Tuesday 31 July 2012

१ एप्रिल २००५ - (भाग १) एक एप्रिल फुल!

माझ्या आयुष्यातील हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. त्यावेळी मी केंब्रीज विद्यापीठात शिकत होते. थीसीसचे काम चालू होते. भारतात फिल्ड वर्कला जाण्यासाठी म्हणून दोन महिने आधीच १ एप्रिल २००५ चं हिथ्रो-मुंबई व्ह्याया अमान (जॉर्डनची राजधानी) असं साधारण ४०० पाऊंडाचं तिकीट (नॉन रीफंडेबल, नॉन कॅन्सलेबल, नॉन पोस्टपोनेबल) असं आधीच काढून ठेवलेलं होतं. सहापेक्षा जास्त महिन्यांनी एक महिन्यासाठी घरी जाणार असल्याने तसा उत्साह होता. आधीच फिल्डवर्कच्या डेट्स घेऊन ठेवलेल्या होत्या. डेटा कलेक्षन झालं की डेटा अ‍ॅनालीसीस करून थीसीस लिहून झाला की पदवी हातात. पण अडचणी न येता माझं आयुष्य सरळसोट असेल तर कसलं माझं आयुष्य? अपेक्षेप्रमाणे अडचणींची मालिका चालू झाली.
http://www.wolfson.cam.ac.uk/sites/default/files/imported/tour/newblock/v-block.jpg
तीन आठवडे आधी माझ्या सुपरवायझरने मी त्याला दुरूस्त करून दिलेला ड्राफ्ट न वाचता जुनाच वाचला आणि मला चक्क म्हणाला की तू आधी दिलेलं काम केलेलंच नाहीयेस. मग मी त्याला जेव्हा माझ्या इ-मेल मधील सेंट फोल्डर मधील ड्राफ्ट दाखवला तेव्हा त्याला स्वत:ची चूक समजली. पण हा माणूस ब्रिटीश. स्वत:ची चूक काही कबूल केली नाही. म्हणजे मला तोंडदेखलं सॉरी म्हणाला पण लगेच पाहू बरं असं म्हणून माझ्या इ-मेलचा ताबा त्याने घेतला. काय होतंय किंवा काय होऊ शकेल हे समजायच्या आतच ह्या माणसाने माझी ती इ-मेल डीलीट आणि एक्सपंज करून टाकली. म्हणजे थोडक्यात त्याने मी त्याला काम करून पाठवलेल्या ड्राफ्टचं प्रुफ नाहीसं केलं. आणि थंड डोक्याने मला म्हणाला जा आता मला पुन्हा तो ड्राफ्ट पाठव. मला भयंकर चीड आली होती. त्याने माझी ती टुटोरीअल चुकवली. केंब्रीज विद्यापीठात कामाचं भयंकर प्रेशर असतं त्यातून मोजक्याच ट्युटोरीयल्स मिळायच्या त्यात पुन्हा ह्या माणसाने हे असले रंग दाखवायला सुरूवात केली त्यामुळे माझ्या मनावर प्रचंड ताण आला. अशातच मी रूमवर आले. ज्यावेळी मनावर प्रेशर असतं त्यावेळी आपल्याला भयानक स्वप्नं पडतात. माझंही तेच झालं.

मी पुण्याला घरी पोहोचलेली होते आणि सगळ्यांबरोबर रात्री झोपलेली असताना मला अचानक जाग आली की माझा लॅपटॉप मी प्रवासाच्या ट्रान्झीट मधे कुठेतरी विसरले. मी एकदम किंचाळलेच आणि दचकुन जागी झाले. मी माझ्या केंब्रीज मधल्या रूममधेच हो्ते आणि माझ्या भारत प्रवासास साधारण १७-१८ दिवस हो्ते. अत्तापर्यंत केलेलं थीसीसचं काम लॅपटॉप मधे होतं आणि लॅपटॉप चोरीला जाणं म्हणजे अत्तापर्यंत केलेल्या कामावर पाणी फिरवण्यासारखं होतं. त्यावेळी मी लॅपटॉप नविनच वापरायला सुरूवात केली होती. त्यामुळे डेटा बॅक अप वगैरेपासून मी काही अंतर दूर होते. १५ दिवसात एक-एक करत माझी कामे पूर्ण करत आणली आणि आता एक महिन्यासाठी भारतात जायला मी तयार होते. तसं माझ्या ब्लॉक मेट्सना सांगूनही टाकलं. माझा एक जर्मन मित्र (ब्लॉकमेट आणि किचन-मेट) ख्रिश्चनने मला निघायच्या आदल्याच दिवशी साधारण रात्री आठच्या सुमारास म्हणाला की उद्या ह्यावेळी तू तुझ्या घरी असशील नं? त्याला फारशी भारतात जायला किती वेळ लागतो याची कल्पना नसावी. मग मी त्याला सांगीतलं की माझी फ्लाईट संध्याकाळी साडे-पाचची आहे. कदाचित उद्या ह्यावेळी मी अमान विमानतळावर असेन किंवा अमानच्या मार्गावर असेन.
http://www.arabiansupplychain.com/pictures/Gulf%20Air.jpg
माझाही तसा हा एकटीने पहिलाच इंटर्नॅशनल विमानप्रवास होता. कारण ऑक्टोबर मधे येताना आम्ही दिल्लीहून ३० सीसीटी स्कॉलर्स एकत्रआलो होतो. हिथ्रोवरही आम्हाला आमचे सिनीअर्स घ्यायला आले होते. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आलेला नव्हता. पंधरा दिवसांपूर्वीच्या त्या भयानक स्वप्नाने माझ्या मनात मात्रं ह्या प्रवासाबद्धल प्रचंड धाकधूक होती. कुठेतरी असं वाटत होतं की हा प्रवास टाळता आला तर बरं होईल. माझी रूम सोडावी असं वाटतच नव्हतं. ह्या अशा मन:स्थीतीच १ एप्रिल २००५ ची सकाळ उजाडली. सकाळी सकाळी सगळं आवरून मी तयार होते. हिथ्रोला जाणारी बस सकाळी १०.३० वाजता ड्रमर स्ट्रीट बस स्टेशन पासून सुटणार होती. माझा प्रवास अगदी नियोजनबद्ध असल्याने मी परतीचंही एक महिन्यानंतरचं तिकीट काढून ठेवलेलं होतं. तिथे अशी पद्धत असे की एकदा काढलेलं तिकीट पुढच्या बसला चालत नसे. माझं विमान हिथ्रोहून संध्याकाळी ५.३० ला होतं. त्यामुळे तीन तास आधी चेक-इन साठी पोहोचायचं होतं. केंब्रीज ते हिथ्रो साधारण तीन तास असं सगळं मोजून मी १०.३० च्या बसचं तिकीट काढलं होतं. सकाळी आठलाच पॅन्थर कॅबला फोन करून साडे नऊ वाजताची कॅब बुक केली. मी ज्यावेळी कॅब बुक करत होते  त्याचवेळी मला तिथे काहीतरी गडबड झाल्याची शंका आली. पण मी दुर्लक्ष केलं. तसं ड्रमर स्ट्रीट आमच्या कॉलेजपासून अगदी ५ मिनीटांच्या अंतरवर होतं. पण माझ्याकडे एक मोठी चेक-इन ची बॅग आणि एक केबीन लगेज, एक लॅपटॉप आणि माझी पर्स असं सामान होतं. म्हणून मी कॅबने प्रवास करायचं ठरवलं होतं. साडे नऊ झाले तरी कॅब आली नाही म्हणून मी कॅबला पुन्हा फोन लावला. पुन्हा गडबड चालूच होती. तीन वेळा माझा कॉल उचलूनही कोणीच बोललं नाही.
http://img-ipad.lisisoft.com/imgmic/2/0/2015-1-taxis-conventionnes.jpg
अशातच दहा वाजले मी पुन्हा फोन लावला. ह्यावेळी पलिकडून कोणीतरी बोललं. मी ९.३० च्या कॅब बद्धल विचारलं तर त्या व्यक्तीने सांगीतलं असं काही बुकींग झालेलं नाहीये. तोपर्यंत १०.१० झाले होते आणि माझं बीपी वाढायला सुरूवात झाली. मग मी पुन्हा कॅब बुक केली. आणि १०.३० ची बस असल्याने लवकरात लवकर कॅब पाठवण्यास सांगीतले. १०.२० झाले तरी एकाही कॅबचा पत्ता नाही. माझं टेन्शन अजुनच वाढत चाललं. केंब्रीज मधे कॅब बुक करूनच जावं लागतं. हात दाखवून थांबत नाहीत (आता मेरू कॅबची कशी सीस्टीम आहे तशीच सीस्टीम होती). इतकं सामान घेऊन १०.३० ची बस मी कशी गाठणार आणि ती बस चुकली तर पुढचा सगळा प्लॅन बारगळेल आणि विमान सुटेल असे सगळे विचित्र विचार मनात यायला सुरूवात झाली. तेवढ्यात १०.२५ वाजता एक पॅंन्थर कॅब आली. एक लेडी ड्रायव्हर होती. तिने पटापट माझ्या बॅग्स डीकीत टाकल्या, लॅपटॉप आणि पर्स सकट मी कॅब मधे बसले. तोपर्यंत १०.२७ झाले होते. कॅब चालू झाल्या झाल्या मी त्या ड्रायव्हरला मला ड्रमर स्ट्रीट्ला १०.३० ची हिथ्रोला जाणारी बस पकडायची आहे आणि पुढे भारतात जाण्यासाठी विमान पकडायचं आहे. तर जरा लवकर चालव असे सांगीतले. त्या ड्रायव्हरनेही गाडी अतीशय रॅश चालवत नेली आणि आम्ही १०.३५ ला ड्रमर स्ट्रीट्ला पोहोचलो. हिथ्रोची बस आणि ऑक्सफर्डची बस यांत बरीच जागा होती. म्हणून त्या ड्रायव्हरने गाडी त्या दोन बसच्या जागेत लावली.
http://farm6.staticflickr.com/5265/5575114362_edb7b4ef7f_n.jpg
माझ्या बसचा ड्रायव्हर लोकांचं सामान डीकीत ठेवत होता. त्यामुळे मी त्या कॅब ड्रायव्हरला म्हणाले मी १ मिनीटात त्या ड्रायव्हरला थांबायला सांगून येते. माझ्या एका खांद्यावर लॅपटॉप आणि दुसर्‍या खांद्यावर पर्स होती. त्या स्वप्नामुळे डोक्यात पक्कं होतं की लॅपटॉप खांद्यावरून उतरवायचा नाही. बरं त्या ड्रायव्हरला पैसे दिल्याशिवाय ती जाणार नाही ही खात्री आणि दोन्ही खांद्यावर सामान घेऊन पळणं अवघड म्हणून पर्स कॅब मधेच ठेवली. मी अगदी अर्ध्या मिनीटात त्या बसच्या ड्रायव्हरला सांगून आले की मी दोन मिनीटात सामान घेऊन येते. परत येते तोपर्यंत कॅब ड्रायव्हरने माझं डीकीतलं सगळं सामान रस्त्यावर काढून ठेवलं होतं आणि ती माझ्याकडून पैसे मिळण्यची वाट बघत होती. आमच्या कॉलेजपासून ड्रमर स्ट्रीट बस स्टेशनला जायला ५ पाऊंड पडायचे म्हणून मी ५ पाऊंडाची नोट माझ्या जीन्सच्या खिशात ठेवलेली होती. पैसे देण्याआधी मी कॅब मधे पाहीलं तर माझी पर्स जागेवर नव्हती. त्यामुळे मला वाटलं की इतर सामानाबरोबर ती पर्सही तिने काढून ठेवलेली असणार. मी तिला ५ पाऊंडाची नोट दिली आणि ती बाई जोरात बॅक ड्राईव्ह करत सुसाट वेगाने निघून गेली.

तिचा वेग इतका होता की बॅक ड्राईव्ह करताना तिने माझ्या दोन्ही बॅग्स धक्क्याने रस्त्यावर पाडल्या. बॅगा सावरत असताना माझ्या लक्षात आलं की आपली पर्स दिसत नाहीये. मग माझी खात्रीच पटली की त्या ड्रायव्हरने माझी पर्स मिसप्लेस केली होती. माझ्याकडील विमन प्रवासाचे रिटर्न तिकीट, बॅंकेची डेबीट-क्रेडीट कार्ड्स, पासपोर्ट-व्हीसा, लायब्ररीचे पुस्तक, सगळे फोन नंबर्स असलेली डायरी, कॉलेज-युनीव्हर्सीटी आणि लायब्ररी कार्ड्स, ५० पाऊंड रोख, २००० रूपये रोख इ. अतिमहत्त्वाच्या गोष्टी त्यात होत्या. बरं माझ्याकडे कंबरेला लावायचं पाऊच होतं की ज्यात मी तिकीट, पासपोर्ट ठेवलेला होता ते पाऊच बस मधे बसल्यावर कंबरेला लावू या होशोबाने पर्स मधे ठेवलेलं होतं. लायब्ररीचं पुस्तक मधे सहा तासांची ट्रान्झीट असल्याने वाचायला बरोबर ठेवलेलं होतं. तिथेच जवळ आमच्या सीसीटी च्या ग्रुप मधला एक मित्र रहात होता मी त्याचं घर गाठलं. तो आजारी असल्याने घरीच होता. नाहीतर त्यावेळी सगळ्यांचीच थीसीसची कामं आणि सबमीशन्स चालू होती. मी त्याला घडलेला प्रकार सांगीतला. तो म्हणाला एकदा कॉलेजमधे फोन करून विचार. तिथे फोन करूनही उपयोग झाला नाही. या सगळ्यात १० मिनीटे गेली. मग आम्ही पहिल्यांदा एचएस बी सी बॅंकेला फोन लावून माझी डेबीट आणि क्रेडीट कार्डस कॅन्सल केली. पॅन्थर कॅबच्या ऑफीसमधे फोन लावला तर त्यांनी हात झटकले. मग आम्ही आमच्या ग्रुपच्या मित्रांना मदतीसाठी बोलवायला फोन करायला सुरूवात केली. पण कुणाचा फोनवरून घडलेल्या घटनेवर विश्वासच बसेना. कारण अगदी २० मिनीटेच आधी आमच्या त्या मित्राने सगळ्यांना एप्रिल फुलची एक कॉमन इ-मेल केली होती.
http://www.ci.cambridge.mn.us/vertical/Sites/%7B5533C7E1-8680-4785-B452-36CB5E1255D8%7D/uploads/%7B659051E9-6DAF-480D-8B64-129DCEE08ED8%7D.JPG
तास झाला तरी कोणीच येण्याची चिन्हे दिसेनात म्हणून मग आम्ही दोघे ड्रमर स्ट्रीट पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवायला गेलो. तिथल्या पोलीसाने ताबडतोब नोंदीला सुरूवात केली. पर्स मधील सामानाची लिस्ट सांगत असताना माझा मोबाईल सुद्धा पर्समधेच असल्याचे लक्षात आले. मग मोबाईलवर त्या पोलीसाने फोन करून बघीतला. नुसतीच रींग वाजत राहीली आणि व्हॉईस मेसेज मधे कॉल गेला. पोलीसाने तिथे मेसेज ठेवला की हा मोबाईल ज्या पर्समधे आहे त्या पर्समधील महत्त्वाची कागदपत्रे ड्रमर स्ट्रीट पोलीस स्टेशनला आणून द्यावीत. त्याने मला हे ताबडतोब लंडन मधील इंडीयन एम्बसीला कळवावे असे सांगीतले. कारण त्याच्या मते माझा पासपोर्ट चोरणे हा एकमेव उद्देश यामागे असू शकतो. म्हणून चोरीला गेलेला पासपोर्टचा नंबर तिथे सांगीतला की मग ते एअरपोर्टला अ‍ॅलर्ट राहतील. माझ्या आशा थोड्या पल्लवीत झाल्या. पण ते काही फारकाळ टिकलं नाही. मी त्या पोलीसाला सांगीतलं की त्या लेडी कॅब ड्रायव्हरला मी ओळखू शकते. तुम्ही तिची चौकशी करा. तो पोलीस मला म्हणतो तुमच्याकडे काय प्रुफ आहे की ती पर्स तिनेच चोरली आहे. आता जर असं चोरीचं प्रुफ मिळणार असतं तर मी चोरी होऊ दिली असती का? असो. मी गप्प बसले.
http://www.cambridge2000.com/gallery/images/PC0729567e.jpg
आम्ही परत त्या मित्राच्या घरी आलो. त्याने त्याच्या ओळखीच्या एकांना फोन करून लंडन मधील इंडीयन एम्बसीच्या संदर्भात फोन करून विचारलं. त्यांनी सांगीतलं की शुक्रवारी दुपारी १.३० वाजता इंडीअन एम्बसी बंद होते. त्यामुळे जे काही करायचं आहे ते सोमवारीच करायला लागेल. त्याने तीन पर्याय सांगीतले. अ) नविन पासपोर्टला इथेच इमर्जन्सी मधे अ‍ॅप्लाय करणे आणि पासपोर्ट व्हीसा घेऊन मगच सगळं काम संपवून भारतात जावे. ब) कुठेही न जा्ता तसंच इथे रहाणं आणि सगळं काम संपल्यावर भारतात परत जावं. क) इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंटला अ‍ॅप्लाय करून आठ दिवसात ते मिळवून मग आठ दिवसांनी भारतात जावं. एकूण परीस्थीती पाहता मला तिसरा पर्याय अधिक योग्य वाटला. हे सगळं होई पर्यंत दुपारचे दीड वाजले. आमच्या स्टोरीत किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी आमच्या मित्रांपैकी एकजण आला. त्याला सुरूवातीला खरंच वाटेना. मग पुन्हा सगळं सांगीतल्यावर खरं वाटलं आणि त्यानेच इतर ३ जणांना फोन करून बोलावून घेतलं. मग आम्ही चौघे टॅक्सी करून पुन्हा एकदा पॅन्थरच्या मेन ऑफीसमधे गेलो. तिथेही त्यांनी उडवुन लावलं. माझ्याकडे पासपोर्ट आणि व्हिसा यांच्या झेरॉक्स कॉपीज नव्हत्या. दोन कॉपीज होत्या त्या पुण्याला होत्या. मग एचएसबीसी बॅंकेत सुरूवातीला खातं उघडताना व्हिसाची एक कॉपी दिली होती. बॅंकेकडून व्हिसाची कॉपी मिळाली. तोपर्यंत चार वाजले होते.

म्हटलं घरी फोन करून घडलेला प्रकार कळवावा तर लक्षात आलं की घरी कोणीच नाहीये कारण माझे वडिल गोव्याला गेले होते. मला या घटनेच्या धक्यामुळे फक्त घरचा लॅंन्डलाईन फोन नंबर आठवत होता. बाकी सगळं एकदम ब्लॅंक झाल्यासारखं झालं होतं. बहिणीचा घरचा नंबर देखिल आठवत नव्हता. बाबांचा मोबाईल नंबर आठवत नव्हता. शेवटी मी एक रायटींग पॅड घेऊन त्यावर रॅंडमली नंबर्स लिहायला सुरूवात केली. मग २०-३० नंबर्स लिहील्यावर माझ्या मोठ्या बहिणीच्या घरचा नंबर मला आठवला. मी लगेच तिकदे फोन लावला आणि घडलेली हकीकत सांगीतली. घरून पासपोर्टच्या झेरॉक्स स्कॅन करून पाठवायला सांगीतल्या. त्यांना वाटलं हे सगळं हिथ्रो विमानतळावर झालं त्यामुळे ते अजुनच गोंधळले. इकडे संध्याकाळ झाल्याने आणि बाकीच्यांनाही आपापली सबमीशन्स असल्याने मला त्यांनी सुखरूप कॉलेजमधे रूमवर सोडले आणि ते निघून गेले. रूमची चावी, सुटकेसच्या चाव्या मी माझ्या जीन्सच्या खिशात ठेवल्यामुळे वाचल्या. सुटकेस मधे चेकबुक्स ठेवल्याने ताबडतोब चेकने पैसे काढता आले. तरीही एकूण सगळं नुकसान बघता ६५० पाऊंडाचं नुकसान झालेलं. आणि ते एका लॅपटॉपच्या त्यावेळच्या किंमती इतकं होतं. म्हणजे १६ दिवसांपूर्वी मला घटनेची वॉर्नींग मिळाली होती. असो.
http://www.zen60163.zen.co.uk/CUTwCWebContent/Social/PubCrawls/ThePickerelInn.jpg
जेव्हा कठीण समय येतो त्यावेळेसच माणसांची खरी ओळख पटत असते. मी रूममधे एकटीच बसले होते. रस्त्यावर येणं म्हणजे काय असतं आणि हातात काहीच नसणं यात काय समाधान असतं हे दोनही मी त्या वेळी अनुभवलं. डोळे बंद केले तरी सगळी घटना एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी डोळ्यांसमोरून जात असे. फ्लाईट चुकल्याचं आणि फिल्डवर्कच्या डेट्स गेल्याचं वाईट वाटत होतं. तेवढ्यात माझ्या रूममधला दिवा चालू पाहून तो जर्मन मित्रं आणि त्याची गर्लफ्रेंड माझ्या रूमपाशी आले आणि त्यांनी बेल दाबली. मी दरवाजा उघडल्यावर मला पाहूनच त्याला लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलेलं दिसतंय. त्याला तशी शंका आधीच आली कारण आदल्याच दिवशी आमचं किचन मधे मी घरी जाणार असं बोलणं झालं होतं. तो एक्सपेरीमेंटल सायकॉलॉजी मधे पोस्ट डॉक करत होता. त्याने ताबडतोब मला रूम मधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या बरोबर पब मधे येण्याचं आमंत्रण दिलं. मी त्याआधी कधीच पब मधे गेले नसल्याने मी नको नको म्हणत होते. पण त्याने आग्रह धरला. त्याला माहीती होतं की मी दारू, बीअर काहीच पीत नाही. तो म्हणाला आम्ही बीअर पिऊ आणि तू पाणी पी. मी तयार झाले. पण बरोबर अजुन चौथी व्यक्ती कोण येणार हा प्रश्नच होता. तर त्याने माझ्या रूम समोरच्या रूममधे राहणार्‍या ऑस्ट्रेलीअन मुलाला तयार केलं. दोघांना बरोबर १५ मिनीटांनी क्लब रूम मधे भेटायला सांगीतले. त्या दिवशी पहिल्यांदाच आणि शेवटचं मी पब मधे गेले. माझं मन रमावं यासाठी त्या दिवशी माझ्या त्या जर्मन मित्राने मला पब मधे नेऊन इतर वेगवेगळ्या विषयांवर माझ्याशी गप्पा मारल्या. त्या घटनेच्या शॉकमधुन बाहेर काढण्यासाठी मला बोलतं केलं. तासाभाने मी देखिल रीलॅक्स झाले.

आता कसे होईल ही चिंता सोडून वस्तुनीष्ठपणे घडलेली परीस्थीती आपल्या हातात आणण्यासाठी आता काय करता येईल असा विचार मी करायला सुरूवात केली. मला बसलेला धक्का इतका जबरदस्त होता की त्यानंतर काहीकाळ मी टॅक्सी, रीक्षा यांमधून प्रवास करायला घाबरत होते. माझा एकटीने प्रवासाचा कॉन्फीडन्स गेल्यासारखं झालं होतं. यासगळ्यातून बाहेर यायला माझ्या मित्रमंडळींनी जी मदत केली मी ती कधीच विसरू शकत नाही. ही घटना घडली त्यावेळी शुक्रवार होता. माझ्या मित्रमंडळींमुळेच मी त्यातून पटकन सावरले नाहीतर अशावेळी लोक आत्महत्या वगैरे दिखिल करतात. मी दुसर्‍या दिवशी आमच्या कॉलेजमधे स्वदेश सिनेमा दाखवत होते तो पहायला गेले इतकी रेलॅक्स झाले. कारण एक गोष्ट पक्की लक्षात आली होती की टेन्शन घेऊन प्रश्न सुटत नाहीत तर अजुनच वाढतात. दुसरं म्हणजे कोणतीही अ‍ॅक्षन घेण्यासाठी सोमवारच उजाडणार होता......म्हणजे तोपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सद्य परिस्थीतीत शांत डोक्याने आहे त्या परीस्थीतीचा वस्तुनीष्ठ विचार करणे चालू केले. हा भाग खूपच लांबलचक झाल्याने पुढे ही परीस्थीती मी कशी हाताळली आणि त्यातून मी आयुष्यभराचे असे जे धडे घेतले ते पुढच्या भागात लिहीते. 

१ एप्रिल २००५:   (भाग २) शिकलेले धडे!!

Sunday 29 July 2012

मानवी मेंदू आणि शिक्षण!

http://madmikesamerica.com/2011/05/10-really-cool-things-about-the-human-brain/human-brain-map/
माणूस विविध माध्यमांतून शिकत असतो. जिभेच्या माध्यमातून चव, नाकाच्या माध्यमातून वास, त्वचेच्या स्पर्श, कानांच्या माध्यमातून ऐकणे आणि डोळ्यांच्या माध्यमातून पहाणे अशा पाचही इंद्रियांच्या माध्यमातून माणूस अर्भकावस्थेत असल्यापासून ज्ञान मिळवत असतो. हे ज्ञान साठवले जाण्याचे ठीकाण एकच आणि ते म्हणजे मेंदू. त्यामुळे आपल्या मेंदूचा, त्यातील विविध भागांचा, त्यात ज्या पद्धतीने माहीती साठवली जाते, त्या माहीतीवर प्रक्रिया करून त्याचे आपल्या दीर्घ स्मृतीत जतन कसे केले जाते हे शिक्षण देताना, शैक्षणिक अभ्यासक्रम ठरविताना लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. पूर्वी जेव्हा शिक्षणाचे औद्योगीकरण झालेले नव्हते तेव्हा काहीप्रमाणात माणसाच्या नैसर्गिक क्षमतांचा शिक्षण देण्यात विचार व्हायचा. पण जसे शिक्षण देणे हा शिक्षीत मानवी प्राणी तयार करण्याचा एक कारखानाच झाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विस्मृतीत गेल्या. त्यातूनही काही तावून सुलाखून बाहेर पडून चमकले पण अधिकाधिक जनतेचे नुकसानच झाले. त्यातच विशिष्ट विषयांचे व्यावसायिक महत्त्व, जीवघेणी स्पर्धा या सगळ्यामुळे जे काही थोडेफार विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक कलाशी जोडले गेलेले शिक्षणही संपुष्टात आले आणि उरला तो फक्त विशिष्ट साचा की ज्यातून घातल्यावर पदवीचा शिक्का मारला जाईल. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी एक मंत्र आहे:  "मूळात जाऊन त्या समस्येचा विचार करा". तोच काहीसा प्रयत्न मी इथे करणार आहे.  

आपल्या मेंदूत नेमके काय आणि कसे घडते हे समजणे वाटते  तितके सोपे नाही. मेंदूमधे घडत असलेल्या क्रियांच्या संदर्भात न्युरॉलॉजी असं सांगते की आपला मेंदू कोणतीही माहीती छोट्या छोट्या तुकड्यांत जोडून ती साठवत असतो. ते तुकडे पाच किंवा सात च्या गटात असतात. त्यालाच चंक असे म्हणतात. प्रत्येक तुकडा हा एखादी माहीती त्रिकूटाद्वारे साठवत असतो. एका त्रिकूटात कर्ता (सब्जेक्ट) क्रियापद (प्रेडीकेट) कर्म (ऑब्जेक्ट) असे बनलेले असते. जगातील कोणत्याही दोन गोष्टी आपण पाच ते सात त्रिकुटांत जोडू शकतो असा एक सिद्धांत आहे. या त्रिकूटात कर्ता, कर्म आणि क्रियापद याची जागा कोणतीही गोष्ट म्हणजेच चव, गंध, छायाचित्रं, आठवण इ. काहीही घेऊ शकते.

आता आपल्या मेंदूच्या स्मृतीचे दोन भाग असतात. अल्पकालिन आणि दीर्घकालिन. आपण कोणत्याही माध्यमातून जी माहीती आत्मसात करतो त्यातील काही माहीती छोट्या त्रिकूटांच्या गटांच्या माध्यमातून अल्पकालिन स्मृतीत जाते आणि काही माहीती गाळली जाते व लुप्त होते. अल्पकालिन स्मृतीमधे माहीती जाण्यास १० ते १०० मिली सेकंद इतका काळ लागतो. आधीच्या स्मृतीच्या आधारे (दीर्घकालिन) आपल्या मेंदूने जे काही नियम तयार केलेले असतात किंवा जी काही माहीती साठवलेली असते त्यानुसार या अल्पकालिन माहीतीतील स्मृतीची गाळणी होते. त्यातून काही माहीती गाळली जाते आणि उरलेली थोडी माहीती दीर्घकालिन स्मृतीत जाते. यासगळ्या प्रक्रियेला काही सेकंद म्हणजे १० सेकंदांपेक्षाही कमी काळ लागतो. दीर्घकालिन स्मृतीत जी माहीती जाते ती तीन भागात विभागलेली असते. एक म्हणजे अर्थपूर्ण स्मृती (सीमॅन्टीक मेमरी) की ज्यात विविध संकल्पना त्यांतील संबंधांसहित साठवलेल्या असतात. दुसरा भाग म्हणजे वैयक्तीक अनुभवांची स्मृती (एपीसोडीक मेमरी) आणि तिसरा भाग म्हणजे प्रक्रियात्मक स्मृती (प्रोसीजरल मेमरी). 

जेव्हा मूल पोटात असते तेव्हापासून त्याच्या मेंदूच्या पेशी कार्यरत होत असतात आणि येणारे अनुभव विविध प्रकारे दीर्घकालिन स्मृतीत साठवत असतात. यासाठीच विशिष्ट आठवड्यांचा गर्भ झाला की तो एक स्वतंत्र जीव आहे असे मानून त्यानंतर गर्भपात करणे हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य आहे. ज्या बाळांमधे मेंदूच्या पेशींना इजा झालेली असते त्या बाळांची प्रगती खुंटते. त्या बाळांच्या कोणत्या प्रगतीवर परिणाम होईल हे मेंदूतील कोणत्या पेशींना इजा झालेली आहे त्यावर अवलंबून असते.  महाभारतात म्हणूनच अभिमन्यू पोटात असतानाच त्याने चक्रव्युहात शिरायचे कसे हे आत्मसात केले पण बाहेर कसे पडायचे हे ऐकत असतानाच सुभद्रेला झोप लागली आणि अभिमन्यु गर्भात असल्याने त्याचे सर्व अनुभव हे आईच्या स्थितीवर अवलंबून होते.  म्हणून त्याला पुढचे काही ऐकता आले नाही.

माणूस हा अनुकरणप्रिय प्राणी आहे असेच म्हणतात. अनुकरणातून माणसं खूप काही शिकतात म्हणूनच निरीक्षण हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे की जे प्रत्येकाने आत्मसात करावे. हे कौशल्य कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडते. प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या शिकण्याच्या शैली (लर्नींग स्टाईल्स) असतात. मेंदूच्या विविध भागांशी या शैली जोडलेल्या असतात. सगळेच जण अमूर्त संकल्पना समजू शकत नाहीत. काही जणांची स्मृती ही छायाचित्रांची असते तर काही जणांची सांगितीक असते. आपापल्या क्षमतेनुसार प्रत्येकाचा मेंदू उपलब्ध माहीती साठवतो आणि त्यावर प्रक्रिया करतो, नियम तयार करतो. प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईल प्रमाणे हा प्रक्रिया करण्याचा कालावधी अवलंबून असतो. 

ज्या प्रकारची माहीती (माध्यमातून येणारी माहीती) समोर येते, त्या प्रकारच्या माहीती नुसार (माध्यमानुसार) जर शिकण्याची शैली असेल तर माहीती प्रक्रियेला लागणारा वेळ खूपच कमी असतो आणि ती माहीती लगेचच दीर्घकालिन स्मृतीत जाते. पण हेच जर माहीतीचे माध्यम आणि शिकण्याची शैली जुळत नसेल तर माहीती प्रक्रियेसाठी लागणारा वेळ जास्त असतो आणि यामधे अधिकाधिक माहीती लुप्त होते. अधिकाधिक लोकांना छायाचित्रांमधून किंवा चलचित्रांमधून मिळणारी माहीती लक्षात राहते. म्हणूनच एखादा धडा वाचून जितकी माहीती लक्षात रहात नाही त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त माहीती सिनेमाच्या माध्यमातून लक्षात राहते. कारण त्यात माहीती एकत्रितपणे ध्वनी, चित्र आणि चलचित्रे या माध्यमातून येत असते. या सगळ्या माहीतीला शास्त्रीय आधार आहे. यासाठीच सध्या शिक्षण देताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिलेला असतो. पण त्याचाही उपयोग नीट आणि माफक प्रमाणात करून घेतला नाही तर त्याचे वेगळेच दुष्परीणाम समोर येतात. 

आता संगणकीय स्मृतीची (मेमरीची) संकल्पना आणि आपली स्मृतीची संकल्पना सारखी आहे असे कितीही वाटत असले तरी तो एक आभास आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अनेक संकल्पना (मशीन लर्नींग, न्यूरल नेटवर्क) वापरूनही अजुनही मानवाला मानवी मेंदूच्या आत ज्या प्रक्रिया पूर्णपणे घडतात त्याचे प्रतिरूप बनवता आलेले नाही. गेल्याच महिन्यात गुगलने मानवी मेंदूचे प्रतिरूप बनवले आहे आणि ते मांजराच्या प्रतिमा गुगल सर्च इंजीनमधून शोधून काढू शकते अशी बातमी वाचण्यात आली होती. पण जेव्हा त्यासंदर्भात अधिक माहीती वाचली तेव्हा त्यात असेही नमूद केले होते की हा काही मानवी मेंदूचे प्रतिरूप नाही. त्यापासून अजुनही आपण लाखो मैल दूर आहोत. त्यामुळे संगणकाच्या स्मृतीत जशी माहीती भरून तिचा वापर करता येतो तशी माहीती मानवी मेंदूत भरता येत नाही. मानवी मेंदू म्हणजे संगणक नाही तर संगणकापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे माहीतीचा मारा आणि माहीतीची घोकंपट्टी हे आजीबात नाही. 

खरं तर शिक्षक हे शिकवत नसतातच तर विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सहाय्य करत असतात. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या फार छान केली आहे. "Education is the manifestation of the potential already existing within a person". प्लेटो च्या मते शिक्षणाची व्याख्या अशी आहे: "education is any process by which an individual gains knowledge or insight, or develops attitudes or skill". म्हणजे माणसाला नैसर्गिक क्षमता वापरून शिकण्यासाठी वातावरण उपलब्ध करून देणे, तसे वातावरण निर्माण करणे म्हणजे शिक्षण देणे. त्यासाठी आपली शिक्षणपद्धती नैसर्गिक असली पाहीजे. एकाच वयोगटातील विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा अभ्यासक्रम एका विशिष्ट पद्धतीनेच शिकला पाहिजे आणि त्यांचे मूल्यमापनही एकाच प्रकारे केलं पाहीजे असे म्हणणे आणि त्याप्रमाणे करणे म्हणजे शिक्षण अनैसर्गिक दृष्ट्या देणे. असं कारखान्यातील साचेबद्ध पद्धतीमुळे आपण फक्त साचेबद्ध शिक्षीत तयार करतो.  माणूस (कितीही हुशार अणि शिकलेला असला तरी) त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या फक्त १०% पेक्षाही कमी क्षमता वापरतो. आईनस्टाईन हा एकच असा मनुष्य होता की ज्याने आपल्या एकूण क्षमतेच्या १०% मेंदू वापरला होता. आपण आपल्या विद्यार्थ्यांना मेंदू नैसर्गिकरित्या वापरूच देत नाही. हीच खरी सध्याच्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका आहे.

Monday 23 July 2012

अपहरण


http://topnews.in/law/files/assam-map-ulfa.jpg
८ ऑगस्ट २०१० ला श्री विलास बर्डेकर यांचं मनोगत "त्या ८१ काळरात्री" हे लोकसत्ता मध्ये वाचलं आणि माझ्या चौदा वर्षांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा मिळाला. त्यावेळी मी आसाम मधील विवेकानंद केंद्राच्या गोलाघाट येथील शाळेत गणित या विषयाचे अध्यापन करत असे. गोलाघाट हे आसाम आणि नागालॅंडच्या हद्दीवरचं एक गाव. एकशिंगी गेंड्यांसाठी जगप्रसिद्ध असलेलं काझिरंगा अभयारण्य हे गोलाघाट पासून १० किमी अंतरावर. कार्बीऑंगलॉंग डीस्ट्रीक्ट मधील वनविभागही (की ज्यातून आसाम आणि नागालॅंडची सीमारेषा जाते) याच भागाच्या अगदी जवळ आहे. खरं तर सांस्कृतिक दृष्ट्या आसामचं गोलाघाट म्हणजे महाराष्ट्रातील पुणे. म्हणजे पुण्याला जसा क्रांतीकारक, सांस्कृतिक चळवळींमधे पुढाकार घेण्याचा इतिहास तशीच काहीशी गोलाघाटची पार्श्वभूमी. सध्याची उल्फा अतिरेकी संघटना हीचा जन्म गोलाघाट मधीलच. इंग्रजांच्या काळात (स्वातंत्र्यपूर्व काळात) आसाममधील अनुकूल हवामान पाहून इंग्रजांनी तिथे चहा-कॉफीचे मळे उभे केले. त्या मळ्यांवर आजूबाजूच्या राज्यांतील म्हणजे मुख्यत: बिहार मधील मजूर काम करत असत. आसाम मधे मुख्यत: जमीन अतिशय सूपिक. नुसत्या भाताच्या साळी टाकल्या तरी भाताची लागवड होऊन भात वाढत असे. भरपूर पाऊस असल्याने घराजवळच्याच खड्यात पावसाचे पाणी साठवून (आसाम मधे त्याला पुखरी म्हणतात) तेच पाणी भातशेती आणि इतर भाज्या वगैरेंसाठी वापरलं जात असे. मुख्य आहार भात आणि मासे कधीतरी असल्यास तोंडी लावायला पालेभाजी असा साधा आहार असल्याने आसाम मधील लोकांना फार कष्ट न करता आपल्या जीवनावश्यक गरजा पुरवली जाण्याची सवयच लागली. त्यामुळे त्यांच्यात एकप्रकारचा आळशीपणा ठासून भरलेला असे. हवामानही त्याला पूरक असेच होते.


http://static.ibnlive.com/pix/sitepix/06_2010/ulfa-talks.jpg
स्वातंत्र्य मिळाल्यावर आसाम मधील फार कमी लोकांनी चहाच्या मळ्यांचा ताबा घेतला कारण त्यात मेहनत खूप असे आणि ते खरदी करण्यासाठी गाठीशी पैसा असायला हवा. मारवाडी लोकांकडे पैसा असल्याने अदिकाधिक चहाचे मळे मारवाडी लोकांकडे गेले. मूलभूत आलशीपणामुळे आसाम मधील माणूस फारसा शिकलेला नसे. त्यामुळे आपसूकच पांढरपेशा नोकर्‍या (बॅंक, सरकारी कार्यालये) बंगाली बाबूंच्या ताब्यात गेल्या. मारवाडी समाज मूळातच व्यावसायिक असल्याने किराणा दुकाने आणि इतर व्यवसाय त्यांच्या हातात गेले. आसामी माणसाला कष्टाचा कंटाळा म्हणून कष्टाचे व्यवसाय बिहारी, ओडीसी, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि काहीप्रमाणात बांग्लादेशी घुसखोर यांच्या हातात गेले. त्यामुळे दिवसेंदिवस आसाम मधे मूळ आसामच्या विद्यार्थ्यांना रोजगार नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्या विरोधात आसाम स्टुडंट्स मुव्हमेंट ही गोलाघाट मधे चालू झाली आणि त्याचाच परिपाक म्हणजे उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) चा जन्म गोलाघाट मधे झाला. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बंद पुकार, सरकारी कार्यालयांवर हल्ले कर अशा कारवाया चालू झाल्या. कालांतराने आसाम मधील बंगाली, बिहारी आणि मारवाडी यांच्यावर प्राणघातक हल्ले सुरू झाले. सुरूवातीला विधायक कारणासाठी निर्माण झालेल्या संघटनेची अतिरेकी संघटना कधी बनली हे कोणालाच समजलं नाही. पुढे आसाम मधील सुशिक्षित समाजाला उल्फाचे खरे स्वरूप समजल्यावर त्यांना स्थानिक एलीट क्लास कडून मिळणारा सपोर्ट कमी झाला. त्यातील काही परदेशात शिक्षणाच्या निमित्ताने गेले आणि भूमिगत राहून उल्फाच्या कार्याला पाठींबा देऊ लागले. अजुनही आंतराष्ट्रीय पातळीवर उल्फाला सपोर्ट करणारा एलिट क्लास कार्यरत आहे आणि ते स्वत:ला भारतीय समजत नाहीत. असो.
http://images.jagran.com/rail-track-balst-b-19-04-20.jpg
स्थानिक एलिट क्लासचा सपोर्ट बंद झाल्याने उल्फाचं पित्त खवळलं आणि ते अधिकाधिक अतिरेकी कारवायांमधे गर्क झाले. मग आसामला भारतापासून तोडण्याचे सर्व प्रयत्न चालू झाले. त्याचाच भाग म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण लोकांना साजरे करू द्यायचे नाहीत. मग त्या दिवसांच्या आधीपासूनच गावागावांत बंदुकधारी लोकांनी भरलेल्या गाड्या फिरवून लोकांना धमक्या द्यायच्या की ध्वजवंदनाला बाहेर पडलात तर याद राखा. मग त्याच सुमारास एखाद-दुसर्‍या आडव्या येणार्‍या माणसाला गोळ्या घालायच्या म्हणजे दहशत लोकांमधे अधिक पसरेल. तरी शासकीय कार्यालयांत, शाळा-महाविद्यालयांत हे दिवस साजरे होत. ते थांबविण्यासाठी म्हणून मग त्यांनी त्या दोन दिवसांच्या आधी आणि नंतरचे दोन दिवस आसाम बंदच पुकारायचा. मग बंगाल आणि आसाम यांना जोडणार्‍या चिंचोळ्या पट्ट्यात रेल्वेचे रूळ उडवून देणे जेणेकरून पॅदेंजर ट्रेन्स किंवा मालवाहतूक ट्रेन्स घसरतील आणि लोकांमधे दहशत पसरेल. मग लोक आसाममधे प्रवास करणार नाहीत. आपसूकच आसाम मधील लोकांना उल्फा वाल्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. हळूहळू आर्मीच्या आणि बीएसएफच्या मदतीने शासनाने परिस्थीती नियंत्रणात आणली. आंतर्गत परिस्थीती सुधारण्याचं काम स्वयंसेवी संस्थांनी घेतलं आणि आजही ते अव्याहत चालू आहे. उल्फा मधेच आता अनेक गट पडले आहेत. त्यातील काही सरेंडर झालेत तर काही अजुनही एनएससीएन या दहशतवादी संघटनेच्या मदतीने कार्यरत आहेत.
http://i.ytimg.com/vi/nMKL0mCdtvQ/0.jpg
त्या दिवशी आमच्या मुख्याध्यापिका काही कामा निमित्त गुवाहाटीला गेल्या होत्या. दुसरी एक सहकारी दिब्रुगढला दुसर्‍या एका कामासाठी गेली होती. नेमकी मी शाळेत एकटीच होते. साधारणत: रात्री साडे आठच्या सुमारास मला शाळेत फोन आला. मी फोन उचलून बोलायला सुरूवात केली तर पलिकडून कुणीतरी घाबर्‍या-घुबर्‍या आवाजात विचारलं, "दिदि प्रिंसीपल दिदि है क्या?" मी म्हणाले, "नहीं, वो तो गुवाहाटी गयी है। परसों सुबह तक आजायेगी। क्यूं क्या हुआ?" फोन वरचा आवाज, "वो दिदि, आपके स्कूल का ऑंठवी में पढनेवाला सोहन कोलीता है ना उसको उल्फा वालोंने उठालिया।" मला धक्काच बसला आणि ताबडतोब विचारले, "ये सब कब और कैसे हुआ?". फोनवरची व्यक्ती घाईतच आणि घाबरलेल्या आवाजातच बोलत होती. तो म्हणाला, "दिदि, हर रोज शाम को सात बजे उसका घर में ट्युशन रहता है. वो अपने ट्युशन टिचर के साथ घर में बैठा था. करीब साढे सात और पौने आठ के बीच उसके घर के बाहर कुछ लोग आये और उन्होंने सोहन को आवाज दी. जब सोहन घर के बाहर आया तो उन लोगों ने उसको उठा लिया और जीप में बिठाके दीमापूर की तरफ चल दिये. उनके हाथोंमें गन थी इसलिये कोई कुछ नहीं कर पाया". हे ऐकून मला घाम फुटला. सोहन च्या वर्गाला म्हणजे आठवीला मी गणित शिकवत होते त्यामुळे मला तो मुलगा माहीती होता. आता पर्यंत फक्त इतरांच्या उल्फा कडून पळवुन नेल्याच्या बातम्या ऐकल्या होत्या. हे तर मला माहीती असलेल्या मुलाच्या बाबतीत घडलं होतं. सोहन एकदम शांत आणि निरूपद्रवी मुलगा. मला पटकन काय बोलावं ते सुचेचना मग मी त्याला म्हणाले, "मैं प्रिंसीपल दिदि को गुवाहाटी फोन करके बोलती हूं। जो कुछ भी होता है आप स्कूल में खबर करते रहना।"
http://images.jagran.com/policy_b_03-05-2012.jpg
आसाम मधे बोडो अतिरेक्यांनी आणि उल्फावाल्यांनी पुकारलेले आसाम बंद, त्यांनीच उडवुन दिलेले रेल्वे रूळ परिणामी ठप्प झालेली वाहतूक, अतिरेक्यांनी घडवून आणलेले बॉम्ब स्फोट इ. बातम्या नेहमीच्याच झालेल्या. उमेशने, शाळेच्या वॉचमनने, अनेक वेळा आम्हाला त्याच्या वायरलेस ट्रान्झीस्टरवर उल्फावाल्यांचे कॅच झालेले संदेश ऐकवले होते. काहीवेळा तर कुणाच्या अपहरणाची किंवा खंडणीची रक्कम ऐकायला मिळायची. हे सगळं आपल्यापासून दहा-हात दूर होतं तोपर्यंत ठीक आहे. पण आज हे लोण आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं होतं. दुसर्‍या दिवशी शाळेत सगळीकडे सोहनला उल्फाने पळवुन नेल्याचीच चर्चा होती. टीचर्स रूम मध्ये समजलं की त्याला शिकवायला संध्याकाळी सात ते आठ या वेळात कोणी शिक्षक येतात. ते असतानाच पावणे आठच्या सुमारास एक मारूती कार दारा समोर थांबली. त्यातून दोन बंदुकधारी उतरले. शिकवणी चालू असल्याने घराचा दरवाजा उघडाच होता. आत शिरून बंदुकीचा धाक दाखवुन त्या शिक्षकांच्या समोर त्याला उचलून घेवून गेले. रात्री अकराच्या सुमारास त्याच्या वडीलांना फोन करून सोहनच्या सोडवणुकीसाठी १ कोटीची रक्कम मागीतली गेली. आठवीच्या वर्गात गेल्यावर मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. वर्गातील मुलं बरीच घाबरलेली होती. मी त्यांना शांत करायचा प्रयत्न करून शिकवण्यापेक्षा गोष्ट सांगायला सुरूवात केली. पुढचा तास ९ वी च्या वर्गावर होता. वर्गात गेल्यावर मुलांमध्ये चर्चा तीच फक्त थोडी वेगळ्या अंगाने चालू होती. मुलं घाबरलेली नव्हती पण दबक्या आवाजात कुजबुज चालू होती. मी विचारल्यावर त्यातील एका धीट मुलाने उठुन सांगीतलं, "अरे दिदि, वो सोहन कोलीता को कुछ नहीं होगा। उसका बाप बहुत चालू है।" मला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थच लागत नव्हता. मला त्या मुलाने वापरलेले शब्द सुध्दा आक्षेपार्हच वाटले म्हणून मी विषय जास्त न वाढवता तिथेच थांबवला. पुढे महिनाभर त्या प्रकरणाचा तपास चालू होता. पण हाताला काहीच लागत नव्हते. बरं सोहनच्या वडिलांकडे १ कोटी रूपये देता येतील इतके पैसेही नव्हते. मग त्या लोकांनी सोहनलाच का उचलून नेलं असा प्रश्न पोलीसांना पडलेला होता.
http://www.ankurkolkata.com/images/wallpaper/Tea%20Garden%20in%20assam1322119323.jpg
साधारणत: दोन महिने उलटल्यावर सकाळी सकाळी शाळेत बातमी की सोहन कलीता सापडला आणि त्याला उल्फा करवी पळवून नेणारा त्याचा बापच होता. नंतर असंही समजलं की सोहनला एक मोठी बहिण होती की जिच्या सासरकडून तिला टी-गार्डनच्या मालकी हक्काचे पैसे मिळायचे. त्या टी-गार्डनच्या खंडणीच्या वादातूनच उल्फाच्या अतिरेक्यांकडून तिच्या नवर्‍याचा खून झाला होता. सोहनची विधवा बहिेण तिच्या दीड वर्षाच्या मुलाबरोबर त्याच्याच घरी म्हणजे वडिलांकडे रहात होती. तिला मिळणार्‍या पैशात सोहनच्या वडिलांना इंटरेस्ट होता. पण मुलगी काही त्यांना पैसे देत नव्हती म्हणून त्यांनी स्वत:च्या मुलालाच म्हणजे सोहनला उल्फावाल्यांकरवी पळवुन नेण्याचा कट रचला. त्यांना वाटलं की भावाच्या प्रेमापोटी बहिण त्याला सोडवण्यासाठी म्हणून पैसे देईल. पोलीसांनी पुष्कळ तपास केला. अगदी उल्फावाल्यांकडे त्यांच्या आतील कनेक्षन्सच्या मार्फत चौकशी केली. त्या लोकांनी हात वर केले. तेव्हा पोलीसांना संशय आला म्हणून त्यांनी मि. कलीतांच्या घरचा फोन टॅप करायला सुरूवात केली आणि एका दिवशी त्या पळवुन नेणार्‍या माणसांशी फोनवर बोलताना मि. कलीतांना पकडलं. तसंच त्या माणसांना पण पकडलं तर त्यांनी लगेच कबूल केलं की ह्यांनीच आम्हाला सुपारी दिली होती म्हणून.
http://www.hindustantimes.com/news/specials/popup/30_10_assam1.jpg
सोहनच्या वडीलांना पैसे तर नाहीच मिळाले पण तुरूंगात जायला लागलं. बरं नाचक्की झाली ती वेगळीच. त्याच बरोबर दोन महिने त्या उल्फावाल्यांबरोबर राहून सोहन एकदम ओव्हर स्मार्ट झाला......एकदम बदलला. त्याच्या वडीलांना पैशापुढे आपल्या मुलाच्या भवितव्याचं काहीच कसं वाटलं नाही. शाळेने म्हणजे प्रीन्सीपॉल बाईंनी पण एक चुकीचा निर्णय घेतला.........सोहनला शाळेतून काढलं. त्यांच्यावर इतर पालकांचं प्रेशर आलं. पण राहून राहून माझ्या मनात हेच येत होतं की केवळ दोन महिने त्या लोकांच्या सहवासात राहून तो बदलला आणि शाळेत इतकी वर्षे राहून जे संस्कार त्याने घेतले ते बदलले असं वाटत असेल तर शाळेला काय अर्थ राहीला? तिथे असताना अशा अनेक मुलांना वहावत जाताना पाहिलेलं आहे. पालकांशी बोलूनही अनेकवेळा उपयोग होत नसे. पालकांचं आपापल्या मुलांकडे झालेलं दुर्लक्ष हे खूप कारणीभूत आहे. खरंतर उल्फासारख्या अतिरेकी संघटनांकडे कोवळ्या वयाची मुलं कशी काय खेचली जातात हा मूळ प्रश्न आहे की जो सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहीजे असं मला वाटतं. गेल्या आठवड्यात गुवाहाटीत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकमत मधे आलेला हा लेख आसाम मधील सध्याच्या स्थितीवर अधिक प्रकाश टाकतो. आसाम सारख्या सीमावर्ती प्रदेशातील अतिरेक्यांचा धोका कितपत टळला आहे याची कल्पना वरवर पाहता येणार नाही. तरी सल्फांमुळे उघड उघड पसरत चाललेला द्हशतवाद, जीवघेणी, घृणास्पद सत्तास्पर्धा-पैशांची स्पर्धा आसामला उर्वरीत भारतापासून तोडेल की अजुन काही होईल हे काळच ठरवेल.

