Wednesday, 21 December 2011

भारतरत्न पुरस्काराचे महाभारत!

भारतरत्न, हिंदूस्थानातील एक सर्वोच्च नागरी पुरस्कार! भारतरत्न अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने मानवतेसाठी, समाजासाठी उच्चकोटीची तसेच भरगच्च कामगीरी केलेली आहे. सुरूवातीला हा पुरस्कार देशासाठी भरीव कामगीरी केलेल्या व्यक्तींना दिला जात असे. पण आता हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला दिला जातो त्यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरीक असण्याचंही कारण नाही आणि त्या व्यक्तीने भारतीय समाजासाठी विशेष केलेलं असण्याचीही आवश्यकता नाही. ह्या पुरस्काराची घोषणा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र पसाद यांनी २ जानेवारी १९५४ ला केली. सुरूवातीला हा पुरस्कार केवळ जीवंत असलेल्या व्यक्तींनाच देण्यात यावा अशी तरतूद होती पण जानेवारी १९५५ मधे त्यात सुधारणा घडवली गेली आणि हा पुरस्कार मरणोत्तर देण्यासही सुरूवात झाली.
अत्तापर्यंत हा पुरस्कार एकूण ४१ व्यक्तींना देण्यात आलेला आहे. त्याची यादी विकीपीडीया इथे उपलब्ध आहे. त्यातील दोन व्यक्ती खान अब्दुल गफारखान (सरहद्द गांधी) आणि नेल्सन मंडेला भारतीय नागरीक नाहीत. हा पुरस्कार देण्यासाठी नक्की कोणते निकष लावले जातात याचे जाहीर प्रकाशन फारसे उपलब्ध नाही. अत्तापर्यंत जे काही बाहेर आले आहे त्यावरून असेच वाटते की विशिष्ठ क्षेत्रातील व्यक्ती------जिवंत अथवा मृत आणि त्यांनी केलेली कामगीरी इतकेच निकष दिसतात. आपण जर यादी नीट पाहीली तर अधिकाधिक वेळा पुरस्कार प्राप्त व्यक्ती ह्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत, राजकीय व्यक्ती तसेच कॉंग्रेसशी संबंधीत आहेत. उदा. राजीव गांधींनी अशी कोणती भरीव कामगीरी भारत देशासाठी किंवा मानवतेसाठी किंवा समाजासाठी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्ती कला क्षेत्र (सुब्बालक्ष्मी, सत्यजीत रे, पं भिमसेन जोशी, लता मंगेशकर, पं रविशंकर, शहनाई सम्राट बिस्मील्ला खान, एम जी रामचंद्रन), सामाजिक कार्य (विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, मदर टेरेसा, नेल्सन मंडेला) तसेच विद्वान-शास्त्रज्ञ (सी व्ही रामन, ए पी जे अब्दुल कलाम, अमर्त्य सेन, डॉ आंबेडकर, पांडुरंग वामन काणे, झाकीर हुसेन, विश्वेश्वरैय्या), उद्योजक (जे आर डी टाटा) यांची नावं आहेत. एम जी रामचंद्रन यांनी मानवतेसाठी आणि समाजासाठी नक्की काय भरीव कामगीरी केलेली आहे हे समजत नाही. राजकीय क्षेत्रातील अनेक नावं अशी आहेत की त्यांच्या भरीव (??) कामगीरी बद्धल प्रश्न पडतात.
यात अजुन एक महत्त्वाचा मुद्दा राहून जातोय आणि तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेलं मरणोत्तर भारतरत्न काढून घेणे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण कामगीरी कोणीच नाकारू शकत नाही. म्हणजे अगदी जवाहरलाल नेहरूंच्या पेक्षाही भरीव कामगीरी नेताजींची आहे. पण केवळ त्यांच्या मृत्युचं सर्टीफिकीट नाही म्हणून त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाता कामा नये असे म्हणून दिलेला पुरस्कार नाकारण्यात आला. आता एक गंमत बघा की हेच कॉंग्रेस सरकार सार्‍या जगाला ओरडून सांगत असतं की सुभाषचंद्र बोस जिवंत नाहीत.....ते जिवंत असणं शक्यच नाहीत असं त्यांचे नातेवाईकही मान्य करतात. मग भारतरत्न पुरस्काराच्याच वेळी यांना ते मृत नाहीत असं का वाटावं? मुख्य म्हणजे लोकांकडून मागणी होते म्हणून घटनेत दुरूस्ती करून भारतरत्न पुरस्कार देण्यात येण्याच्या यादीत खेळाडूंची वर्णी लावली गेली. पण सुभाषचंद्र बोसांवर किती अन्याय होतो आहे याचा कुणीही विचारही करत नाही. इंदिरा गांधीला १९७१ साली हा पुरस्कार देण्यात आला आणि १९७५ साली तिने लोकशाहीची पायमल्ली करून देशात आणीबाणी निर्माण केली. मग ही भारतरत्न पुरस्काराची पायमल्ली नाही काय? राजीव गांधींचं नाव बोफोर्स गैरव्यवहारांसहित स्विस बॅंकेतील काळ्या पैशासंदर्भातही आलेले आहे. मग एकूणातच काहीही कामगीरी न केलेल्या आणि भ्रष्टाचारात नाव गोवले गेलेल्या व्यक्तीचं भारतरत्न का काढून घेऊ नये?
सचिन तेंडूलकरने क्रिकेट या खेळात भव्य कामगीरी केलेली आहे. तशी ध्यानचंद यांनीही तेंडूलकर जन्माला येण्याआधी हॉकीच्या क्षेत्रात सुवर्ण कामगीरी केलेली आहे. मग केवळ सचिन तेंडूलकरसाठी (म्हणजे क्रिकेट साठी) नियम बदल केले जातात. [मी हे असं लिहीलं आहे याचा अर्थ मी सचिन तेंडूलकरची कामगीरी आजीबात महत्त्वाची नाही असं म्हणते आहे असा होत नाही.] उद्या अमिताभ बच्चनचे चाहते एकत्र येऊन त्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करतील. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे क्रिकेटमधला नाही. त्यामुळे वयाच्या चाळीशीतच भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर त्याला पुढे कोणताच भारतातील पुरस्कार स्विकारता येणार नाही. याउलट मला असं वाटतं की अत्ता त्याला हा पुरस्कार न देऊन त्याला भारतीय समाजासाठी/ मानवतेसाठी काही उत्तम करण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे भविष्यात जेव्हा हा पुरस्कार त्याला दिला जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांसाठीच ते अधिक अभिमानास्पद असेल.
बिस्मिल्ला खान यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतरही आयुष्यातील शेवटची काही वर्षं त्यांनी हालाखीत एका झोपडीत औषधपाण्याविना काढलेली आहेत. काय उपयोग त्या भारतरत्न पुरस्काराचा? ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबाबतीतही त्यांचा अपमान होण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत.
हे भारतरत्न पुरस्कार वगैरे सगळा दिखावा आहे. नागरी पुरस्कार देण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीवर तसेच सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती आहे त्यावर हे सगळं अवलंबून आहे. वर नमूद केल्याप्रमाणे राजीव गांधी, इंदिरा गांधी तसेच इतरही काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या बाबतीत जे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तसं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी भारतरत्न पुरस्कार पात्रता निवडीत वयाची अटही असावी असे वाटते. म्हणजे व्यक्तीला अधिक काळ परखून मगच हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जावा. मला असं वाटतं की सद्य परिस्थीतीत तसेच निकषांच्या बाबतीत पारदर्शकता असावी तसेच हा पुरस्कार मरणोत्तरच दिला जावा म्हणजे पुरस्कार प्राप्त काही विद्यमानांचा (बिस्मिल्ला खां आणि अब्दुल कलाम) जसा अपमान होतो आहे/झाला आहे तो तरी भविष्यात होणार नाही. तरच या पुरस्काराची मानदंडता राखली जाईल. नाहीतर दिवसेंदिवस त्याचे महत्त्व कमी होत राहील यात शंका नाही.

