Wednesday 24 February 2010

कोमा

(डिस्क्लेमरः कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)
नलीला स्ट्रेचरवर घालून ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. तिच्या पोटात अजुनही असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तिला ऑपरेशन टेबलवर झोपवलं आणि सराईतपणे नलीशी बोलत एकीकडे सिस्टरला सूचना दिल्या. नलीला तिचे नेहमीचे कपडे बदलून हॉस्पिटलचा हिरवा अगदि टिपीकल गाऊन घालेपर्यंत वेदना चालूच होत्या. सिस्टरने तिचे कपडे बदलून तिला ऑपरेशन थिएटर मध्ये आणलं होतं. ऑपरेशन करून घेण्याची ही नलीची पहिलीच वेळ. डॉक्टर काय बोलत होत्या हे तिच्या डोक्यावरून जात होते. हातपाय गार पडत चालले होते. तशातच डॉक्टरांनी तिला सांगितलं, "काळजी करू नकोस, आता थोड्याच वेळात तुला बरं वाटायला लागेल, हं!!" नलीला आता कोणाचाच आवाज ऐकावासा वाटत नव्हता. नली आपल्याच कोणत्यातरी विचारात असताना सिस्टरनी चटकन एक इंजक्शन दिलं. डॉक्टर म्हणाल्या आता तुला काही त्रास होणार नाही. मग हळूच डॉक्टरांनी नलीचा उजवा हात हातात घेउन आय-व्ही टोचलं. नलीला आता फक्त त्यांचे पुसट होत जाणारे आवाज ऐकू येत होते आणि आजूबाजूला होणार्‍या हालचालीची पुसटशी जाणीव होत होती. त्यानंतर एकदम एअरटाईट कंपार्टमेंट मध्ये असल्या सारखं तिला वाटायला लागलं. तिने हलण्याचा प्रयत्न केला पण तिला हलताच येत नव्हते. आपल्या शरीराला काहीतरी होतं आहे याची जाणीव तिला होती पण डॉक्टर म्हणाल्या तसं तिला त्याचा त्रास होत नव्हता. खूप दमल्यावर अंगातली शक्ती पूर्णपणे निघून गेल्यावर जसं वाटेल तसंच तिला वाटत होतं. त्या एअरटाईट कंपार्टमेंट मध्ये ती कितीवेळ तरी पडून होती. मग अचानक तिला पुन्हा आजूबाजूचे आवाज ऐकू यायला लागले. पण ते तिला सहन होत नव्हते. त्यामधून बाहेर पडण्याचा तिचा अटोकाट प्रयत्न चालला होता. "आई...आई..ई..ई.." असं जीवाच्या आकांताने ओरडून ती पुन्हा शांत होत होती. पुन्हा १-२ मिनीटांनी तोच प्रकार. हे सगळं पहिल्यांदाच पहात असलेला अनिकेत, नलीचा नवरा, कावरा बावरा होउन नलीच्या उशाशी बसला होता. काही वेळाने नलीने अनिकेतला ओळखले आणि आता ती अनु....अनु असे ओरडायला लागली. तिच्या हळूहळू लक्षांत येत होतं की आता ती हॉस्पिटल मधल्या तिच्या प्रायव्हेट रूम मध्ये असून अनिकेत एका हाताने तिचा हात हातात घेउन तिला दुसर्‍या हाताने गोंजारत होता. तिच्या डोळ्यांतून निघणार्‍या पाण्याच्या धारा काही थांबायचं नाव घेत नव्हत्या. अंगातली सगळी शक्ती गेल्याने तिला फारसं बोलता येत नव्हतं. शरीर एकदम हलकं हलकं वाटत होतं. बराच वेळ तिला झोप लागली असावी. आता तिला थोडं बोलता येत होतं. पण डोळे आजुनही पाणावलेले होते. मधुनच तिला मळमळल्या सारखं होत होतं. खूप तहान पण लागली होती. पण डॉक्टरांनी सिस्टरला बजावलं होतं की त्या जो पर्यंत परत येउन पेशंटला तपासत नाहीत तोपर्यंत तरी तिला पाण्याचा एक थेंब सुधा द्यायचा नाही. एकीकडे तिच्या उजव्या मनगटापाशी टोचलेलं आय-व्ही तसच होतं. सिस्टरना डॉक्टरांनी सांगून ठेवलं होतं की सलाईनची आयत्यावेळी गरज पडली तर पुन्हा टोचाटोची टळण्यासाठी ते तसंच ठेवलं होतं. त्यामुळे नली तशीच अनिकेतच्या हातात हात देउन पडून राहिली.
..............
नली आडीच महिन्यांची गरोदर होती. सकाळीच घरी गडबडीत पाय घसरून ती पडली. त्यामुळे पोटात वेदना चालू झाल्या होत्या आणि ब्लिडिंग पण व्हायला सुरूवात झाली. नशीबाने अनिकेत ऑफिसला जायच्या आधीच हे झाल्याने त्याची मदत मिळाली. त्यानेच मग बाबांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी डॉक्टरांना ताबडतोब इमरर्जन्सी कॉल दिला आणि डॉक्टरांनीही तासाभरात ऑपरेशनची जुळवाजुळव केली. खरंतर आज तिच्या आईचं वर्षश्राद्दं होतं. बरोब्बर एका वर्षांपूर्वी तिची आई कॅन्सरने गेली होती. तिला ते सगळं आठवायला लागलं. आई पण जेव्हा गेली तेव्हा कोमात होती. नलीच्या मनात आलं, "खरंच, आत्ता आपण जे काही अनुभवलं आईने जी दोन महिने कोमात मरणाशी झुंज दिली त्या दरम्यान पण असंच घडलं असेल कां? नलीला आता पुन्हा तो सगळा काळ आठवला.
