![]() |
http://danielgovar.com/gallery/womanhood-unfinished |
जगात फेमिनीझम म्हणजेच स्त्रीवादाचा उदय होऊन अनेक वर्षं झाली. पाश्चात्य देशांत स्त्रीमुक्ती चळवळी उभ्या राहिल्या, फोफावल्या, यशस्वी तसेच अयशस्वी सुद्धा ठरल्या. या चळवळींची यशस्विता नेमकी कशावरून ठरवली जाते आहे हे महत्त्वाचे. स्त्रिया शिकू लागल्या, त्यांना पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली, कायदेशीररित्या पुरूषांच्या बरोबरीचे हक्क मिळाले म्हणजे स्त्रीमुक्त झाली का? मुळात काही जणांना प्रश्न पडलेला असतो की स्त्री ही खरंच बंधनात आहे का? काही जणं म्हणतील अति मुक्त आहेत म्हणून मोकाट सुटलेल्या आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी त्यांच्या एका व्याख्यानात म्हंटल्याचं स्मरतंय की स्त्री आणि पुरूष हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं आहेत. एक चाक निखळलं तरी गाडा पुढे चालणार नाही. त्यामुळे एकटी स्त्री मुक्त होऊ शकत नाही तसेच एकटा पुरूषही मुक्त होऊ शकत नाही. म्हणजे नक्की काय? या फेमिनीझम मधे फेमिनीटीचा म्हणजेच स्त्रीत्त्वाचा कितपत विचार होतो? हा उहापोह करण्याआधी आपल्याच आजूबाजूला घडलेली, घडत असलेली काही प्रसंगचित्रे उभी करून त्यातील स्त्रीत्त्वाच्या वेदना काय आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न स्त्रीत्त्ववेणा मधून करते आहे.
------------------------------------------------------------------------------------------
१. वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्र. वेळ रात्रीची, बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय. आश्रमाच्या इमारतीला लागूनच असलेल्या माळरानावर दुपार पासूनच मेंढपाळांचं पाल पडलेलं आहे. संध्याकाळपासूनच पावसाने जोर धरलाय. रात्र जशी वाढतेय तसा पावसाचा तडाखा वाढलेलाच आहे. माळरानावरच्या पालातील खुडबुड आश्रमात स्पष्ट ऐकू येतेय. अचानक पालातील लगबग वाढते. पहाटेच्या सुमारास अचानक तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज यायला सुरूवात होते. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आवाज. तो आवाज ऐकून पालात आता ओली बाळंतीण असणार हे गृहीत. पावसाच्या धडाक्यामुळे बाळंतीणच कशाला सगळं पालच ओलं आहे. सकाळी पाऊस थांबलेला स्वच्छ उन्ह पडलेलं आणि दुपारपर्यंत माळरानावरचं पाल ओल्याबाळंतीणीसकट उठलेलं असतं.
***********************************
२. पुण्यातील भांडारकर रस्त्यामधील एक प्रथितयश मॅटर्निटी होम. दाराशीच थांबलेल्या मर्सीडीज बेंझ मधून एक तरूण स्त्री तिचा नवरा आणि सासू यांच्याबरोबर उतरते. आधीच फोन करून ठेवलेला असल्याने नर्सींगहोमच्या रिसेपशनीस्टला त्यांना नक्की कुठे जायला सांगायचंय हे माहीती असतं. तशी नेत्रपल्लवी होऊन त्यांना एका छोट्याशा खोलीकडे पाठवलं जातं. बंद दाराआड त्या तरूण स्त्रीची सोनोग्राफी केली जाते. गर्भ मुलीचा आहे हे समजल्यावर त्या तरूण स्त्रीला काय वाटतंय याचा जराही विचार न करता डॉक्टरांना तिचा गर्भपात करण्यास सांगीतलं जातं.
**************************************
३. एक मध्यमवर्गिय कुटुंब. घरात तीन मुलींचा चिवचिवाट. त्या चिमण्यांची आई सुद्धा अतिशय नाजूक पण चेहर्यावरून तिला काहीतरी होत असावं असं वाटावं इतकी मलूल झालेली. घरात चर्चा चालू आहे ती नातू आणण्याची. त्यासाठी तिच्यावर चौथं गर्भारपण लादलं जातंय. तिला नक्की काय वाटतंय याचा विचार न करता.