4 comments:

 1. या प्रकारच्या पुरस्कारांना काही अर्थ राहिला नाही - राजकीय सोयीव्यातिरिक्त - म्हणून ते आता बंदच केले पाहिजेत. पण तरीही त्यावर चर्चा होत राहते!

  ReplyDelete
 2. अतिवास, अगदी खरंय. मलाही हेच वाटतं की हे नागरी पुरस्कार वगैरे बंदच करावेत. पण ह्यांचं राजकारण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठीची आणखी एक पेढी कमी होईल. आता लोकपालच्या निमीत्ताने त्या पेढीत एकाने वाढ झालेली आहेच.

  ReplyDelete
 3. सचिन तेंडुलकरला इतक्यात भारतरत्न पुरस्कार देऊ नये ह्या मुद्याशी मीही सहमत आहे. पण बहुधा सचिनने १०० वी सेंच्युरी झळकावली की त्याला भारतरत्न जाहीर केले जाईल. आणि नाहीते वाद नको म्हणून सचिनसोबत ध्यानचंद यांनाही हा पुरस्कार मिळेल अशी शक्यता आहे.
  केवळ संवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराचा वापर केला जाईल असेच दिसते.

  ReplyDelete
 4. आज क्रिकेटमधे जितका पैसा... आहे जर तितका पैसा क्रिकेटमधे नसता तर सचिन तेंडूलकर झाला असता का? म्हणजे त्याच्या आई-वडिलांनी त्याला स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून सुरूवातीलाच प्रशिक्षणास पाठवीले असते का? चाहत्यांचं प्रेम बघून विक्रम करणार्‍यांना अजून स्फूर्ती मिळते. जर क्रिकेट मधे इतका पैसा नसता तर आज क्रिकेट इतका लोकप्रिय खेळ असता का? ध्यानचंदच्याकाळात कोणत्याच खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी पैसा मिळत नसत. त्याचप्रमाणे प्रशिक्षणा ऐवजी स्वत:च्या अंगभूत गुणवत्तेवरच सगळं अवलंबून असे. त्यामुळे ध्यानचंद यांचे विक्रम हे सचिन तेंडूलकरच्या विक्रमांपेक्षा काकणभर सरसच आहेत. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला तर अधिक चांगलं होईल.

  ReplyDelete