Sunday, 15 August 2010

कॅनडा ट्रीप - भाग ६

पाश्चात्य देशांत सहल किंवा तेथील विद्यापीठात शिक्षण-वास्तव्य आणि ग्रंथालयांवर भाष्य नाही असं शक्यच नाही. म्हणूनच हा स्वतंत्र लेख. युनीव्हर्सीटी ऑफ टोरंटो च्या रोबार्ट्स लायब्ररीकडे वळण्याआधी मी  भारतीय प्राचीन काळातील ग्रंथालय संस्कृती, युरोप अमेरिकेतील ग्रंथालय संस्कृती यांवर थोडं भाष्य करते.  म्हणजे एक पार्श्वभूमी तयार होईल.
तक्षशीला अवशेष
तसं आपल्या भारतीय परंपरेचा विचार करता वैदिक कालापासून आपल्याकडे श्रुती आणि स्मृती यांवरच भर असल्याने मौखिक परंपराच होती. म्हणजेच ज्ञान हे लेखनाच्या माध्यमापेक्षा श्रृती आणि स्मृतींच्या माध्यमातूनच साठवून ठेवले जात असे आणि संक्रमित होत असे. पण गौतम बुध्दाच्या काळात पाली भाषेतील ज्ञान भांडार जपण्यासाठी नालंदा व तक्षशीला यांसारख्या विद्यापीठांतून प्रचंड ग्रंथालये उभी राहीली.  
नालंदा अवशेष
बौध्द धर्मातील मुख्य ज्ञान हे या ग्रंथालयांच्या माध्यमातून साठवलं गेलं. तिथेच बौध्द भिख्खु आपल्या शिष्यांना शिकवत असल्याने त्या ग्रंथालयांचा अतिशय चांगला उपयोग तसेच संवर्धन झाले. हीच परिस्थिती आपल्याला युरोपात दिसून येते. युरोपात सगळीकडे असलेल्या, तयार केलेल्या आणि मिळवलेल्या ज्ञानाचा साठा लेखनाच्या माध्यमातून केला जात असे. डॉक्युमेंटेशनची पध्दत त्यामुळे पाश्चात्य जगताची देन आहे. 
बॉड्लीयन लायब्ररी, ऑक्सफर्ड 
 आपल्या कडील मौखिक परंपरांचा एक फायदा असा झाला की हिंदू धर्म, वैदिक धर्म ह्यावर आक्रमण झाल्यावर त्यातील ज्ञान हे पूर्णपणे नष्ट झालं नाही. कारण ते अनेक व्यक्तींच्या डोक्यात होतं. मैखिक परंपरेनं ते संक्रमित होत राहून वाचलं. पण हेच बुध्द धर्माच्या बाबतीत जेव्हा भारतीय उपखंडात परकिय आक्रमणं झाली तेव्हा नालंदा, तक्षशीला ही विद्यापीठे जाळून नष्ट करण्यात आली. तिथल्या बौध्द भिख्खुंना मारून टाकण्यात आलं. परिणामी बुध्द धर्माचं मूळ तत्त्वज्ञान भारतीय उपखंडातून नाहीसं झालं. पण बुध्द धर्माचं मूळ तत्त्वज्ञान त्याआधीच अतिपूर्वेकडील चीन आणि जपान सारख्या देशां मध्ये पोहोचल्याने त्या तत्त्वज्ञानाची तिथे वाढ आणि संवर्धन झालं. 
युनीव्हर्सीटी लायब्ररी, केंब्रीज
 हा मुद्दा इतका तपशीलात मांडण्याचं कारण म्हणजे आज घडीलासुध्दा आपल्याकडे डॉक्युमेंटेशनची आणि उत्तम ग्रंथालयांची वानवा आहे. मी हे भलतंच बोलते आहे असं अनेकांना वाटत असेल पण ज्यांनी भारतीय विद्यापीठांतील ग्रंथालयं, त्यात उपल्ब्ध पुस्तकं यांचा अनुभव घेवून जर इंग्लंड-युरोप, उत्तर अमेरिका येथील नामांकित विद्यापीठांची ग्रंथालयं अनुभवली असतील पाहीली असतील त्यांना माझा मुद्दा पटेल. 
व्रेन लायब्ररी, ट्रीनीटी कॉलेज, केंब्रीज
वर नमूद केल्याप्रमाणे इंग्लंड युरोपात खूप जुनी अशी भव्य ग्रंथालयं अनेक आहेत. मी स्वत: इंग्लंडच्या केंब्रीज विद्यापीठातील युनीव्हर्सीटी लायब्ररी, ट्रीनीटी कॉलेजची (न्युटनच्या काळापासून असलेली) व्रेन लायब्ररी आणि ऑक्स्फर्ड युनीव्हर्सीटीची बॉड्लीयन लायब्ररी या तीनही पाहील्या आहेत. तिथली पुस्तकं, मॅन्युस्क्रीप्ट्स हाताळलेली आहेत म्हणून या तीन ग्रंथालयांबध्दल अधिकृतपणे सांगू शकते की विद्यापीठांच्या जगप्रसिध्द नावांबरोबरच त्यांची ही ग्रंथालयं सुध्दा अतिशय उत्तम दर्जाची आहेत. त्यामुळे जेव्हा मी पहील्यांदा केंब्रीज विद्यापीठाची युनीव्हर्सीटी लायब्ररी बघीतली, तिच्यातील पुस्तके, जर्नल्स, मॅन्युस्क्रीप्ट्स हाताळल्यावर वाटलं की जगातील सगळ्यात उत्तम आणि मोठी लायब्ररी आहे. अश्वमित्र त्याच वेळी मला म्हणाला की केंब्रीजच्या युनीव्हर्सीटी लायब्ररी पेक्षा युनीव्हर्सीटी ऑफ टोरंटोची रोबार्ट्स लायब्ररी चांगली आणि मोठी आहे. 
रोबार्टस लायब्ररी, टोरंटो युनीव्हर्सीटी
मी रोबार्टस लायब्ररी प्रत्यक्ष पाहीपर्यंत माझा विश्वास बसत नव्हता. खरं तर युरोपातील अनेक जुन्या विद्यापीठांची ग्रंथालयं सुध्दा भव्य दिव्यच आहेत. त्या इमारतींचं बांधकामंच आपल्याला ४-५ शतकं मागे घेवून जातं. ऑक्सफर्डच्या बॉड्लीयन लायब्ररीत तर मुख्य जमीनीच्या खाली दोन मजले आहेत आणि वर सहा मजल्यांची गोलाकार लायब्ररी पसरली आहे. त्या लायब्ररीचा तो गोलाकार परिसरच खूप मोठा आहे.  तिथे जवळ जवळ सर्वच विषयांवर अनेक दुर्मीळ पुस्तकं, मासीकं, जर्नल्स, हस्तलिखितं तसेच अद्ययावत नवनवीन प्रकाशीत होणारी पुस्तकं, जर्नल्स, मासिकं असं सगळं आहे. केंब्रीजच्या युनीव्हर्सीटी लायब्ररीमध्ये सुध्दा परिसर प्रचंड मोठा आणि सात मजली बिल्डींग आहे. मुख्य मजल्याच्या जमीनी खाली दोन मजले आहेत. त्या ग्रंथालयात मी स्वत: ग्रीक भाषेत लिहीलेली भूमितीची जुनी हस्तलिखीतं बघीतली आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृत, मराठी, तमीळ, बंगाली, हिंदी, उर्दू, तेलुगु यांसारख्या भाषांमधील विविध पुस्तकांची शेल्फ्स पण बघीतली आहेत. मराठीतील ह ना आपटे, शंना नवरे, ह मो मराठे, पु ल देशपांडे यांसारख्या आणि अजुनही बर्‍याच लेखकांची पुस्तके पाहण्यात आली. ट्रीनीटी कॉलेजच्या व्रेन ग्रंथालयात तर ब्रीटानीका मॅथॅमॅटीका च्या मूळ हस्तलिखित प्रती बघायला मिळतात. वर नमूद केलेल्या ग्रंथालयांत अद्ययावत पुस्तकं, डीजीटल लायब्ररीज असं सगळं सुध्दा उपल्ब्ध आहे. कदाचित ऑक्स्ब्रीज (म्हणजे ऑक्स्फर्ड आणि केंब्रीज सारख्या विद्यापीठांत एकूण पुस्तकांची स्ट्रेन्थ संपूर्ण विद्यापीठांत असलेल्या इतर ग्रंथालयांत मिळून विभागली गेली असण्याची शक्यता आहे. तसेच अतिशय जुनी ग्रंथालयं असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशिवाय किंवा त्या ग्रंथालयाच्या सभासदां शिवाय इतरांना मुक्त वावर नसतो. पण गंमत म्हणजे ऑक्स्ब्रीज मधील या मुख्य ग्रंथालयांचे सभासदत्त्व विद्यार्थी नसलेल्या सामान्य नागरिकाला सुध्दा मिळू शकते. आता इतकी पार्श्वभूमी तयार केल्यावर रोबार्ट्स लायब्ररीची माहीती बघुयात.
 रोबार्ट्स लायब्ररी ही उत्तर अमेरिकेतील पहिल्या दोन क्रमांकांच्या मोठया आणि उत्तम ग्रंथालयांमध्ये मोडते. तसा अमेरिका, कॅनडा हा भागच खूप अलिकडच्या काळात निर्माण झाला आहे. म्हणजे भारत, इंग्लंड, युरोप सारखी प्राचीन संस्कृती अमेरिका कॅनडा ह्या देशांना नाही. तिथले मूळ रहीवासी काही इतके प्रगत नव्हते की त्यांच्या कडे प्राचीन ग्रंथालयं वगैरे असायला. नाही म्हंटलं तरी दक्षिण अमेरिकेतील काही भागात असलेली प्राचीन संस्कृती युरोपीय लोकांनी आक्रमण केल्यावर उध्वस्त करून टाकली. त्यामुळे तसं प्राचीन असं ग्रंथालयांच्या बाबतीत काहीच नाही. त्यामुळे उत्तर अमेरिकेतील विद्यापीठांच्या इमारती सुध्दा खूप शतकं मागे जात नाहीत. 
रोबार्ट्स लायब्ररी ही १४ मजल्यांची उभीच्या उभी अत्याधुनीक अशी भव्य इमारत आहे. रोबार्ट्स च्या इमारतीचं बांधकाम इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे की उपल्ब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर केलेला आढळतो. बाजूच्या फोटोंत चौदाव्या मजल्यावरील पॅसेज आणि फॅकल्टी रूम्स कडे जाण्याचा मार्ग असे सगळे दिसते आहे. उपल्ब्ध जागेत जागा वाया न घालवता उत्तम पध्दतीचे बांधकाम याचा हा उत्तम नमूनाच आहे.
तळ मजल्यालाच लायब्ररीचा ऑनलाईन कॅटलॉग अ‍ॅक्सेस करण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी, सभासदांसाठी तसेच बाहेरून येणार्‍या पाहूण्यांसाठी आहे. ऑक्स्ब्रीज मधल्या ग्रंथालयांत सभासद नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला ग्रंथालयात प्रवेश नव्हता. त्यामुळे रोबार्ट्सचे पहिले दोन मजले हे सभासद नसलेल्यांसाठी सुध्दा खुले आहेत हे पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. 
 या दोन मजल्यांवर जाण्यायेण्यासाठी सरकते जीने ठेवलेले आहेत. त्या दोन मजल्यांवर विविध विषयांवरची पुस्तकं, जर्नल्स यांची शेल्फ सगळ्यांच्या वापरासाठी खुली आहेत. तिथेच ४-५ संगणकांवर बाहेरून आलेले लोक युनीव्हर्सीटीच्या ऑनलाईन कॅटलॉग मधून संदर्भासाठी लागणारे पुस्तक किंवा लेख शोधू शकतात. (संदर्भ सापडणार ही १००% खात्री असल्याने) मिळालेला संदर्भ आपण तिथल्या ग्रंथपालांना सांगीतला की तो संदर्भ आपल्याला उपल्ब्ध करून दिला जातो.
 मला तर ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटली. कारण मला बंगलोर पासूनच एका जर्नल मधील लेखाचा संदर्भ हवा होता आणि मी तो बर्‍याच ग्रंथालयांत धुंडाळला. बर्‌याच ओळखीच्या प्रोफेसर्सना (परदेशी विद्यापीठांतील) त्यांच्या डीजीटल लायब्ररी मार्फत मिळतोय का हे पाहीलं. पण संदर्भ जुना म्हणजे १९८९ सालातील असल्याने आणि अधिकाधिक विद्यापीठां मध्ये डीजीटल लायब्ररी डेटाबेस हा १९९० च्या पुढचा असल्याने तो लेख काही मिळत नव्हता.
टोरंटोला गेल्यावर रोबार्ट्स लायब्ररी मध्ये नक्की मिळेल आणि अश्वमित्र (माझा नवरा) तिथला माजी विद्यार्थी असल्याने कदाचित कोणाची तरी ओळख निघुन तो लेख मिळवता आला तर मिळवु असा विचार करून आम्ही तिथे गेलो. या सगळ्या विद्यापीठांच्या ग्रंथालयांत आपल्याकडील ग्रंथालयांच्या पेक्षा एक अतिशय वेगळा अनुभव येतो तो म्हणजे आपलं एकदम हसून स्वागत होतं आणि "मी आपली काही मदत करू शकते/तो का?" हा प्रश्न सुहास्य वदनाने विचारला जातो.
 नाहीतर आपल्याकडे कोणत्याही ग्रंथालयात गेलं की अगदी ग्रंथपाल किंवा तिथे उपल्ब्ध असलेले मदतनीस यांचे चेहरे म्हणजे "आता कुठुन आले हे आणि किती हा त्रास?" हे व्यक्त करत असतात. त्यांची देहबोली आणि प्रत्य्क्षातील बोली सुध्दा हेच सांगत असते. असो. मी तिथल्या ग्रंथपाल बाईंना संदर्भ शोधायचाय असं सांगीतल्यावर त्यांनी लगेचच आम्हाला एक संगणक उपलब्ध करून दिला. आम्हाला नुसतंच संगणक उपल्ब्ध करून देवून त्या बाई थांबल्या नाहीत तर दहा मिनीटांनी येवून संदर्भ मिळाला का ह्याची चौकशी केली. नेमका आम्ही व्हिजीटर्सच्या संगणकावर असल्याने आम्हाला संदर्भ सापडून सुध्दा तो लेख पूर्णपणे दिसत नव्हता. मग त्या बाईंनी स्वत:च्या संगणकावरून स्वत:च्या अकाउंट मध्ये जाऊन तो लेख उघडला आणि प्रिंटींग करून आम्हाला आणून दिला. हा अनुभव म्हणजे मला रोबार्ट्स लायब्ररीच्या प्रेमात पाडायला पुरेसा होता. 
5 comments:

 1. That's great that you got that reference. Already read all parts of Canada trip and eagerly waiting for next.
  shashank

  ReplyDelete
 2. अल, सगळे भाग वाचून काढले आज. खुपच छान वर्णन केलं आहेस. उत्तम !!

  ReplyDelete
 3. अलताई,
  खूपच मस्त ऍरेंज करतेस गं तू पोस्ट..
  फोटो आणि पोस्ट वाचून एकदम छान अनुभव येतो!

  ReplyDelete
 4. खूप सुंदर माहिती. एक अनुभव नोंदवण्याचा मोह आवरत नाहिये. दोन वर्षांपूर्वी मी लंडनला गेलो असताना ब्रिटिश लायब्ररीत रामायण या विषयावरचं प्रदर्शन लागलं होतं. त्या लायब्ररीतले रामायणावरचे बरेचसे संदर्भ त्यांनी तिथे लोकांना पाहण्यासाठी नीटपणे मांडून ठेवले होते. दक्षिण-पूर्व आशियातील रामायणाच्या प्रसाराचं अत्यंत सुंदर डॉक्युमेन्टेशन होतं ते. तो पर्यंत मी रामायणावर इतकी सारी पुस्तकं, ऑडिओ कॅसेटस्, व्हिडिओज्, सीडी-डीव्हीडीज्, चित्रं व अन्य कलांच्या माध्यमातून रामायणाचं प्रकटीकरण असं सारं एकत्रितपणे कधीच पाहिलं नव्हतं. डॉ. आंबेडकरांच्या रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकासंबंधीच्या वादावर बोलताना एका भाषणात शिवाजीराव भोसलेंनी भांडारकर संस्थेत हजारावर वेगवेगळी रामायणे पाहायला मिळतात, असा उल्लेख केला होता. त्याव्यतिरिक्त भारतात असं काही कुठे असल्याची माहितीही सर्वसामान्यांना उपलब्ध होत नाही, हे ब्रिटीश कौन्सिलमधलं ते प्रदर्शन पाहताना मला फार प्रकर्षानं जाणवलं.

  ReplyDelete