***************************************
४. घरात चार मुली आहेत. मुलाची हौस भागावी म्हणून सगळ्यात धाकट्या मुलीला कायम मुलाचे कपडे घालायला दिले जातायत. ती मुलगी ओरडून सांगतेय मी मुलगी आहे, मुलगा नाही. त्यामुळे मला मुलाचे कपडे घालायचे नाहीत. तरीही तिला मुलाचे कपडेच घालायची जबरदस्ती केली जाते.
*****************************************
५. अफ्रिकेतील एका देशातील बातमी. मुलगी वयात येण्याच्या आधीच तिच्या योनीतील एक अतिशय नाजूक भाग की ज्यामुळे तिला आनंदाची अनुभूती मिळू शकते, काढून टाकून योनीला मोठे भोक पाडले जाते. म्हणजे तिचा उपयोग फक्त मुलं पैदा करण्यासाठी व्हावा आणि तिला लैंगिक सुखाची अनुभूती काय असते याची कल्पना सुद्धा न येवो.
******************************************
६. एका मध्यमवर्गीय घरात बारावीला मुलीला चांगले गुण मिळालेले असतात. मुलीला खूप इच्छा असते आपण आर्कीटेक्चरला जावं पण घरात आई सांगते तुझ्या शिक्षणावर पैसे खर्च करून आम्हाला काय फायदा. जे शिक्षण कमी खर्चाचं असेल तेच शिक्षण तुला घ्यावं लागेल. पुढे कर्मधर्म संयोगाने त्या मुलीवरच घरची जबाबदारी पडते. मुलाप्रमाणे ती ते सगळं निभावून नेते.
********************************************
७. एका नवपरिणीत विवहीतेला दिवस जातात. त्या गोड बातमीचं कन्फर्मेशन डॉक्टरांकडून मिळाल्यावर ती धावतच आपल्या नवर्याला ही गोष्ट सांगायला जाते. नवरा मूल होऊ देण्यास मानसिक दृष्ट्या तयार नसतो आणि म्हणून तिला ते मूल अॅबॉर्ट करायला लागतं. त्याला मूल नको म्हणून तिला आय यू डी सारखं काही बसवून घ्यायला लागतं की ज्याचा तिला भयंकर त्रास होतो.....शारीरीक तसेच मानसिक.
*********************************************************
८. पाश्चात्य देशातील एक जोडपं पस्तीशी जवळ आलेली. त्यातील स्त्रीला मूल हवंय पण पुरूषाला मूल नकोय. त्या स्त्रीला दिवस गेलेले असतात. नवरा अॅबॉर्शन करायला सांगतो पण ती त्याला डिव्होर्स देते आणि आपल्या बाळाला जन्म देते. पुढे एक नवा जोडीदार निवडते आणि नविन आयुष्य चालू करते. आधीचा जोडीदार पश्चात्ताप करत बसतो आणि नविन जोडीदार शोधतो.
*******************************************************
९. एका मध्यमवर्गीय घरात वयात येणार्या मुली आहेत. त्यांच्या आईवर तिच्या वडिलांच्या मानसिकतेचा जबरदस्त पगडा. त्यामुळे मुलींनी नटायचं नाही, अगदी पावडर सुद्धा लावायची नाही असा आईच्या वडिलांचा खाक्या आईनेही मुलींवर लादलय. मुलींना स्वत:च्या स्त्री असण्याचा वैताग येईल इतपत हे सगळं चालू आहे.
*****************************************************
१०. साधारण १०० वर्षांपूर्वीचा काळ. मुलगी वयात आली म्हणजे तिला न्हाणं आलं की तिचं स्त्रीत्त्व साजरं व्हायचं. त्या मुलीला दागदागीन्यांनी सजवलं जायचं. तिची पूजा केली जायची.
************************************************
११. जपान मधे मुलगी १५ वर्षांची झाल्यावर घरी तिच्या बरोबरीच्या किंवा तिच्या पेक्षा मोठ्या मुलांना आवर्जुन बोलावून एक पार्टी करतात आणि तिची ओळख अनेक समवयस्क भिन्नलिंगी व्यक्तींशी करून दिली जाते.
