*********************************************
परदेशातील संशोधक की केंद्रातील सरकार? पुरावा घ्या.
सध्या महाराष्ट्रात सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजां विषयीच्या काही मजकुरावरून संभाजी ब्रिगेड सारख्या गटांनी वादंग उठवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजां विषयी आपल्या लाडक्या कॉंग्रेसचे सरकार असलेल्या केंद्रात आणि केंद्रीय अभ्यासक्रमा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नक्की काय भावना आहेत, त्यांची तसेच मराठा साम्राज्याची महती कशा प्रकारे आणि काय पातळीवर शिकवली जाते हे आपणच पहा.
![]() |
सीबीएसई सातवी इतिहास धडा १० |
त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी असे संबोधन वापरून फक्त २-३ वाक्यांत आला आहे. पेशव्यांचा उल्लेख २ वाक्यांत आला आहे. संपूर्ण सीबीएसई च्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या नशिबी फक्त ४७३ शब्द आले आहेत. संभाजी ब्रिगेड सारख्या लोकांची मजल फक्त भांडारकर संस्थेवर हल्ला करण्यात आणि दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून हटवण्या पर्यंतच आहे. केंद्रातील सरकारला जाब विचारण्याची ना कुणाची इच्छा आहे ना हिम्मत.
सीबीएसई च्या इतिहासाच्या पुस्तकां मध्ये मुघलांना केवढे स्थान आहे हे जर सोबत एनसीईआरटी ची लिंक दिलेली आहे तिथे बघीतल्यास दिसेलच. बरं हा युक्तीवाद मानला की भारत केवढा मोठा आहे मग सगळ्या प्रदेशांतील गोष्टी लिहीणार काय? नाही मान्य. पण कोणत्या गोष्टी आणि कशा पध्दतीने लिहायच्या हे तर या लोकांच्या हातात आहे. आता महाराष्ट्रात मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा आणि सीबीएसईच्या शाळांचे पेव फुटले आहे (गुणांच्या राजकारणासाठी). मग खरा इतिहास मुलांना कसा आणि कोण सांगणार? बरं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पुण्यासारख्या शहरां मधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या वास्तूंवर हल्ला करायचा त्यांची तोडफोड करायची. मग पुढच्या पिढीला काय तोडफोडीचा मुघल इतिहास शिकवत बसणार? ज्या मराठा साम्राज्याच्या नावाने ही सगळी तोडफोड चालू आहे त्या साम्राज्याचा मागमूसच जर इतिहासात राहीला नाही तर काय उपयोग?
याला अजुन एक कारण सुध्दा आहे. जर इतिहासाचा अभ्यासक्रम बनवणारी समिती बघीतली तर त्यावर एकही महाराष्ट्रीय व्यक्ती नाही. ९०% लोक दिल्ली मधील आहेत. एक व्यक्ती पुणे विद्यापीठातील आहे पण ती मराठी नाही. सोबत त्याचाही दुवा देत आहे. म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ होईल.
जेम्स लेन चं पुस्तक असे किती लोक वाचणार आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणीही उठुन काहीही लिहीलं आणि कुणाच्याही गावगप्पांचा परिपाक म्हणूनही काहीही लिहीलं गेलं तरी आमची छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रध्दा इतकी कमकुवत नाहीये की लगेच तिला तडा जायला. मुख्य म्हणजे याचं श्रेय महाराष्ट्रातील पूर्वीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांना तसेच श्री बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या इतिहास संशोधकांना जाते. त्यांनी आजतागायत महाराष्ट्रातील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं आहे.
ज्या समर्थ रामदासांनी स्वत:च्या समर्थ वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात (मुघल साम्राज्याच्या वर्चस्वामुळे) आलेली मरगळ झटकली अशा समर्थांचा एकेरी नावाने उल्लेख आणि त्यांच्या विषयीच सध्या अपप्रचार करणे चालू केले आहे. संभाजी ब्रिगेड वाल्यांना जर असं वाटत असेल की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नाहीत (तसे पुरावे ते मान्य करत नाहीत) तर मग त्यांनी ऐतिहासिक पुरावे द्यावेत की दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे शिक्षक नसून त्यांना इतर शिक्षक शिकवायला होते. त्यांची नावे जाहीर करावीत. उगाच राजा शिवछत्रपती सारख्या पुस्तकांतील अर्धवट मजकूर (स्वत:ला पाहीजे ते शब्द उचलून आणि अतिरीक्त शब्द टाकून बनवलेली अशुध्द मराठी वाक्ये) संभाजी ब्रिगेडच्या वेबसाईट वर घालून श्री बाबासाहेबांविषयी अपप्रचार करू नये. (पहा) नुसत्या ब्राम्हण कुळात जन्म घेवून कोणी खरा ब्राम्हण होत नाही तसेच नुसत्या क्षत्रिय कुळात जन्म घेवून कुणी क्षत्रिय होत नसतं. ब्राह्मणाने जर ब्राह्मणाचे कर्म म्हणजे विद्याध्ययन, विद्यादान केलं नाही तर त्याला/तिला ब्राह्मण म्हणता यायचं नाही तसंच जर जन्माने क्षत्रिय रक्षण न करता तोड फोड करत असेल तर तो कसला आलाय क्षत्रिय? असेल हिम्मत संभाजी ब्रिगेड वाल्यांची तर त्यांनी दिल्लीत बसलेल्या केंद्र सरकारला जाब विचारावा नाहीतर सरळ बांगड्या भराव्यात.
भारत सरकारची अधिकृत वेब साईट आहे तिच्यावर तर भारताच्या मध्ययुगीन इतिहासात तसेच इतर इतिहासांत मराठा साम्राज्याचा साधा उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्याच्या विभागात खाली दिल्या प्रमाणे उल्लेख आढळतो.
While the Bahamani rule brought a degree of cohesion to the land and its culture, a uniquely homogeneous evolution of Maharashtra as an entity became a reality under the able leadership of Shivaji. A new sense of Swaraj and nationalism was evolved by Shivaji. His noble and glorious power stalled the Mughal advances in this part of India. The Peshwas established the Maratha supremacy from the Deccan Plateau to Attock in Punjab.
यासाठी केंद्रातील कॉग्रेस सरकारला संभाजी ब्रिगेड तसेच महाराष्ट्र सरकार जाब का विचारत नाही? कारण संभाजी ब्रिगेडचा हा सगळा स्टंट फक्त राजकिय हेतूने प्रेरीत आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखिल सूर्याजी पिसाळ होते आणि आत्ता देखिल आहेत. म्हणूनच राजकिय हेतूने प्रेरीत होवून आधीच दुरावलेल्या मराठी समाजात अजुन फूट पाडण्याचे कारस्थान रचले आहे.
यांचे काय करायचे ते आपणच ठरवा!