Thursday, 13 January 2011

ऐरावत आणि शिवनेरी........(प्रांतवाद नको पण निखळ सेवा बघावी)!

 ऐरावत

आजची सकाळ मधली बातमी वाचली की कर्नाटक महामंडळाची एसटी महामंडळावर कुरघोडी आणि खूप दिवस मनात होते ते लिहावे असं वाटलं. म्हणून हा सगळा खटाटोप. कर्नाटक महामंडळाच्या वोल्व्हो सेवेला ऐरावत असे म्हणतात तर महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या सेवेला शिवनेरी म्हणतात. बेळगाव मध्ये मराठी माणसांवर अन्याय होतो, मराठी लोकांना कन्नड माध्यमातच शिक्षण घ्यावे लागते त्यांच्यावर कर्नाटक सरकार अन्याय करते वगैरे वगैरे आपण वेळोवेळी वृत्तप्त्रांमधून वाचत असतो. 
केएसआरटीसी साधी बस
मला असं वाटतं की यात कर्नाटक सरकारची चूक नसून चूक महाराष्ट्र सरकारचीच आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी भ्रष्टाचार, व्यक्तीगत हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी, शह-काट शहाचे राजकारण यातच व्यस्त आहेत. म्हणून गुजरात आणि कर्नाटक सारख्या प्रगत शेजारील राज्यांचा प्रत्येक बाबतीत त्यांना असूया वाटते. मग एखाद्या गोष्टीत खरंच टीका करण्यासारखं काहीही नसताना उगाचच कारण नसताना टीकेसाठी टीका केली जाते. आता वरील बातमी वाचल्यावर प्रथम दर्शनी असं वाटेल की केएसआरटीसी किती कुरघोडी करतंय. पण सत्य वेगळंच आहे. माझ्या दोन परस्पर विरोधी अनुभवांवरून हे सिद्ध होईलच. माझ्यासारखेच इतरांना सुद्धा अनुभव नक्कीच आले असतील.