*****************************************************
१२. साधारणत: त्याच १०० वर्षांपूर्वीच्या काळी बालविधवेचे केशवपन केले जायचे. स्निग्ध पदार्थ खाणे, चांगले चुंगले खाणे तिला वर्ज्य असायचे. पण काहीवेळा घरातील किंवा अपवादानेच बाहेरील पुरूष अशा विधवेचा गैरफायदा घेत असत. मग त्या बिचारीलाच कुल्टा ठरवून शिक्षा दिली जायची.
*****************************************************
१३. पूर्वी काही खेडेगावांत जर एखाद्या मुलीच्या केसात जटा झाल्या तर तिला देवाला सोडलं जायचं. म्हणजे जर एखाद्या मुलीकडे काही कारणाने दुर्लक्ष झालं आणि केस स्वच्छ नाही राहू शकले तर केसात धूळ अडकून जट तयार झाली की त्यामुलीला घरापासून तोडून देवळात रहायला सांगायचे आणि मग ती वयात आल्यावर किंवा त्याही आधीपासून सगळ्या गावातील पुरूषांच्या वेळीअवेळीच्या गरजा भागवायला मोकळी ठेवलेली असे. यालाच देवाला सोडणं असे म्हणत.
**************************************************************
१४. एक कलिग तिची व्यथा सांगत असते. सेक्स च्या बाबतीत माझा विचार कधीच हो नसतो. नवर्याला पाहिजे तेव्हा त्याने उचलायचं आणि बेडवर पटकायचं. माझा भयंकर संताप होत असतो. पण काही करू शकत नाही. हे ऐकताना मला सुद्धा भयंकर चीड येते.
************************************************************
खर्या अर्थाने स्त्रीत्त्वाचा सन्मान करायचा असल्यास आपल्याकडे अजुनतरी खर्या अर्थाने स्त्रीमुक्ती वगैरे येणं याला काही शतकं लागतील. आपल्याकडे अजुनही नोकरी करणार्या स्त्रीला बाळंतपणाची सुट्टी तीन महिने मिळते. तीन महिन्यांत काय काय होतं? जर एखादीला बेड-रेस्ट सांगीतली तर तिने नोकरी सोडून द्यायची का? नोकरी सोडून देणं भविष्याच्या दृष्टीने परवडणारं नाही म्हणून मग तिने आई बनण्याचं स्वप्न बाळगायचंच नाही. एकप्रकारे हा सुद्धा स्त्रीचं स्त्रीत्त्व नाकारण्याचा प्रकार आहे. स्वीडन, नॉर्वे यासारख्या देशांत, त्या देशात जन्माला येणारं प्रत्येक मूल, मग ते कोणत्याही रेसचं, नॅशनॅलीटीचं असो, एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेलं असतं. त्यामुळे नोकरी करणार्या आईला त्यागोष्टीसाठी दोन वर्षं पेड लिव्ह देण्याची सोय आहे. नवर्याने त्यातील कमीत कमी सहा महिने पेरेंटल लिव्ह घेणं अनिवार्य आहे. सरकार तर्फे नोकरी करणार्या आई-वडिलांच्या मुलांसाठी पाळणाघरही चालवलं जातं. हे एका अर्थाने स्त्रीचं स्त्रीत्त्व जपणंच आहे. त्याचा आदर करणं आहे. आजकाल स्त्रीमुक्ती ही कन्सेप्ट जबाबदारी टाळण्यासाठी वापरली जाते. म्हणजे स्त्रीचं शरीर हवं असेल तेव्हा तिच्यातलं स्त्रीत्त्व छान आहे. पण त्यातून मूल नको असतं, कारण जबाबदारी नको असते. मग त्यावेळी सोयीस्कररित्या तिचं स्त्रीत्त्व नाकारलं जातं तिचा मूल जन्माला घालायचा जन्मसिद्ध अधिकार डावलून.
