Monday 14 May 2012

समलैंगिकता: नैसर्गिक की अनैसर्गिक??


http://theonlinecitizen.com/2007/05/decriminalising-homosexuality-in-singapore/
 दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. पुणे विद्यापीठात मित्रमंडळी कट्ट्यावर गप्पामारत बसलेलो असताना विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपाशी आदल्याच दिवशी झालेल्या गे-लेस्बीयन यांच्या समर्थनार्थ कुलगुरूंच्या कार्यालयावर काढल्या गेलेल्या मेळावा वजा मोर्चाची चर्चा चालू होती. त्यावेळी मला गे आणि लेस्बियन या संकल्पनांची पहिली ओळख झाली. त्यावेळी त्या मेळावा-मोर्च्याला वर्तमानपत्रांतूनही फारशी प्रसिद्धी मिळालेली नव्हती. त्यामुळे तरूणांमधे याविषयावर चालणारी चर्चा एकदम दबक्या आवाजात असे.

त्याआधी हिजडा ही संकल्पना माहीती होती पण त्याविषयी इतकंच ज्ञान होतं की ते टाळ्या वाजवून पैसे मागतात आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी जाता जात नाहीत. मुंबईसारख्या ठीकाणी हे लोक काही लहान बाळाशी संबंधीत समारंभ असेल तर बाळाला आशीर्वाद देण्यासाठी अचानक उपस्थीत होतात आणि आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने प्रचंड पैसे उकळतात. असो.

पुढे इंग्लंड मधे शिकत असताना या संकल्पनांविषयी अधिक माहीती मिळाली. म्हणजे तिथे दोन मुली किंवा दोन मुलं हाताला धरून चालत असले म्हणजे त्यांना लेस्बियन कपल किंवा गे कपल म्हंटलं जायचं. त्यामुळे कोणाही मैत्रिणीचा हात धरायचा नाही हा धडा मिळालेला होता.

त्याच दरम्यान दीपा मेहताचा "फायर" चित्रपट पाहण्यात आला. त्यातील सीता आणि राधा अशा दोन सेन्सीटीव्ह नावांमुळे (ती भारतीय संस्कृतीचा अभिमान असणार्‍यांच्या भावना मुद्दाम दुखावण्यासाठीच अधिक असे वाटते) तो चित्रपट वादग्रस्त ठरला. त्यात एका पंजाबी घरातील दोन सख्या जावा लेस्बियन असलेल्या/बनलेल्या दाखवल्या आहेत. हा चित्रपट पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली की सीता आणि राधा ही नावं न घेता सुद्धा दीपा मेहता यांना हा सामाजिक प्रश्न दाखवता आला असता कारण स्टोरीलाईन, अ‍ॅक्टींग खूप प्रभावी आहे. मोठीचा नवरा कायम कामात असल्यामुळे तो तिला वेळ देत नाही आनि मूलही होऊ देत नाही. खरं तर त्याला मेडीकल प्रॉब्लेम असतो. याची त्या माणसाला पूर्ण कल्पनाही असते. फक्त ते छातीठोकपणे अ‍ॅक्सेप्ट करण्याची ताकद नसते. त्यामुळे संयुक्त कुटुंबात मोठ्या सुनेवरच ठपका ठेवला जातो. दर्म्यान धाकट्या मुलाचं लग्नं होतं. लग्न झाल्या दिवसापासून धाकटा मुलगा रात्री बाहेरच. त्याचे एका दुसर्‍या बाईशी संबंध असतात. धाकटीला लग्न होऊन सहा महिने होत आले तरी गुड न्युज नाही म्हणून बोल लावायला सुरूवात होते. खरं तर त्या घरात दोघींचीही मानसिक आणि शारीरीक घुसमट होत असते. त्याचाच परिणाम म्हणजे त्या एकमेकींना शारीरीक आनंद द्यायला सुरूवात करतात. संपूर्ण चित्रपट या भोवती गुंफलेला आहे.

त्याच काळात गेम थिअरी मधे इकॉनॉमीक्सचं नोबेल पारितोषिक मिळवणारा जॉन नॅश याची बायोग्राफी "ब्युटीफुल माईंड" वाचनात आली. चरीत्रामधे तो बायसेक्षुअल (दोन्ही लिंगांकडे आकर्षित होणारे, समलिंगी तसेच भिन्न लिंगी व्यक्तींशी शारीरीक संबंध ठेवणारे) असल्याच्या घटना लिहीलेल्या होत्या. जॉन नॅश तर लग्नानंतर सुद्धा एका गे-बीच वर पकडला गेला होता आणि रात्रभर लॉकअप मधे होता अशा घटना सांगीतल्या आहेत. फक्त हाच नाही तर अनेक गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ त्यंच्या तरूणपणात बायसेक्षुअल होते. त्यांच्यामधे ऑटीझम स्क्रीझोफेनिया यांसारख्या आजारांचा प्रदुर्भाव होता असंही वाचनात आलं.

