Friday 25 June 2010

घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का?

(नम्र निवेदन: अमृतयात्री गटाच्या श्री सलील कुलकर्णी यांनी शुध्दलेखनातील बदल सुचवले आहेत .तसेच  श्री प्रमोद देव यांनी मनोगत च्या शुध्दलेखन तपासण्याचा आधार घेवून थोडी मदत केली. या दोघांचेही आभार!)

 दि. १२ जूनच्या दैनिक लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये "घरीच शिक्षण किंवा होमस्कूलिंग" या संकल्पनेवर आधारित ‘घरात शाळा’ हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची ’पायवाट’ हा वंदना अत्रे यांचा आणि ’शिकतं घर’ हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहिती सांगणारा, असे तीनही लेख वाचनात आले. सर्व शिक्षण अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरुवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या लेखांच्या परीक्षणामध्ये करत आहे.

तशी होमस्कूलिंग ही संकल्पना आपल्याकडे नवीन नाही. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांना त्या काळातील शालेय शिक्षण खूपच तोकडे वाटत असल्याने आणि त्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन करण्याऐवजी शिक्षक त्यांच्यावरच आगपाखड करत असल्याने दोघांनाही घरीच स्वतंत्रपणे शिकवण्यास शिक्षक येत असत. अमेरिकेत ही संकल्पना राबविणारे पालक सुद्धा एकेक विषय शिकवायला स्वतंत्र शिक्षक ठेवतात. इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या नियतकालिकात असे ’होमस्कूलिंगसाठी शिक्षक पाहिजेत’ अशा भरपूर जाहिराती असतात. मला आठवतंय एका जाहिरातीत तर चक्क नमूद केलेलं होतं की “रोज जेवण करताना आमची मुलांबरोबर विविध विषयांवर चर्चा होते. तर इच्छुक उमेदवाराने आमच्याच बरोबर कुटुंबात राहावे आणि मुलांबरोबर त्या चर्चांमध्ये सहभाग घ्यावा.”

माझा पहिला प्रश्न याच गोष्टीशी संबंधित आहे. वर उल्लेखलेल्या लेखांमधील उदाहरणांत आणि मी दिलेल्या उदाहरणांत घरीच शिक्षण या व्यतिरिक्त अजून एक साम्य आहे. ते म्हणजे त्यांची घरची पार्श्वभूमी. या सर्व उदाहरणांतील पालक धनिक आणि अत्यंत सुशिक्षित किंबहुना उच्चशिक्षित आहेत. रविंद्रनाथ टागोर आणि विक्रम साराभाई यांचे पालकांनी त्यांना स्वत: भले शिकवलं नाही पण स्वतंत्र शिक्षक ठेवले. सखी बोरकर, सहल कौशिक, प्रल्हाद यांच्याबाबतीत त्यांचे पालक त्यांना शिकवत होते. वेळप्रसंगी स्वतंत्र शिक्षकही नेमले. काहीं आई नाहीतर वडील यांनी स्वत:चा व्यवसाय, करिअर बाजूला ठेवून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी खूपच वेळ दिला आहे. माझ्या परिचयातील पुण्यामधील जालनापूरकर नामक कुटुंबीयांनीसुद्धा आपल्या मुलांना असेच होमस्कूलिंग दिले आहे. या सर्व पालकांनी आपल्या ज्ञानाच्या उपयोगाबरोबरच इंटरनेटवर मोफत उपलब्ध असलेल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्याचा, आणि संदर्भांचा उपयोग केला आहे असे दिसते. मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होवू नये यासाठी विशेष काळजी घेऊन त्यांच्याच आपल्याच घरात विविध उपक्रम राबवून, इतर मुलांना आपल्याच घरी बोलावून, मुलांचे समवयस्क मुलांमध्ये मिसळणे सुकर करणे, त्यांना विविध छंदवर्ग, खेळ यांसाठी पाठवणे अशाही पूरक गोष्टी केलेल्या दिसतात. हे सगळं शक्य झालं ते केवळ पालकांकडे असलेला पैसा आणि पालकांचे उच्चशिक्षित असणे या वस्तुस्थितीमुळे. याला अपवाद डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांचा. चतुरंग मध्येच त्यांच्या मुलाने, अमृत अभय बंग याने, त्यांच्याविषयी लिहिलेला लेख वाचनात आला. अमृतला सुध्दा होमस्कूलिंगच मिळालं. त्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर कष्ट घेतले. त्याचे पालकही उच्चशिक्षित पण तरीही त्यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्य करून तेथील आदिवासींसाठी काम करून आपल्या मुलांमध्येसुध्दा समाजाचे ऋण फेडण्याची प्रेरणा निर्माण केली. पण जिथे ह्या गोष्टी नाहीत; म्हणजे पालक धनिक नाहीत, सुशिक्षित नाहीत किंवा अल्पशिक्षित आहेत; तिथे हे घरीच शिक्षण शक्य आहे का? या संकल्पनेचा मुलांवर शैक्षणिक दृष्ट्या जरी सकृद्दर्शनी चांगला परिणाम दिसत असला तरी इतर दूरगामी परिणामांचं काय? या मुलांना अगदी समवयस्क मुलांना घरी आणून सोशलाइज करण्याचा प्रयत्न केला तरी त्या मुलांमध्ये “मी कोणीतरी विशेष” ही भावना कशावरून वाढीस लागलेली नसेल? सध्याच्या परीक्षाकेंद्रित शिक्षणपद्धतीमध्ये मुलं शाळेत जातात ती ते फक्त परीक्षांमध्ये गुण मिळवण्यास असाच काहीसा अर्थ निर्माण झाला आहे. तसेच एकूणच शिक्षणाचा, शाळांचा दर्जा ढासळलेला आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतात स्थायिक होणार्‍या किंवा उच्चशिक्षित पालकांनाच काय पण सामान्य पालकांना सुद्धा मुलांच्या भवितव्याची चिंता असणं साहजिक आहे. पण होम स्कूलिंग हा पर्याय किती व्यवहार्य आहे याचाही विचार व्हायला हवा असं मला वाटतं.

