Wednesday 13 October 2010

**रेशीमगाठी**


रेशीमगाठी, म्हंटलं तरी करकचून आवळता येत नाहीत आणि जर खरेच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी सुटत नाहीत. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या परिचयातून, प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा अगदी व्यवस्थित कांदेपोहे खाऊन बांधलेल्या असोत.... आपल्या भारतीय संस्कृती मध्ये या रेशीमगाठी बर्‍याच वेळा इतक्या करकचून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि पर्यायाने त्या पूर्ण कुटुंबाचा बळी दिला-घेतला जातो. लग्नबंधनात अडकलेली अनेक जोडपी असंही म्हणताना आढळतात की लग्नाआधीच बरं होतं, लग्नं करून पस्तावलोय/पस्तावलेय इ.इ. जेव्हा एकत्र रहाणं अशक्यच होतं तेव्हा काहीजण कायद्याचा आधार घेवून वेगळे होतातही.....पण असं करून (खरं पाह्यला गेलं तर) त्यांचे प्रश्न कितपत सुटलेले असतात किंवा वाढलेले असतात हे त्यांच त्यांनाच ठावुक. लग्न न केलेले किंवा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमातून फारसं यश न लाभलेले, स्वत:चं स्वत:च न जमवता आलेले अनेक जण आजूबाजूला दिसतात. काही जणांची गाडी ही नको-ती/ हा नको तो असं करत करत लग्न करण्याच्या/जमवण्याच्या वयाच्या स्टेशन वरून कधीच सुटलेली असते. कारणं काहीही असोत हे सगळं आपल्याला आपल्या समाजात पहावयास मिळतं. वधुवर-सूचक मंडळांच्या नोंदवह्या आणि  मॅटर्निटी नर्सिंग होम्स मधील नोंदी (खर्‍या दाखवल्या तर) ह्या तर समाजाच्या खर्‍या प्रगतीचा आरसाच असतो. कारण संपूर्ण समाज जीवन वैयक्तिक जीवनाशी सांगड घालत तिथेच गुरफटलेलं असतं. वधू-वर सूचक मंडळांमधील नोंदवल्या गेलेल्या उपवर वधु-वरांसाठीच्या (अवाजवी) अपेक्षा असोत किंवा गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या असोत हे सगळंच एकमेकांत बांधलं गेलं आहे. कितीही वैयक्तिक असा म्हटला तरी अतिशय सामाजिक आणि तितकाच ज्वलंत विषय. 
आपल्या सगळ्यांनाच उपवर अशा वधू आणि वर या दोघांच्या आणि त्यांच्या  आई-वडीलांच्या वाजवी-अवाजवी अपेक्षा माहिती आहेत त्यामुळे त्या इथे लिहीणे हा या लेखाचा हेतू अजिबात नाही. खरंतर अशा पद्धतीच्या अपेक्षा, त्यानंतर येणारा फोलपणा, लग्न करायच्या आधी त्या उपवर मुला-मुलींची लग्न म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात किंबहुना ते का करायचं? किंवा करायचंच की नाही? ह्या सगळ्या बाबतीत पुरेसा विचार झालेला असतो का? हा एक मोठा प्रश्न आहे. काही जणांना लग्न म्हणजे उत्तमोत्तम दाग-दागिने, कपडे घालून विविध प्रकारच्या केशरचना करून स्टेजवर मिरवणे असंच वाटत असतं. उपवर मुला-मुलींच्या पालकांना त्यांच्या स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातून मिळालेला बहुमूल्य शहाणपणा (??) आपल्या मुला-मुलींबरोबर वाटून घ्यावा, त्यांच्याशी याबाबतीत अतिशय मोकळेपणाने बोलावं असंच वाटत नाही. त्यामुळेच तर खरं ९९% प्रश्न निर्माण होतात/झालेले असतात. 
मागे काही वर्षांपूर्वी मला एका नेट-मित्राची इ-मेल आली होती. मला म्हणजे ती त्याने सगळ्यांनाच ग्रुपवर पाठवली होती. इ-मेलचं शीर्षक होतं अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड आणि तशीच काही अंशी कथाही जुळवली होती. पण मला यातली अ‍ॅलीस कोण आणि वंडरलॅन्ड काय हे लक्षात आल्याने त्याला प्रतिसादाची मेल  लिहिली......"आखूड शिंगी बहुदुधी अशी गाय मिळणं अवघडच. आपल्या प्राथमिकता आपणच ठरवायच्या (अगदी आई-वडीलांना थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी) त्या प्राथमिकतां प्रमाणे निर्णय आपला आपणच घ्यायचा. जेव्हा एखादा निर्णय आपणच घेतलेला असतो तेव्हा आपसूकच त्याची जबाबदारी आपणच उचलतो आणि जर आपण तेवढे समजुतदार असू तर घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून तो टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:हून अधिक प्रयत्न करतो. यातच आपण मोठं (ग्रो) होत असतो." मला ताबडतोब त्याचं उत्तर आलं, "माझ्या इतक्या सगळ्या संपर्कां मधुन, मित्र-मैत्रिणीं मधुन फक्त तूच माझी इ-मेल खर्‍याअर्थाने वाचलीस आणि समजून घेतलीस. मला उत्तर आवडलं". व्यक्ती विचारी असेल तर बर्‍याचवेळी हा सगळा विचार चालू असतो फक्त निर्णय घेण्यासाठी दोन शब्दांचं पाठबळ कुठलाही निर्णय न-सुचवता दिलेलं (हे महत्त्वाचं) लागतं. पण बहुतांशी उपवर मुलं-मुली या सगळ्याचा विचार करताना दिसत नाहीत. साहजिकच लग्न होवून आणि न होवून सुद्धा प्रश्न सुटत नाहीतच.
    पुण्यात साथ-साथ म्हणून परिचयोत्तर विवाह जुळवणारी एक संस्था आहे. वर संशोधनाची अपेक्षा कमी पण संस्थेविषयी कुतुहल अधिक म्हणून मी सुद्धा कधीतरी त्या संस्थेची पायरी चढले होते. मला तिथे दिला जाणारा एक फॉर्म बर्‍यापैकी भावला. म्हणजे त्याने वधु-वर शोधायला प्रत्यक्षपणे कितपत मदत होते ते माहीत नाही (कारण यात कितीही गणित आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नसतो., आवडी-निवडी जुळणे, विचार जुळणे याची मोजदाद करून हिशेब करून लग्न जुळवता येत असतं तर चहापोहे काय वाईट?) पण स्वत:चे विचार स्वत:लाच समजायला, ते पक्के व्ह्यायला मदत होते हे नक्की. मला तर वाटतं सगळ्या उपवर मुला-मुलींनी अगदी पूर्णपणे साथ-साथ स्टाईल मध्ये फॉर्म भरण्यापेक्षा एकदा स्वत:चा खुंटा बळकट करण्यासाठी स्वत:च एक स्वाध्याय करावा. त्यात पहिल्या टप्प्यात स्वत:च्या, इतरांच्या, आई-वडीलांच्या अपेक्षा लिहून काढाव्यात. (हा प्रयोग प्रामाणिकपणाने आणि स्वत:च एकट्याने करावा). मग त्यातील महत्त्वाच्या अशा दहा अपेक्षा शॉर्टलिस्ट कराव्यात. त्यांची पुन्हा एकमेकांशी तुलना करून पहावी म्हणजे एक असेल आणि एक नसेल तर काय वाटेल? इ. अशाप्रकारे तुलना केल्यावर त्या दहा अपेक्षा उतरत्या क्रमाने मांडाव्यात. त्यातील पहिल्या पाच अपेक्षा (म्हणजे याशिवाय चालूच शकणार नाही) पहाव्यात. त्यावर पुन्हा विचार करावा आणि मगच पुढे काय ते ठरवावं. मग अपेक्षां मध्ये अगदी काळ्या-गोर्‍या रंगा पासून ते घरची आर्थिक परिस्थिती, करीअर नोकरी ते बौद्धिक पातळी, सवयी, आवडी-निवडी (या सगळ्यां मध्ये केवळ नुसत्या अपेक्षाच ठेवून उपयोग नसतो तर स्वत: कडे सुद्धा तेवढ्याच चिकित्सेने आणि तटस्थपणे पहायला जमलं पाहीजे.......नाहीतर बर्‍याचवेळा अनेकजण नुसत्याच अपेक्षा करतात)याचा समावेश असावा.
    आता चष्मा नको ही एक महत्त्वाची (?) अट असते. मग एखाद्याला/एखादीला लग्नानंतर चष्मा लागला तर काय घटस्फोट घेणार? गंमतच आहे.  चोखोबांच्या "ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा" ह्या शिकवणुकीचा पार बोर्‍या वाजवत लोकांना कायम बाह्य रंगाने काळी मुलगी नको असते.......मग एखाद्या गोर्‍या मुलीचं अंतरंग कितीही काळं असलं तरी......पत्रिका बघणे आणि त्यातून मंगळ आहे म्हणून नकार तर कांदेपोह्यांपर्यंतचा प्रवासच दुर्धर करून टाकतो तर काही जण मुलगी पाहिल्यानंतर मंगळ आहे असे कारण पुढे करतात. अगदी दोन एकाच जाती मधल्या कुटुंबांत सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात म्हणून मुलगा/मुलगी विशिष्ट जातीतीलच पाहीजे यासाठी हट्ट धरण्यात मतलब आहे की नाही हे आपणच ठरवावे. आहार हा काही जणांना कळीचा मुद्दा वाटू शकतो कारण शाकाहारी व्यक्तींना मांसाहार अजिबात चालतच नसेल (म्हणजे समोर सुद्धा पहावत नसेल) तर अवघड होवून बसतं. खरंतर पत्रिका पहाणे, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शहरं [पुण्यासारख्या शहरात (अमुकच पेठेत किंवा भागात), मुंबईत अमुक एकाच लाईनवर (वेस्टर्न दादर वगैरे उत्तमच पण बोरीवली, अंधेरी वेस्ट, चांगलं, मालाड ठाणा डोंबिवली चालेल शिवडी, सायन, चुनाभट्टी नकोच. पनवेल खूपच लांब आहे], परदेशातील स्थळे यांसारख्या इतर अनेक उपविषयांची अपेक्षा या अंतर्गत चर्चा करायची असल्यास प्रत्येकी एक एक प्रकरण सहज लिहीता येईल.