एसटीचा लाल डबा
एस टी महामंडळाची सेवा केएसआरटीसीच्या तुलनेत डावीच आहे. मला नुकताच हा अनुभव आला. मुंबईहून पुण्याला येण्यासाठी आम्ही दोघे शिवनेरीच्या दादरच्या बस थांब्यावर उभे होतो. तिकीट काढल्यावर गाडी लागली. आमच्याकडे बरंच सामान होतं म्हणून मी शिवनेरीच्या पोटात सामान ठेवण्यासाठी तिथला दरवाजा शोधायला लागले. मी बंगलोरला रहात असल्याने केएसआरटीसीने (वोल्व्होने) भरपूरवेळा प्रवास केला आहे. 
शिवनेरी
त्यामुळे वोल्व्होचा ड्रायव्हर डीकीचं दार उघडून सामान आत ठेवायला प्रवाशांना मदत करतो आणि स्वत: सामानाच्या नगांवर प्रवाशांच्या तिकीटावरील क्रमांक टाकतो. इथे ड्रायव्हरचा पत्ताच नव्हता. मी डीकीचा दरवाजा कसा उघडायचा हा विचार करत असतानाच एक खाकी गणवेषातील माणूस पुढे झाला आणि त्याने डीकीचं दार उघडलं, आमचं सामान घेतलं आणि खडूने त्यावर आमचे आसन क्रमांक घातल्यावर ते नग आत ठेवले. नेहमीच्या सवयी प्रमाणे मी गाडीत चढायला सुरूवात केली तर त्या खाकी गणवेषातील माणसाने माझ्यापुढे तोंड वेण्गाडत हात पुढे केला आणि म्हणाला, "काही चाय पाणी". मला हे नविनच होतं. हे पक्कं माहीती आहे की प्रवाशांचं सामान तिकीट चेक करून व्यवस्थित डीकीत ठेवणे हे प्रत्येक वोल्व्होच्या ड्रायव्हरचं काम असतं. (कर्नाटकात आणि परदेशातही मी हेच पाहीलं आहे) त्यामुळे मी पैसे द्यायला नकार दिला कारण मला चुकीच्या प्रथा पाडायच्या नव्हत्या. 
बंगलोर मॅजेस्टीक
मी पैसे द्यायला नकार दिल्यावर त्या माणसाने चक्क मला धमकी दिली की आमच्या सामानावरचे क्रमांक पुसून टाकून ते गायब करेन. शेवटी धसक्याने मी त्याला २० रू काढून दिले. तेव्हा दात विचकत त्याने ते घेतले आणि खिशात टाकले. आमच्या नंतर अजुन एक माणूस अशाच प्रकारे लुटला गेला. मी आत गेल्यावर पाण्याची बाटली आणि वर्तमानपत्र घेतलं नसल्याने पुन्हा तिकीट खिडकीपाशी जायला म्हणून खाली उतरले. तर हा खाकी गणवेषातील माणूस प्रवासी वाट पाहताना बसतात त्या खुर्च्यांवर बसून एकाला माझ्याकडे बोट दाखवून हसत हसत सांगत होता की मी तिला कसं धमकावलं आणि तिने मला २० रू दिले. तो ज्या व्यक्तीशी बोलत होता तो आमच्या शिवनेरीचा ड्रायव्हर होता कारण त्यानंतर लगेच तो उठून मला गाडीत चढताना दिसला. मला राग आला म्हणून त्याला मी विचारलं की शिवनेरीच्या आणि केएसआरटीसीच्या सेवेत येवढा फरक कसा काय? तेव्हा तो मला म्हणतो कसा तुम्ही कशाला दिलेत पैसे. मग तर माझा राग अनावर झाला आणि मी त्या दात विचकणार्‍या माणसाची ताबडतोब तक्रार करायची ठरवली. 
स्वारगेट एसटी स्टॅंड
 प्रश्न वीस रूपयांचा नव्हता तर एसटी महामंडळाच्या रेप्युटेशनचा होता. मी तक्रार करायला जाते आहे हे जेव्हा त्या दात विचकणार्‍याच्या लक्षात आलं तेव्हा मला त्याने दहा रूपये परत केले आणि म्हणाला मी तुम्हाला दहा रूपये परत देणारच होतो पण तुम्ही लगेच गाडीत चढलात. मी जाऊन तक्रार केली. त्यांना घडलेला प्रकार सांगीतला आणि हे सुद्धा सांगीतलं की तो माणूस एसटी महामंडळाची लाज घालवतोय असं वागून. तेव्हा त्या अधिकार्‍यांनी मला सांगीतलं की तो एसटीचा कर्मचारी नाही. त्याला बोलावून समज देणार तर त्या माणसाने उरलेले दहा रूपये माझ्या हातावर ठेवले. आणि त्या अधिकार्‍याला म्हणाला यांनीच मला सामान उचलायला सांगीतलं म्हणून मी सामानाला हात लावला. आता या चालू झाल्या चोराच्या उलट्या.....
त्यानंतर आठच दिवसांनी आम्ही पुण्याहून (स्वारगेट बस स्टॅंडहून) बंगलोरला जायला कर्नाटक महामंडळाची ऐरावत धावतच गाठली. तर ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघंही खाली उतरून एकाने तिकीटं तपासली आणि दुसर्‍याने सामान आपण्हून उचलून डीकीत ठेवले. (सामान ठेवताना कुठे उतरणार हे विचारायला तो विसरला नाही म्हणजे त्याप्रमाणे सामानाची जागा ठरवली) तसेच एका चिठ्ठीवर दोन बाजूंना क्रमांक चालून एक तुकडा सामानावर व्यवस्थीत बांधून एक तुकडा आमच्याकडे दिला. मला नेहमीच ऐरावत सेवा आवडते. नाहीतर शिवनेरीची सेवा..........तोंड बघा असंच म्हणावं लागतं.
कर्नाटक राज्याच्या साध्या गाड्या पण एकदम स्वच्छ आणि हवेशीर असतात. त्यांमधील आसन व्यवस्था एकदम व्यवस्थीत, सुटसुटीत तसेच वरच्या बाजूला सामान ठेवायला भरपूर मोकळी जागा असते. त्यांचे रंगही अतिशय ताजेतवाने आणि नवीन असतात. गेली अनेक वर्षे मी या गाड्या पुणे मुंबई मार्गे कर्नाटकातील अगदी शिमोगा वगैरे छोट्या शहरांपर्यंत धावतात हे सुद्धा बघीतलं आहे.  केएसआरटीसी चे बस थांबे सुद्धा अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त असतात. त्या उलट एसटी च्या गाड्या प्रचंड धुळीने माखलेल्या, हवा जेमतेम, सामान ठेवायला वरच्या बाजूला अत्यंत तोकडी जागा, आसन व्यवस्था अत्यंत टुकार, गाडीच्या बाहेरून प्रवाशांचे ओकार्‍यांचे डाग तसेच वाळलेल्या अवस्थेत असतात. म्हणजे ते वास घेऊन आणि तसली अस्वच्छता बघून एखादा आजारी नसलेला आजारी पडायचा अशी अवस्था. एसटीच्या गाड्यांचा तो आदीम काळापासूनचा लाल डबा रंग कधीच बदलेला नाही. एसटीच्या बस थांब्यांची कल्पना पुण्याच्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, दादरच्या शिवनेरी बस स्थानकावरून केलेली बरी.