आपल्याकडे ज्या पद्धतीच्या शाळा मिशनरी लोकांनी सुरू केल्या त्या पाश्चात्य शिक्षणपद्धतीवर आधारित होत्या. अमेरिका-युरोप मध्ये जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे त्यांचे शैक्षणिक धोरणही बदलत गेले. जशा आपल्याकडे सुधारणा होत गेल्या तशा अमेरिकन शैक्षणिक पद्धतीतील बदलाचे वारे काही वर्षांचे अंतर ठेवून आपल्याकडेही वाहू लागले. आता पूर्वीच्या तुलनेत जागतिकीकरणामुळे अमेरिकेत जाऊन राहणार्‍या भारतीयांचे प्रमाण तसेच अमेरिकेत काही वर्षं काढून भारतात स्थायिक होणार्‍याचं प्रमाण वाढत असल्याने आपल्याकडील काही सामाजिक स्तरांमध्ये हे बदलाचे वारे लगेचच येतात. अमेरिकेत सर्वांना समान शिक्षण देणे या संकल्पनेवर आधारिरीत पण औद्योगिक जगताशी जोडली गेलेली गोष्ट म्हणजे विविध वयोगटांप्रमाणे वर्गांची विभागणी आणि घाऊक पद्धतीने सगळ्यांना शिक्षण देणे. त्यात प्रत्येक मूल स्वतंत्र क्षमतेचं असतं ही संकल्पना लक्षातच घेतली नव्हती. ही संकल्पना आता खूपच जोर धरीत आहे. तसेच काही ठिकाणी ही विभागणी गुणांवर आधारित करण्यात आली. जसजसे या सगळ्यांचे तोटे लक्षात यायला लागले तसतसे अमेरिकन शिक्षणपद्धतीमध्ये आणि पर्यायाने सगळ्याच फर्स्ट वर्ल्ड देशांतील शिक्षण पद्धतींमध्ये बदल होत गेले. त्यात तंत्रज्ञानातील प्रगतीने अधिकच भर टाकली. पाश्चात्य देशांत काही शाळांमध्ये तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप (उर्ध्वपट) वापरायला दिला जातो. कित्येक ठिकाणी दूरस्थ शिक्षणपद्धतीचे वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत. त्यातच मग एम आय टी सारख्या नामवंत विद्यापीठांनी आपल्या शिक्षकांना/प्राध्यापकांना ते वापरत असलेले किंवा त्यांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य, मजकूर महाजालाच्या (इंटरनेटच्या) साहाय्याने जे विद्यार्थी प्रत्यक्ष तिथे प्रवेश घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी खुला केला. शालेय पातळीवर सुद्धा मग शैक्षणिक संसाधनांचे साठे (लर्निंग ऑबजेक्ट रिपॉझीटरीज) तयार करण्यात आले. अशा साठ्यांची माहिती असलेले सर्वच जण म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक असे सगळेच त्यांचा वापर करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याची गरज वेगळी, त्याला शिकावं असं वाटेल तो वेळ प्रत्येकाचा वेगळा या अशा संकल्पना अस्तित्वात आल्या. अमेरिकेत सगळी अंतरं खूप लांब आहेत. त्यामुळे एका विद्यार्थ्याचा शाळेत जाण्याचा खर्च आर्थिक आणि वेळ यादृष्टीने खूप. म्हणजे विद्यार्थ्याच्या स्वतंत्र गरजेनुसार शिक्षण द्यायचं असेल तर एका व्यक्तीसाठी एक शिक्षक शाळेत येणं हे सुद्धा परवडणारे नाही. ढासळलेली कुटुंबव्यवस्था. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अमेरिकेत डी-स्कूलिंग म्हणजेच शाळेत न पाठवण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यातूनच होमस्कूलिंग ही संकल्पना जन्माला आली आहे. एका विशिष्ट वयापर्यंत सगळ्याच मुलांना शाळेत शिकणं बंधनकारक असल्याने जे खूप श्रीमंत नाहीत अशांची मुलं सरकारी शाळांमध्ये जातात. होमस्कूलिंग ही संकल्पना तिथे सुद्धा धनिक आणि उच्चशिक्षित पालकांमध्ये अधिक प्रचलित आहे.