Thursday 19 July 2012

दिव्यांची आमावस्या!

http://www.flickr.com/photos/kshitijthakur/5993989684/
पूर्वी आषाढ आमवस्येपासून घराघरांत कहाण्यांची पुस्तकं बाहेर काढली जात आणि दिव्यांच्या अवसेच्या कहाणीपासून महिनाभर पुढे रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर, शुभंकरोती म्हंटल्यावर त्या त्या दिवसाची कहाणी वाचली जात असे. प्रत्येक वाराची किमान एक कहाणी तरी असेच. श्रावणातील प्रत्येक वारी कोणते ना कोणते व्रत करण्याची पद्धत त्यामुळे त्या व्रताचे महत्त्व किंवा ते व्रत कसे सुरू झाले, ते व्रत कसे करायचे, त्याव्रताने ने लोकांना कशाप्रकारे फायदा झाला, ज्यांनी ते व्रत मधेच सोडून दिले त्यांना कसा त्रास झाला इ. सर्व त्यात असे. पण दिव्यांची आमावस्या या दिवसाची कहाणी फक्त एकच दिवस वाचली जायची. दिव्यांच्या आमावस्येला घरातील सर्व दिवे (देव्हार्‍यातील चांदीच्या निरांजन-समई पासून ते कंदिला पर्यंत) घासून लख्ख केले जात. त्यांची पूजा केली जात असे. त्या दिवशीच फक्त कणकेचे गोड दिवे केले जायचे. संध्याकाळी घासून पुसून स्वच्छ झालेले दिवे लावल्यानंतर खूप सुंदर दिसायचे. मला दिव्याच्या आमावस्येची स्वच्छ घासलेले दिवे आणि कणकेचे गोड दिवे यांमुळे मजा वाटत असे. श्रावणातील पहिला दिवस जिवतीचा कागद देव्हार्‍यात लावून, तिची पूजा करून, कहाणी वाचून सुरू व्हायचा. मला त्या कहाण्या, कहाण्यांमधील विश्व खूप गंमतीशीर वाटायचे. मग इतर वेळी श्रावण नसतानाही कधी कधी मी त्या कहाण्या वाचत असे. 