तात्पर्य असं आहे की आपण कोणत्याही बाबतीत एसटी महामंडळ आणि कर्नाटक महामंडळाच्या गाड्यांची तुलना केली तर सर्वच बाबतीत (अगदी गाड्यांची स्वच्छता, गाड्यांची एकूण स्थिती, गाड्यां मध्ये मिळणारी सेवा) कर्नाटक महामंडळ उजवं आहे. मला नेहमी हा प्रश्न पडायचा की बंगलोरहून पुण्यासाठी अगदी मुंबई-शिर्डी पर्यंत रोज केएसआरटीसीच्या गाड्या आहेत. तशाच उलट्या दिशेला पण आहेत. हेच एस टी महामंडळाच्या का नाहीत? अगदी पुण्याहून लातूरला जाताना सुद्धा शिवनेरी पेक्षा खाजगी प्रवासी कंपन्यांचीच सेवा असते. असं का? याचा एस टी महामंडळ तसेच महाराष्ट्र सरकार यांनी विचार करायला हवा. राज्यकर्तेच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असताना सरकारी संस्थांकडून तरी दुसरी काय अपेक्षा ठेवणार?

9 comments:

 1. खरंय!
  आंधळं दळतंय अन्‌ कुत्रं पीठ खातंय...अशीच अवस्था आहे आपल्या राज्याची.

  ReplyDelete
 2. वोल्वो चं उदाहरण छान आहे.. सध्या गाड्यांबाबत बोलायचं झालं तर आपले बसचे वाहक काहीच करत नाहीत... कर्नाटक वाले एवढा आरडाओरडा करतात त्या मार्गावरील गावांची नावे घेत ...!! फरक पहायचा असेल तर स्वारगेट ला जाऊन यावे.. :)

  ReplyDelete
 3. तुम्ही कम्प्लेंट करून काहीच फायदा होणार नाही. या व्होल्व्हो गाड्या कॉंट्रॅक्ट वर चालवल्या जातात. त्या एसटीच्या मालकीच्या नाहीत. ड्रायव्हर पण कंत्राटी असतो हल्ली.
  माझा एक मित्र आहे एसटी मधे रिजनल ऑफिसला त्याच्याकडून हे सगळं समजलं.

  ReplyDelete
 4. मी देखील बंगलोरला असतो आणि कधीही ऐरावतने प्रवास करण्याला प्राधान्य देतो. ऐरावतमध्ये जागा नाही मिळाली तर खाजगी पण एस.टी. नाही. ऐरावतच्या सुविधा, ड्राइवर कंडक्टरांचे वागणे, स्वच्छता आणि मुख्य म्हणजे वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा अश्या किती तरी गोष्टी आहेत ज्या बाबतीत आपले महामंडळ कधीच KSRTCचा हात धरू शकत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर आपल्याकडे एस.टी.च्या नव्या जुन्या कुठल्याही बस घ्या, सीटच्या कोपर्‍यात लोकं थुंकलेली असतात पण नुसती ऐरावतच नव्हे KSRTCच्या अगदी साध्या बसने मी बंगलोर कोल्हापूर प्रवास केला आहे. लांब पल्य्याची असो वा सिटी बस सगळ्या बसमध्ये स्वच्छता असतेच. कुठे ही धूळ, तिकिटांचे तुकडे असे काही दिसणार नाही. या उलट आपल्याकडचे बस असो वा एस.टी. स्टॅंड कुठेही बसायची देखील इच्छा होत नाही.