१) कांदेपोहे पद्धतीत काहीच मुद्दे एखाद्या व्यक्तीचे दिसू शकतात. उदा. बाह्यगोष्टी, शिक्षण, नोकरी (खरी  माहिती दिल्यास), घरची पार्श्वभूमी (जुजबी........प्रत्यक्ष लग्न करून घरात गेल्याशिवाय कोणाचेच खरे स्वभाव कळत नाहीत)
२) प्रेमविवाहात सुद्धा प्रेमाने आंधळे झाल्यामुळे काही गोष्टी दिसत असून न-दिसल्या सारख्या होतात आणि मग लग्नानंतर डोळे उघडू शकतात.
३) परिचयोत्तर विवाहात यातील काही धोके कमी असतात. आपल्याला व्यक्तीशी बोलता येतं (व्यक्ती प्रामाणिक असेल तर अनेक गोष्टी बोलून ताडता येऊ शकतात), व्यक्तीच्या देहबोलीवरून डोळ्यांच्या हालचालीवरून व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही हे समजू शकते.
४) रंग, रूप, नोकरी, पैसा, स्टेट्स, पत्रिका, राहण्याचे विशिष्ट ठिकाण, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शिक्षण, सिनेमातील विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री सारखेच दिसणे, एखादा खेळ येणे, एखादी कला येणे, स्वयंपाक करता येणे, पैसे भरपूर कमवून आणावेत, अती शिकलेली आणि करिअरिस्टिक मुलगी नको, श्रीमंत आई-बापांची एकुलती एक असली तर चांगलं आहे, एकच भाऊ असेल तर आदर्श स्थळ नाही, एक बहीण चालेल पण जास्त बहिणीच आणि भाऊ नाही म्हणजे त्या मुलीची घोड चूक आहे (हे मुलींच्या बाबतीतले) तर मुलावर कोणाची जबाबदारी नको, स्वतंत्र फ्लॅट असल्यास प्राधान्य, स्वत:ची गाडी हवी, एकुलता एक मुलगा सोन्याहून पिवळं, एक बहीण उत्तम, एक भाऊ चालेल, जास्त भाऊ नकोतच (हे मुलांच्या बाबतीतले) यासगळ्या भाऊगर्दीत आरोग्य, स्वभाव, चारित्र्य ह्या गोष्टी हरवलेल्या असतात. आपण वरील गोष्टींचा विचार नक्की का करतो? लग्न हे कशासाठी करतात? म्हणजे आपल्याला सर्वार्थाने जोडीदार हवा असतो, त्याच्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं असतं. वरील मुद्दे हे विचार करण्यासारखे नक्कीच आहेत पण प्राधान्य क्रम नक्की कोणता असावा हे आपलं आपणच ठरवा. जो काही निर्णय घ्याल तो कुठल्याही फॅन्टसी मधे घेऊ नका. आयुष्याची सत्य खूप वेगळी असतात.
वरील अधिकाधिक मुद्द्यांमध्ये फारसा दम नसला तरी याच गोष्टीं मध्ये रेशीमगाठी अडकलेल्या असतात.  एक मात्रं खरं की जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे. त्यात एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम (केवळ शारीरिक आकर्षण नाही) हे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. त्यात दोघांनी मिळून सर्व जबाबदार्‍या पार पाडणे, घरातील कामं वाटून घेणे या गोष्टी ओघाने आल्याच. त्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते. ताणण्याने काहीच साध्य होत नसतं पण जोडून सामोपचाराने राहण्यातच खरी कसोटी आणि यश दडलेलं असतं हे महत्त्वाचं. दोघांनीही आपापल्या आणि एकमेकांच्या घरच्यांना समजून घेऊन (घरच्यांनी सुद्धा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं) दोन घरं खर्‍या अर्थाने जोडावीत. या सगळ्याचा अधिक विचार व्हावा असं मला वाटतं. उपवर मुला-मुलींनी अतिशय  वस्तुनिष्ठपणे  या सगळ्याचा विचार केला पाहीजे आणि आपल्या रेशीमगाठी करकचून न-बांधल्या जाता घट्ट आपोआप कशा होतील यावर भर दिला पाहीजे. स्वत:च्या प्राथमिकता स्वत:च ठरवून जबाबदारी घेण्यास शिकलं पाहीजे येवढंच मनापासून सुचवावंसं वाटतं.