**************************************************************
असे किंवा यापेक्षा वेगळे अनेक प्रसंग सांगता येतील. या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन आहे आणि ते म्हणजे स्त्रीचं स्त्रीत्त्व! या प्रसंगांवरूनच लक्षात येतं की स्त्रीचं स्त्रीत्त्व समाजाने, कुटुंबाने आणि स्वत: स्त्री ने स्विकारलेलं आहे की नाही. मला असं वाटतं की एखाद्या समाजात स्त्रीमुक्ती चळवळ यशस्वी झाली की नाही याचं मोजमाप त्या समाजात स्त्रीच्या स्त्रीत्त्वाला किती किंमत आहे यावर ठरवता येईल. स्त्रीत्त्व नाकारलं गेल्याचीच अधिकाधिक उदाहरणं या प्रसंगांतून समोर येत आहेत. स्त्रीच्या स्त्रीत्त्वाचा आदर करणे म्हणजेच स्त्रीमुक्ती....आणि पुरूषाच्या पुरूषत्त्वाचा आदर म्हणजे पुरूष मुक्ती. या दोन्ही मुक्ती एकमेकांच्या सहकार्या शिवाय होणारच नाहीत. स्त्रीत्त्वाच्या वेणा समजल्याशिवाय हे होणार नाही.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteलेख उत्तम झाला आहे आणि रेखाटलेली चित्रे अतिशय जिवंत (आणि त्यामुळे मन विषण्ण करणारी ) झाली आहेत. पण पुढील मजकुराचे प्रयोजन समजू शकले नाही: " स्त्रिया शिकू लागल्या, त्यांना पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली, कायदेशीररित्या पुरूषांच्या बरोबरीचे हक्क मिळाले म्हणजे स्त्रीमुक्त झाली का? मुळात काही जणांना प्रश्न पडलेला असतो की स्त्री ही खरंच बंधनात आहे का? काही जणं म्हणतील अति मुक्त आहेत म्हणून मोकाट सुटलेल्या आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी त्यांच्या एका व्याख्यानात म्हंटल्याचं स्मरतंय की स्त्री आणि पुरूष हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं आहेत. एक चाक निखळलं तरी गाडा पुढे चालणार नाही. त्यामुळे एकटी स्त्री मुक्त होऊ शकत नाही तसेच एकटा पुरूषही मुक्त होऊ शकत नाही." हे सर्व "बाष्कळ"या सदरात मोडते.ज्या वाचकांना या पातळीवरून आपल्याला स्त्री मुक्तीचे सहानुभूतीदार बनण्यापर्यंत न्यायचे आहे, त्यांचे खरच हृदय परिवर्तन होऊ शकते का? आणि त्यांची आपल्याला खरच गरज आहे का?
ReplyDeleteलेख एकांगी वाटायला नको म्हणून. स्पष्टीकरण म्हणून नाही तर एक उल्लेख म्हणून लिहीलाय तो मजकूर. ज्यांना उत्तरं शोधायची त्यांनी ती शोधावीत. कालच एक कार्टून पाहण्यात आलं. चित्रं असं होतं की एका घराच्या अंगणात खाटेवर नवरा तंगड्या वर करून झोपलाय आणि जवळच त्याची बायको डोक्यावर दोन पाण्याचे हंडे, कमरेवर एक तान्हं मूल आणि दुसर्या मोकळ्या हाताशी एक तीन वर्षांचं मूल. वरच्या बाजूने जाणार्या मोटारीतील माणूस बाईचं वर्णन असं करतो, "शी इज हाऊस वाईफ, शी डझ नथींग". फार बोलकं चित्रं होतं ते. हेच वर्षानुवर्षं चालू आहे. आता तर दुहेरी धार आलेली आहे. करीअर + घर!
ReplyDeleteकाही बोलायला सुचत नाहीय...
ReplyDeleteनिरीक्षणे व टिपणे मनात अस्वस्थता निर्माण करतात.
ReplyDeleteहे असे कितीतरी आयुष्यांचे तुकडे .. 'तुकडे' या अर्थी की क्षणभर ते समोर येऊन जातात .. किती दिसले आणि किती पडद्याआड आहेत याच गणित मांडल तर? ..पण ते नाहीच मांडता येणार पूर्णपणे .. आणि समजा ते मांडलंच चुकून कुणी .. तर पेलणार थोडंच आहे आपल्याला ते?