त्यानंतर अनेक वेळा माझा या संकल्पनांशी वाचन, चित्रपट, चर्चा-गप्पा यांसारख्या माध्यमातून सामना झाला. अगदी गाडी सिग्नलला थांबवल्यावर हिजडे दिसल्यावर पूर्वी वाटत असलेली भिती कमी झालेली होती. पण त्या हिजड्यांच्या एका गोष्टीचं निरीक्षण लक्षात आलं आणि ते म्हणजे ते पुरूषांकडेच पैसे मागतात. स्त्रिया मुलींकडे मागतात कधी कधी पण दुर्लक्ष केलं तर निघून जातात. हेच पुरूषांनी दुर्लक्ष केलं तरी जात नाहीत आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी बडबड चालू करतात. त्या बडबडीला घाबरून की काय पण बरेचसे पुरूष हिजडा दिसला की खिशातून पैसे काढून लगेच देऊन टाकतात. कुणीतरी सांगीतलं की हिजडा बनवण्याचा एक  विधी असतो. तो विधी झाला की तो माणूस हिजडा बनतो आणि त्या कम्युनीटी मधे जातो.

आपल्याकडे क्वचितच एखादं मूल मुलगा/मुलगी म्हणून जन्माला येतं पण त्यांचे अवयव आतल्याबाजूने त्या त्या लिंगाचे नसतात. त्यामुले त्यांची मोठं झाल्यावर खूप गोची होते. आजकाल डॉक्टर्स ऑपरेशन करून ते फिक्स करण्याचा प्रयत्न करतात पण निसर्गापुढे त्यांचंही फारसं चालत नाही.

गेली काही वर्षे समलिंगी संबंध हा पाश्चात्य देशांतील अतिशय सेन्सीटीव्ह विषय आहे. अनेक मोर्चे आणि संघर्षांनंतर आता तिथे समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता लाभलेली आहे. नुसते संबंधच नाहीत तर समलिंगी लग्नांना सुद्धा कायदेशीर परवानगी मिळालेली आहे. दोन वर्षांपूर्वी टोरंटो मधे गे-परेड पाहण्याचा योग आला. लक्षात आलं की हे लोक एकमेकांबरोबर खूपच आनंदी आहेत. आयुष्यात आनंदी रहाणं हे फार महत्त्वाचं आहे. माझ्या नवर्‍याचा एक मित्र गे आहे.गेल्यावेळेच्या कॅनडा ट्रीप मधे त्यालाही भेटले होते. त्या गे मित्राचा पूर्वीचा एक पार्टनर (बॉयफ्रेंड) भारतीय होता. त्या भारतीय मुलाचे आई-वडिल लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागलेले आणि हा मुलगा लग्नाचा विषय टाळत होता. कॅनडात सेपरेट गे-पब्स आहेत. तिथे गे-लोक एकमेकांना भेटतात. चार विरंगुळ्याच्या गप्पा करतात.

मधे एका व्यक्तीने मला सांगीतलं की त्याला एका व्हाईट प्रोफेसरने (की जो भारतात काही कामा निमीत्त काही वर्षं रहात होता) सांगीतलं की त्याने इंजीनीअरींग कॉलेजमधल्या ९०% विद्यार्थ्यांबरोबर लैंगिक संबंध ठेवलेले होते. रोज एक नविन मुलगा यायचा. त्याच्या म्हणण्यानुसार भारतातील हॉस्टेलमधे राहणार्‍या मुलांच्या ९५% मुलं ही सुरूवातीला समलिंगी संबंध ठेवतात. त्याची कारणंही तशीच आहेत. मुलांना प्युबर्टी पिरीयड उशीरा चालू होत असला तरी त्यांचा सेक्स ड्राईव्ह खूप जास्त आसतो आणि त्यांची लैंगिकता ही शारीरीक जास्त असते. ह्या उलट मुलींची प्युबर्टी शाळेत असतानाच आलेली असते आणि त्यांचा सेक्स ड्राईव्ह हा तुलनेने कमी असतो. अपवाद सगळीकडेच असतात. मुलींची लैंगिकता ही जास्त इमोशनल असते. ज्याकाळात त्यांचा सेक्स ड्राईव्ह अ‍ॅक्टीव्हेट होतो त्याकाळात त्यांना आपल्या समाजात मुलींशी संबंध ठेवता येत नाहीत. (कारणं काहीही असोत) त्यामुळे ते एकमेकांमधे त्यांची लैंगिकता एक्सप्लोअर करतात. त्यातून पुढील आयुष्यात गंभीर परीणाम होत असतील किंवा नाही हे त्या त्या मुलाच्या सेन्सीटीव्हीटीवर अवलंबून आहे.

कालच अमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमात लहान मुलांचे लैंगिक शोषण हा विषय दाखवला. त्यातील हरीश अय्यर हा एक व्हिक्टीम दाखवला आहे की ज्याच्यावर वयाच्या ७ व्या वर्षापासू्न ११ वर्षं म्हणजे १८ व्या वर्षांपर्यंत एका पुरूषा कडून बलात्काराला सामोरं जावं लागलं. आज वाचलं की हरीष एक गे म्हणून वावरतो. तसेच गे-हक्कांसाठी लढतो. आपल्या शरीराचं भान येण्यापूर्वीपासूनच जर एखाद्यावर अत्याचार झाला असेल आणि तो सुद्धा सतत ११ वर्षे (तो का थांबवता आला नाही किंवा तत्सम प्रश्न इथे तसे महत्त्वाचे नाहीयेत कारण चर्चेचा मुद्दाच वेगळा आहे) होत असेल तर यात आजीबात आश्चर्य नाही की ती व्यक्ती गे आहे. त्याच कार्यक्रमात एक गणेश नावाचा तरूणही दाखवला होता की जो स्वत:ला गे म्हणवतो की नाही ते समजले नाही पण त्याला एकूणच शारीरीक संबंध याचा तिटकारा आलेला आहे. अशी अजुनही अनेक आपल्या समोर प्रकाशात न आलेली अनेक उदाहरणं असतील (मुलं/मुली) की जे लहान असताना लैंगिक किंवा इतर अत्याचारांना सामोरे गेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात त्या घटना कुठे ना कुठे तरी कमी जास्तप्रमाणात प्रभाव टाकणार्‍या ठरलेल्या आहेत. अमिर खानने चाईल्ड अ‍ॅब्युझचे दिलेले सरकारी आकडे परीस्थीती फारच गंभीर असल्याचं द्योतक आहे. हे केवळ सरकारी आकडे आहेत. प्रत्यक्षात न नोंदवल्या गेलेल्या, न बोलल्या गेलेल्या अनेक केसेस असतील.

आपल्याकडे पूर्वी मुलीचं लग्नं तिच्या सातव्या वर्षी आणि मुलाचं लग्न तो १२-१३ वर्षांचा असताना करायचे ते अतिशय योग्य होतं. त्याचेही दुष्परीणाम बाहेर पडले म्हणून लग्नाचं वय वाढत गेलंय. आपल्याकडचे सामाजिक नियम चालीरीती या अनेक वर्षे मानवीस्वभावाचा अनुभव घेतल्याने बनलेल्या आहेत. वयाच्या २५, ३० वर्षापर्यंत व्हर्जीन रहाणं हे मुलगा किंवा मुलगी यांच्या दृष्टिकोनातून खरंच खूप अनैसर्गिक आहे. त्यातून मुलामुलींचा भावनिक कोंडमारा होत असतो. कदाचित हे अत्याचार करणारे लोक कोणत्यानाकोणत्या प्रकारे त्यांच्या लहानपणीच्या घटनांच्या परीणामातून भावनिक कोंडमार्‍याला सामोरे जात असावेत. त्याचीच अभिव्यक्ती लैंगिक शोषण करण्याच्या प्रवृत्तीत होत असावी असं वाटतं.

ढोबळ मनाने विचार करता अगदी नर आणि मादी यांचं प्रयोजन किंवा स्त्री आणि पुरूषष यांचं नैसर्गिकरित्या एकत्र येण्याचं कारण लक्षात घेतलं तर प्रजनन किंवा पुनरूत्पादन हेच आहे. प्रजनन हे फक्त दोन भिन्न लिंगातच होते. त्यामुळे हे नैसर्गिक आहे. समलैंगिकता ही नैसर्गिक की अनैसर्गिक हे सांगणं तितकं सोप्पं नाहीये. फायर मधलं उदाहरण घेतल तर तिथे त्या दोघींना त्यांचा स्त्री असण्याचा अधिकारच नाकारला जात होता. एकूणच परीस्थीती बिकट होती. त्या दबावाची वेगळ्या प्रकारे अभिव्यक्ती झाली. जॉन नॅश च्या उदाहरणात नेमकी परीस्थीती वेगळी होती. त्याचा प्रश्न हा प्रोफेशनल फ्रस्ट्रेशन मधून उद्भवलेला होता. सामान्यत: असं समजतात की मॅथमॅटीशीअन म्हणून करीअर, नविन शोध लावायचे असतील ते तुम्ही वयाच्या २५-२८ पर्यंतच करू शकता. त्यानंतर तुमची बुद्धी तितकीशी प्रभावी रहात नाही. त्यामुळे वयाच्या २८-३० व्या वर्षी या लोकांना फ्रस्ट्रेशन येतं. जॉन नॅशचंही तसंच झालेलं. त्याचा स्क्रीझोफेनीया सुद्धा त्यचाच परिपाक होता. अगदी हरीष अय्यर च्या बाबतीतही त्याच्यावर लहानवयात होत असलेला अत्याचार कारणीभूत आहे. अगदी हिजडे सुद्धा गे-या प्रकारात मोडतात. ते एकमेकांमधे शारीरीक संबंध ठेवतात. यासगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्प्ष्ट आहे की मेडीकली लिंगच वेगळं असणं किंवा आतील अवयवांमधे प्रॉब्लेम असणं हेच केवळ नैसर्गिक आहे. या व्यतीरीक्त लोक जे गे किंवा लेस्बीअन या कॅटेगरीत जातात ते तत्वत: नैसर्गिक नाही. पण, आपण लहानाचे मोठे होत असताना आजूबाजूला घडणार्‍या बर्‍या-वाईट घटनांचा प्रत्येक मूलाच्या सेन्सीटीव्हीटीच्या पातळीप्रमाणे कमी अधिक परिणाम होत असतात. काही वेळा मुलींच्या बाबतीत खूपच दबलेल्या असल्या की त्याचाही परिणाम नेमका उलट होतो. हे सगळे परीणाम इतके प्रभावी असतात की ते आपली मानसिक जडण्घडण बदलतात. मनाचा आणि शरीराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुले मनातील बदलांचे परीणाम हे शरीरावर नक्कीच दिसतात. त्यामुळे गे-लेस्बियन ह्या संकल्पना नैसर्गिक आहेत असे वाटायला लागते.


गे-लेस्बीयन हे नैसर्गिक (बाय डेफीनेशन) नसले तरी त्याला एखादं व्यंग म्हणूनपण हाताळू नये. खरं तर एकूणच सामाजिक परीस्थीतीचा, अशी लोकं लहानाची मोठी होत असताना सामोरे जात असलेल्या परीस्थीतीचा अभ्यास केल्यास चांगले. त्यातून आप्ल्याला आपल्याच समाजातील चालीरीती, एकूणच बदलती सामाजिक परीस्थीती यांचा यासगळ्यावर किती प्रखर परिणाम होतो ते समजेल. ही वाईट सामाजिक परिस्थीती बदलून लहान मुलांना अधिकाधिक चांगलं लहानपण कसं देता येईल याचीही दिशा मिळेल. सुधीर कक्कर म्हणून एक प्रसिद्ध लेखक आहेत. एकूणच संस्कृतींचा सायकोसोमॅटीक अंगाने विचार करून त्याविषयी अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या एका पुस्तकात मुला-मुलींच्या मानसिकतेवर आणि लैंगिकतेवर परिणामकरणार्‍या घटनांमधे महत्त्वाचा घटक म्हणजे टॉयलेट ट्रेनींगची पद्धत हा दिलेला आहे. एकूणच विषय हा वरवर विचार करण्याचा नाही. लैंगिकतेशी संबंधीत अनेक प्रश्न हे सामाजिक चालीरीती किंवा समाजची सद्य परीस्थीती, कौटुंबिक परिस्थीती यांच्याशीच सांगड घालणारे अधिक असतात. त्यामुळे दिवसेंदिवस भयानक स्वरूप धारण करणार्‍या या प्रश्नांचा, त्यांच्या सखोल परीणामांचा आपल्या देशाच्या, संस्कृतीच्या तुलनेत व्यव्स्थीत अभ्यास व्हायला हवा असं मला वाटतं.

Saturday 5 May 2012

॥उमरावजान॥

महाजालावरून साभार
जगाच्या पाठीवर कुठेही जा स्त्रीचं आयुष्य इतक्या नाट्यमय घटनांनी भरलेलं असतं की जगभरातील उत्तमोत्तम साहित्य निर्मितीसाठी या स्त्रीच्या आयुष्यानेच कधीही न आटणारा स्रोत दिला आहे. याची प्रचिती अगदी आपल्या रामायण-महाभारत या प्राचीन महाकाव्यांपासून ते सध्याच्या विविध भाषांमधील वाहिन्यांवरील टीव्ही सीरीअल्स मधून येतेच. ग्रीक मायथॉलॉजी मधील प्रसिद्ध महाकाव्य ओडीसी सुद्धा याचीच साक्ष देतं. स्त्रीच्या आयुष्यातील या नाट्यमयतेची बीजं ही तिच्या स्त्रीत्त्वातच आहेत. कारण स्त्री-पुरूष समानता फक्त या ठीकाणीच माघार घेते. तिथे समानता शक्यच नाहीये....निसर्गाने तिलाच हे पुननिर्मीतीचं गिफ्ट दिलेलं आहे. यासाठी तिचं स्त्रीत्त्व हे एका विशिष्ट कालमर्यादेचंच असतं. त्या विशिष्ट कालमर्यादेत तिला अनेक भूमिका वठवाव्या लागतात. म्हणूनच स्त्रीचं आयुष्य अधिक डायनॅमिक असतं. स्त्रीच्या आयुष्यातील अधिकाधिक नाट्यमय घटना या कालावधीतच घडत असतात. या घटनांची तीव्रता तिच्या स्त्रीत्त्वाभोवतीच गुंतलेली असते. तसं पहायला गेलं तर या स्त्रीत्त्वामुळेच पुरूषाच्या पुरूषत्त्वाला अर्थ, जगाला जगपण आणि घराला घरपण प्राप्त होते.