शाळेत मुलांनी एकत्रं शिकणे हे त्यांच्या निकोप वाढीसाठी अत्यावश्यक मानलं गेलं आहे. मुलं ही समवयस्क मुलांकडून खूप काही शिकत असतात. पूर्वीच्या काळी घरांमध्ये एकत्र कुटुंबपद्धतीमुळे अनेक भावंडं असायची त्यामुळे जरी घरी शिक्षक शिकवायला आले तरी मुलांना मिळून-मिसळून राहण्याचं शिक्षण मिळत असे. अगदी पूर्वी आपल्याकडच्या गुरुकुल पद्धतीमध्ये सुद्धा या सगळ्याचा सखोल विचार झालेला आढळतो. त्यामध्ये अगदी राजपुत्रांपासून ते गरीब ब्राह्मणांची मुलं गुरूगृही राहून एकत्रितपणे शिक्षण घेत असत. गुरुजी प्रत्येक शिष्याच्या क्षमतेनुसार त्याला शिक्षण देत. त्यामुळे राजपुत्रांचे पायही जमिनीवर राहण्यास मदत होत असे. सर्वांना सर्व प्रकारची कामं करायला लागत असत. वयाने मोठे असलेले विद्यार्थी आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना मदत करत असत.

त्याच्या बरोबर उलट सध्याची परिस्थिती आहे. संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे तसेच लोकसंख्या विस्फोट, आर्थिक विवंचना या सगळ्या कारणांमुळे प्रत्येक घरात एक ते दोन मुलं असतात. पण हे सुद्धा मध्यमवर्गीय सुशिक्षित घरांतील चित्रं आहे. मग विद्यार्थ्यांना जर समवयस्कांकडून शिकायची, त्यांच्यात मिळून-मिसळून राहायची संधीच मिळाली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर होतील असं नाही का वाटत? अशा पद्धतीने शिक्षण घेतल्याने ती मुलं स्वत:विषयीच्या तयार झालेल्या अवास्तव संकल्पना बाजूला ठेवून पुढे समाजात मिसळतील का इथपासून शंका येते. बरं, भारताच्या तुलनेने अमेरिका हा श्रीमंत देश आहे. तिथली पाश्चात्य संस्कृती ही मुळातच व्यक्तिकेंद्रित आहे. त्यामुळे तिथे अशा संकल्पनांनी जोर धरला तरी त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीने तसा फरक पडत नाही; उलट ते पोषकच ठरते. पण भारतासारख्या पदोपदी विषमतेच्या दर्‍यांचं दर्शन होत असलेल्या कुटुंबकेंद्रित, समाजकेंद्रित संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सामाजिक विषमतेमध्ये वाढीस भर घालणारी आणि व्यक्तिकेंद्रित संस्कृतीकडे नेणारी पद्धत कितपत सयुक्तिक आहे? होमस्कूलिंग ही संकल्पना जरी चांगली आणि परिणामकारक वाटत असली तरी आपल्या देशातील एकूण परिस्थिती बघता तिचा आपल्या देशात विस्तार होणं अवघडच आहे. काही मोजकी धनिक आणि उच्चशिक्षित कुटुंबच हे करू शकतील. तंत्रज्ञानातील प्रगतीने आणि त्या अनुषंगाने उपलब्ध व्यावसायिक संधींमुळे आय.टी. आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढते आहे. आय.टी. मधील पालकच आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये घालत आहेत. त्यातील काही जणांना होमस्कूलिंग हा पर्यायही चांगला वाटेल आणि शक्यही असेल. पण इतर मुलांचं काय?

त्या दृष्टीने विचार करता मला ’शिकतं घर’ ही संकल्पना आपल्या देशाच्या नाळेशी घट्ट नाते सांगणारी वाटली. ह्यात सुद्धा जागरूक आणि सुशिक्षित पालक यांचाच सहभाग आहे. मग इतर मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्या देशात सुद्धा महाजालाचा (इंटरनेटचा) वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मग प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शाळांनीच या तंत्रज्ञानाचा वापर का करून घेऊ नये? तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यामागचा एक मोठा उद्देश आहे जगातील विविध समाजांत, देशांत जी विषमतेची दरी आहे ती कमी करणे. याचा उपयोग आपल्याला महाकाय लोकसंख्या आणि प्रचंड विषमता असलेल्या देशात करता आला तर खूप चांगले होईल. तंत्रज्ञान, संगणक यांचा वापर शालेय स्तरावर करणे याचा अर्थ शिक्षकांची जबाबदारी किंवा काम कमी करणे असा होत नाही. उलट शिक्षकांनी पूरक म्हणून त्याचा विचार करावा आणि स्वत:चा अधिक विकास घडवून आणावा असे वाटते. संगणक आणि महाजाल याचा सयुक्तिक वापर खरंतर आपल्या देशातील शहरी-ग्रामीण, गरीब- श्रीमंत यांमधल्या शैक्षणिक दर्जातील दरी कमी करण्यास मदतगार ठरू शकते. शैक्षणिक दर्जा सुधारणे हे सर्वस्वी आपल्या हातात (जनतेच्या) आहे. आपण जर उत्तमतेचा ध्यास घेतला आणि उत्तमतेची कास धरली तर दर्जा घसरण्याऐवजी वाढेलच यात शंका नाही. डी-स्कूलिंग, होम स्कूलिंग सारख्या संकल्पना जरी चांगल्या आणि परिणामकारक वाटल्या तरी त्याचे दूरगामी आणि आपल्या संस्कृतीवर होणारे परिणाम आणि आपल्या विषमतेने भरलेल्या समाजात त्याचा परिणामकारक विस्तार कितपत होवू शकतो यांची चर्चा व्हायलाच हवी असे वाटते.