ReplyDeleteसविता, काहीवेळा एकाच आयुष्यात हे अनेक तुकडे असू शकतात फक्त आपल्याला दिसत नसतात. आपण जरी प्रत्येक तुकड्यासाठी काही करू शकलो नाही तरी जर प्रत्येकाने बदल करायचाच असं ठरवलं तर ते अशक्यही नाहीये. सुरूवात स्वत:च्या घरापासून करायला पाहिजे. मग आपल्या जवळच्या संपर्कातील लोक वगैरे. असं ते वर्तुळ वाढलं पाहीजे असं मला वाटतं. मागे काही वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून त्या मुलीने नकर दिल्यावर त्या मुलीवर खुनी हल्ला करणे, स्वत:ला आणि त्या मुलीला जीवे मारणे असले प्रकार वढले होते. रिंकू पाटील प्रकरण आणि दुसरं फर्ग्युसन महाविद्यालयात झालेलं. त्यावेळी एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने मला विद्या बाळ यांचं भाषण ऐकण्याचा योग आला. त्या भाषणात त्यांनी स्वच्छ उल्लेख केला होता की असले प्रकार वाढण्या मागचं कारण म्हणजे आपण आपल्या मुलांना नकार काय असतो आणि तो सुद्धा घ्यायचा असतो हेच शिकवत नाही. फार महत्त्वाचं सांगीतलं त्यांनी. आपणच आपल्या घरातल्यांपासून सुरूवात केली पाहिजे स्त्रीच्या स्त्रीत्त्वाचा आदर करायला शिकवलं पाहीजे. मगच काही होऊ शकेल.
ReplyDeleteOMG - वाचल्यानंतर सगळ्याच गोष्टींची लाज वाटते आहे...
ReplyDeleteजरी स्वतहापासून आपण सगळ्या बदलांना सुरूवात केली तरी एकूणच जगातील चित्र केव्हा बदलणार आणि बदलणार तरी आहे का ?
शिवानंद, ज्याला खरच बदल हवा असतो तो सगळं जग कधी बदलेल असा विचार करत बसत नाही. आपल्या घरात किंवा घराच्या आसपास कचरा असेल तर आपण मी घरातला कचरा काढला तर सगळ्या जगातला कचरा कधी जाईलतसेच परीसर असा विचार न करता तडक झाडू घेतो आणि घर तसेच घराभोवतालचा परीसर झाडून स्वच्छ करतो. तसंच कोणत्याही बदलचं आहे. तो घडवून आणण्यासाठी स्वत: पासून सुरूवात करणे हेच उत्तम.
ReplyDeleteस्त्री आणि पुरुष हे शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या वेगवेगळे आहेत...पुरुष शरीराने तर स्त्री मनाने बळकट आहे(हे सापेक्ष आहे)...मला तरी असं वाटतं की दोघेही अपूर्ण आहेत..एकमेकांशिवाय..त्यामुळे मुक्ति वगैरेची भाषा अजिबात पटत नाही मला.
ReplyDeleteस्त्री पुरुषापेक्षा शरीराने दुबळी असल्यामुळे साहजिकच दोघांच्यात पुरुषाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आणि परंपरेने त्याच गोष्टीला खतपाणी मिळत गेलं...स्त्रीनेही पुरुषाला आपला स्वामीच मानलं....आता स्वामी म्हटला की त्याच्या गुणदोषांप्रमाणे तो स्वामीत्त्व हक्क गाजवतो...कुठे हुकूमशहा तर कुठे सर्वसमावेशक असा तो वागत असतो.
निसर्गाने अजून एक गोष्ट केलेय...नैसर्गिकपणे पुरुषाची शारिरीक भूक जास्त ठेवलेय त्याच वेळी स्त्रीमध्ये जबरदस्त आकर्षणशक्ति त्याने निर्माण केलेय....मात्र हीच आकर्षणशक्ति तिला शाप म्हणून ठरलेली आहे...
ह्या सगळ्यावर माणसाने आत्मनियंत्रण,अध्यात्माच्या नावाखाली पापभिरूपणा आणि अशा अनेक गोष्टींचा वापर करून पुरुषापासून स्त्रीला संरक्षण मिळेल,तिचा सन्मान राखला जाईल असा प्रयत्न केला...त्याला काही मर्यादेपर्यंत यशही आलं...तरीही नैसर्गिक भावना केव्हा आणि कशा उचंबळून येऊन घडू नये ते घडेल...हे सांगता येत नाही.