मिर्झा हादी रूसवा या उर्दु लेखकाची उमरावजान ही अशीच एक अजरामर साहित्यकृती. उमरावजान ही एक उर्दु कादंबरी असली तरी तिला उर्दु भाषा येत नसलेल्या रसीकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम दिग्दर्शक मुझफ्फर अलींनी केलं. त्यासाठी त्यांचे आभारच मानले पाहीजेत. रेखा सारख्या अतिशय सुंदर अदाकाराने उमरावजानला प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण करून दिलंय. गीतकार खय्याम यांनी तर प्रत्येक शेराच्या (कवितेच्या) माध्यमातून तिच्या जीवनाचं, भावनिक हल्लकल्लोळाचं सारच उत्तमरित्या पोहोचवलं आहे. एक स्त्री म्हणून मी जेव्हा उमरावजान हा चित्रपट बघते तेव्हा तेव्हा मी तिच्या तसेच एकूणच स्त्रीत्त्वाच्या अधिकाधिक प्रेमात पडते. हा चित्रपट मी कायम शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत असते पण माझे डोळे अश्रुंनी डबडबलेले असतात आणि मन भरून आलेलं असतं. मग शेवट कधी होतो तेच समजत नाही. पर्यायाने शेवटचा सीन लक्षात रहात नाही आणि मग कथेच्या शेवटी काय झालं असेल हे कुतुहल मला पुन्हा त्या चि्त्रपटाकडे नेतं.

सुरूवातीपासूनच उमरावजानच्या आयुष्यातील (सुरूवातीची अमिरन) पुरूष एकप्रकारे तिच्या धैर्यापुढे, सहनशीलतेपुढे कमकुवत आहेत. तिचे अपयशी ठरलेले वडिल पूर्वीचे पोलीसपाटील असले तरी तसंच मुलीला कोणी पळवुन नेलंय हे माहीती असूनही ते तिला शोधू शकत नाहीत. हा तिच्या वडिलांचा कमकुवतपणा झाला.

तिला पळवुन नेलं जातं तेव्हा लहान असलेला भाऊ, ती मोठी झाल्यावर घरी परतते तेव्हा तिची मायेने विचारपूस करण्या ऐवजी तिची ओळख फक्त लखनौ मधील प्रसिद्ध कोठेवाली अशीच लक्षात ठेवतो. त्याची जाणीव दोघी मायलेकींना करून देतो. बहिणीपेक्षा समाज काय म्हणेल याची चिंता असलेला भाऊ देखिल म्हणूनच कमकुवत वाटतो.

कबुतरांचं आमीष दाखवून तिला पळवुन नेणारा कबुतरवाला शेजारी सुद्धा तिला पळवताना नेमकं तिचं काय करायचंय हे न ठरवताच तिला पळवतो आणि मग तिला लखनौमधे नेऊन विकतो. एका मुलीला किंवा स्त्रीला विकुन पैसे कमावणारा माणूस कमकुवतच असतो. 

अगदी सुरूवातीला तिच्या प्रेमात पडलेला गौहर खानही सर्वे प्रसंगांतून स्वत:च्या कमकुवत पणाचंच प्रदर्शन करतो. सुरूवातीला भावनिक कमकुवतपणा, मग कोठ्यातून बाहेर हाकलल्यावर देखिल उमरावजानचीच गझल इतरांना स्वत:ची म्हणून ऐकवणं, स्वत:चं ज्या मुलीवर प्रेम आहे असं ज्याला वाटत असतं त्याच मुलीसाठी नवाबाचा सौदा आणणं, सुरूवातीला त्याच्या आणि उमरावजानच्या प्रेमाला विरोध करणार्‍या खानम ने शेवटी तिला कोठयावर बांधून ठेवण्यासाठी गौहर खानबरोबर लग्नाचा बनाव रचणे, त्यातून सुटण्यासाठी उमरावजाननेच दिलेले पैसे घेऊन तिच्याच कानपूर मधल्या घरी जाऊन राहणे ह्या गोष्टी त्याचा कमकुवतपणा प्रकर्षाने दर्शवतात.
उमरावजान ज्या नवाब सुल्तानच्या प्रेमात पडलेली असते त्याची तर मला गंमतच वाटते. प्रेम करताना लक्षात आलं नाही की ती कोठेवाली आहे म्हणून. त्याचा स्वत:चा अपमान होतो म्हणून कोठ्यावर जाणं चालत नाही पण तिला बाहेर इतरत्र चोरून भेटलेलं चालतं. त्याच्या मि्त्राकडे तिचा अपमान होतो म्हणून त्या ठीकाणी त्याला भेटायला बाणेदारपणे नकार देणारी उमरावजान खूप मोठी झाल्यासारखी वाटते. एकूण परीस्थीती पाहता खरं तर नवाब सुल्तानला स्वत:च्या आईला उमरावजानशी लग्न करण्यासंदर्भात पटवता आलं असतं पण तिथेच त्याचा कमकुवतपणा दिसून येतो.

नाही म्हणायला उमरावजानचे मौलवी सहाब की ज्यांनी उमरावजानला शायरी करायला शिकवलेली असते, डाकू फैज अली की जो उमरावजानला कोठ्यातून बाहेर काढतो हे पुरूष कमकुवत वाटत नाहीत पण तिच्या आयुष्यातील त्यांचा प्रभाव अत्यंत अल्प असा वाटतो म्हणून त्या अर्थी ते काहीसे कमकुवत ठरतात.

