोकांना जाणीव नसते हे लक्षात येते.
    १००+ वर्षांपूर्वी गो.ग.आगरकरांनी शिमग्यावर ’पांचजन्याचा हंगाम’ या लेखातून आसूड ओढले होते. तसा लेख गटारीवर यावा असे वाटू लागले आहे.

    अवांतर- ते कणकेचे दिवे विझले की आम्ही प्रसाद म्हणून खायचो. :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संकेत. आम्ही देखील कणकेचे गोड दिवे खास खाण्यासाठी म्हणून बनवायचो. म्हणजे त्या दिवशी पोळ्या करत नसू. त्या दिव्यांसाठीच मला दिव्याची आवस खूप आवडायची. :-)

      Delete
    2. धन्यवाद संकेत, एका विस्मरणात गेलेल्या गोष्टीची (जिवती) आठवण करून दिल्याबद्दल.
      जिवती (देवी) ची प्रतिमा चांदीच्या कागदाच्या स्टिकरच्या स्वरूपात मिळायची. घरातील मुलांचे औक्षण केले जायचे त्या दिवशी.

      बादवे - जिवती पश्चिम विदर्भातही साजरी केली जाते बरं का...

      Delete
  5. मुळात गटारी हा प्रकार लोकारूढ आहे आणि बहुतेकांना दुर्दैवाने त्या दिवशी दीप अमावस्या असते हे ही माहित नसतं.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय आजकाल कैच्याकै गोष्टी लोकारूढ होताहेत. गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरूप (दारू पिऊन, लाऊड स्पिकरच्या मोठमोठाल्या भिंती लावून, अश्लील गीतांवर गणपतीसमोर नाच करणे) हे इतके लोकारूढ झाले आहे की गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप आणि उद्देश नविन पीढीला कसा माहीती असणार? मग ते म्हणणारच की हिंदूंचे सण साजरे करणे म्हणजे दारू पिऊन धिंगाणा घालणे मग ते कशाला साजरे करायचे? चुकीच्या गोष्टी प्रोजेक्ट होत आहेत.

      Delete
  6. कहाण्या आणि आरत्या आता पुन्हा एकदा आवडायला लागल्या आहेत त्या त्यातल्या सामाजिक (आणि क्वचित प्रसंगी साहित्यिक) मूल्यांच्या दर्शनाने!

    बाकी 'गटारी अमावास्या' हा शब्द नेमका कधी आला हे एकदा पहायला हवे. ते सामाजिक संक्रमणाचे एक वळण असेलही कदाचित. प्रतिष्ठा त्याला आधीच मिळाली असणार. आता दिवे कोणी वापरत नाही फारसे - निदान जालावर असणारा समाज तरी - त्यामुळे 'दिव्याची अवस' हे शब्द मागे पडणार हे स्वाभाविक आहे. जे आपण करतो त्यातून काही सांस्कृतिक प्रतीकं तयार करण्याची माणसाची प्रवृत्ती दिसते. उद्या पुढच्या पिढ्यांना दुर्दैवाने वीज मिळणार नाही कदाचित तेव्हा दिवे परत येतील आणि त्याभोवातालाचे उत्सवही...!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सविता, वाईट प्रथांना प्रतिष्ठा मिळण्यास वेळ लागतच नाही. आपण फक्त आशा करू शकतो पण त्याचबरोबर सणांचे जे मूळ स्वरूप आहे ते पुढच्या पिढीला सांगू शकतो, पटवून देऊ शकतो .....जर आपल्या मनात संभ्रम नसेल तर....असे मला वाटते.

      Delete
  7. लेख आवडला.

    गटारी - हे ऐकूनच मला कसे तरी वाटते बुवा. तसे पाहिले तर महाराष्ट्राच्या काही भागांतच हे साजरे होते. मी याबद्दल २००५ प्रथमच ऐकले.
    पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणारी कर मात्र फार पूर्वीपासून प्रचलित. एकदा पोळ्याच्या दिवशी वर्तमानपत्रात सजवलेल्या बैलजोडीचे चित्र आले होते. त्याखाली ओळी लिहिल्या होत्या.

    कशाचा हा पोळा, कशाची ही कर?
    एक दिवसाचा विश्राम, मग वर्षभर मर मर...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रीरंग. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण उत्साहात साजरे करतात. माझ्या लहानपणी अनेक वर्षे आम्ही सोलापूरात रहात होतो. तिथे आम्ही बैलपोळा हा सण साजरा झालेला बघायचो. मुख्यत: शेतकरी, ज्यांच्याकडे बैल आहेत अशी मंडळी हा सण अधिक साजरा करतात. मला देखिल "कर" हा सण/प्रकार माहीती नाही. पुण्यात हा सण मी फारसा पाहीलेला नाही. हे गटारी प्रकरण देखिल मला अगदी ४-५ वर्षांपूर्वी पर्यंत माहीती नव्हते. म्हणजे ते अस्तित्त्वात असले तरी त्याला इतकी पॉप्युलॅरीटी मिळालेली नव्हती. आता १-२ वर्षे मी पहाते आहे सगळे गटारीच्या शुभेच्छाच देतात.....दिव्याच्या आवसेचं काहीच नाही. :(

      Delete
    2. "कर" विदर्भात साजरी केली जाते. खास करून शेतकरी लोक करतात बहुधा. कारण त्याअगोदरचे बरेच आठवडे श्रमपरिहार करायलाही सवड नसते.

      Delete
  8. वातावरणात होणाऱ्या बदलानुरुप सण साजरे केले जातात.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हा एक यशस्वी मार्ग आहे. आपण वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करण फार महत्त्वाचे असते.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रद्धा! शतपावलीवर स्वागत. खरंय वातावरणात होणार्‍या बदलांनुरूप सण साजरे केले की ते निसर्गाचा समतोल आणि पर्यायाने आरोग्याचा समतोल राखायला उपयोगी पडते. पर्वाच एका कॅनेडीअन स्थानीक व्यक्तीशी बोलताना लक्षात आले की आपण जर आपले परंपरागत अन्न खाणे चालूच ठेवले तर आपली तब्येत चांगली राहते. पण ज्या व्यक्ती जगाच्या दुसर्‍या भागात स्थलांतरीत होतात किंवा आपल्या परंपरागत भागात राहूनही आपले अन्न न खाता परदेशातील अन्न खातात त्यांना तब्येतीचे प्रश्न अधिक भेडसावतात. महाराष्ट्रात आपण इडली-डोसा खाल्ला तर आपल्याला त्रास होतो पण हेच दक्षिणेतील लोकांना होत नाही कारण ते त्यांचे परंपरागत खाद्य आहे. त्याचबरोबर त्या परंपरागत अन्नात ते अशाकाही गोष्टी वापरत असणार की ज्याने त्यांना त्याचा त्रास होत नाही. आपण इडली डोसा खाताना त्यांचे परंपरागत सप्लीमेंटरी खाद्यपदार्थ वापरूच असे नाही. ज्यामुळे इडली-डोसा आपल्याला त्रासदायक ठरेल.

      Delete
  9. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete