Sunday, 8 August 2010

कॅनडा ट्रीप - भाग ४

भोजन व्यवस्था आणि खाणेपिणे:
 परदेशात कुठेही गेलं तरी शाकाहारी लोकांना खर्‍या अर्थाने शाकाहारी भोजन मिळणे म्हणजे तारेवरची कसरत असते. विमानसेवांमध्ये तर खास सूचना दिल्या शिवाय शाकाहारी जेवण मिळत नाही. माझा नवरा टोरंटो मध्ये अनेक वर्ष राहील्याने त्याला कोणतं अन्न शुध्द शाकाहारी, कुठे शुध्द शाकाहारी जेवण मिळतं हे माहीत होतं. जर आपण नुसतं व्हेज फुड असं म्हणून विचारलं तर ज्यात व्हेजीटेबल्स आहेत असं फुड आणून देतात.  काहीजणांच्या दृष्टीने अंडं आणि चीज हे व्हेज मध्ये मोडतात.  त्यातच तिकडचं काही प्रकारचे (जास्तीत जास्त) चीज हे घट्ट बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करतात. तसेच काही पदार्थ तळताना सुध्दा प्राण्यांच्या चरबी पासून बनवलेलं तेल वापरतात. त्यामुळे तुम्हाला व्हेज सलाड शिवाय पर्याय रहात नाही.  त्याची ऑर्डर देतानाच नो एग, नो चीज असं सांगावं लागतं.

"बुध्दाज शाकाहारी चीनी उपहारगृह"   
टोरंटोला चायना टाऊन मध्ये "बुध्दाज" नावाचं एक संपूर्ण शाकाहारी उपहारगृह होतं. तिथे मी पहिल्यांदाच खर्‍या अर्थाने चायनीज खाल्लं. त्या उपहारगृहाचा एकूणच चेहरा-मोहरा अतिशय साधा आणि अस्सल चीनी वातावरणाची साक्ष देत होता.   
 

शाकाहारी चायनीज बनवताना त्यात दुधापासून बनवलेले पदार्थ आजीबात वापरलेले नव्हते. सगळ्या पदार्थांत वेगवेगळ्या भाज्या, गाजर, टोफू, विविध प्रकारची मश्रुम, गहू , तांदूळ आणि सोया पीठापासून बनवलेले पदार्थ यांचा समावेश होता. खालील छायाचित्रात खूप भाज्या, मश्रुम , बेबी कॉर्न आणि टोफू घातलेलं सूप आहे. यासाठी भाज्या खूप कमी शिजवतात. जास्तीत जास्त वेळा फक्त थोड्या उकडलेल्या असतात. 
(सूप)
 पुढच्या छायाचित्रात सोयाच्या पीठापासून बनवलेलं इमिटेशन डक आहे. हे दोन्ही पदार्थ खूपच चवदार होते. ऑर्डर दिल्यावर लगेचच एका मुलीने चीनी मातीची केटल आणि छोटे कप्स आणून ठेवले . त्या केटल मध्ये खास चीनी वनस्पतीं पासून बनवलेला ग्रीन टी होता ग्रीन टी म्हणजे काही हिरवी पानं उकळत्या पाण्यात भिजवून ठेवतात.
(इमिटेशन डक)
 त्याची चव घेतल्यानंतर खूप छान वाट्लं त्याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत होता. हा ग्रीन टी पिताना चुकुनही आपण चहा पितोय अशी जाणीव झाली नाही. पण तो प्यायल्या नंतर खूपच ताजंतवानं वाटलं. इतर उपहारगृहांच्या तुलनेत ह्या उपहारगृहात रीझनेबल रेट्स मध्ये उत्तम क्वालीटीचं चायनीज फुड मिळतं असं अश्वमित्रं म्हणाला. 
ग्रीन टी
 पुढच्या वेळी गेलो तेव्हा वेगळ्या प्रकारच्या नूडल्स मागवल्या. अश्वमित्रला तर चॉपस्टीक्सने खाता येत होतं पण सुरूवातीला माझी चांगलीच तारांबळ उडाली. काहीवेळ प्रयत्न केल्यावर मी चॉपस्टीक्सचा नाद सोडून दिला आणि सरळ काट्याने खायला सुरूवात केली. गंमत म्हणजे त्या उपहारगृहात स्मॉल क्वान्टीटी मागीतली तरी भरपूर क्वान्टीटी असायची. हे पुढील छायाचित्रां वरून लक्षात येईलच. तशी खाण्यामधे मी कच्चा लिंबूच आहे. त्यामुळे तीन चतुर्थांश भाग अश्वमित्रलाच संपवायला लागायचा. आणि तोही ते अत्यंत आवडीने करत असे. 
सुशी
 नायगरा फॉल्स ला गेलो असताना माझ्या नणंदेने सुशी नावाचा माश्यांचा भात घेतला होता. सुरूवातीला मला तो एक गोड पदार्थ वाटला.....म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे रंग घालून केलेल्या बर्फ्या असतात ना तसंच काहीसं वाटलं. त्याचं छायाचित्रं पाहून तुमच्या लक्षात येईल की मला असं का वाटलं असेल. आम्ही मात्र व्हेजीटेबल सलाडच खाल्लं. काकडी, टोमॅटो आणि सगळ्यात जास्त प्रमाण हिरव्या कोबीच्या पानांचं. पुढच्या सर्व प्रवासात आम्ही जास्तीत जास्त वेळा ह्याच प्रकारचं सलाड जेवण म्हणून खाल्लं. कारण तेच पूर्ण शाकाहारी असणार याची खात्री होती. 

ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांनी हे व्हेज सलाड आणि चायनीज फुड खायला हरकत नाही. आपल्या अन्न अति शिजवण्याच्या पध्दती्मुळे ते पचायला जड असतं. फॅट्स पण आपल्याकडच्या शिजवलेल्या अन्नात जास्त असतात. या शाकाहारी चायनीज फुड मध्ये नुसत्या उकडलेल्या भाज्या घातल्यामुळे जीवनसत्त्वे साठवली जातात याउलट आपल्याकडच्या भाज्या अधिक शिजवण्याच्या पध्दती मुळे जीवनसत्त्व नाहीशी होतात. हा आहार आपल्या नेहमीच्या आहारापेक्षा खूपच वेगळा असल्याने मी यावर स्वतंत्र पोस्ट टाकली आहे. फोटोंचा उपयोग हा विविध पदार्थांचा अंदा्ज (व्हर्च्युअल आस्वाद) घेता यावा म्हणून केला आहे. 
तसं रोज सकाळी कॉन्टीनेन्टल व्हेज ब्रेकफास्ट असायचाच. पण त्यात खूप काही नाविन्य नसल्याने त्याचा इथे फक्त ओझरता उल्लेख करत आहे. 
एडमंटन मध्ये माझी एका प्रोफेसर बरोबर लंच मीटींग होती. त्यावेळी आम्ही मंगोलीयन प्रकारच्या एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो. त्याचं वैशिष्ट्य हे होतं की आपणच आपलं अन्न रॉ जीन्नसां मधुन तयार करायचं आणि ते तिथल्या कुकला शिजवायला द्यायचं.  मी पूर्ण शाकाहारी असल्याने त्याला तसं स्पेशल सांगीतलं आणि त्याने माझ्यासाठी ते पूर्णपणे वेगळं शिजवलं. हे मुख्यत: नूडल्स वगैरे असतात विविध सॉस, भाज्या आणि मसाले घालून ते फ्राय केलेलं भाता बरोबर खायचं किंवा पोळीच्या रोल मध्ये घालून खायचं. 
खरंतर तिथल्या खाण्यापीण्याच्या सवयी या अधिकाधिक मांसाहार आणि अल्कोहोल असा आहे. लोक प्रचंड प्रमाणात गायीचं मांस (बीफ), डुकराचं मांस (पोर्क/हॅम)  खातात. हॉट डॉग, हॅम बर्गर हे तिथले सामान्यत: अधिक खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. यासगळ्याचा परिणाम प्रचंड जाड शरीरयष्टीत दिसून येतो. अतिलठ्ठपणा (ओबेसीटी) हा प्रकार तिथे प्रचंड प्रमाणात आढळतो. त्याला त्यांची ही खाण्याची सवय काहीअंशी जबाबदार आहे. काही लोक अति हेल्थ कॉन्शस आढळतात. कुठलाच अतिरेक शेवटी धोकादायकच.

14 comments:

 1. अलताइ काल तुझ्या ट्रीपचे पहिले 3 भाग वाचले .मजा आली वाचताना.बरीच माहिती मिळत आहे नवीन.हा भाग ही चांगला झालाय पण मला आश्चर्यचा धक्का बसला हे वाचून की भाऊजी हे परदेशी आहेत.मला याची काहीच कल्पना नव्हती म्हणून जुनी पोस्ट वाचली व सगळं उलगडा झाला.
  तुझे गरुडपूरण सुद्धा मी वाचले होते खूप आधी पण कॉमेंट नव्हती टाकली.आत सुट्टी मिळालाई की नवंत पूर्ण ब्लॉग वाचून काढणार आहे.

  साबा

  ReplyDelete
 2. आवडत्या विषयावरील पोस्ट आवडीने वाचली... इथे बाहेर कामाला आलो की माझे सुद्धा असेच शाकाहारी खाणे होते.. नाहीतरी ते अर्धे शिजवलेले कच्चे-पक्के कुठलेच मांस मला खायला आवडत नाही... तुझा फोटो प्रथमच पहिला.. तो सुद्धा खाताना... :)

  ReplyDelete
 3. सगळे भाग वाचले. शाकाहारी लोकांची होणारी कुचंबणा खरंच समजू शकतो. अतिशय उत्तम झालाय लेख. .

  ReplyDelete
 4. वाह काल इशारा दिल्या प्रमाणे ;) फोटोसकट उत्तम खादाडी पोस्ट वाचून सकाळी सकाळी भूक लागली ग ताई...एकंदरीत मस्त झालीय ही सफर तुझी..शुभेच्छा :)

  ReplyDelete
 5. अल ताय...आपल्या सारख्या शुशा वाल्यांचे शॉलीड वांदे होतात...कैरो मध्ये असताना तर मी बाहेर काही खायची रिस्कच घेतली नाही...त्या लोकांना शुध्द शाकाहरी हा प्रकारच पचनी पडत नाही....फ़ोटु मस्त आहेत.

  ReplyDelete
 6. अपर्णा,
  लेख सुरेख झाला आहे. मी पण कॅनडा चे रेसि कार्ड 'अजिंक्य' माझ्या मुलाच्या शिक्षणा करता घेत आहे. कदाचित ह्या वर्षी जाणे होईल. अर्थात कायमचे कठीण आहे कारण आम्ही मस्कत मध्ये सेटल झालेलो आहोत.

  ReplyDelete
 7. लेख मस्त.
  मला सुशी आवडला.
  ग्रीन टी साठी कोणती पाने वापरतात याची माहिती कर ना जरा. आपल्याकडे मिळतात का पाहू.

  ReplyDelete
 8. सागर, रोहन, महेंद्रकाका, ममौजी, सुझे, अनुजा, सपा धन्यवाद.

  रोहन, तू माझ्या फेसबुक वर आहेस ना. मग आमचे फोटो नाही पाहीलेस?
  पण तू तर सेनापती म्हणजे तू इतरांना पहिल्यांदा पाहणार तेच खाताना :-)

  ReplyDelete
 9. सपा, आपल्याकडे ग्रीन टी मिळतो. म्हणजे टी बॅग्स मध्ये. कोणत्याही मेगा स्टोअर मध्ये मिळतो. आपल्याकडे मिळणारा टी बॅग्ज मधला ग्रीन टी आणि चायनीज अस्सल ग्रीन टी (म्हणजे हिरवी पाने) खूपच वेगळे आहेत.
  ती हिरवी पानं फक्त चीन मध्ये किंवा एखाद्या चायना टाऊन मध्येच मिळतील. मी आणणार होते पण अश्वमित्र म्हणाला जे आवडतंय ते सगळं नेणार आहेस का? म्हणून मग शांत बसले.:-)

  ReplyDelete
 10. सुशीचा फोटो भारी आहे...मला खूपदा खावंसं वाटतं...
  पण शाकाहारी असणं आड येतं...
  असो...मस्तच पोस्ट! माहिती मस्त दिलीयेस!

  ReplyDelete
 11. Japanese restorant madhe fakt 'veg' sushi milatat. Tyala 'cucumber sushi/role' sangitalat tar. sushi barobar ek vishishta chatani aani ginger-pickle detaat. he sarv combo khan mhanaje 'khadya-samadhichaa' anubhav hoy !

  ReplyDelete
 12. शाकाहारी सुशी मला खाऊन बघायला नक्कीच आवडेल. :-)

  ReplyDelete
 13. बुध्द साधुंच्या रेसिपिजचे अन्न मी चीन मधे खाल्ले. आवडले होते. पदार्थांची नावे सर्व मांसाहारी.
  एकदा एक फिश मागवला होता. म्हणजे नाव ‘फिश ‘ !
  माझे यजमान म्हणाले, " टोफुपासून केलेला फिश एकदम रिअल लागतो आहे ना? "
  मी मान डोलावली.
  खरं तर रिअल फिश खाल्ला होता कोणी? ना त्यांनी ना मी.

  ReplyDelete
 14. हे हे, टोफू पासून बनवलेला मासा म्हणजे अगदी सोया पासून बनवलेल्या इमिटेशन डक सारखंच झालं. फक्त आमच्या इमिटेशन डकचा आकार काही बदकासारखा नव्हता. तुमच्या टोफू-माशाचा अवतार होता का खर्‍या माशासारखा?

  ReplyDelete