22 comments:

  1. मी अजुन हया दिव्याच्या जवळपासही गेलेलो नाहीये...तेव्हा अनुभव घेतला कि बोलु.... :)

    ReplyDelete
    Replies
    1. दवबिंदू अजुनतरी या लेखाचा उपयोग केलास की नाही?

      Delete
  2. ब्लॉगच नवीन रुपड आवडल...

    ReplyDelete
  3. अरे दवबिंदु रेशीमगाठी जुळवणे हे आनंददायक जावे यासाठी यासगळ्याचा आधीपासूनच विचार करावा. म्हणजे आपल्या प्राथमिकता ठरवायला मदत होते. हा विचार तुमच्यासारख्यांनी करावा त्यावर स्वत:शी तरी संवाद करावा म्हणून तर हा लेख आहे. :-)
    ब्लॉगचं नवं रूपडं आवडल्या बद्धल धन्यवाद!

    ReplyDelete
  4. Wow. You write well. Had never read such an insightful article on this topic. Thanks.

    ReplyDelete
  5. 1. Mastach lekh aahe, geli kaahi varsh yaatil 'yaatana' sahan kelyaat. Mi tula swatantra emailch taakto yaavar. :) btw tu maaza famous mind-map paahila asashilach : ऍरेन्जड् मॅरेज :: स्थळं पहाताना पडलेले प्रश्न : http://thelife.in/?p=295

    2. Yaach dhartivar mi 'Live in relationship' var ek lekh lihila hoto, to esakal ne publish kelaa aahe.

    3. 'Vivahapashchat sahajeevan' haa mudda samajaat overlook kelaa jatoy.

    ReplyDelete
  6. अमोद, शतपावलीवर स्वागत. प्रतिसादा बद्धल धन्यवाद. खरंतर सगळ्याच अविवाहीत-विवाहीतांसाठी हा विषय ज्वलंत आणि उपयुक्त आहे. त्यावर चर्चा नक्की व्हायला हवी.

    सोमेश, प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद. तुझा मन (मनाचा नकाशा) चांगला आहे. मला गंमत वाटते की या वधू किंवा वर संशोधनाचा अनुभव असलेली जवळ जवळ ९०% मंडळी विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा, त्या व्यक्त करण्याची पद्धत यावर टीकाच करताना दिसतात. पण सुधारणा कुठेच दिसत नाही. :-)
    तुझ्या इ-सकाळ मधील त्या लेखाचा दुवा पण तुझ्या मोठ्या स्वतंत्र इ-मेल बरोबर पाठव. :-)

    ReplyDelete
  7. nice article Shantisudha ji!

