धर्मातीत श्रद्धा आणि भावना!!
मला अपघात झाल्याचे मी लंगडताना दिसल्यावर
पहिल्या मजल्यावरील मुसलमान शेजारणीने चौकशी केली. ताबडतोब तिने मला
सांगीतलं की वाईट शक्तींची दृष्टी घालवण्यासाठी जिथे अपघात झाला तिथे जाऊन
काहीतरी केलं पाहीजे. मला एकदम आमच्या आईची आठवण झाली. मला अपघात तसा नविन
नाही. अपघात झाला की आई मला सांगायची की अपघात झाल्या ठीकाणी जाऊन नारळ
फोडून यायचा आणि मगे न बघता परतायचं. माझा तसा या गोष्टींवर खूप विश्वास
नाही त्यामुळे आता मी काही हे करत नाही. ती हयात असताना तिच्या समाधानासाठी
म्हणून मी ते करत असे. या मुसलमान शेजारणीचे मन मला मोडता आले नाही म्हणून
मी काही बोलले नाही. पण घटनेला ४ दिवस उलटून गेल्याने ती म्हणाली आता त्या
ठीकाणी जाऊन उपयोग नाही. मीच संध्याकाळी घरी येते. तशी ती तिन्ही सांजा
झाल्यावर घरी आली आणि घराच्या दाराबाहेर मला पूर्वेकडे तोंड करून उभं
रहायला सांगीतलं आणि माझी झाडूने दृष्ट काढली. तोच झाडू ओलांडून घरात जायला
सांगीतले आणि तोंडावरून पाण्याचा हात फिरवायला सांगीतला. आमच्या घरी
पूर्वी आजी (दोन्ही कडच्या) आणि आई अशा मीठ मोहरीने दृष्ट काढायच्या आणि ती
ओवाळून टाकलेली मीठ-मोहरी लोखंडाच्या पळीत जाळायला ठेवली जायची. आता
मीठ-मोहरी जळल्यावर घाण वास हा येणारच पण आमच्या आज्या म्हणायच्या "चांगलीच
दृष्ट लागली होती हो" आणि आम्ही मंद स्मीत करत त्यांच्या त्या मायेला
एन्जॉय करायचो. २०११ मधे "ड्ब डब डब २०११" या कॉन्फरन्सला हैद्राबाद ला
गेले असताना तिथे एक तैवानी मुलगी भेटली. माझ्यासारखीच गुगलची फेलोशिप
मिळवून आली होती. शेवटच्या दिवशी निरोप घेताना तिने मला एक कागदी
चित्रविचित्र तोंडाचा सिंह दिला. तिने तो स्वत: बनवला होता. मला म्हणाली की
मी असे पाच सिंह माझ्या बरोबर आणले आहेत. मला जी पाच महत्वाची वाटतील अशी
लोकं भेटतील त्यांना देण्यासाठी. हा सिंह तुझ्या घराच्या हॉल मधे दाराकडे
तोंड करून ठेव आणि तो तुझं दुष्ट शक्तींपासून रक्षण करेल. कथित परिणामच्या
सत्यासत्यतेचा वाद घालण्यापेक्षा तिच्या माझ्याविषयीच्या भावना मला अधिक
महत्त्वाच्या वाटल्या म्हणून माझ्या कडे तो सिंह अजुनही आहे आणि मी तो तिने
सांगीतल्या प्रमाणे दाराकडे तोंड करून ठेवलाही आहे. आता मी कॅनडाला जाते
तेव्हा तिथेही काही आप्तेष्ट भेटलेले आहेत. आम्ही प्रवासाला निघालो की
त्यांच्या "टेक केअर" आणि "गळा भेटीतून" देखिल तीच माया अनुभवत असते.
मुद्दा हा आहे की भावना, श्रद्धा या धर्मातीत असतात. कुणी त्याला धर्माचे
लेबल लावून त्याचे भांडवल करू नये.
No comments:
Post a Comment