Monday 12 July 2010

कॅनडा ट्रीप - भाग १


पार्श्वभूमी

खरंतर कॅनडाला माझं सासर. पण आमचं लग्न झाल्यापासून तिकडे जाण्यासाठी कधी वेळच मिळाला नाही. त्याचं मुख्यं कारण म्हणजे भारत आणि कॅनडातील अंतर आणि आमची आपापल्या कामातील व्यग्रता. मधल्याकाळात सासूबाई-सासरे आम्हाला भारतात येवून भेटले. चार-पाच महीन्यांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी माझा एक अ‍ॅकॅडमिक पेपर निवडला गेला. ती कॉन्फरन्स टोरंटोला असल्याने त्यानिमित्ताने कॅनडाला जाण्याचा योग जुळून आला. मग पूर्ण ट्रीपचं नियोजन मार्च ते एप्रील महीन्यांत केलं. त्यातच कॅनडातीलच व्हॅन्कुव्हर येथील सायमन फ्रेझर युनिव्हर्सीटी आणि एडमंटन येथील अथाबास्का युनीव्हर्सीटी यांमधील रीसर्च लॅब्सना भेट देण्याचं ठरलं. हे सगळं ठरवण्यात माझे पीएचडी सुपर्व्हायझर श्री प्रो. रमणी यांचा फार मोठा वाटा आहे. जेव्हा मी हे सगळं ठरवत होते त्याच वेळी माझे सासरे आमच्या कॅनडा भेटीच्या बातमीने उल्हसीत झालेले होते. शेवटच्या दिवसापर्यंत कामात बुडल्यामुळे निघायच्या आदल्या दिवशी खरेदी केली. बुक केलेली इ-तिकीटे बघताना एक गोष्ट लक्षात आली की आम्ही एक महीन्यात सात विमानं आणि पाच प्रमाण वेळा (टाईम झोन्स) [भारत, जर्मनी, टोरंटो (ओंटॅरिओ), व्हॅन्कुव्हर (ब्रीटीश कोलंबीया), एडमंटन (अल्बर्टा) क्रॉस करणार होतो. मला एक प्रकारचं प्रवासाचं दडपण यायला लागलं. येव्हढा लांबचा (२२ तास, फ्रॅन्कफुर्ट मधील ३ तास ट्रान्सीट धरून) विमान प्रवास पहील्यांदाच होणार होता त्यामुळे जेट-लॅगचा काय परिणाम होईल याची धास्ती वाटत होती. नवरा (ज्याने लहानपणापासून प्रचंड विमानप्रवास केलेला आहे कमीत कमी सामानात) आणि वडील (ज्यांचं पूर्ण भारतभ्रमण कामा निमीत्त झालेलं आहे) बरोबर असल्याने माझी धास्ती कमी झाली....पण एक मोठा प्रवास म्हंटला की मला तरी खूप ताण येतो......तसा मनावर ताण होताच. मागे इंग्लंडला जाताना एकटीनेच प्रवास केला होता आणि तो पहीलाच परदेश प्रवास असल्याने इतका प्रचंड ताण आला होता की मी इंग्लंडला जायला निघण्या आधी आठ दिवस जेवूच शकत नव्हते...असो. इतका प्रचंड प्रवास असल्याने (म्हणजे सात विमानं बदलणं इत्यादी) आम्ही अत्यंत कमी सामान जवळ बाळगलं. त्यामुळे सामान वाहून नेण्याचा त्रास तुलनेने खूप कमी झाला (यासाठी माझा नवरा अश्वमित्रं आणि सासरे श्री डेव्हीड अर्नेस्ट यांना धन्यवाद). म्हणता म्हणता जाण्याचा दिवस उगवला. मित्रंमंडळी आणि नातेवाईक यांचे शुभेच्छांसाठी दूरध्वनी येतच होते. अशाप्रकारे आप्तेष्टांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आणि शुभास्तेपंथान: असे म्हणत दिनांक २८ जून २०१० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री सुमारे २.१५ वाजता आम्ही बंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमचा कॅनडा प्रवास सुरू केला.

