Thursday 21 October 2010

मुक्त होणे...

छायाचित्र महाजालावरून साभार
(खालील उतारा श्री जे कृष्णमुर्ती यांच्या "टु बी फ्री" या इंग्रजी उतार्‍याचे भाषांतर आहे. मागे खूप वर्षांपूर्वी मी कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्राच्या मुख्य कार्यालयात गेले असताना तिथेच काच फलकात मला हा इंग्रजी उतारा दिसला. तो वाचल्यावर मला एकदम खूप काही गवसल्यासारखं वाटलं आणि मी तो माझ्या डायरीत लिहून घेतला. आजही मला अस्वस्थ वाटत असेल तर मी ताबडतोब हा उतारा वाचते आणि मन शांत होतं. असं काय आहे या उतार्‍यात? वाटलं तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावं. म्हणून हे भाषांतर करते आहे.)
*********************************************************************************
मुक्त (फ्री) होण्यासाठी आपल्याला आपल्याच आत असणार्‍या सगळ्या परावलंबित्वावर (डीपेन्डन्सी) मात करावी लागेल. जर आपल्याला हेच समजलं नाही की आपण असे इतरांवर अवलंबुन का आहोत तर आपण आपल्या परावलंबित्वावर मात करू शकणार नाही. आपल्या मुक्तीचा मार्ग हा आपण परावलंबी (डीपेन्डट) का आहोत हे समजलं तरच उघडेल नाहीतर आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाही. पण मुक्ती म्हणजे काही फक्त एक प्रतिक्रीया नाही. पण प्रतिक्रीया म्हणजे काय? जर मी काही तुम्हाला लागेल असं बोललो म्हणजे तुम्हाला नावं ठेवली तर तुम्ही माझ्यावर चिडाल. हे चिडणं म्हणजे प्रतिक्रीया की जी परावलंबित्वातुन जन्मलेली आहे. स्वातंत्र्य (इंडीपेन्डन्स) ही अजुन एक प्रतिक्रीया झाली. पण मुक्ती ही काही प्रतिक्रीया नाही. म्हणूनच जोपर्यंत आपल्याला प्रतिक्रीया म्हणजे नक्की काय हे समजत नाही आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत आपण कधीच मुक्त होणार नाही.
     एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? एखाद्या झाडावर प्रेम करणं किंवा एखाद्या पाळीव प्राण्यावर प्रेम करणं किंवा एखाद्या पक्ष्यावर प्रेम करणं म्हणजे नक्की काय हे माहीतेय? जरी ते झाड तुम्हाला सावली, फळं असं काहीच देणार नसलं तरी ते तुमच्यावर अवलंबुन नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या झाडाची, त्या पाळीव प्राण्याची किंवा पक्ष्याची तुम्ही काळजी घेता, त्याला खाऊ-पिऊ घालता, त्याची नीगा राखता. यालाच प्रेम असं म्हणतात. आपण असं निरपेक्ष प्रेम कधीच करत नाही. आपल्यापैकी कित्येकांना हे असं प्रेम म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. कारण आपलं प्रेम हे मुख्यत: राग, लोभ, मोह, मद, मत्सर, भिती यांच्याशी निगडीत असतं. यामुळेच आपण आपल्या आतून प्रेम करून घेण्यावर पराकोटीचे अवलंबुन असतो. आपण फक्त प्रेम करून तिथेच सोडून देत नाही पण परतफेडीची अपेक्षा करतो आणि या अपेक्षेमुळेच आपण परावलंबी बनतो.
      म्हणून मुक्ती आणि प्रेम हे हातातहात घालून जातात. प्रेम ही काही प्रतिक्रीया नाही. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता म्हणून मी तुमच्यावर प्रेम केलं तर तो एक केवळ व्यापार होईल, एक अशे गोष्ट की जी बाजारात खरेदी केली जाते. ते प्रेम नव्हे. प्रेम करणं म्हणजे त्याबदल्यात काही मागणं नव्हे. अगदी असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे की तुम्ही काहीतरी देता आहात. अशाच प्रकारच्या निरपेक्ष प्रेमाला मुक्ती जाणून घेता येते. पण आपल्याला यासाठी शिक्षण मिळतच नाही. आपल्याला गणित, रसायनशास्र, भूगोल, इतिहास याचं शिक्षण मिळतं आणि तिथेच ते थांबतं देखिल. कारण तुमच्या पालकांची काळजी ही फक्त तुम्हाला चांगली नोकरी मिळणे आणि तुम्ही आयुष्यात यशस्वी होणे यासाठीच असते. जर त्यांच्याकडे पैसा असेल तर ते तुम्हाला परदेशात पाठवतील, पण सगळ्या जगासारखाच त्यांचाही हेतू हाच असतो की तुम्ही श्रीमंत बनावं, तुम्हाला समाजात एक मानाचं स्थान असावं; जेवढं वर तुम्ही जाल तेवढे जास्त तुम्ही इतरांच्या दु:खासाठी कारण बनता. कारण त्याठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला इतरांशी स्पर्धा करावी लागते, अगदी निर्दयी व्हावं लागतं. पालक आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतात की जिथे महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा आहे पण प्रेम आजीबात नाही. आणि म्हणूनच आपल्यासारखा समाज सतत संघर्षात आणि गोंधळलेल्या अवस्थेत जातो आहे. म्हणूनच आपल्या देशातील राजकिय नेते मंडळी, न्यायमूर्ती आणि तथाकथित आदरणीय विद्वान जरी सतत शांततेच्या गप्पा करत असले तरी त्या शब्दाला फारसा अर्थ प्राप्त होत नाही.
 **************************************************************************
 


Saturday 16 October 2010

स्वातंत्र्याचे लेखक - फ्रीडम रायटर्स!!

(छायाचित्र महाजालावरून साभार)
१९९२ साली लॉस एंजलीस, कॅलीफोर्नीयामधील विविध वांशिक गटांमधील दंगलींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शिक्षण मंडळ, कॅलीफोर्नीया हे लॉस एंजलीस मधील एका नामांकीत शाळेत एक धाडसी शैक्षणिक अभ्यासक्रम चालू करते. इंटीग्रेटेड स्कूल प्रोग्रॅम असे त्या अभ्यासक्रमाचे नाव. ह्या अभ्यासक्रमाचा उद्देश हा फारसे शाळेत न गेलेले, काही कारणामुळे याआधीच शाळांना रामराम ठोकलेले, विविध कारणांमुळे तुरूंगात गेलेले, रस्त्यवर राहणारे अशा विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून त्यांना पुढचे शिक्षण घेण्यास उद्युक्त करणे हा असतो. या वर्गात विविध एथनिसीटी असलेली म्हणजेच कृष्णवर्णीय, कंबोडीयन, मेक्सीकन, हिस्पॅनिक, व्हाईट अशा विविध वंशांची मुलं-मुली असतात. या मुलांना शिकवण्यासाठी एक नवी अतिशय तरूण इंग्लीश शिक्षिका येते. हे काम तिने स्वेच्छेने स्विकारलेलं असतं कारण तिला या मुलांना शिकवण्यात रस असतो. पहिल्याच दिवशी शाळेची उपमुख्याध्यापिका तिला त्या मुलांची वर्गातील परिस्थिती आणि त्यांचे गुण याविषयी सूचना देऊन सावध करते. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या शाळेतून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा सोडून जाणे आणि शाळेची पत कमी होणे यासाठी या अभ्यासक्रमाच्या मुलांना जबाबदार धरलेले असते. त्यांना शिकण्याची इच्छाच नाहीये, त्यांना शिस्त नाहीये वर्गात कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते यासारख्या कानपिचक्या देऊनच उपमुख्याध्यापिका तिला तिचे शिकवण्याचे नियोजन बदलायला सांगतात. सुरूवातीचे काही दिवस वर्गात आणि वर्गाबाहेर अक्षरश: राडा म्हणजे प्रचंड मारामारी म्हणजे अगदी गोळीबाराच्या तयारीने मुलं येणं  इत्यादी होते. तिला त्यामुळे या मुलांना शिकायला प्रवृत्त कसं करायचं हेच लक्षात येत नसतं. त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यात अधिक रस निर्माण व्हावा म्हणून ती पुष्कळ प्रयत्न करते आणि शेवटी तिच्या लक्षात येतं की जोपर्यंत त्यांना त्यांच्या आयुष्याशी निगडीत, त्यांना समजून घेईल असं जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांना शिक्षणात रस वाटणार नाही. ती त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न करते. त्यांना खेळांच्या माध्यमांतून, वेगवेगळी चांगली पुस्तकं वाचायला देणं, बाहेर ट्रीपला घेवून जाणं, मुझीयम्स ना भेटी देणं, बाहेर एकत्र जेवायला घेऊन जाणं असे अनेक नवनविन उपक्रम करते. यात शाळेकडून तिला कोणतीच मदत मिळत नाही कारण त्यांचं सगळ्यांचं मत असतं की ह्या मुलांना शिकवणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे.
    या सिनेमात एखादा चांगला शिक्षक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांना शिक्षणात रस वाटावा यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण दाखवलं आहे. या चित्रपटातून अमेरिकेसारख्या सांस्कृतिक आणि  वांशिक विविधता असलेल्या राष्ट्रात या विविध गटांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र, नविन शैक्षणिक प्रयोग, शिक्षकांचं मानसशास्त्र, समूहाचं मानसशास्त्र यासगळ्याचं उत्तम दर्शन घडवलं आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्या मुलांसाठी ती इंग्लीश शिक्षिका काय काय करते, त्या प्रयोगांचा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर तसेच त्या शिक्षिकेच्या वैयक्तीक आयुष्यावर काय परिणाम होतो? त्यातील किती विद्यार्थी पुढच्या अभ्यासक्रमांना जातात हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा. चित्रपट १९९९ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असून त्याचे दिग्दर्शक आणि लेखक रीचर्ड लाग्राव्हेन्सी हे आहेत.
    योगायोगाची गोष्ट अशी की अशाच प्रकारची घटना १९९९ च्या सुमारास मी एका शाळेत शिकवत असताना माझ्या आयुष्यात घडून गेली. त्यासगळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या.  मी त्यावेळी आसाम मधील एका शाळेत गणित शिकवत होते. मलाही त्यावेळी एक आव्हान म्हणून आणि मुद्दाम अभ्यासात कच्च्या, आत्मविश्वास नसलेल्या, सर्व शाळेत डफर याच संबोधनाने परिचित असलेला वर्ग दिला होता. गंमत म्हणजे त्यांची तुलना कायम त्यांच्या पुढे एक वर्ष असलेल्या वर्गाशी केली जात असे. यासगळ्याचा परिणाम त्या वर्गाच्या मानसिकतेवर, आत्मविश्वासावर, अभ्यासावर, गुणांवर न झाला असता तरच नवल. मला त्यांना यासगळ्यातून बाहेर काढून जमेल तसं गणित शिकवायचं होतं. बरं तो वर्ग इयत्ता नववीचा वर्ग होता. म्हणजे मला त्यांच्यावर काम करायला जेमतेम एक वर्षाचा कालावधी होता. मला वर्गातील मुलांनी सांगीतलं की गेल्या दोन वर्षांत एकूण ८ गणिताचे शिक्षक बदलले आणि मी आठवी. अशाप्रकारे शिक्षक सोडून जाण्याने किंवा बदलल्याने त्याचा मुलांच्या मूलभूत संकल्पना निर्मितीवर प्रचंड वाईट परिणाम होतो. त्याचा प्रत्यय तर मला येतच होता. मी त्या वर्गाची क्लास टिचर होते. त्यासगळ्या प्रकारात अजुन एक मेख होती की एका स्थानिक टिचरला (की जो दोन वर्षांपूर्वी त्याच शाळेत शिकवत होता पण त्याच्या गैरवर्तनामुळे त्याला शाळेतून कमी केले होते) त्या शाळेत इंटरेस्ट होता. त्याला शाळेतल्याच काही शिक्षकांचीही साथ होती. म्हणूनच दोन वर्षांत त्याने ७ शिक्षकांना पळवुन लावलं होतं. मला मुद्दामच त्या ठीकाणी टाकलं होतं. हळूहळू विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करून, त्याचवेळी त्या स्थानिक शिक्षकाने केलेल्या काड्यांना तोंड देत मी माझं काम चालू ठेवलं. काही वेळा मुख्याध्यापिकांची साथ होती काहीवेळा नव्हती. एक-दोन वेळा मला धमक्या मिळाल्या की स्थानिक वर्तमानपत्रात तुमच्या बद्धल बदनामीकारक मजकूर छापू वगैरे पण मीही यासगळ्याला धैर्याने तोंड दिलं. आता मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येतं की तेवढं बळ मला माझ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जुळलेल्या बंधांमधुन मिळालं होतं. केवळ त्यांचं नुकसान होवू द्यायचं नाही आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचा येवढंच एक ध्येय डोळ्यांसमोर होतं. त्यावेळी केवळ अभ्यास आणि गणितच नाही तर मी अगदी त्यामुलांना राष्ट्रभक्तीपर गीतं सुद्धा शिकवुन गायला लावली होती. आमच्या सगळ्यांमध्ये एक वेगळाच बंध निर्माण झाला होता. त्याचा शेवट फक्त एकाच प्रसंगात सांगते म्हणजे कल्पना येईल, मी ज्यावेळी पुण्याला परत यायला निघाले त्यावेळी पूर्ण वर्ग त्यांच्या गणवेषात मला सोडायला बस स्थानकावर आला होता. हे असलं दृष्य मी माझ्या आयुष्यात आणि त्या गावाने सुद्धा पहिल्यांदाच अनुभवलं होतं. अजुनही मी त्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्यातील अपेक्षित सुधारणा होण्यास मी एक निमित्तमात्र झाले ह्यातच मला आनंद वाटतो. नाहीतर आपण इतके सामान्य असतो की फारसं काहीच करू शकत नाही. असो.
"फ्रीडम रायटर्स" हा चित्रपट पाहीला नसेल तर जरूर पहा. एक उत्तम प्रतिचा उद्बोधक असा चित्रपट अशी मी त्याची गणती करते. चित्रपटाचं आणि त्या सत्य घटनेवर आधारित कादंबरीचं नाव फ्रीडम रायटर्स का आहे हे चित्रपट पाहील्यावरच समजेल.

Wednesday 13 October 2010

**रेशीमगाठी**


रेशीमगाठी, म्हंटलं तरी करकचून आवळता येत नाहीत आणि जर खरेच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी सुटत नाहीत. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या परिचयातून, प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा अगदी व्यवस्थित कांदेपोहे खाऊन बांधलेल्या असोत.... आपल्या भारतीय संस्कृती मध्ये या रेशीमगाठी बर्‍याच वेळा इतक्या करकचून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि पर्यायाने त्या पूर्ण कुटुंबाचा बळी दिला-घेतला जातो. लग्नबंधनात अडकलेली अनेक जोडपी असंही म्हणताना आढळतात की लग्नाआधीच बरं होतं, लग्नं करून पस्तावलोय/पस्तावलेय इ.इ. जेव्हा एकत्र रहाणं अशक्यच होतं तेव्हा काहीजण कायद्याचा आधार घेवून वेगळे होतातही.....पण असं करून (खरं पाह्यला गेलं तर) त्यांचे प्रश्न कितपत सुटलेले असतात किंवा वाढलेले असतात हे त्यांच त्यांनाच ठावुक. लग्न न केलेले किंवा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमातून फारसं यश न लाभलेले, स्वत:चं स्वत:च न जमवता आलेले अनेक जण आजूबाजूला दिसतात. काही जणांची गाडी ही नको-ती/ हा नको तो असं करत करत लग्न करण्याच्या/जमवण्याच्या वयाच्या स्टेशन वरून कधीच सुटलेली असते. कारणं काहीही असोत हे सगळं आपल्याला आपल्या समाजात पहावयास मिळतं. वधुवर-सूचक मंडळांच्या नोंदवह्या आणि  मॅटर्निटी नर्सिंग होम्स मधील नोंदी (खर्‍या दाखवल्या तर) ह्या तर समाजाच्या खर्‍या प्रगतीचा आरसाच असतो. कारण संपूर्ण समाज जीवन वैयक्तिक जीवनाशी सांगड घालत तिथेच गुरफटलेलं असतं. वधू-वर सूचक मंडळांमधील नोंदवल्या गेलेल्या उपवर वधु-वरांसाठीच्या (अवाजवी) अपेक्षा असोत किंवा गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या असोत हे सगळंच एकमेकांत बांधलं गेलं आहे. कितीही वैयक्तिक असा म्हटला तरी अतिशय सामाजिक आणि तितकाच ज्वलंत विषय. 
आपल्या सगळ्यांनाच उपवर अशा वधू आणि वर या दोघांच्या आणि त्यांच्या  आई-वडीलांच्या वाजवी-अवाजवी अपेक्षा माहिती आहेत त्यामुळे त्या इथे लिहीणे हा या लेखाचा हेतू अजिबात नाही. खरंतर अशा पद्धतीच्या अपेक्षा, त्यानंतर येणारा फोलपणा, लग्न करायच्या आधी त्या उपवर मुला-मुलींची लग्न म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात किंबहुना ते का करायचं? किंवा करायचंच की नाही? ह्या सगळ्या बाबतीत पुरेसा विचार झालेला असतो का? हा एक मोठा प्रश्न आहे. काही जणांना लग्न म्हणजे उत्तमोत्तम दाग-दागिने, कपडे घालून विविध प्रकारच्या केशरचना करून स्टेजवर मिरवणे असंच वाटत असतं. उपवर मुला-मुलींच्या पालकांना त्यांच्या स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातून मिळालेला बहुमूल्य शहाणपणा (??) आपल्या मुला-मुलींबरोबर वाटून घ्यावा, त्यांच्याशी याबाबतीत अतिशय मोकळेपणाने बोलावं असंच वाटत नाही. त्यामुळेच तर खरं ९९% प्रश्न निर्माण होतात/झालेले असतात. 
मागे काही वर्षांपूर्वी मला एका नेट-मित्राची इ-मेल आली होती. मला म्हणजे ती त्याने सगळ्यांनाच ग्रुपवर पाठवली होती. इ-मेलचं शीर्षक होतं अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड आणि तशीच काही अंशी कथाही जुळवली होती. पण मला यातली अ‍ॅलीस कोण आणि वंडरलॅन्ड काय हे लक्षात आल्याने त्याला प्रतिसादाची मेल  लिहिली......"आखूड शिंगी बहुदुधी अशी गाय मिळणं अवघडच. आपल्या प्राथमिकता आपणच ठरवायच्या (अगदी आई-वडीलांना थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी) त्या प्राथमिकतां प्रमाणे निर्णय आपला आपणच घ्यायचा. जेव्हा एखादा निर्णय आपणच घेतलेला असतो तेव्हा आपसूकच त्याची जबाबदारी आपणच उचलतो आणि जर आपण तेवढे समजुतदार असू तर घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून तो टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:हून अधिक प्रयत्न करतो. यातच आपण मोठं (ग्रो) होत असतो." मला ताबडतोब त्याचं उत्तर आलं, "माझ्या इतक्या सगळ्या संपर्कां मधुन, मित्र-मैत्रिणीं मधुन फक्त तूच माझी इ-मेल खर्‍याअर्थाने वाचलीस आणि समजून घेतलीस. मला उत्तर आवडलं". व्यक्ती विचारी असेल तर बर्‍याचवेळी हा सगळा विचार चालू असतो फक्त निर्णय घेण्यासाठी दोन शब्दांचं पाठबळ कुठलाही निर्णय न-सुचवता दिलेलं (हे महत्त्वाचं) लागतं. पण बहुतांशी उपवर मुलं-मुली या सगळ्याचा विचार करताना दिसत नाहीत. साहजिकच लग्न होवून आणि न होवून सुद्धा प्रश्न सुटत नाहीतच.
    पुण्यात साथ-साथ म्हणून परिचयोत्तर विवाह जुळवणारी एक संस्था आहे. वर संशोधनाची अपेक्षा कमी पण संस्थेविषयी कुतुहल अधिक म्हणून मी सुद्धा कधीतरी त्या संस्थेची पायरी चढले होते. मला तिथे दिला जाणारा एक फॉर्म बर्‍यापैकी भावला. म्हणजे त्याने वधु-वर शोधायला प्रत्यक्षपणे कितपत मदत होते ते माहीत नाही (कारण यात कितीही गणित आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नसतो., आवडी-निवडी जुळणे, विचार जुळणे याची मोजदाद करून हिशेब करून लग्न जुळवता येत असतं तर चहापोहे काय वाईट?) पण स्वत:चे विचार स्वत:लाच समजायला, ते पक्के व्ह्यायला मदत होते हे नक्की. मला तर वाटतं सगळ्या उपवर मुला-मुलींनी अगदी पूर्णपणे साथ-साथ स्टाईल मध्ये फॉर्म भरण्यापेक्षा एकदा स्वत:चा खुंटा बळकट करण्यासाठी स्वत:च एक स्वाध्याय करावा. त्यात पहिल्या टप्प्यात स्वत:च्या, इतरांच्या, आई-वडीलांच्या अपेक्षा लिहून काढाव्यात. (हा प्रयोग प्रामाणिकपणाने आणि स्वत:च एकट्याने करावा). मग त्यातील महत्त्वाच्या अशा दहा अपेक्षा शॉर्टलिस्ट कराव्यात. त्यांची पुन्हा एकमेकांशी तुलना करून पहावी म्हणजे एक असेल आणि एक नसेल तर काय वाटेल? इ. अशाप्रकारे तुलना केल्यावर त्या दहा अपेक्षा उतरत्या क्रमाने मांडाव्यात. त्यातील पहिल्या पाच अपेक्षा (म्हणजे याशिवाय चालूच शकणार नाही) पहाव्यात. त्यावर पुन्हा विचार करावा आणि मगच पुढे काय ते ठरवावं. मग अपेक्षां मध्ये अगदी काळ्या-गोर्‍या रंगा पासून ते घरची आर्थिक परिस्थिती, करीअर नोकरी ते बौद्धिक पातळी, सवयी, आवडी-निवडी (या सगळ्यां मध्ये केवळ नुसत्या अपेक्षाच ठेवून उपयोग नसतो तर स्वत: कडे सुद्धा तेवढ्याच चिकित्सेने आणि तटस्थपणे पहायला जमलं पाहीजे.......नाहीतर बर्‍याचवेळा अनेकजण नुसत्याच अपेक्षा करतात)याचा समावेश असावा.
    आता चष्मा नको ही एक महत्त्वाची (?) अट असते. मग एखाद्याला/एखादीला लग्नानंतर चष्मा लागला तर काय घटस्फोट घेणार? गंमतच आहे.  चोखोबांच्या "ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा" ह्या शिकवणुकीचा पार बोर्‍या वाजवत लोकांना कायम बाह्य रंगाने काळी मुलगी नको असते.......मग एखाद्या गोर्‍या मुलीचं अंतरंग कितीही काळं असलं तरी......पत्रिका बघणे आणि त्यातून मंगळ आहे म्हणून नकार तर कांदेपोह्यांपर्यंतचा प्रवासच दुर्धर करून टाकतो तर काही जण मुलगी पाहिल्यानंतर मंगळ आहे असे कारण पुढे करतात. अगदी दोन एकाच जाती मधल्या कुटुंबांत सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात म्हणून मुलगा/मुलगी विशिष्ट जातीतीलच पाहीजे यासाठी हट्ट धरण्यात मतलब आहे की नाही हे आपणच ठरवावे. आहार हा काही जणांना कळीचा मुद्दा वाटू शकतो कारण शाकाहारी व्यक्तींना मांसाहार अजिबात चालतच नसेल (म्हणजे समोर सुद्धा पहावत नसेल) तर अवघड होवून बसतं. खरंतर पत्रिका पहाणे, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शहरं [पुण्यासारख्या शहरात (अमुकच पेठेत किंवा भागात), मुंबईत अमुक एकाच लाईनवर (वेस्टर्न दादर वगैरे उत्तमच पण बोरीवली, अंधेरी वेस्ट, चांगलं, मालाड ठाणा डोंबिवली चालेल शिवडी, सायन, चुनाभट्टी नकोच. पनवेल खूपच लांब आहे], परदेशातील स्थळे यांसारख्या इतर अनेक उपविषयांची अपेक्षा या अंतर्गत चर्चा करायची असल्यास प्रत्येकी एक एक प्रकरण सहज लिहीता येईल.
