Wednesday, 23 March 2011

कथा!!


नेहमीप्रमाणे ससा आणि कासवाची शर्यत चालू होते. नेहमीप्रमाणेच ससा टिवल्या-बावल्या करत शर्यतीत पुढे पुढे पळत राहतो. वाटेत अनेक प्रलोभनांना बळी पडून मजा करत राहतो. कासव नेहमीप्रमाणेच हळूहळू पण स्थिर गतीने चालत पुढे पुढे सरकतं. वाटेत आलेल्या प्रलोभनांकडे जराही लक्ष न देता कासव शर्यतीच्या शेवटाकडे चालतच राहतं. या गोष्टीत ससा झोपत नाही पण मजा करत असतो. आणि शेवटी शर्यतीचा शेवटचा टप्पा दिसू लागताच, हळूहळू चालणार्‍या कासवाच्या डोक्यावर बसून शर्यत कासवाच्या आधीच पूर्ण करतो. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या सई परांजपे दिगदर्शित "कथा" या चित्रपटाची ही सुरूवत. पूर्ण सिनेमा हा दोन मित्रांच्या गोष्टीवर आधारित आहे. गोष्ट घडते ती मुंबईतील एका सामान्य चाळीत. सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही उत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट असा याचा लओकीक नक्कीच आहे. सई परांजप्यांचं ससा-कासवाच्या कथेच्या रूपानं संपूर्ण चित्रपटाची कथा सुरूवातीलाच दाखवणं धोक्याचं असलं तरी खूप छान झालंय. म्हणजे त्यांनी या रूपकात्मक कथेचा अगदी पुरेपुर वापर करून घेतला आहे. राजाराम आपटे अतिशय सालस आणि सज्जन मुलगा असतो. ज्या दिवशी त्याला ऑफीसमध्ये कायम केलं जातं त्याच दिवशी त्याचा कॉलेज मधला वासू नावाचा एक मित्र त्याच्याकडे रहायला येतो. मग सुरू होते मुंबईतल्या चाळीतील धमाल. राजारामच्या शेजारीच एक संध्या सबनीस नावाची सुंदर मुलगी रहात असते की जिच्यावर राजारामचं खूप प्रेम असतं. पण ते प्रेम एकतर्फीच असतं कारण संध्याला राजाराम गरज लागली की हवा असतो पण लग्नासाठी तिला तो आवडत नाही करण त्याचं शामळू व्यक्तीमत्त्व. राजारामचा मित्र वासू आल्यापासून सगळ्यांवर छाप पाडतो. त्याच्या बोलघेवडेपणाचा तसेच इतरांची खोटी स्तुती करतानाच संध्या देखिल त्याच्यामध्ये गुंतत जाते. आता वासू संध्यात खरंच गुंततो की आणखी काही यासाठी "कथा" हा चित्रपट जरूर बघा. यु-ट्युब वर त्याच्या लिंक्स आहेत.
सई परांजप्यांनी यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की सध्याच्या कलियुगात चांगल्या आणि सचोटीने वागणार्‍या लोकांना कधीच जिंकता येत नाही पण हेच जर तुमच्या कडे बोलघेवडेपणा असेल, इतरांना फसवण्याचं काळीज असेल तर तुम्ही यशस्वी होतात. या चित्रपटाद्वारे ८० च्या दशकातील चाळवाल्या मुंबईचं दर्शन घडतं. त्यात सई परांजपे यांनी अगदी एका डबेवाल्याला सुद्धा घेतलं आहे. सकाळी थोडाच वेळ येणारे पाणी आणि पहाटे पहाटे दुधाच्या बाटलीतून दूधकेंद्रावरून दूध आणणे सगळं सगळं दाखवलंय. सिनेमा दिग्दर्शित करण्याची सई परांजपे यांचं कौशल्य अफलातूनच आहे. सई परांजपे यांचा या चित्रपटामागील हेतू जरी वरील ससा कासवाची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा असला तरी मला वाटतं की यातून अनेक इतर बोध घेता येतील. माणसाने चांगलं असावं पण आपल्या चांगूलपणाचा कुणाला गैरफायदा घेऊ न देणे हे सुद्धा अत्यावश्यक आहे. यशस्वि होण्यासाठी अ‍ॅसर्टीव्ह असायला लागतं. त्यासाठी आपला चांगला स्वभाव बदलण्याची गरज नाही. नविन पीढीतील मुलांना हा चित्रपट माहीती असणं जरा अवघडच. पण एक जरूर पहावा असा चित्रपट. सुरूवातीलाच "कथा" ची यु-ट्युब ची भाग-१ ची लिंक दिली आहे. तिथुनच पुढे इतरही भाग सापडतील.

1 comment:

  1. छान परिक्षण. चित्रपट पाहिला आहे. ८० च्या दशकातली मराठमो्ळ्या चाळसंस्कृतीचे दर्शन, फारुक शेख , नसीर आणी दिप्ती नवलचा सहजसुंदर अभिनय अप्रतिमच.
    धन्यवाद!

    ReplyDelete