साहित्य: १/४ कप कनोला आणि ऑलिव्ह ऑईल; १(१/३) कप साखर, १ कप किसलेले गाजर, १/४ टीस्पून लवंग पावडर, १(१/३) कप थंड पाणी; १ कप मनुका/बेदाणे, १ टीस्पून दालचिनी पावडर, १ टीस्पून जायफळ, १/२ कप दाणे/बदाम/अक्रोड; २ कप गव्हाचे किंवा होल व्हिट पीठ, १ टीस्पून सोडा, १ टीस्पून बेकींग पावडर, १ टीस्पून मीठ, केक पात्राला लावण्यास
कृती: एका भांड्यात दिलेलेल्या मापाप्रमाणे कनोला आणि ऑलिव्ह तेल, साखर, पाणी, किसलेले गाजर, लवंग, दालचिनी, जायफळ, बेदाणे व्यवस्थित एकत्र करून घ्यावेत. तयार झालेले मिश्रण ५ मिनीटे उकळावे आणि थंड करण्यास ठेवावे.
दिलेल्या मापाने घेतलेल्या पिठात मीठ, सोडा, बेकींग पावडर एकत्र करून घ्यावे. वरील थंड झालेल्या मिश्रणात मीठ, सोडा आणि बेकींग पावडर घातलेले पीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणात दिलेल्या मापात आक्रोडांचे तुकडे टाकावेत. तयार झालेले मिश्रण व्यवस्थीत एकजीव करावे. केकपात्राला आतून क्रिस्को शॉर्टनींग किंवा तूप लावून केकचे बॅटर (मिश्रण) केकपत्रात भरावे.
केकपात्र एक तासभर ओव्हन मधे ३५० डिगरी तापमानावर बेक करावे. तासाभराने केकपात्रं ओव्हन मधून बाहेर काढून केक थंड होण्याची वाट पहावी. केक थंड होत असताना तो व्यवस्थीत बेक झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी सुईसारखे अणकुचीदार टोक असणारी वस्तू त्या केक मधे घुसवून पहावी.
व्यवस्थीत बेक झालेल्या केकचे बॅटर त्या अणकुचीदार टोकाला चिकटत नाही. जर बॅटर चिकटले तर केक नीट बेक झालेला नाही असे समजावे आणि पुन्हा थोडावेळ ओव्हन मधे केकपात्र ठेवावे.
व्यवस्थीत बेक झालेल्या केकच्या कडा केक थंड होत असताना केकपात्रापासून आपोआप सुटायला लागतात. अशा कडा सुटायला लागल्या की केकपात्रं उलटे करून त्याच्या तळाशी थपडा माराव्यात म्हणजे केक केकपात्रापासून व्यवस्थीत सुटून बाहेर येतो.
यानंतर तुमचा गाजराचा केक कापून इतरंना खायला घालण्यासाठी तयार असेल. हा गाजराचा केक एकदम स्वादिष्ट आणि खुसखुशीत होतो.
No comments:
Post a Comment