१) कांदेपोहे पद्धतीत काहीच मुद्दे एखाद्या व्यक्तीचे दिसू शकतात. उदा. बाह्यगोष्टी, शिक्षण, नोकरी (खरी  माहिती दिल्यास), घरची पार्श्वभूमी (जुजबी........प्रत्यक्ष लग्न करून घरात गेल्याशिवाय कोणाचेच खरे स्वभाव कळत नाहीत)
२) प्रेमविवाहात सुद्धा प्रेमाने आंधळे झाल्यामुळे काही गोष्टी दिसत असून न-दिसल्या सारख्या होतात आणि मग लग्नानंतर डोळे उघडू शकतात.
३) परिचयोत्तर विवाहात यातील काही धोके कमी असतात. आपल्याला व्यक्तीशी बोलता येतं (व्यक्ती प्रामाणिक असेल तर अनेक गोष्टी बोलून ताडता येऊ शकतात), व्यक्तीच्या देहबोलीवरून डोळ्यांच्या हालचालीवरून व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही हे समजू शकते.
४) रंग, रूप, नोकरी, पैसा, स्टेट्स, पत्रिका, राहण्याचे विशिष्ट ठिकाण, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शिक्षण, सिनेमातील विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री सारखेच दिसणे, एखादा खेळ येणे, एखादी कला येणे, स्वयंपाक करता येणे, पैसे भरपूर कमवून आणावेत, अती शिकलेली आणि करिअरिस्टिक मुलगी नको, श्रीमंत आई-बापांची एकुलती एक असली तर चांगलं आहे, एकच भाऊ असेल तर आदर्श स्थळ नाही, एक बहीण चालेल पण जास्त बहिणीच आणि भाऊ नाही म्हणजे त्या मुलीची घोड चूक आहे (हे मुलींच्या बाबतीतले) तर मुलावर कोणाची जबाबदारी नको, स्वतंत्र फ्लॅट असल्यास प्राधान्य, स्वत:ची गाडी हवी, एकुलता एक मुलगा सोन्याहून पिवळं, एक बहीण उत्तम, एक भाऊ चालेल, जास्त भाऊ नकोतच (हे मुलांच्या बाबतीतले) यासगळ्या भाऊगर्दीत आरोग्य, स्वभाव, चारित्र्य ह्या गोष्टी हरवलेल्या असतात. आपण वरील गोष्टींचा विचार नक्की का करतो? लग्न हे कशासाठी करतात? म्हणजे आपल्याला सर्वार्थाने जोडीदार हवा असतो, त्याच्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं असतं. वरील मुद्दे हे विचार करण्यासारखे नक्कीच आहेत पण प्राधान्य क्रम नक्की कोणता असावा हे आपलं आपणच ठरवा. जो काही निर्णय घ्याल तो कुठल्याही फॅन्टसी मधे घेऊ नका. आयुष्याची सत्य खूप वेगळी असतात.
वरील अधिकाधिक मुद्द्यांमध्ये फारसा दम नसला तरी याच गोष्टीं मध्ये रेशीमगाठी अडकलेल्या असतात.  एक मात्रं खरं की जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे. त्यात एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम (केवळ शारीरिक आकर्षण नाही) हे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. त्यात दोघांनी मिळून सर्व जबाबदार्‍या पार पाडणे, घरातील कामं वाटून घेणे या गोष्टी ओघाने आल्याच. त्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते. ताणण्याने काहीच साध्य होत नसतं पण जोडून सामोपचाराने राहण्यातच खरी कसोटी आणि यश दडलेलं असतं हे महत्त्वाचं. दोघांनीही आपापल्या आणि एकमेकांच्या घरच्यांना समजून घेऊन (घरच्यांनी सुद्धा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं) दोन घरं खर्‍या अर्थाने जोडावीत. या सगळ्याचा अधिक विचार व्हावा असं मला वाटतं. उपवर मुला-मुलींनी अतिशय  वस्तुनिष्ठपणे  या सगळ्याचा विचार केला पाहीजे आणि आपल्या रेशीमगाठी करकचून न-बांधल्या जाता घट्ट आपोआप कशा होतील यावर भर दिला पाहीजे. स्वत:च्या प्राथमिकता स्वत:च ठरवून जबाबदारी घेण्यास शिकलं पाहीजे येवढंच मनापासून सुचवावंसं वाटतं.