विमानप्रवास

मध्यरात्रीचं विमान असल्याने झोपेचं खोबरं झालं होतं. लुफ्तान्साच्या विमानात बसल्यावर लक्षात आलं की आपण आधीच १२ तास आधी आपली आसनं ऑनलाईन बुक करू शकतो. त्यामुळे ह्यावेळी उरलेल्या मधल्या जागां मधील आसनं घ्यावी लागली. (श्री शशी थरूर यांनी इकॉनॉमी क्लासला कॅटल क्लास का म्हंटलं असेल याचा दुसर्‍यांदा प्रत्यय आला. पहील्यांदा एअर इंडीया च्या विमानात. असो.) तिघात मिळून दोन बॅग्स चेक इन केल्या होत्या आणि त्या एकदम टोरंटो ला मिळणार होत्या, तसेच बंगलोर विमानतळावरच आमची फ्रॅन्कफुर्ट ते टोरंटो आसन व्यवस्था बुक झाली होती त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. प्रचंड झोप आलेली असल्याने आणि टीव्हीची सोय नसल्याने आम्हाला छान झोप घेता आली. लुफ्तान्सामधील जेवण आणि नाश्ता खूपच छान होतं. विमानात सगळेच झोपलेले असल्याने नक्की बाहेर उजेड आहे की अंधार हे समजत नव्हतं. बर्‍यापैकी झोप मिळाल्यावर जाग आली तेव्हा सूचनांच्या फलकावर युरोपच्या नकाशावर विमान फ्रॅन्कफुर्ट पासून किती दूर आहे हे दाखवत होते. त्यावेळी ते इस्तंन्बुल पार करणार होते. आम्हाला फ्रॅन्कफुर्ट ला पोहोचायला अजुन एक तास दहा मिनीटे लागणार होती. घड्याळात अजुनही भारतीय प्रमाणवेळ असल्याने नक्की कितीवाजता पोहोचेल याचं कॅलक्युलेशन माझ्यामनात चालू होतं.

आम्ही फ्रॅन्कफुर्टवर उतरलो तेव्हा सकाळचे सात वाजले होते. उतरल्यावर लक्षात आलं की आमच्या इ-तिकीटावरचा फ्लाईट नाव-नंबर आणि बोर्डींग पास वरचा फ्लाईट नाव-नंबर वेगवेगळे आहेत. ताबडतोब ट्रान्झीटच्या खिडकीपाशी जावून शहानीशा केल्यावर लक्षात आलं की लुफ्तान्सा कंपनीचा एअर कॅनडा कंपनीशी करार आहे. त्यामुळे लुफ्तान्सातील ट्रान्सीट मधील प्रवासी त्या विमानात बसवले जातात. थोडं फ्रेश झाल्यावर आम्ही एअर कॅनडाचं टर्मीनल शोधायला सुरूवात केली. सकाळ असल्याने कदाचित फ्रॅन्कफुर्ट विमानतळ पूर्णपणे रीकामा होता. चुकुन ३-४ प्रवासी दिसले तर दिसत होते. फ्रॅन्कफुर्टवर आमचं सिक्युरीटी चेक मध्ये संपूर्ण सामान स्कॅनकरायला लावलं (अगदी पायातील बूट वगैरे काढायला लावून). गंमत म्हणजे स्त्रियांचं स्वतंत्र पणे पूर्ण चेकींग केलं पण पुरूषांचं करत नव्हते. तिथेच दोन कुत्र्याची पिल्लं सुध्दा सिक्युरीटी चेक पास होवून आणलेली दिसली. (त्यांचं स्कॅनिंग केलं नसावं कारण ते ओरडत नव्हते. कदाचित अतिरेक्यांना अजुन प्राण्यांमार्फत बॉम्ब पेरायची कल्पना मिळाली नसावी.) आमच्या ४६ व्या टर्मीनल पाशी येईपर्यंत (चालत) आमची दमछाक झाली. एकूण साधारण एक ते दीड तास लागला. कमी सामान बरोबर असल्याने हायसं वाटलं. ४६ क्रमांकाच्या फलाटावर आल्यावर (न रहावून मी हा शब्द वापरते आहे कारण बंगलोरच्या लुफ्तान्साच्या सेवेच्या तुलनेत एअर कॅनडाची फ्रॅन्कफुर्ट मधील सेवा म्हणजे प्रचंड सावळा गोंधळ होता. आपल्या भारतातील एसटी स्टॅंड वर जसे गाडी जिथे लावली असेल तिथे लोकांना नेमकेपणाने दिशा न दाखवता वेगवेगळ्या ठिकाणांना पाठवून प्रवाशांचा फुटबॉल करतात त्याप्रमाणे) आम्हाला विमान प्रवेशासाठी उगाचच इकडून तिकडे फेर्‍या मारायला लावल्या. मग शेवटी पुन्हा माझी सगळी कागदपत्रं तपासली....कॅनडाला जाण्याचा उद्देश विचारला आणि इमीग्रेशन क्लीअरन्स चा शिक्का मारून मिळाला. विमान सुटायच्या वेळेप्रमाणे पाच मिनीटे आधी बीझनेस क्लासवाल्या लोकांना आधी पाठवले आणि मग इकॉनॉमीवाल्यांना. लुफ्तान्साच्या तुलनेत एअर कॅनडाचा स्टाफ कमी मैत्रीमधे वाटला. आम्हाला तिघांनाही छान आसनं मिळाली होती. आम्ही खूष होतो. विमान सुटल्यावर जेव्हा एअर होस्टेस जेवण द्यायला आली तेव्हा लक्षात आलं की आम्ही आधीच शाकाहारी असल्याचं सांगायला हवं होतं (आमच्या पुण्याच्या एजंटने ते केलं नव्हतं. वेगवेगळ्या धड्यांबरोबर हा सुध्दा एक धडा की विमान तिकीट बुक करताना एजंटने आहाराचा पर्याय भरला आहे नं याची खात्री करावी नाहीतर पूर्णपणे मांसाहार असलेल्या देशांच्या विमान कंपन्यांच्या विमानात सांगीतल्याशिवाय शाकाहार मिळणार नाही). दोनच पर्याय दिसत होते एकतर समोर आलेला मांसाहार खा नाहीतर उपाशी रहा. (९ तास + १ तास इमीग्रेशन + हॉटेल मध्ये पोहोचे पर्यंतचा वेळ). आमच्या नशीबाने आमची एअर होस्टेस चांगली होती. एक तासाने तिने आम्हाला दोन व्हेज पास्ता आणून दिले. माझा नवरा चीज सुध्दा खात नाही म्हणून त्याने ते खाल्ले नाही. मी सुध्दा चीज खात नाही पण त्यावेळी मला प्रचंड भूक लागल्याने आणि त्या पास्ताची चव चांगली असल्याने पास्ता खाल्ला. एअर कॅनडाची फ्लाईट मस्तच होती. प्रशस्त आसनं आणि प्रत्येक आसनासाठी स्वतंत्र टीव्ही, त्यात वेगवेगळ्या चॅनल्सची सोय. म्हणजे मूव्हीज मध्ये सुध्दा (बॉलीवुड सोडून) इतर भाषांमधील छान छान चित्रपट होते. अ‍ॅलीस इन वंडर लॅन्ड आणि एक नवीन जपानी चित्रपट (अ वंडरफुल होम ऑफ उलुलु) पाहीला. जपानी चित्रपटावर एक स्वतंत्र लेख लवकरच लिहेन. टोरंटोला विमानतळावर उतरल्यावर जी-२० मुळे अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेतून जावे लागले. पण फ्रॅन्कफुर्टच्या तुलनेत गोंधळ आजीबात नव्हता. ट्रान्सीट नंतर आम्हाला ५ मिनीटात आमच्या दोनही बॅग्स कुठेही न हरवता व्यवस्थित मिळाल्या. अशाप्रकारे आमचा २२ तासांचा विमानप्रवास संपवून आणि वेगवेगळे धडे-अनुभव घेत आम्ही सुखरूप टोरंटोला पोहोचलो.