तिची आई जाण्याच्या आधी एक वर्ष तिला कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. अचानक असं काही होईल हे ध्यानीमनी नसल्याने घरातले सगळेच हादरले होते. तिसरी स्टेज असल्याने डॉक्टरांनी फक्तं सहाच महीने सांगितले. मग त्यातच होणारा त्रास कमी करण्यासाठी की वाढवण्यासाठी ती केमोथेरपी चालू झाली. त्यामुळे तिच्या शरिरात खूप मोठी आग पडल्यासारखं तिला वाटायचं. कालांतराने तिच्या डोक्यावरचे केस पण गायब झाले. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळं चालू होतं. तसे तिने सहा महिन्यांच्या वर काढले. तिची प्रतिकारशक्ती खूपच कमी झाली होती. त्यामुळे कफ, खोकला तिला अगदी नेहमीचाच असे. एक दिवस खोकल्याची मोठी उबळ तिला आली. नलीचे वडील तिथेच होते. त्यांनी तिला पाणि देण्याचा प्रयत्न केला पण कफ तिच्या श्वासनलिकेत जाउन तिचा श्वास अडकला. कसा तरी तोंडाने श्वासोछ्वास चालू होता. डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. त्यांनी तिला तपासलं आणि म्हणाले, "त्या कधी शुध्धीवर येतील ते काही सांगता येत नाही. कदाचीत २-३ दिवस लागतील किंवा जास्तं दिवसही लागतील. किंवा त्या कधी शुध्धीवर न येता जातील सुधा. पण किती दिवस लागतील ते सांगता येत नाही." नली ने आईच्या चेहर्‍याकडे पाहिले. तिचा चेहरा अजुनही वेडावाकडा होत होता..फीट आल्यावर एखाद्याचा होतो तसा. डॉक्टर रोज सकाळ संध्याकाळ इंजक्शन देउन जात होते. पण उपयोग काही होत नव्हता. त्यातून डॉक्टरांनीच सांगितलं की हॉस्पिटल मध्ये हलवून उपयोग नाही. कारण तिचं शरीर एकतर त्या कॅन्सरने पोखरलं गेलं होतं आणि हॉस्पिटल मध्ये फक्त आय. सी. यू. मध्ये सगळ्या शरीराला नळ्या लावून ठेवणार. त्यात त्या पेशंटवर नक्की काय उपचार चालू आहेत ते कळायला पण मार्ग नसे. त्यामुळे काय होतं आहे आणि कधी होतं आहे याची वाट बघत बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जस जसं लोकाना-नातेवाईकांना समजत होतं तस तसं ते भेटायला येत होते. त्यांचे हेतू जरी चांगले असले तरी घरात पेशंट असल्यावर त्या घरात किती वेळ बसावे आणि काय बोलावे याचं भानच लोकांना नसायचं. या सगळ्याचा त्रास नली आणि तिच्या वडिलांना होत असे. तिच्या आईचे डोळे उघडे असत आणि घशांतून घर घर येत होती. हे सगळं रात्रंदिवस चालू होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे लोक वेगवेगळे सल्ले देत होते. त्यातच कोणी तरी तिला सांगितलं की कोमा मध्ये माणूस असला तरी त्याला सगळं बोलणं ऐकायला येत असतं. कोणी सांगितलं की नलीच्या चिंतेमुळे तिच्या आईचा प्राण अडकून राहीला आहे. मग नलीने रोज रामरक्षा, मनाचे श्लोक, करूणाष्टकं हे सगळं आईच्या जवळ जाउन म्हणायला सुरूवात केली आणि उरलेला वेळ भग्वदगीता तसेच ओंकार जप यांच्या कॅसेट्स लावलेल्या असायच्या. शक्यतो तिच्या आजूबाजूला कोणी येउन काहीबाही बोलणार नाही याची खबरदारी घेतली जायची. जवळ जवळ दोन महिने असे काढले. एक दिवशी अनिकेत आला. तो तसा नेहमीच यायचा. पण त्यादिवशी त्याने जे केले त्यामुळे नलीचा कोमात असलेल्या व्यक्तींना आवाज ऐकू येतात यावर विश्वास बसला. अनिकेतने त्या दिवशी नलीचा हात हातात घेउन आईच्या काना जवळ जावून तिला सांगितलं की नलीची काळजी करू नका. मी तिची आणि तिच्या बाबांची काळजी घेइन. काय आश्चर्य, आई च्या घशातली घरघर थांबली आणि त्याच दिवशी रात्री तीने शांतमनाने आपला दोन महिने मॄत्यूशी चालू असलेला संघर्ष थांबवला.
आज काय योगायोग घडला होता. नलीने पण काहीप्रमाणात आईची स्थिती अनुभवली होती. आणि अनिकेतने त्याचं तिच्या आईला दिलेलं वचन पण पाळलं होतं.

No comments:

Post a Comment