Tuesday 27 July 2010

कॅनडा ट्रीप - भाग २

टोरंटो : वाहन व्यवस्था

(टीटीसी मधील स्ट्रीट कार, एका स्ट्रीट कार मध्ये बसून तिला क्रॉस होणार्‍या दोन स्ट्रीट कार्सचा फोटो)
(टीटीसी मधील ट्युब)

टोरंटोला "टोरंटो ट्रान्झीट कमीशन" म्हणजेच टीटीसी ही पब्लीक ट्रान्सपोर्ट सेवा उपल्ब्ध आहे. या सेवे आंतर्गत टोरंटो मधील पब्लीक बसेस, ट्राम्स (स्ट्रीट कार), अंडरग्राउंड रेल्वे (ट्युब)थे सगळं वापरता येतं. टीटीसी वापरण्यासाठी एका मार्गाला ३ डॉलर्स तिकीट असते. मग तो मार्ग कीतीही मोठा किंवा छोटा असला तरी तिकीटाच्या किंमतीत फरक नसतो. या सिस्टीम मध्ये आपण एक ट्रान्स्फर वापरू शकतो. म्हणजे एका ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ट्युब आणि बस वापरायची असेल तर रेल्वे स्टेशन पासून बस मध्ये बसायचे असल्यास त्याला एक ट्रान्स्फर म्हणतात. प्रत्येक वेळी तिकीट काढून बसणं खूप महागात जातं. त्यामुळे चक्क एक दिवसाचा मिळणारा पास वापरावा. तो अधिक परवडतो. त्या पास मध्ये आपण एक दिवस कुठेही टीटीसीची व्यवस्था कितीही वेळा वापरू शकतो. मग ट्रान्सफर्स किती घ्याव्यात यावर बंधन नसतं. एक दिवसाचा पास पाच डॉलरला मिळतो. तिथले सूचना फलक आणि नकाशे अतिशय उपयुक्त आणि सेल्फ एक्सप्लनेटरी असतात. त्यामुळे सिस्टीम समजुन घेण्यात थोडा वेळ लागला तरी आपण लगेचच टीटीसी आपली आपण वापरू शकतो. टोरंटो फिरण्यासाठी टीटीसीचा पास (एक आठवड्याचा पास ३६ डॉलरला मिळतो), टीटीसी सिस्टीमचा नकाशा, टोरंटो डाऊन टाऊनचा नकाशा, टोरंटोचा नकाशा, चौकस वृत्ती आणि थोडंसं धाडस असं सगळं घेवून गेलो तर आपलं आपण टोरंटो फिरू शकतो. टोरंटो मधील रस्ते खूपच सरळसोट आणि काटकोनात आहेत. त्यामुळे खूप कॉम्प्लीकेटेड नाही. उन्ह नसेल तर टोरंटो मध्ये उंचच उंच इमारतींमधून, अत्यंत स्वच्छ आणि फेरीवाले रहीत पदपथांवरून चालण्याचा आनंद घ्यायला हरकत नाही. पाश्चात्य देशांत सगळीकडेच पायी चालणार्‍या लोकांना कायमच महत्त्व आहे. म्हणजे तिथे रस्ता ओलांडण्यासाठी जरी स्वतंत्र जागा असल्या तरी जर एखादा पादचारी रस्ता ओलांडत असेल तर चार चाकी वाहनांतील लोक त्या पादचार्‍यासाठी थांबतात. आपल्याकडे हे अशक्यच आहे. कारण आपल्याकडे रस्ते हे पादचारी सोडून बाकी सगळ्यांच्या मालकीचे असतात..........निदान बाकी सगळे तसं वागतात. तिथले मोठे मोठे बगीचे पाहून खूप हेवा वाटतो. तिथल्या सर्व प्ब्लीक ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स मध्ये अपंग, वयस्कर आणि लहान मुलांना घेउन जाणारे यांची अतिशय काळजी घेतलेली असते. त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी (बगीचे, वाहने, सार्वजनीक ठिकाणी बसण्याची बाकडी) वेगळ्या जागा राखून ठेवलेल्या असतात. आम्ही तिथे असताना २-३ वेळा वीज गेल्यामुळे संपूर्ण व्यवस्था बंद पडल्याचेही अनुभवास आले. ट्युब बंद पडल्यावर देखिल सारख्या सूचना सांगून आणि व्यवस्थेच्या स्थिती बध्दल अद्ययावत माहीती सांगून लोकांना परिस्थीतीची माहीती दिली जात होती. सगळीकडे स्वच्छता, नेटकेपणा आणि प्लॅनींग यागोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. 