http://www.flickr.com/photos/shree2much/3772798508/
त्यावेळीही आणि अत्तासुद्धा मी काही खूप कर्मकांड मानत नसे. पण मला त्या कहाण्या पंचतंत्रांतील गोष्टींसारख्या वाटायच्या. मी त्यातून माझं लॉजीक लावून काहीतरी शहाणपण उचलत असे. "आता दिव्याच्या आवसेचीच कहाणी बघा. राजाच्या सुनेने आपण चोरून खाल्ले त्याचा आळ उंदरांवर घेतल्याने उंदीर संतापले आणि त्यांनी तिची फजीती करण्यासाठी तिची चोळी पाहुण्यांच्या बिछान्यात टाकली. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी तिला घरातील लोकांनी घराबाहेर काढले. राजाची सून घरातील साफ सफाई करत असे. दिव्यांच्या आमावस्येला दिव्यांची लख्ख घासून पुसून पूजा करत असे. त्यावर्षी राजाची सून घरात नसल्याने दिव्यांच्या आमावस्येला राजाच्या घरातील दिव्यांची सफाई झालीच नाही. त्या दिवशी राजा प्रवासातून घरी परतत होता आणि विश्रांतीसाठी गावाबाहेरच्या झाडाखाली बसतो. तेवढ्यात त्याला त्या झाडावर बसलेल्या दिव्यांचे बोलणे कानावर पडते. गावातील सर्व दिवे त्या झाडावर एकत्र जमून गप्पा मारत असतात. सगळे दिवे आपली कशी छान स्वच्छता आणि पूजा झाली याचं वर्णन करत असतात. पण राजाच्या घरचा दिवा मात्र हिरमुसलेला असतो. कारण त्याची सफाई आणि पूजा झालेली नसते. मग तो सगळी हकीकत सांगतो. राजा घरी आल्यावर घडला प्रकार कोणी प्रत्यक्षा पाहीला आहे का याची शहानीशा करतो. त्यातच त्याला सुनेची चूक नसल्याचे समजते आणि मग तिला मेणा पाठवून बोलावून घेतले जाते. मग सगळे सुखाने नांदतात." मला ही गोष्ट इतकी गोंडस वाटते. इथे उंदरापासून दिव्यापर्यंत सगळ्यांना व्यक्तीमत्त्व दिलेलं आहे. यातूनच आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी अतिशय चांगल्या पद्धतीने कसे वागावे (अगदी निर्जीव वस्तू सुद्धा सजीव असल्यासारखे वागावे) हे अप्रत्यक्षपणे शिकवले गेलंय. अप्रत्यक्षपणे विश्वातील सर्व गोष्टींत चैतन्य असते हेच सांगीतलंय. पुन्हा खोटं बोलू नये, दुसर्‍यावर आळ ढकलू नये ही नितीमत्ता आलीच. त्याच बरोबर दिव्यांची सफाई म्हणजे साफसफाईचे महत्त्व आले. श्रावण महिना म्हणजे विविध व्रत वैकल्यांचा महिना. प्रत्येक दिवशी वाराप्रमाणे देवाची पूजा करून, देवाला विशिष्ट नैवेद्य दाखवून, त्या दिवसाची कहाणी वाचून साजरा करतात. मग या सुंदर अशा महिन्यांत घर देखिल स्वच्छ असायला हवं. श्रावण महिना पावसाचा महिना. दिव्यांची घासपूस करून ते देखिल स्वच्छ ठेवले तर छान पवित्र तर वाटतेच. पूर्वीच्या काळी अत्तासारखे विजेचे दिवे नसत. त्यामुळे तशी महिन्यातून एकदा दिव्यांची साफसफाई होत असेच. अगदी सध्याच्या विजेच्या दिव्यांच्या काळात विज कधी गायब होईल सांगता येत नाही तेव्हा दिवे तयार असलेले बरे. असा देखिल दुहेरी फायदा आहे. 

मला तर हे सगळे दिवस (म्हणजे नागपंचमी, बैलपोळा, दिव्याची आवस) म्हणजे त्या त्या प्राणी किंवा वस्तूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेले दिवस वाटतात. आपल्या हिंदू धर्मात वराहापासून सर्व प्राण्यांमधे देवत्त्व असल्याचे सांगीतले आहे. म्हणून ३३ कोटी देव आणि प्रत्येक देवाला आपापलं वाहन. म्हणजे त्या त्या देवा बरोबर त्या प्राण्याचीही पूजा होते. त्याचेही महत्त्व वाढते. सगळेच लोक हे पाळतात असं नाही पण आपली जीवनशैली, आपले सण (पूर्वीच्या स्वरूपातले) हे निसर्गाशी अधिकाधिक जवळीक साधणारे होते. सगळेच लोक काही बुद्धीमान नसतात. मग काही तात्वीक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्या अशा कहाण्या, देव, व्रत अशा माध्यमांतून पोहोचवणे उचित आहे असे वाटल्याने हे सगळे अस्तित्त्वात आले असावे असे मला वाटते. पण शेवटी मनुष्य स्वभावाचे दोष पूर्वीही होते आणि अत्तासुद्धा आहेतच. त्यामुळे कर्मकांडाचा विपर्यास केला जातो. साधारणत: श्रावण, भाद्रपद (गौ्री-गणपती), अश्विन (देविचे नवरात्र-दसरा), कार्तिक (दिवाळी) असे महिने आहेत. याच महिन्यांत अधिकाधिक महत्त्वाचे सण येतात. हे महिने पावसाळा आणि शेवटी थंडीची सुरूवात असे असतात. पावसाळ्यात वातूळ अन्न, जड पदार्थ नीट पचत नाही्त म्हणून वांगी, कांदा-लसूण (ह्यांचा वासही उग्र असतो) इत्यादी पदार्थ खाल्ले जात नव्हते. हे सर्व पाळणे यालाच चातुर्मास पाळणे असे म्हणतात. 

http://www.smsblaze.com/smstext/gatari-amavasya-sms/
आता जे लोक मांसाहारी आहेत ते सुद्धा चातुर्मासात मांसाहार तसेच मद्यपान करत नाहीत. पण जे मांसाहार करतात, मद्यपान करतात त्यांना ते आवडते फक्त एक पद्धत म्हणून चार महिने ते करायचं नाही. मग चार महिने मांसाहार करायला मिळणार नाही दारू ढोसायला मिळणार नाही म्हणून चातुर्मास चालू होण्याच्या एकच दिवस आधी हे सगळं वारेमाप खाऊन-पिऊन घ्यायचं. नेमका तो दिवस म्हणजे दिव्याची आमावस्या येतो. कित्येक वर्षं मला दिव्याच्या आमावस्येला "गटारी आमावस्या" देखिल म्हणतात हे माहीत नव्हते. ८-१० वर्षांपूर्वी समजले. तसे म्हणण्याचे कारणही समजले कारण जे लोक मांसाहार करतात, मद्यपान करातात ते लोक त्या दिवशी भरपूर खाऊन-पिऊन अक्षरश: गटारात देखिल लोळतील इतके देहभानही त्यांना रहात नाही. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर आल्यानंतर "गटा्री" हा प्रकार लोकांमधे किती पॉप्युलर आहे याचा प्रत्यय येतो. म्हणजे लोक एकमेकांना गटारीच्या शुभेच्छा देतात. काल दिवसभरात "गटारीच्या शुभेच्छा" असे कित्येक स्टेट्स बघीतले. म्हणजे आपला हिंदू समाज कुठुन कुठे चालला आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. ज्यांना मांसाहाराशिवाय होत नाही, मद्यपान आवडते त्यांनी ते सरळ सरळ करावे १२ महिने करावे. उगाचच आपल्या सणांना बदनाम करू नये असं वाटतं.

याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की नविन पीढीला हिंदूंच्या सणांची, साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवसांची किळस यावी. मग हेच का आहे हिंदू धर्मात मग जर दारू पिणं वाईट आहे तर मग आपण आपले सण कशाला साजरे करायचे? असे प्रश्न अनेक पालकांना त्यांच्या मुला-मुलींनी विचारले असतील. गणेशोत्सवाचे, नवरात्रोत्सवाचे, दहिहंडीचे, दिवाळीचे, होळी-धुळवड-रंगपंचमी, संक्रांतीचे देखिल तेच झाले आहे. गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीपुढे अश्लील गाणी लावून, लाऊड स्पीकरच्या भिंती लावून मद्यपान करून लोक हिडीस नाचतात. नवरात्रातही तोरण महोत्सवाच्या नावाखाली तेच चालू असतं. दिवाळीला इतके प्रचंड फटाके उडवायचे की सगळीकडे हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण करून ठेवायचे. मकर संक्रांतीला पतंगबाजी करण्यासाठी मांजांना काचेचे आवरण लावून पक्ष्यांचे जीव घ्यायचे. तसं पाहिलं तर गणपती उत्सव, नवरात्र हे घरच्या घरी साजरे केले जाणारे सण. देश पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी जनतेला इंग्रज सरकार विरूद्ध एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यात जागृती घडवण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. ते स्वरूप देखिल खूप विधायक होते. दिवाळीतही पूर्वी पणत्या, आकाश दिवे, सुगंधी तेल-उटणं लावून अभ्यंग स्नान इ. गोष्टी होत्या. फटाके उडविणे हा प्रकार नव्हताच. सध्या जरी मकर संक्रांतीला पतंगबाजी चालू असली तरी हे आपल्या मूळ संस्कृतीत सांगीतलेलंच नाही. पतंग उडविणे, काचेच्या आवरणापासून मांजा बनवून पतंगांची काटा-काटी हे सगळं अरब देशांतून मुघलांबरोबर आलेलं आहे. कोणतीही गोष्ट थोडक्यात केली तर ठीक आहे. त्याचा अतिरेक झाला की त्रास होतो. सध्याच्या हिंदू सणांचं एकूणच स्वरूप बघता आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून किती दूर भरकटत चाललो आहोत याची कल्पना येईल. पुढच्या पिढीकडे आपण नक्की कोणता सांस्कृतिक ठेवा देऊन जाणार आहोत याचाही विचार आपण केला पाहीजे असं वाटतं.