स्त्रीवर होणारे शारिरीक आणि मानसिक अत्त्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत ही खरंच गंभीर बाब आहे..पण त्यावर एकच असा ठोस उपाय दूर्दैवाने अजून तरी सापडलेला नाहीये...स्त्रियांनी दुसर्यांवर अवलंबून न राहता स्वसंरक्षण करण्यास सिद्ध व्हायला पाहिजे असे ढोबळमानाने म्हणता येईल पण हे सगळ्यांनाच शक्य होणार नाही ही देखिल वस्तुस्थिती आहे...त्यामुळे नाईलाजास्तव हेच म्हणावे लागतंय की समस्या सूटणे कठीणच आहे...
संरक्षणासाठी पुरुषांवर अवलंबून राहणे..मग तो बाप,भाऊ,मुलगा,काका,मामा इत्यादि कुणीही असो...कारण पुरुष हा शेवटी पुरुषच असतो आणि स्त्री ही स्त्रीच असते....त्यांच्यात असली बनवलेली नाती विसरून जाऊन केव्हा मूळातले नर-मादीचे नाते निर्माण होईल हे सांगणे खूपच कठीण आहे.
वैद्यकिय दृष्ट्या सुद्धा स्त्रीचं शरीर हे अधिक चिवट आणि आतून बळकट असतं म्हणूनच निसर्गाने स्त्रीला प्रजनन क्षमता दिलेली आहे. कोणताही गायनॅकॉलॉजीस्ट हेच सांगेल. म्हणूनच गर्भारपणात किंवा बाळंतपणात काही धोका निर्माण झाला तर मुलगी वाचण्याचं प्रमाण हे मुलगा वाचण्याच्या तुलनेत जास्त आहे. तसं ठरवलं तर स्त्रिया सर्व गोष्टी करू शकतात. पण पुरूषांचा मूळ स्वभाव पाहता ते काहीच न करता आराम करतील. म्हणून मग हळूहळू समाजात पुरूषाने पैसे कमावून आणणे आणि स्त्रीने घरातील स्वयंपाक-पाणी आणि मुलांचं संगोपन अशी जबाबदार्यांची विभागणी झाली. पण आपल्या पुरूषप्रधान संस्कृतीमधे त्याचंही भांडवल केलं गेलं. पुरूष कमावतो म्हणून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. मग पुरूष बाहेर जाऊन मेहनत करतो स्त्री घरातच असणार आणि घरात बसून स्त्री काहीच मेहनत करत नाही (??) त्यामुळे मग पुरूषाला अधिक व्यवस्थीत आहार देणे, त्याची अधिक काळजी घेणे सुरू झाले आणि स्त्रीकडे दुर्लक्ष. त्यामुळे स्त्रीकडे दुबळी असं पाहण्याचा दृष्टिकोन रूढ झाला.
ReplyDeleteया सगळ्या घोळातून हे स्त्रीवर अत्याचार वाढलेले आहेत. आपल्याकडे पूर्वी अधिकाधिक लोक स्त्रीची देवी म्हणून पूजा करायचे तर काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक तिला भोग्य वस्तू म्हणून पहायचे. आता राक्षसी प्रवृत्ती वाढलेली आहे. त्यामुळे स्त्रीला एक भोग्य वस्तूच मानतात. आजचा जर सत्यमेव जयते हा कार्यक्रम बघीतला असेल तर सत्य काय आहे ते समजलं असेल. ह्या फक्त बाहेर आलेल्या गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रकाशातच येत नाहीत. त्या तुलनेत स्त्रीयांनी पुरूषांचे शोषण ही क्वचितच आढळून येणारी बाब आहे.
नर-मादी असा विचार अधिकाधिक पुरूषच करू शकतात कारण त्यांचीच शारीरिक भूक जास्त असते आणि अधिक काळ रहाते. म्हणूनच पूर्वी स्वत:च्या नातीच्या वयाच्या मुलींशी सुद्धा लग्न कायचे. असो. मुद्दा हा आहे की जर स्त्रीच्या स्त्रीत्त्वाचा आदर केला तरच पुरूषाचे पुरूषत्त्व टिकेल, त्याचा आदर होईल.
दुर्दैवाने खूप खरंय सगळं..!
ReplyDelete