  ReplyDelete
 5. अल ताई...एस.टी. असो किंवा अन्य कोणतीही सरकारी सेवा सो...सगळा सावळा गोंधळ आहे....संपुर्ण राज्याचा बट्ट्याबोळ करुन ठेवला आहे.

  ReplyDelete
 6. मी अजून कर्नाटक महामंडळाच्या बसने प्रवास केलेला नसल्याने तुलना करण्याकरीता अनुभव जमेस नाही. पण तुम्ही मांडलेले मुद्दे पाहता आणि एसटी महामंडळाची चाहती असल्याने वाईट वाटले. खरे तर अनेक गोष्टी अगदी सहज करण्यासारख्या आहेत. पण केवळ आळस आणि वरून कोणाचाही दट्ट्या नसल्याने ( स्वत:हून ग्राहकासाठी काही करावे हा भाव असावाची अपेक्षाच मला आजकाल अवाजवी वाटू लागली आहे... :( ) आणि ग्राहकही चालवून घेतोय ना... मग मरू देत, हा प्रकार अव्याहत चालतोय.

  लाल डब्ब्याच्या प्रेमापोटी मी एक पोस्ट लिहीली होती, वाचून पाहा. :)

  http://sardesaies.blogspot.com/2009/10/blog-post_06.html

  ReplyDelete
 7. भानस, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. एसटी ही आपल्या महाराष्ट्रासाठी जीवन वाहीनी आहे. पण जेव्हा एसटी आणि केएसआरसीटीने प्रवास केला की जणवण्याइतपत फरक आहे. आता महेंद्रजी म्हणाले तसं शिवनेरी ही भाड्याच्या लोकांमार्फत चालवली जाते हे जरा अति दरीद्रीपणाचं लक्षण वाटत नाही का? मी गेली ३० वर्षे पहात आहे मुंबईहून पुण्याला येताना कर्नाटक स्टेटच्या गाड्या फास्ट तसेच स्वच्छ असतात. त्यांचं भाडंही कमी असतं. दोन्हीचा अनुभव घेतल्यामुळे आणि कालच्या बातमीमुळे तुलना आपसूकच झाली. पण हे सुद्धा तितकच खरं आहे की महाराष्ट्रात अगदी खेड्यापाड्यांपर्यंत हेच लाल डबे जातात. तसेच कर्नाटकातही केएसआरसीटीसीचे लालडबे जात असतीलच की. स्वच्छता राखायला ह्यांना कमी पणा का वाटतो? हवेशीर गाड्या ठेवायला कमीपणा का वाटतो? शिवनेरीची सेवा एसटीच्याच कर्मचार्‍यांमार्फत चालवली का जात नाही? मी इथे बंगलोरला पाहीलं आहे. अगदी सकाळची पहिली फेरी सुरू होते त्यावेळी ड्रायव्हर स्वत:च्या खिशातले पैसे काढून मोठा गजरा विकत घेतो आणि गाडीच्या पुढच्या भागात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीला घालतो. मस्त उदबत्ती लावून वातावरणात प्रसन्नता आणली जाते. ह्या गोष्टी इतक्या अवघड आहेत का?

  ReplyDelete
 8. स्वानुभावाने सांगते, बेंगळूरू-पुणे:१६ तास मजेत जातात पण पुणे-माणगाव: ४ तासात वाट लागते

  ReplyDelete
 9. kharay.. :)
  mi hi airavat la ch prefer karayche blore- pune prawasa karata.. :)

  ReplyDelete