Wednesday 23 June 2010

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा!!



 (निवेदन: काही महिन्यांपूर्वी हा लेख लिहीला होता आणि तो इ-सकाळ मध्ये पैलतीर सदरात छापून आला होता. अर्थातच काही मजकूर वगळून. काहींना त्यावर प्रतिसाद लिहायचा आहे म्हणून त्यांनी मला तो लेख शतपावलीवर टाकण्याचा आग्रह झाला म्हणून टाकते आहे. त्यामुळे लेखाचा संदर्भ हा साधारणपणे सप्टेंबर २००९ ह्या कालखंडातील आहे. हे कृपया लेख वाचताना ध्यानात घ्यावे. त्यावेळी एका महाशयांनी प्रतिक्रीया लिहीली होती की उगाच आमचा वेळ कशाला वाया घालवता? आम्हाला (अमेरीकेतील भारतीयांना) भाजपं मध्ये काय चालू आहे याच्याशी काहीही देणंघेणं नाही. कशाला असले फाल्तू लेख पैलतीर वर छापून आम्हाला पकवता इ. आशय. त्यांना मी दिलेलं उत्तर मात्रं इ-सकाळच्या अतिशय दक्ष प्रतिक्रीया संपादकांनी छापलीच नाही. कारण त्यात त्यांचं पितळ उघडं पडणार होतं. मी लिहीलं होतं की मी लेख सकाळ कडे दिला होता. तो छापायचा की नाही आणि कोणत्या सदरात छापायचा हे त्यांनी ठरवलं ...मी नव्हे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर तेच देवू शकतील. चुकून जर त्या महाशयांनी पुन्हा एकदा हा लेख वाचला (शक्यताच आहे) तर त्यांनी माझं त्यावेळीचं न-छापलेलं पण मी लिहीलेलं उत्तर वाचावं. म्हणजे त्यांच्या शंकेचं समाधान होईल. )



लोकसभेच्या निवडणुकी नंतर भाजपमध्ये जी दुफळी दिसली त्यामुळे आणि सध्याच्या घडामोडींमुळे हे सत्य बाहेर आले कि भाजपमध्ये बरेच अजीर्ण झाले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कि काय हळूहळू एकएक गोष्टी बाहेर पडत आहेत. मला असं वाटतं कि हे जे काय अजीर्ण बाहेर पडणे आहे ते एकदाचे होऊन जावूदेत म्हणजे मग सगळ्यांनाच बरे वाटेल. अनेकांची मधूनच उफाळून येणारी मळमळ थांबेल. आता वसुंधराराजे या (अहम्पित्तावर) आम्लापित्तावर पण काहीतरी उपाय करायला हवा. कारण राजस्थान भाजपला त्याचा चांगलाच प्रसाद मिळाला आहे.
मला आपले एकच वाटते कि मा. अडवाणीन सकट सगळ्यांनी पुन्हा एकदा तीस वर्षांपूर्वीच्या भाजपच्या स्थापनेच्या उद्दिष्टाकडे मागे वळून त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे सर्वच ज्येष्ठांनी नुसतेच राममंदिर बांधण्याच्या घोषणा न देता श्रीरामामधील खरे खुरे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाहीतर भाजपवरच "राम" म्हणायची वेळ यायची. आपले राजकीय उत्तराधिकारी वेळेत तयार करणे हे एक दूरदृष्टीचे आणि मोठ्या मनाचे निदर्शक आहे. काही वेळा मला आसे जाणवते कि सोनिया गांधीना रामाचे काही गुण समजले आहेत. म्हणजे त्यांचा उद्देश काही रामासारखा उदात्त वगैरे नाही आहे पण भरताला अयोध्येचे राज्य जसे रामाने चालवायला दिले म्हणजेच भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका नेल्या त्यांच्या नावाने राज्य चालवायला त्याप्रमाणे सोनियांनी आपल्यापाशी चालत आलेली सत्ता मनमोहनरूपी भरतासाठी सोडली आणि कोणत्याही पादुका वगैरे न देता सगळी अप्रत्यक्षपणे सत्ता आपल्याच हातात ठेवली. त्या दृष्टीने बघता सोनियांना राम थोडा तरी कळला (या भारतभूमीच्या मातीचा गुणधर्म दुसरा काय) पण पूर्णपणे नाही, नाहीतर त्या इटली मधील वनवासात नसत्या का निघून गेल्या. खरंतर या त्यांच्या कृतीला सध्याच्या भाषेत खरे राजकारण म्हणतात. जे रामाने काधीच केले नाही.
ग दि मांच्या गीत रामायणामधील "पराधीन आहे जगती...." हे गीत जेंव्हा जेंव्हा मी ऐकते तेंव्हा तेंव्हा मला एकच प्रश्न पडतो कि आपल्या रामाने म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांनी इतक्या उच्च कोटीचे वैश्विक (ग्लोबल) तत्वज्ञान सांगितले आहे कि ते अखंड विश्वात सगळ्या भूतमात्रांना उपयोगी पडेल (अगदी सध्याच्या मायकल जॅक्सनच्या भूताला सुद्धा) तरी सुद्धा आपल्याच देशातील कॉंग्रेस आणि समाजवादी, साम्यवादी लोकांना प्रभू रामचंद्रांचे वावडे का? जर चुकूनमाकून येशू ख्रिस्ताने आणि पैगंबराने संस्कृत भाषा शिकण्याचा शहाणपणा (इतर जर्मन विद्वानान सारखा) पूर्वी केला असताच तर त्यांना दोघानाही हे पटले असते आणि त्यांनी या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यास सुरुवात केली असती. ते त्या ख्रिस्त धर्मप्रसारक लोकांना सोपे सुद्धा गेले असते भारत देशामध्ये त्यांचे हात पाय फारसे कष्ट न घेता पसरता आले असते. त्याचप्रमाणे मुहामद पैगंबराच्या चेल्यांनी जगभरात जी काही कत्तल केली ती पण झ्हाली नसती. त्या बाबराने सुद्धा प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान वरील मंदिरही फोडले नसते आणि गेली दोन दशके जे राजकारण या मंदिर बांधण्यावरून चालू आहे ते पण घडले नसते. या जगात सगळीकडे रामराज्यच आले असते. त्याचप्रमाणे ब्रिटीशांनी भरतीय उपखंडावर राज्यं केलं नसते आणि फाळणी पण झाली नसती. जिनांचा प्रश्न आला नसता आणि भाजप मध्ये पण फाळणी झाली नसती. केवढी मोठी साखळी आहे नाही.