या सगळ्या भावनिक प्रवासात अमिरनला भेटलेल्या स्त्रिया, त्यांच्यामधील आणि तिच्यातील बौद्धिक तफावत यांचं चित्रण उमरावजानला खूप वर उचलतं. तिचा एक अतिशय साधी कमकुवत अमिरन ते अत्यंत प्रगल्भ अशी उमरावजान हा प्रवास एकूणच खूप ग्रोथ असलेला वाटतो. कारण अमिरनला पळवुन नेलं जाणं, तिचं नेमकं रंगाने सावळी असल्याने नवाबाकडे न जाता कोठ्यावर जाणं, तिथला भावनिक संघर्ष, आयुष्यात हवेसे वाटणारे क्षण हातात येतायेता निसटून जाणं आणि मग शेवटी तिचं परत लखनौच्या कोठीत परत येणं यातील कोणतीच घटना तिच्या स्वत:च्या इच्छेने झालेली नाहीये. तरीही ती या सगळ्याचा कोणत्याही प्रकारची चिडचिड, तणतण न करता स्विकार करते हीच उमरा्वजानच्या स्त्रीत्त्वाची ताकद दाखवते आणि तिचं यशही.

Thursday 3 May 2012

स्त्रीत्त्ववेणा!!

http://danielgovar.com/gallery/womanhood-unfinished

जगात फेमिनीझम म्हणजेच स्त्रीवादाचा उदय होऊन अनेक वर्षं झाली. पाश्चात्य देशांत स्त्रीमुक्ती चळवळी उभ्या राहिल्या, फोफावल्या, यशस्वी तसेच अयशस्वी सुद्धा ठरल्या. या चळवळींची यशस्विता नेमकी कशावरून ठरवली जाते आहे हे महत्त्वाचे. स्त्रिया शिकू लागल्या, त्यांना पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली, कायदेशीररित्या पुरूषांच्या बरोबरीचे हक्क मिळाले म्हणजे स्त्रीमुक्त झाली का? मुळात काही जणांना प्रश्न पडलेला असतो की स्त्री ही खरंच बंधनात आहे का? काही जणं म्हणतील अति मुक्त आहेत म्हणून मोकाट सुटलेल्या आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी त्यांच्या एका व्याख्यानात म्हंटल्याचं स्मरतंय की स्त्री आणि पुरूष हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं आहेत. एक चाक निखळलं तरी गाडा पुढे चालणार नाही. त्यामुळे एकटी स्त्री मुक्त होऊ शकत नाही तसेच एकटा पुरूषही मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे नक्की काय? या फेमिनीझम मधे फेमिनीटीचा म्हणजेच स्त्रीत्त्वाचा कितपत विचार होतो?  हा उहापोह करण्याआधी आपल्याच आजूबाजूला घडलेली, घडत असलेली काही प्रसंगचित्रे उभी करून त्यातील स्त्रीत्त्वाच्या वेदना काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्त्रीत्त्ववेणा मधून करते आहे.
------------------------------------------------------------------------------------------
१. वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्र. वेळ रात्रीची, बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय. आश्रमाच्या इमारतीला लागूनच असलेल्या माळरानावर दुपार पासूनच मेंढपाळांचं पाल पडलेलं आहे. संध्याकाळपासूनच पावसाने जोर धरलाय. रात्र जशी वाढतेय तसा पावसाचा तडाखा वाढलेलाच आहे. माळरानावरच्या पालातील खुडबुड आश्रमात स्पष्ट ऐकू येतेय. अचानक पालातील लगबग वाढते. पहाटेच्या सुमारास अचानक तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज यायला सुरूवात होते. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आवाज. तो आवाज ऐकून पालात आता ओली बाळंतीण असणार हे गृहीत. पावसाच्या धडाक्यामुळे बाळंतीणच कशाला सगळं पालच ओलं आहे. सकाळी पाऊस थांबलेला स्वच्छ उन्ह पडलेलं आणि दुपारपर्यंत माळरानावरचं पाल ओल्याबाळंतीणीसकट उठलेलं असतं.
***********************************
२. पुण्यातील भांडारकर रस्त्यामधील एक प्रथितयश मॅटर्निटी होम. दाराशीच थांबलेल्या मर्सीडीज बेंझ मधून एक तरूण स्त्री तिचा नवरा आणि सासू यांच्याबरोबर उतरते. आधीच फोन करून ठेवलेला असल्याने नर्सींगहोमच्या रिसेपशनीस्टला त्यांना नक्की कुठे जायला सांगायचंय हे माहीती असतं. तशी नेत्रपल्लवी होऊन त्यांना एका छोट्याशा खोलीकडे पाठवलं जातं. बंद दाराआड त्या तरूण स्त्रीची सोनोग्राफी केली जाते. गर्भ मुलीचा आहे हे समजल्यावर त्या तरूण स्त्रीला काय वाटतंय याचा जराही विचार न करता डॉक्टरांना तिचा गर्भपात करण्यास सांगीतलं जातं.
