Friday 25 March 2016

आयसीएसइच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची मिमांसा भाग-१: (पार्श्वभूमी)


फेब्रुवारी २०१६ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या काळात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आयसीएस आणि सीबीएसच्या अभ्यासक्रमावर आधारित इतिहासाच्या पुस्तकांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचं कारणही तसंच होतं. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका अतिरेक्याच्या फाशीचा दिवस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यासाठी विद्यार्थी जमले आणि त्याच कार्यक्रमात देशविरोधी घोषणा ऐकू आल्या. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बहुतांश विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचं म्हणणं असं की भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केलेला आहे. त्यामुळे काश्मीरला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. मग त्यासाठी ज्या काही कारवाया केल्या जातात त्यांना स्वातंत्र्य चळवळीचा दर्जा आहे आणि म्हणूनच भारताच्या लोकशाहीचे मंदिर म्हणजेच भारतीय संसदेवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना अतिरेकी न मानता स्वातंत्र्य सैनिक मानावे. त्यांना भगत सिंग सारख्या शहिदांचा दर्जा आम्ही देतो आणि त्यांना भारतीय न्याय व्यवस्थेने दिलेल्या फाशीचा एक न्यायिक हत्या म्हणून निषेध करतो. मुळात विश्वविद्यालयाच्या आवारात असे बुद्धीभेदी वातावरण का निर्माण होते याचा विचार करायला जाता हे लक्षात येते की शालेय जीवनातच बुद्धीभेद निर्माण होईल असा इतिहास शिकविला जातो. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात जो इतिहास शिकविला जातो त्यामुळे त्यांचे देशाच्या इतिहासाविषयी, त्यातील महत्वाच्या व्यक्तींविषयी मत निर्माण होते.

मूळात इतिहास हा विषय शालेय स्तरावर का शिकविला जातो हे पहाणं महत्वाचं आहे. शालेय जीवनात सुरूवातीला विद्यार्थ्यांना आपण जिथे राहतो तिथल्या राज्याचा, देशाचा इतिहास, संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक व्यक्ती यांची ओळख व्हावी, देशप्रेम निर्माण व्हावे हा इतिहास शिकविण्याचा मुख्य हेतू असतो. नववी, दहावी सारख्या इयत्तांमधे जागतिक इतिहासाची ओळख करून दिली जाते. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही त्यामुळे खूप सखोल अभ्यास करून या पाठ्यपुस्तकांची मिमांसा नाही करू शकणार पण एक देशप्रेमी म्हणून माझ्या वाचनात जो थोडाफार इतिहास आलेला आहे किमान त्याआधारे आणि इतिहास शिकविण्यामागची मूळ उद्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून मी या अभ्यासक्रमाची शीतावरून भाताची करतात तशी परीक्षा करू शकते. यासाठी म्हणून मी आयसीएससीच्या ५ वी, ७ वी, ८ वी आणि ९ वी या इयत्तांच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत डोकवायचं ठरवलं. अनुक्रमणिकेवरून साधारणत: पुस्तकात नक्की काय मजकुर असेल याचा अंदाज येतो. त्यामुळे या परीक्षेसाठी सुरूवातीला सगळ्या अनुक्रमणिका पाहिल्या आणि नंतर जशी गरज वाटली तशी एखाद्या धड्याच्या मजकुराच्या तपशीलात गेले.  माझ्या हातात या कामासाठी आलेली पाठ्यपुस्तके ही आयसीएस अभ्यासक्रम राबविणार्‍या एका शाळेतील विद्यार्थ्याकडून आणलेली आहेत. त्यामुळे ती पुस्तके आयसीएसच्या अभ्यासक्रमाची आहेत याविषयी तीळमात्र शंका नाही.

माझ्या अंदाजाने एनसीईआरटी ही संस्था जशी सीबीएसच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके प्रकाशित करते तशी आयसीएससाठी एक प्रकाशन संस्था नाही. या दुव्यावर आयसीएसची माहिती घेण्यासाठी गेलं असता अभ्यासक्रम या सदरात काहीच आढळत नाही. ब्रांचेसला क्लीक केलं की त्यांच्या विविध शाखांची कार्ये कोणती त्याची माहिती आहे. त्यातच अ‍ॅकॅडमीक ब्रांच म्हणून आहे. त्याच्या कार्यांमधे पुस्तकं रिव्ह्यु आणि प्रकाशित करणे असं दिलेलं आहे. पण कुठेही ही पुस्तके नक्की कुठे प्रकाशित केली जातात याची माहिती दिलेली नाही. मूळातच आयसीएससी ही एक ऑटोनॉमस म्हणजेच स्वायत्त संस्था आहे त्यामुळे त्याचा शासकीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाशी कितपत संबंध आहे याची कल्पना येत नाही. म्हणजेच थोडक्यात एनसीईआरटी च्या पाठ्यपुस्तक निर्मिती आणि पुस्तक प्रकाशनासाठी काही लोकांची यादी तयार आहे की जी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाला उत्तरदायी आहे. पण आयसीएस नक्की कोणाला उत्तरदायी आहे हेच गुलदस्त्यात आहे. त्यामुळे विविध प्रकाशक त्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके प्रकाशित करतात. कोणत्या प्रकाशकांची पुस्तके पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासायची हे पूर्णपणे त्या त्या शाळेवर अवलंबुन असते. त्यामुळे सर्व प्रकाशकांच्या पुस्तकांची मिमांसा करणं शक्य नाहीये.