या गीताच्या सुरुवातीलाच प्रभू रामचंद्रांनी झालेल्या सगळ्या घटनां मध्ये (रामायणातील) दोष कुणाचा नसून या भूतलावर मानव हा पराधीन आहे आणि जे विधिलिखित आहे ते होतच असते. आपण फक्त निमित्त मात्र असतो. मग दोष कैकयीमातेचा पण नाही की वडिलांचाही नाही. सगळं जे आहे ते आपल्या पूर्व कर्मानुसारच होते आहे. काय लाख मोलाचा विचार मांडला आहे. भाजपमध्ये सध्या सगळ्यांनी जरा असा विचार करून आपल्याच पूर्व कर्मांचा आढावा घेतला तर फारच बरे होईल. त्याचप्रमाणे सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी देखील आपल्या सध्याच्या कृती करताना हे विसरू नये आणि स्वहिताच्या गोष्टी सोडून लोकहिताच्या गोष्टीच कराव्यात. नाहीतर पुन्हा पुढच्या निवडणुकांच्या वेळी त्यानाही हाच अनुभव येईल. त्यांनी सुद्धा हा कर्म सिद्धांत विसरू नये.
तसेच दुसऱ्या कडव्या मध्ये जे सांगितले आहे ते तर बावनकशी सोनेच. "अंत उन्नतीचा पतनी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत". अमेरिकन राज्यकर्त्यांनी (विशेषतः दोघे बुश आणि त्यांचे चेले) त्याच प्रमाणे जे जे जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहेत (सगळे धर्मांध मुस्लीम अतिरेकी, चीन, उत्तर कोरिया इत्यादी) त्या सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हवे कि जिथे कळस होतो तिथेच पायापण रचला जातो. हेच तत्वज्ञान महाभारतातहि सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्यांनी या गोष्टीचे वेळीच भान ठेवणे जरुरीचे आहे. नाहीतर तालिबान आणि अल कायदा हे जसे अमेरिकेवरच उलटले तसेच यांनी सत्तेच्या हव्यासापोटी तयार केलेले भस्मासुर त्यांनाच राख करतील. आपल्या भारत देशाच्या प्राचीन संस्कृती मध्ये इतके उच्च कोटीचे आणि सत्य सांगितले आहे तरी सुद्धा आपल्याकडच्या अनेक विद्वानांना (??) भिकेचे डोहाळे लागलेले असतात (रोमिला थापर सारख्या) ज्यामुळे ते भारतीय प्राचीन संस्कृतीमधील जे काही आहे ते सगळंच वाईट आणि पाश्चात्य संस्कृतीत जे काही आहे तेच फक्त चांगलं असा समज करून घेतात आणि आयुष्यभर भारतीय संस्कृतीच्या मागे हातधुवून लागतात.
पुढच्या कडव्या मध्ये तर आगदी या जीवनाचे सारच सांगितलं आहे. " जीवा बरोबरच त्याचा मृत्यू सुद्धा जन्मतो, जे जे दिसते ते सगळेच विश्व नाशवंत आहे, वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा". आता मला असा प्रश्न पडतो कि २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत सरकारने काहीच कशी कारवाई केली नाही?? याचे मूळ या तत्वात आहे. भारतीयांनी हे तत्व चांगलंच आत्मसात करायला हवं कि जे जे जन्माला आले आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे फारसं दुःख आणि कारवाईची अपेक्षा न करता आपले आयुष्य नियमितपणाने चालू ठेवावे. यातच सगळ्यांचे भले आहे. त्याच बरोबर या राजकारणी लोकांनी सुद्धा हे तत्व कधीच विसरू नये. कोणीच अमरत्व घेऊन आलेले नाही. आता भारतीय जनता दुःखात आणि हालाखीच्या परिस्थितीमध्ये राहते, बऱ्याच ठिकाणी लोक अन्नाअभावी भुकेने तडफडून मरणाला सामोरे जात आहेत पण प्रभू श्रीरामांनीच सांगितलं आहे " जरा मरण यांतून सुटला कोण प्राणी जात? दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात? " त्यामुळे जरी जनता अर्धपोटी राहिली तरी जनतेने प्रभू रामचंद्रांचे सांगणे प्रमाण मानावे अशी राजकारणी लोकांची कृती असते. प्रभू रामचंद्रांनी सांगितलेले तत्वज्ञान तर हे लोक अप्रत्यक्षपणे पाळतात पण मग त्यांच्या मंदिराला या राजकारण्यांचा विरोध का हेच समजत नाही?
अटलबिहारी वाजपेयींचे निवृत्त होणे हे कधीतरी होणारच होते. त्याच प्रमाणे बऱ्याच ज्येष्ठांना लवकरच निवृत्त व्हावे लागणार आहे. तेंव्हा राष्ट्रहित आणि पक्षहित लक्षात घेवून अनेकांनी इतर नवीन व्यक्तीं साठी वाट मोकळी करावी असेच सुचवावेसे वाटते. शेवटी आपण सगळे पराधीन असलो तरी सुद्धा कर्म सिद्धांतानुसार आपले कर्म हे महत्वाचे आहेच. आणि ते डोळसपणाने करावे हीच सदिच्छा.
भाजपशी विशेष जवळीक असल्याने तसेच राष्ट्रप्रेम हे प्रथामिकतेने महत्वाचे असल्याने हे प्रेमाने चुचकारणे आहे. म्हणजेच घरचा आहेर. त्यामुळे राग मानू नये.