**************************************
३. एक मध्यमवर्गिय कुटुंब. घरात तीन मुलींचा चिवचिवाट. त्या चिमण्यांची आई सुद्धा अतिशय नाजूक पण चेहर्‍यावरून तिला काहीतरी होत असावं असं वाटावं इतकी मलूल झालेली. घरात चर्चा चालू आहे ती नातू आणण्याची. त्यासाठी तिच्यावर चौथं गर्भारपण लादलं जातंय. तिला नक्की काय वाटतंय याचा विचार न करता.
***************************************
४. घरात चार मुली आहेत. मुलाची हौस भागावी म्हणून सगळ्यात धाकट्या मुलीला कायम मुलाचे कपडे घालायला दिले जातायत. ती मुलगी ओरडून सांगतेय मी मुलगी आहे, मुलगा नाही. त्यामुळे मला मुलाचे कपडे घालायचे नाहीत. तरीही तिला मुलाचे कपडेच घालायची जबरदस्ती केली जाते.
*****************************************
५. अफ्रिकेतील एका देशातील बातमी. मुलगी वयात येण्याच्या आधीच तिच्या योनीतील एक अतिशय नाजूक भाग की ज्यामुळे तिला आनंदाची अनुभूती मिळू शकते, काढून टाकून योनीला मोठे भोक पाडले जाते. म्हणजे तिचा उपयोग फक्त मुलं पैदा करण्यासाठी व्हावा आणि तिला लैंगिक सुखाची अनुभूती काय असते याची कल्पना सुद्धा न येवो.
******************************************
६. एका मध्यमवर्गीय घरात बारावीला मुलीला चांगले गुण मिळालेले असतात. मुलीला खूप इच्छा असते आपण आर्कीटेक्चरला जावं पण घरात आई सांगते तुझ्या शिक्षणावर पैसे खर्च करून आम्हाला काय फायदा. जे शिक्षण कमी खर्चाचं असेल तेच शिक्षण तुला घ्यावं लागेल. पुढे कर्मधर्म संयोगाने त्या मुलीवरच घरची जबाबदारी पडते. मुलाप्रमाणे ती ते सगळं निभावून नेते.
********************************************
७. एका नवपरिणीत विवहीतेला दिवस जातात. त्या गोड बातमीचं कन्फर्मेशन डॉक्टरांकडून मिळाल्यावर ती धावतच आपल्या नवर्‍याला ही गोष्ट सांगायला जाते. नवरा मूल होऊ देण्यास मानसिक दृष्ट्या तयार नसतो आणि म्हणून तिला ते मूल अ‍ॅबॉर्ट करायला लागतं. त्याला मूल नको म्हणून तिला आय यू डी सारखं काही बसवून घ्यायला लागतं की ज्याचा तिला भयंकर त्रास होतो.....शारीरीक तसेच मानसिक.
*********************************************************
८. पाश्चात्य देशातील एक जोडपं पस्तीशी जवळ आलेली. त्यातील स्त्रीला मूल हवंय पण पुरूषाला मूल नकोय. त्या स्त्रीला दिवस गेलेले असतात. नवरा अ‍ॅबॉर्शन करायला सांगतो पण ती त्याला डिव्होर्स देते आणि आपल्या बाळाला जन्म देते. पुढे एक नवा जोडीदार निवडते आणि नविन आयुष्य चालू करते. आधीचा जोडीदार पश्चात्ताप करत बसतो आणि नविन जोडीदार शोधतो.
*******************************************************
९. एका मध्यमवर्गीय घरात वयात येणार्‍या मुली आहेत. त्यांच्या आईवर तिच्या वडिलांच्या मानसिकतेचा जबरदस्त पगडा. त्यामुळे मुलींनी नटायचं नाही, अगदी पावडर सुद्धा लावायची नाही असा आईच्या वडिलांचा खाक्या आईनेही मुलींवर लादलय. मुलींना स्वत:च्या स्त्री असण्याचा वैताग येईल इतपत हे सगळं चालू आहे.
*****************************************************
१०. साधारण १०० वर्षांपूर्वीचा काळ. मुलगी वयात आली म्हणजे तिला न्हाणं आलं की तिचं स्त्रीत्त्व साजरं व्हायचं. त्या मुलीला दागदागीन्यांनी सजवलं जायचं. तिची पूजा केली जायची. 
************************************************
११. जपान मधे मुलगी १५ वर्षांची झाल्यावर घरी तिच्या बरोबरीच्या किंवा तिच्या पेक्षा मोठ्या मुलांना आवर्जुन बोलावून एक पार्टी करतात आणि तिची ओळख अनेक समवयस्क भिन्नलिंगी व्यक्तींशी करून दिली जाते. 