मी जी पाठ्यपुस्तके पाहिली ती त्या त्या शाळांनी अभ्यासासाठी सुचवलेली पुस्तके आहेत. ती सुद्धा एकाच प्रकाशनाची नाहीत. त्या पाठ्यपुस्तकांचे लेखक हे कोणत्यातरी शाळेचे मुख्याध्यापक वगैरे आहेत. पुस्तका विषयी पुस्तक लेखकांनी दिलेली माहिती वाचताना लक्षात येते की ६ वी ते ८ वी ची पुस्तके ही इंटर स्टेट बोर्ड फॉर अ‍ॅंग्लो-इंडियन एज्युकेशनच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. आता या बोर्डची माहिती तुम्हाला या दुव्यावर पहायला मिळेल. याची एकूण माहिती पाहता ही संस्था १९३५ साली युरोप, युरेशीया आणि अ‍ॅग्लो-इंडियन या भागातील शाळांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी झाली. याची एकूण सुरूवातीची उद्दीष्टे पाहता ब्रिटीशराज मधे जे लोक या भागात ब्रिटीशांच्या सेवेत असत त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था चालू झाली असल्याचे किंवा ब्रिटीश सत्तेला सोयीचे असे प्रशासकीय अधिकारी तयार करण्याचा पाया म्हणून ही संस्था चालू झाली असावी असे वाटते. त्याचे सध्याचे स्वरूप हे भारतात अ‍ॅग्लो-इंडियन शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे असे दिसते आहे. मुख्यत: आयसीएस आणि आयएससी या परीक्षांचा अभ्यासक्रमाचा पाया, आराखडा तयार करणे हे आहे. ही पण एक स्वायत्त संस्था आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण मंडळाशी जोडलेली नाही. त्यामुळे कोणाला उत्तरदायी नाही. अभ्यासक्रमाच्या मिमांसेच्या आधी हे सगळं इतक्या खोलात जाऊन लिहीण्यामागचं कारण असं की या अभ्यासक्रमाच्या शाळांमधे आपल्या मुलांना घालण्याचे प्रमाण सध्याच्या एलिट वर्गात वाढत आहे. आपण आपल्या पाल्यांना १०-१२ वर्षं एका अशा संस्थेच्या ताब्यात देत आहोत की जी आपल्या मुलांची मानसिक जडण घडण शिक्षणाच्या माध्यमातून तयार करणार आहे. अशी संस्था की जी कोणालाच उत्तरदेण्यास बांधील नाही. मग ह्या लोकांना तुम्ही इतिहास म्हणून आमच्या मुलांना नक्की काय शिकवत आहात ह्याचा जाब पालक कसा विचारणार? बरं अभ्यासक्रम आणि त्याचा आराखडा तयार करणार्‍या संस्थेचा मूळ हेतू हे ब्रिटीशांना सोयीचे असे शिक्षण देणे हा आहे. मग अशा अभ्यासक्रमातून देशप्रेमाचे धडे कसे दिले जातील?

आयसीएसच्या वेबसाईटवर उद्दिष्टांमधे खूप काही दिलेलं आहे. मुख्यत: पद दलित, विधवा स्त्रियांना मदत, अनाथ मुलांना शिक्षण असं बरंच काही लिहीलेलं आहे. पण माझ्या माहिती प्रमाणे आयसीएसचा अभ्यासक्रम हा अधिकतर ख्रिस्ती मिशनरी शाळा वापरतात. या शाळांमधे जाणारी मुलं ही नक्कीच पददलीत समाजातील, अनाथ वगैरे आजीबात नाहीत कदाचित पूर्वी असतील. यांना लागणारा पैसा कुठुन येतो हे वेगळं सांगायची गरज नाही. या शाळा शासकीय अनुदान घेत नसल्याने (थोडक्यात शासनाशी काहीही संबंध ठेवत नाहीत) यांचे शुल्क देखील अफाट असते. जी शुल्क रचना या वेबसाईटवर दिली आहे ती फक्त १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे शुल्क यासाठी आहे. शाळांचे शुल्क यात कोठेही नाही. त्यामुळे यांचे लिखित (म्हणजेच दाखवायचे) उद्दिष्टे आणि प्रत्यक्षातील कृती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. याचाच अर्थ आयसीएस हा एकूणच गोलमाल प्रकार आहे आणि कोणालाही उत्तरदायी नसलेल्या या संस्थेकडे देशातील अनेक शाळांचे अ‍ॅफिलीएशन आहे. या शाळांतून हजारोच्या संख्येने एलिट तसेच उच्च मध्यमवर्गातील मुले शिक्षण घेत आहेत. बंगळुरू मधे तर मी या आयसीएस अभ्यासक्रम असलेल्या शाळांच्या जाहिराती, स्कुलबसेस ढिगाने पाहिल्या आहेत. म्हणजे मुलांना शिक्षण देण्याच्या माध्यमातून देशद्रोही, देशाविषयी फारसे प्रेम नसणारी, अप्रत्यक्षपणे ब्रिटीशांचे मांडलिकत्व मानसिकदृष्ट्या मान्य करणारी फौज तर तयार केली जात नाहीये ना? अशी शंका मनात येते. माझ्या मनात या शंका का येत आहेत हे तुम्हाला लेखाच्या पुढील भागावरून लक्षात येईल. 

आयसीएसइच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची मिमांसा भाग-२: (मिमांसा)

No comments:

Post a Comment