Monday 11 May 2015

पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग १) : प्रस्तावना

http://thegradstudentway.com/blog/wp-content/uploads/2012/12/PhD-Degree.jpg

पुणे विद्यापीठात शिकत असताना सर्वप्रथम पीएचडी या पदवीशी संबंध आला. पण त्याविषयी फारसं काहीच माहिती नव्हतं.  एमएस्सी झाल्यावर तिथल्याच एका सरांनी इथे पीचडी करणार का असा प्रश्न विचारला. तोपर्यंत पीएचडीचा संबंध नविन संशोधनाशी असतो हे माहिती झालेलं होतं. पण आमच्या डिपार्टमेंटमधलं एकूण वातावरण पाहता आणि संशोधनासाठी स्वत:ला एखादा प्रश्न पडला पाहिजे व तोच प्रश्न सोडविण्यासाठी आपण संशोधन करायला पाहिजे असा समज कुठेतरी निर्माण झाला होता. म्हणजे गाईडने दिलेला प्रॉब्लेम सोडवणं हे तेव्हा देखील मला मंजुर नव्हतं. 

थोडक्यात संशोधन खर्‍या अर्थाने करण्यासाठी स्वत:ला अनुभव पाहिजे आणि अनुभवाअंती आपल्याला एखादा प्रश्न पडलेला असेल तर त्याचं उत्तर शोधून काढण्यासाठीच पीएचडी करायचं असं मी ठरवुनच टाकलेलं होतं. खरं तर संशोधनामागचा उद्देशही तोच पाहिजे. पण सध्याच्या टोकाच्या व्यावसायिक स्पर्धेत प्रश्नाची उकल करण्यासाठी संशोधन आणि संशोधन केलं म्हणून पीएचडी असं न राहता, व्यावसायिक चढण चढण्यासाठी पीएचडी करणे, नावामागे डॉ लावलं की प्रतिष्ठा वाटते म्हणून पीएचडी करणे, टीचींग जॉबसाठी चांगलं म्हणून पीएचडी करणे अशा संकल्पना तयार झाल्या. म्हणूनच देशात परदेशात ठीकठीकाणी पीएचडी तयार करण्याचे कारखाने निघाले. (काही संस्थांमधे, विद्यापीठांमधे खरंच चांगलं संशोधन होतं पण बहुतांश ठीकाणी पाट्याच टाकल्या जातात.) पूर्वी मॅट्रीक झालेल्या व्यक्तीला बर्‍यापैकी नोकरी मिळत असे, ग्रॅज्युएट होणं म्हणजे डोक्यावरून पाणी. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण म्हणजे अति झालं आणि महाविद्यालयात पदवीच्या कोर्सेसना शिकवायला पदव्युत्तर शिक्षण अनिवार्य केलं गेलं. मग मधे नेट-सेट हा प्रकार आला. पण त्यातून फक्त विषय ज्ञानाची घोकंपट्टीची क्षमता बर्‍याच विषयात दिसून येते पण संशोधन क्षमता नाही. त्यामुळे मग पुन्हा नेट-सेट बरोबरच पीएचडी पण असलं पाहिजे हे अनिवार्य झालं. त्यामुळेच आता पीएचडी हे अ‍ॅकॅडमीक्स मधे करीअर करण्यासाठी पहिली पायरी आहे. 

पीएचडी करण्यामागचा हेतूच बदलल्याने नवनविन संशोधन बाजूलाच राहीले आहे पण महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणाचा दर्जा सुधारला नाहीच. मी स्वत: पीएचडी करायला सुरूवात केल्यावर अनेकांनी मला अनेक बालीश प्रश्न विचारून, अनेक खोचक आणि बोचणारे भोचक प्रश्न विचारून, टोमणे मारून खूप भंडावून सोडलं होतं. काहींच्या मते पीएचडी हे एक ते दोन वर्षात संपतं, तर काहींच्या मते त्यात काय दुसर्‍यांनी काय लिहीलंय तेच कॉपी पेस्ट करायचं असतं. पीएचडी संदर्भात इतकं अज्ञान आणि टोकाचे गैरसमज होण्यास कारणं देखील तशीच असावीत. कारण काहीजण संशोधनातले रजनीकांत असल्यासारखे वर्षाला ३-४ रीसर्च पेपर्स पाडतात (पब्लीश करतात), तर काहींना पब्लीशींग करणं म्हणजे नक्की काय करतात हे देखील माहिती नसतं आणि मग ते कॉपी पेस्ट करत बसतात. असो. तर हे आणि असे अनेक गैरसमज दूर करण्यासाठी पीएचडी म्हणजे नक्की काय?, संशोधन म्हणजे नक्की काय?, ते कसं करणं अपेक्षीत आहे?, पेपर पब्लीशींग म्हणजे काय?, ते कशासाठी करतात?, पीएचडी करण्यामागचं वलय नष्ट होण्यामागची कारणं काय? यासगळ्याचा उहापोह करण्यासाठी ही छोटी लेखमाला काही भागांमधे लिहीत आहे. यात माझे स्वत:चे अनुभव, काही इतरांचे अनुभव, काही निरीक्षणे यांचे संदर्भ घेतलेले आहेत. जर कोणत्याही मजकुरात किंवा व्यक्तींमधे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा पण फिक्षन नाही. कारण जे लिहीणार आहे ते वास्तव आहे. या लेखमालेतील लेखांमुळे अनेकांचे पीएचडी संदर्भातील समज, गैरसमज दूर होतील आणि जर कुणाला संशोधन करण्यास प्रेरणा मिळाली तर ते सोन्याहून पिवळं असेल यात शंका नाही.
 पीएचडी - अपेक्षा आणि वास्तव (भाग २) : पीएचडी गाईड

No comments:

Post a Comment