पुढील भागात कॉन्फरन्सचा अनुभव वाचायला मिळेल.......कधी?.......सध्या प्रवासात असल्याने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा.





7 comments:

  1. असो तर एकंदरीत प्रवास बऱ्यापैकी सुखकर झाला.
    आणि तुझ्या लेखामुळे आम्हीं पण कॅनडा ला पोहचलो तेही व्यवस्थीत.

    शुभेच्या.

    ReplyDelete
  2. तुम्ही दोघे सुखरुप पोहचलात हे वाचुन आनंद झाला...
    आम्हा सर्व बझकरी मंडळींना तुझी आठवण येत आहे...प्रवास वर्णनाचा हा भाग आवडला आणि आता कॉन्फरन्सचा अनुभव वाचायची उत्सुकता लागुन राहिली आहे...:)
    भरपुर फ़ोटो काढ आणि नंतर आम्हाला ते दाखव... :)

    ReplyDelete
  3. अलताई,
    एकदम सहीच वर्णन केलंयस..सचिन म्हणतो तशागत आम्हीही कॅनडाला पोहोचलो..
    खूप शुभेच्छा आणि पुढचंही प्रवासवर्णन येत राहू दे!

    ReplyDelete
  4. धन्यवाद अधा आणि विभि. वेळ मिळेल तसं लिहेन.

    ReplyDelete
  5. प्रवास वर्णानाची सुरुवात चांगलीच झाली आता बघतो प्रवास कसा झाला.

    ReplyDelete
  6. अगं, प्रवासाची सुरवात होतांना थोडेफार गोंधळ नाही झाले तर मला आपण प्रवासाला निघालोय असेच वाटत नाही. हीही... चला कॅनडाला पोचलीस. उतरल्या उतरल्या काहीतरी खाल्लेत नं... मीही संपूर्ण शुशा आहे, त्यामुळे कसे हाल होतात ते चांगले माहितीये.

    आता पुढचे भाग वाचते. :)

    ReplyDelete