Saturday 19 June 2010

माझे शाकाहार पुराण - भाग २


आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या  हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

पर्वाच पावसाळी विशेषांकात एक शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.
जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. ह्य उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात अश्या ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.
पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापा पासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं.  ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?
याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.
माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

माझे शाकाहार पुराण - भाग १

 मांसाहाराशी ओळख

http://healthveda.com/wp-content/uploads/2012/01/vegetarian-food.jpg
मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.
माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.

मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.
आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना पूर्ण शाकाहारी लोक असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.
पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मा पासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो. मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स?

पुढच्या भागात या बाय रीलीजन की बाय एथिक्स की आणखी काही या संदर्भातील विविध युक्तीवाद मांडेन.

Wednesday 2 June 2010

प्रत्यक्ष मृत्युशी सामना - एक अविस्मरणीय आठवण!



 लहानपणी शाळेत असताना निंबंध लेखनासाठी हमखास विषय असायचा "माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आठवण" वगैरे. त्यावेळची गंमत अशी की तो पर्यंत माझ्या आयुष्यात अविस्मरणीय असा एकही प्रसंग घडलाच नव्हता. त्यामुळे तो विषय मी नेहमीच  टाळत असे. जर खरा अविस्मरणीय प्रसंग नसेलच तर काय बोडक्याचं लीहीणार?  पण पुढे एम एस्सी झाल्यावर तसा एक प्रसंग घडलाच.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एम एस्सी झाल्यावर लगेच नाशिक जिल्ह्यातील वनवासी भागात वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाच्या निमित्ताने मी राहीले होते. त्याच सुमारास एका बैठकी साठी म्हणून गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सुरगाणा तालुक्याच्या एका अति दुर्गम भागात जाण्याचा योग आला. बैठक होती सुरगाणा या तालुक्याच्या गावी होती. बैठक आटोपली की तिथुनच पुढे गुही ह्या केंद्रावर जाण्याचं अचानकच ठरलं. गुही हे ठिकाण अश्या जागी आहे की जिथे नाशिकहून दुपारी बारा वाजता दिवसातून फक्त एकच बर्डीपाडा ही बस जाते  आणि ती गुही ला पोहोचायला साधारणपणे संध्याकाळचे सात वाजतात. तिथून नाशिकला परत येण्यासाठी साधारणपणे सकाळी साडेसातला एकच बस असते.
२७ जून १९९६ ची गोष्ट आहे. बैठक संपून सुरगाण्याला बस पकडे  पर्यंतच दुपारचे दोन वाजले. थोडा थोडा पाऊस पडणं चालूच होतं. संध्याकाळी सहा च्या सुमारास बस गुही पासून साधारणपणे ३ किमी वरच थांबली. कारण पावसाने पुढचा रस्ता वाहून गेला होता आणि रस्त्याच्या जागी पाण्याचा प्रचंड लोंढा वहात होता. गाडी जाणं शक्य नसल्याने आम्हाला तिथंच उतरून पुढे तीन किमी चालत जावं लागलं. संध्याकाळची वेळ असल्याने आणि गर्द दाट जंगल असल्याने थोडी भितीच वाटत होती. पण गप्पा मारत मारत आम्ही ३-४ जण गुहीला अंधार पडे पर्यंत पोहोचून गेलो. त्यारात्री तिथे प्रचंड जोराचा पाऊस पडला. आमचा गुहीला येण्याचा कार्यक्रम अचानक ठरल्याने बरोबर तसे कपडे वगैरे पण आणले नव्हते. माझ्याकडे फक्त एक छोटी पर्स आणि रेनकोट येव्हढंच काय ते सामान होतं. रात्रीचा पावसाचा जोर पाहून तिथल्या लोकांनी सांगीतलं की आता इकडे बस येणारच नाही. तेव्हा इथेच रहा. नाहीतर परत जाण्यासाठी गुही पासून बारा किमी अंतरावर उंबरठाण या ठिकाणाहून बस पकडावी लागेल. ती सुध्दा सुरगाण्या पर्यंत. सुरगाण्यापासून बस मिळायला अडचण नव्हती. आम्ही उंबरठाण पर्यंत १२ किमी चालत जायचं ठरवलं.
त्यामुळे सकाळी सकाळी आठ वाजता मी आणि माझ्या बरोबर १७ वर्षांचा वनवासी मुलगा बाळू असे आम्ही उंबरठाण साठी निघालो. आकाश एकदम निरभ्र आणि हिरवाईतून डोकावणार्‍या सुंदर सोनेरी किरणांचा लपंडाव अश्या सुंदर वातावरणात आम्ही त्या घनदाट जंगलातून आमचा परतीचा प्रवास चालू केला. वातावरण खूपच अल्हाद दायक असल्याने आम्ही रमत गमत जंगलातील नागमोडी रस्त्याने चाललो होतो. बाळू जंगलातल्या मस्त गंमती-जमती सांगत होता. जंगलातून चालण्याचा अनुभव किती सुरेख असतो, तिथल्या वनस्पती, विविध पक्षी...