तसं रस्त्यांवर सगळीकडे सांभाळून रहावे लागते. कारण बरेच दारू प्यायलेले लोक वावरताना दिसतात. टीटीसी मध्ये जर असा कोणी (अशी कोणी) चढला तर ताबडतोब पोलीस येवून त्यांना खाली उतरवतात. मुंबईच्या लोकल सिस्टीम मुळे कसा मुंबईच्या आयुष्याला एकप्रकारचा वेग आहे तसाच टीटीसी मुळे टोरंटोला एक प्रकारचा वेग आहे. कॅनडातील इतर ठीकाणचे लोक टोरंटो मधील या वेगवान आयुष्याला टोरंटो कॅरेक्टर असे म्हणतात. त्यांचं असंही म्हणणं असतं की टोरंटो मधील माणसं खूपच आत्मकेंद्री आणि अहंभावी असतात. जर कोणी एखाद्या रस्त्याची दिशा विचारली तरी तोंड दुसरीकडे फिरवून निघून जातात. आपणहून मदत करणारे फारच थोडे. पण टीटीसीच्या बस ड्रायव्हर्सना विचारलं तर व्यवस्थित सांगतात. म्हणजे माहीती हवी असल्यास मिळेल फक्त योग्य व्यक्तीला विचारायला हवी.

टोरंटोपासून नायगरा फॉल्स, किंवा अजुन थोड्या जवळच्या उपनगरांत जाण्यासाठी गो-ट्रेन नावाच्या सुपरफास्ट ट्रेन्स असतात. त्याच प्रमाणे टोरंटो हे शहर ज्या तळ्याच्या काठावर आहे त्या तळ्यात टोरंटो आयलंड्स आहेत. तिथे जायला फेरी बोट्स वेस्टीन हार्बर पासून मिळतात. टोरंटो मधून ओंटॅरिओ स्टेट्च्या उत्तर भागात जाण्यासाठी नॉर्थ लॅन्डर्स म्हणून कंपनीच्या ट्रेन्स असतात. न्यु लिस्कर्डला जाताना आम्ही त्यातून प्रवास केला होता. 
 (गो-ट्रेन, नायगरा फॉल्स ला जाताना)


  (नॉर्थलॅन्डर कंपनीची ट्रेन न्यु लिस्कर्डला जाताना-येताना)
सामाजिक व्यवस्था:

कॅनडा मध्ये कॅनेडीयन गव्हर्नमेंट तर्फे एक सोशल वेलफेअर सिस्टीम असते. की ज्यामधुन कॅनेडीअन गव्हर्नमेंट नोकरी नसलेल्या आठरा वर्षे वयाच्या पुढच्या, वयस्कर लोकांना, मानसिक दृष्ट्या अपंग-रूग्ण असलेल्या लोकांना, ठरावीक रक्कम त्यांच्या उपजीविकेसाठी देत असते. तिथे कोणीही उपाशी मराताना किंवा रस्त्यावर ट्रीटमेंट अभावी मेलेला दिसणार नाही. एखादा माणूस दारू पिउन रस्त्यावर लोळत पडला असेल तर त्याला लगेचच पोलीस अ‍ॅम्ब्युलन्स मधुन उचलून रीहॅबीलीटेशन सेंटर मध्ये पाठवले जाते. रस्त्यावर राहणार्‍या (होमलेस) लोकांसाठी गव्हर्नमेंटने घरं बांधून दिलेली असतात. तिथे रहाणारे लोक हे गव्हर्नमेंटच्या वेलफेअर फंड वर जगत असतात. वेलफेअर फंडच्या लाभार्थीं कडे लक्ष ठेवण्यासाठी सोशल वर्कर्स नेमलेले असतात. त्यांच्या मार्फत या लाभार्थींना हे पेन्शन किंवा रक्कम मिळते. तसं पाहीला गेलं तर आपल्याकडे भुकेने रस्त्यावर मरणारे लोक पाहीले, योग्य आरोग्य सेवे अभावी मृत्युमुखी पडणारे लोक पाहीले, रस्त्यावर भीक मागणारे अपंग पाहीले की कॅनडातील सोशल वेलफेअर सिस्टीम बरी वाटते. पण याचे अनेक दूरगामी वाईट परिणामही त्यांच्या समाजावर झालेले आहेत. जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो करावा लागत नसल्याने जे धडधाकट आहेत पण त्यांना सोशल वेलफेअरवर जीवंत राहता येते त्यांच्या मधे व्यसनाधीनता, स्वत:ला काहीही काम करता येते याचा आत्मविश्वास या सगळ्याचा अभाव आणि त्यातूनच आलेला एकटेपणा ......या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला जागोजागी डोक्यावर परिणाम झालेले, दारूडे, प्रचंड अ‍ॅग्रेसीव्ह लोक दिसतात. दारू पीण्यासाठी पैसे हवेत म्हणून भीक मागणारेही दिसतात. हे सगळं पाहीलं की वाटतं.........नको आपली व्यवस्था चांगली आहे. गरजवंतांनाच मदत मिळाली पाहीजे. पण लोकांमधील क्रयशक्ती, आत्मविश्वास, जगण्यासाठी काम करण्याची उर्मी मरता कामा नये. 