    ReplyDelete
  8. लग्न जुळवताना काही गोष्टी जरूर तपासून घेणे गरजेचे आहे, तर काही गोष्टीना अती महत्व देवू नये, लेखामध्ये तुम्ही छान मुद्दे मांडलेत Keep writing....

    ReplyDelete
  9. Sadhya Vandana tai (saath saath-pune) hya Hyderabad la aaplya kade 5-6 divas rahayla aalya aahet. tyanna vachun dakhavin.

    Mast ch lihile aahe. Gr8 going ...keep it up.

    ReplyDelete
  10. शिवा, शतपावलीवर स्वागत. प्रतिक्रीयेबद्धल धन्यवाद.
    वंदनाताई मला ओळखतात. त्या माझ्या मावस मामी आहेत.

    ReplyDelete
  11. अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत.. जे माझ्या मते वडीलधारी मंडळी स्थळ जमवताना अजाणतेपणे का होईना पण टाळतात..

    ReplyDelete
    Replies
    1. मुक्त कलंदरा, प्रत्यक्षात तू केलास का उपयोग या लेखाचा?

      Delete
    2. ताई आता कुठे मला या लेखातील मुद्द्यांचा उपयोग करता येईल. बाकी रिझल्ट्स आले की कळवतोच..

      Delete
  12. ताई,
    नेहमीप्रमाणेच अत्यंत मुद्देसूद लिहिला आहेस लेख. आणि ह्या विषयावरचा अगदी बेसिक आणि महत्वाच्या प्रश्नांवर ऊहापोह करणारा इतका उत्तम लेख मी कधीच वाचला नसावा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रोफेटा! मग याचा उपयोग केलास की नाही?

      Delete
  13. प्रिय शान्तिसुधाजी, माफ करा परंतु आपल्या पूर्वपरवानगी शिवाय आपल्या " रेशीमगाठी " या लेखातील काही भाग pradeepmokal.blogspot.com ह्या ब्लॉग वर टाकत आहे... क्षमस्व :... परंतु लेख फारच आवडला , आणि सद्य स्थितीत काही ह्याच विषयाशी निगडीत प्रसंगांना सामोरे जावे लागले... असो... पण एका महत्वाच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  14. प्रमोदजी मोकल, प्रतिक्रीयेबद्धल आभार. एकच विनंती. आपण जर माझ्या लेखातील काही भाग जरी तुमच्या ब्लॉगवर टाकला असला तरी आपण स्वत: काहीच भाष्य त्याबाबतीत केलेलं नाही. त्यामुळे कृपया पूर्ण लेख अधोरेखित करून टाकावा. तसेच, माझ्या लेखाचा उल्लेख जरा मोठ्या फॉन्ट मध्ये करावा. कारण नविन वाचणार्‍याला असेच वाटेल की ते तुम्ही लिहीलेलं आहे. माझ्या ब्लॉगचा उल्लेख तळाशी करण्यास हरकत नाही फक्त मोठ्या अक्षरात असावा म्हणजे वाचणार्‍यांना ते दिसेल. माफ करा पण इतके स्पष्ट लिहीण्यामागे इतरही अनुभव गाठीशी आहेतच.

    ReplyDelete
  15. शांतीसुधाजी,

    सर्वप्रथम लेख ब्लॉगवर ठेवण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद...
    आपला लेख फारच सुंदर आहे... त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो काल्पनिक नसून वास्तविक आहे...
    कारण, हे घडत सगळीकडेच... अगदी सर्वांबरोबरच... आणि कळतही सगळ्यांना... फक्त वळत नाही...
    असो,

    आणि त्या small font बद्दल क्षमा करा....
    पुनच्छ: धन्यवाद...

    आपला,
    प्रदीप मोकळ

    ReplyDelete
  16. धन्यवाद... इतका सुंदर लेख लिहिल्याबद्दल....

    ReplyDelete
  17. फारच छान लेख! पण आपल्याकडे लोकांना मुलांचे संगोपन कसे करावे ह्याच्या बाबतीत आनंदी आनंद आहे. त्यामुळे मुलं/मुली किती समजूतदार असतात हा एक वेगळा प्रश्न आहे! एवढा प्रगल्भ विचार आपल्या लोकांत रुजला पाहिजे हे मात्र खरं!

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हेमंत, तू लेखातील मुद्दे विचारात घेऊन कोणताही निर्णय घेशील हे नक्की.

      Delete