*****************************************************
१२. साधारणत: त्याच १०० वर्षांपूर्वीच्या काळी बालविधवेचे केशवपन केले जायचे. स्निग्ध पदार्थ खाणे, चांगले चुंगले खाणे तिला वर्ज्य असायचे. पण काहीवेळा घरातील किंवा अपवादानेच बाहेरील पुरूष अशा विधवेचा गैरफायदा घेत असत. मग त्या बिचारीलाच कुल्टा ठरवून शिक्षा दिली जायची.
*****************************************************
१३. पूर्वी काही खेडेगावांत जर एखाद्या मुलीच्या केसात जटा झाल्या तर तिला देवाला सोडलं जायचं. म्हणजे जर एखाद्या मुलीकडे काही कारणाने दुर्लक्ष झालं आणि केस स्वच्छ नाही राहू शकले तर केसात धूळ अडकून जट तयार झाली की त्यामुलीला घरापासून तोडून देवळात रहायला सांगायचे आणि मग ती वयात आल्यावर किंवा त्याही आधीपासून सगळ्या गावातील पुरूषांच्या वेळीअवेळीच्या गरजा भागवायला मोकळी ठेवलेली असे. यालाच देवाला सोडणं असे म्हणत.
**************************************************************
१४. एक कलिग तिची व्यथा सांगत असते. सेक्स च्या बाबतीत माझा विचार कधीच हो नसतो. नवर्‍याला पाहिजे तेव्हा त्याने उचलायचं आणि बेडवर पटकायचं. माझा भयंकर संताप होत असतो. पण काही करू शकत नाही. हे ऐकताना मला सुद्धा भयंकर चीड येते.
************************************************************
खर्‍या अर्थाने स्त्रीत्त्वाचा सन्मान करायचा असल्यास आपल्याकडे अजुनतरी खर्‍या अर्थाने स्त्रीमुक्ती वगैरे येणं याला काही शतकं लागतील.  आपल्याकडे अजुनही नोकरी करणार्‍या स्त्रीला बाळंतपणाची सुट्टी तीन महिने मिळते. तीन महिन्यांत काय काय होतं? जर एखादीला बेड-रेस्ट सांगीतली तर तिने नोकरी सोडून द्यायची का?  नोकरी सोडून देणं भविष्याच्या दृष्टीने परवडणारं नाही म्हणून मग तिने आई बनण्याचं स्वप्न बाळगायचंच नाही. एकप्रकारे हा सुद्धा स्त्रीचं स्त्रीत्त्व नाकारण्याचा प्रकार आहे. स्वीडन, नॉर्वे यासारख्या देशांत, त्या देशात जन्माला येणारं प्रत्येक मूल, मग ते कोणत्याही रेसचं, नॅशनॅलीटीचं असो, एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेलं असतं. त्यामुळे नोकरी करणार्‍या आईला त्यागोष्टीसाठी दोन वर्षं पेड लिव्ह देण्याची सोय आहे. नवर्‍याने त्यातील कमीत कमी सहा महिने पेरेंटल लिव्ह घेणं अनिवार्य आहे. सरकार तर्फे नोकरी करणार्‍या आई-वडिलांच्या मुलांसाठी पाळणाघरही चालवलं जातं. हे एका अर्थाने स्त्रीचं स्त्रीत्त्व जपणंच आहे. त्याचा आदर करणं आहे. आजकाल स्त्रीमुक्ती ही कन्सेप्ट जबाबदारी टाळण्यासाठी वापरली जाते. म्हणजे स्त्रीचं शरीर हवं असेल तेव्हा तिच्यातलं स्त्रीत्त्व छान आहे. पण त्यातून मूल नको असतं, कारण जबाबदारी नको असते. मग त्यावेळी सोयीस्कररित्या तिचं स्त्रीत्त्व नाकारलं जातं तिचा मूल जन्माला घालायचा जन्मसिद्ध अधिकार डावलून.
**************************************************************
असे किंवा यापेक्षा वेगळे अनेक प्रसंग सांगता येतील. या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन आहे आणि ते म्हणजे स्त्रीचं स्त्रीत्त्व! या प्रसंगांवरूनच लक्षात येतं की स्त्रीचं स्त्रीत्त्व समाजाने, कुटुंबाने आणि स्वत: स्त्री ने स्विकारलेलं आहे की नाही. मला असं वाटतं की एखाद्या समाजात स्त्रीमुक्ती चळवळ यशस्वी झाली की नाही याचं मोजमाप त्या समाजात स्त्रीच्या स्त्रीत्त्वाला किती किंमत आहे यावर ठरवता येईल. स्त्रीत्त्व नाकारलं गेल्याचीच अधिकाधिक उदाहरणं या प्रसंगांतून समोर येत आहेत. स्त्रीच्या स्त्रीत्त्वाचा आदर करणे म्हणजेच स्त्रीमुक्ती....आणि पुरूषाच्या पुरूषत्त्वाचा आदर म्हणजे पुरूष मुक्ती. या दोन्ही मुक्ती एकमेकांच्या सहकार्या शिवाय होणारच नाहीत. स्त्रीत्त्वाच्या वेणा समजल्याशिवाय हे होणार नाही.