त्यांचे मंजुळ स्वर, नागमोडी ओहळ , प्रचंड उंच आणि घनदाट झाडी यांचं सौंदर्य या सगळ्याचा आस्वाद न घेता रूक्षपणे किंवा अतिशय नेहमीचा रस्ता असल्यासारखं भासवुन चालणं मला तरी शक्य नव्हतं. आमच्या रमत गमत चालण्याने आम्हाला चांगलाच उशीर झाला. म्हणजे उंबरठाणला आम्ही ११ वाजेपर्यंत पोहोचायचं असा बेत होता तरी साडे अकरा वाजले तरी आम्ही उंबरठाणच्या आसपास पण पोहोचलो नव्हतो. साधारणत: पावणे बाराच्या आसपास आम्ही एका खिंड सदृष्य जागी येवून पोहोचलो. बाळू आधीच गंमतीने म्हणाला, "ताई इथे जंगलात भर दुपारी बाराच्या सुमाराला बिबटे दिसतात". मी पण गंमतीने म्हणाले, "मग येवू देत की आपण काय घाबरतो का काय?" बाळूने सांगीतलं की उंबरठाण आता फक्त ३ किमी अंतरावर आहे. आम्ही जवळ जवळ ९ किमी अंतर गप्पा मारत मारत चाललो होतो. शहरातील असल्याने मला चालायची सवयच नव्ही. त्यामुळे हे ९ किमी मला खूपच वाटले. थोडा वेळ बसण्यासाठी म्हणून आम्ही खिंडीतल्या एका मोठ्या शीळेची निवड केली. आणि त्यावर एकमेकां समोर तोंडं करून बसलो. साधारण बारा वाजलेच होते. आम्ही अश्याच गप्पा मारत त्या खिंडीचं निरीक्षण करत बसलो. खिंड साधारण पणे ३००-४०० मीटर लांब असेल आणि खिंडीच्या उंबरठाण कडच्या दिशेच्या टोकाला एक दरी होती आणि दरीच्या समोरच मोठा डोंगर आवासून उभा होता. त्या दरी आणि डोंगर यांच्या मधुनच उंबरठाण कडे जाणारा रस्ता पुढे जात होता. मी गुही च्या दिशेला म्हणजे आम्ही ज्या दिशेने आलो त्या दिशेला तोंड करून तर बाळू उंबरठाणच्या रस्त्याच्या म्हणजेच दरी-डोंगराच्या मधुन जाणर्‍या रस्त्याच्या दिशेला तोंड करून असे बसलो.
अचानक बाळू मला म्हणातो, "ताई, तुमच्या मागे बघा". मी पण सहज मान वळवली आणि बघते तो काय एक बिबट्या त्या दरीतून सावकाश पण दमदार पावलं टाकत रस्त्यावर येत होता. माझ्या आयुष्यात पहील्यांदाच मी असलं जंगली जनावर प्रत्यक्ष (म्हणजे पिंजर्‍यात नसलेलं....पूर्णपणे मोकळं) पहात होते. बिबळ्या दृष्टीस पडताच माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि मी शीळेवरून मोठी उडी मारून रस्त्यावर उभी राहीले. हे सगळं माझी बिबळ्या पाहील्यावरची प्रतिक्षीप्त क्रीया घडल्या सारखं घडलं. बाळूने मला लगेच बजावलं," ताई ओरडू नका आणि आजीबात हालचाल करू नका". बाळूचे शब्द नुसतेच माझ्या कानावर आदळत होते. माझं सगळं लक्ष बिबट्याकडेच होतं आणि मी स्तब्द झाले. निवांतपणे दरी चढणारा बीबळ्या माझ्या किंचाळण्याच्या आवाजाने रस्त्याच्या मध्येच थांबून आमच्याकडे पहायला लागला. तो आमच्या कडे पहात होता आणि आम्ही तो काय करतोय याची वाट बघत त्याच्या कडे पहात होतो. आमच्या कडे बाळू कडच्या एका छत्री शिवाय आणि माझ्या रेनकोट शिवाय दुसरं काहीच नव्हतं. प्रतिकार करायचा तरी तो करण्यासाठी काहीच नव्हतं. बरं पळून जायचं तर तो आमच्या मागे पळत येवून दोन मिनीटात आमचा फडशा पाडला असता. त्या दोन मिनीटात माझ्या मनाची निर्वीचार अवस्था झाली होती. तो काय करतोय या कडेच आमचं लक्ष होतं. दोन मिनीटं आमचा अंदाज घेतल्यावर बिबळ्याच्या बहुधा लक्षात आलं की त्याला आमच्यापासून काहीच धोका नाहीये. म्हणून त्याने त्याची डोंगराची वाट धरली आणि तो डोंगरात दिसेनासा झाला.
बिबळ्या तर निघून गेला. आम्हाला काही क्षण हायसं वाटलं. मग लक्षात आलं, की त्याने तर आपल्याला पाहीलं आहे मग आपण उंबरठाण कडे चालायला लागल्यावर डोंगरावरून बिबळ्याने आपल्या अंगावर उडी घेतली तर? बिबळ्या समोर असताना जेव्हढी भीती वाटली नाही तेव्हढी तो गेल्यावर वाटायला लागली. बिबळ्या समोर असताना निदान माझ्यात तरी कुठुन बळ आलं होतं त्याच्या कडे पहात राहण्याचं हे मला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. कदाचित आता आपण वाचणार नाही ही ९९% खात्री असल्याने शेवटंचं आपल्या मृत्युला डोळेभरून पाहूया असं वाटून आणि मग ती मनाची निर्वीचार अवस्था यांमुळे समजलंच नाही. पुन्हा गुहीच्या दिशेने उलट जायचं तर ९ किमी ची पायपीट होती. शेवटी आम्ही दोघांनीही ठरवलं जर आपलं मरण बिबळ्याकडून तेही इथेच लिहीलेलं असेल तर ब्रह्मदेव सुध्दा आपल्याला वाचवु शकणार नाही. आणि हेच जर आपलं मरण आत्ता नसेलच तर काही झालं तरी ते बदलणार नाही. मनाचा हिय्या करून आम्ही उंबरठाणच्या दिशेने चालायला सुरूवात केली. साधारण १ किमी अंतर चालून गेल्यावर आम्हाला डोंगराच्या कपारीत एक गुहा दिसली. कदाचित ती गुहा त्या बिबळ्याचीच असावी असा अंदाज बांधून आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. बाळू कडुन त्यावेळी समजले की बिबळे किंवा वाघ जर भुकेले असतील किंवा त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे असे वाटले तरच आपल्यावर हल्ला करतात. किंवा मादी बिबळ्या, वाघीण असेल तर पील्लांसाठी म्हणून भूक नसताना आणि त्यांच्या जीवाला धोका नसला तरी आपल्यावर प्राणघातक हल्ला करतात. उंबरठाणमध्ये आल्यावर आम्हाला असं समजलं की त्याच खिंडीत एक महीन्यापूर्वी एका माणसाला बिबळ्याने फाडला होता. तो माणूस जखमी अवस्थेत हॉस्पीटल मध्ये दाखल होता. अजुनही बर्‍याच खर्‍या खोट्या कथा उंबरठाण मधील गावकर्‍यां कडून ऐकायला मिळाल्या.
तिथुनच सुरगाणा आणि सुरगाण्याहून कळवण अश्या गाड्या पकडुन आम्ही कनाशीला सुखरूप पोहोचलो. उंबरठाण ते कनाशी या प्रवासात आम्ही एकमेकांशी एकही शब्द बोललो नाही. त्या बिबळ्या भेटीने मला तरी खूपच आंतर्मुख केलं होतं. त्याच बरोबर जर बिबळ्याने हल्ला केला असता तर काय झालं असतं हा विचार मनात घर करून बसला होता. कनाशीला आल्यावर रात्री मला प्रचंड थंडी वाजून ताप भरला......हे सगळं "बिबळ्याने हल्ला केला असता तर....." च्या भीतीचा परिणाम होता. त्या रात्री मी अंगावर ६ कांबळी घेवून आणि ३ ब्रुफेन्च्या गोळ्या घेवून झोपले ती डायरेक्ट दुसर्‍या दिवशी रात्रीच उठले. मी त्यावेळी अत्यंत बारीक असल्याने माझे वडील अजुनही गंमतीने म्हणतात की बिबळ्याने विचार केला ह्या वाळकुडीला खाऊन मला हाडंच चघळायला मिळतील. मग काय उपयोग? म्हणून त्याने आमच्यावर हल्ला केला नाही.  :-)

मला वाटलेल्या भीतीचा भाग सोडता त्या प्रसंगाने मला आयुष्याच्या क्षणभंगुरतेची साक्षच पटवुन दिली. त्यामुळे आयुष्याकडे अधिक गांभिर्याने पहाण्याचा आणि ते अधिकाधिक समृध्द कसं करता येईल याचा नवा दृष्टीकोन मिळाला.