अशा गोष्टीं मध्ये आपण हे एक बरोबर आणि अमुक एक चूक असं म्हणू शकत नाही. पण दोन्ही मधील चांगल्याची सांगड घातली तर अधिक फायदा होईल असे वाटते.

7 comments:

  1. हि प्रतिक्रिया बर्याचशा पोस्ट वाचून झाल्यावर टाकतो आहे.
    लेखनाची स्टाईल आवडली. कॅनडा च्या पोस्ट वाचल्यावर पुढच्या पोस्ट वाचल्याशिवाय सोडवेनात.
    असेच लिहित राहा.

    ReplyDelete
  2. श्री आपटे शतपावलीवर स्वागत. धन्यवाद आपण आवर्जुन लिहीलेल्या प्रतिक्रीये बध्दल. बरंच लिखाण शतपावलीवर येईल फक्त वेळे अभावी रोज येईलच याची खात्री नाही. मी शक्यतो प्रयत्न करणार आहे. कारण गोष्टी ताज्या असतानाच लिहीलेल्या बर्‍या.

    ReplyDelete
  3. अपर्णा ताइ खुप सुंदर लिहल आहेस...

    >>गरजवंतांनाच मदत मिळाली पाहीजे. पण लोकांमधील क्रयशक्ती, आत्मविश्वास, जगण्यासाठी काम करण्याची उर्मी मरता कामा नये.

    सहमत...अगदी बरोबर आहे.

    ReplyDelete
  4. सर्व सामांन्यांच्या भावना आणि अस्तित्व आपल्या समाजात गुदमरवून
    टाकले जात आहे.चांगल्या जीवनपद्धती अस्तित्वात आहेत,त्यांचा अंगीकार
    आपल्याकडे होत नाही.भ्रष्टाचाराचा मात्र सहज अंगीकार झाला आहे.
    निराशेचा रोग सगळीकडे पसरला आहे.सतत बदलते संदर्भ माणसांना गोंधळवतात.
    उपाय सापडत नाही.
    तुम्ही छान लिहिता.धन्यवाद.

    ReplyDelete
  5. कॅनडा वर्णन मस्तच आहे.आवडलं.

    मला एकच सांगायचंय...भारत आणि इतर देश ह्यांची तुलना होऊच शकत नाही...भारत हा खंडप्राय देश आहे आणि त्याची लोकसंख्याही बेसुमार आहे....त्यामुळे इतर देशात जे व्यक्तीगत लक्ष दिलं जातं ते आपल्याकडे शक्यच नाहीये...आपले प्रश्न वेगळे, इतरांचे प्रश्न वेगळे त्यामुळे त्यावरची उत्तरंही वेगवेगळीच असणार.

    चांगलं वाईट हे सापेक्ष असतं...आपल्याला जे हवं ते मिळालं की चांगलं आणि नाही मिळालं की वाईट...इतका साधा सोपा हिशोब असतो.

    ReplyDelete
  6. मनमौजी, जयंतराव आणि देवकाका प्रतिक्रीयांबध्दल धन्यवाद.

    देवकाका, भारत आणि युरोप यांची तुलना होवू शकते. कारण युरोप प्रमाणेच भारतातही वेगवेगळ्या भाषा आणि विवीधतेतही समानता अशी संस्कृती असा काहीसा थाट आहे. युरोपातील अनेक राष्ट्रांमध्ये भारतापेक्षाही जास्त गरीबी आहे. लोकसंख्या मात्र भारतात खूप आहे हे खरंय. मला असं वाटतं गरीबी आणि अशिक्षितपणा यामुळे येणारे प्रश्न सगळीकडे सारखेच असतात. चांगलं वाईट हे जरी सापेक्ष असलं तरी आपल्याला जे हवं ते मिळालं की ते चांगलं आणि नाही मिळालं ते वाईट इतका सोपा हिशेब कधीच नसतो. तसा हिशेब फक्त लहान मुलांच्या मनात असतो असं मला वाटतं. हे सगळं त्याहून जास्त कॉम्प्लीकेटेड आहे.

    ReplyDelete
  7. एक प्रवासी म्हणून छान निरीक्षण झाले आहे. हे लिखाणाने व प्रतिमांनी दाखवले आहे. प्रवासी व निवासी ह्यांचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असावा व असणार. दोन देशातील तुलना करताना तेच मोजमाप वापरावे लागेल. ही तुलना अश्वमित्र नीट करू शकेल कारण तो निवासी म्हणून ही तुलना करण्यास योग्य ठरेल. प्रवासी व निवासी ह्यांच्या समस्या नेहमीच वेगळ्या असतात.

    ReplyDelete